-अशोक राणे
एका विशिष्ट परिस्थितीत किंवा अगदी कोंडीतच सापडलेली माणसं ही लेखक, दिग्दर्शकांना फारच आवडणारी असतात. अशा परिस्थितीत ही माणसं कशी जगतात, कशी वाट काढत राहतात याचं जर नैसर्गिक कुतूहल असेल, तर काहीतरी अतिशय संवेदनशील, सखोल, प्रगल्भ असं अनुभवता येतं.
टोरोण्टो महोत्सवात आयर्लण्डच्या ‘रोझी’ या चित्रपटाने याचाच प्रत्यय दिला.
चित्रपटाला शीर्षक पुरवणारी रोझी हीच कथानायिका आहे. कोंडीत ती एकटीच सापडलेली नाही. सोबत नवरा पॉल आहे आणि चार मुलं आहेत. त्यांच्या भाड्याच्या राहत्या घरातून घरमालकाने त्यांना रस्त्यावर आणलं आहे. हे कुटुंब अचानकपणे कोसळलेल्या या परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करतं आहे. घरमालकाने त्यांना का घराबाहेर काढलं किंवा दुसरं-एखादं घर त्यांना का लगेच मिळू शकत नाही यात लेखक-दिग्दर्शक जात नाही. कारणांचा काथ्याकूट न करता अचानक अंगावर कोसळलेला प्रसंग ती व्यक्ती कसा हाताळते आणि त्यातून मार्ग कसा काढते, हा या सिनेमाचा ‘फोकस’ आहे. पॅडी ब्रेथनाकसारखा अनुभवी दिग्दर्शक हे काम अतीव नेमकेपणाने करतो.
कपडे, मुलांची पुस्तकं, बॅगा आणि काही मोजक्या आवश्यक गोष्टी घेऊन, आपला संसार एका गाडीत टाकून रोझी गावभर भटकते आहे. पॉल एका रेस्तराँच्या किचनमध्ये नोकरी करतोय. त्याचा बेतास बात पगार आणि मर्यादित क्षमता असलेलं क्रेडिट कार्ड याच्या आधारे रोझी तिचं हे होम ऑन व्हिल्स चालवते आहे. तिच्याकडे शहरातल्या काही अपार्टमेण्ट्सच्या फोन नंबर्सची मोठी यादीच आहे. दोनचार दिवसांसाठी टुरिस्टना भाड्याने मिळणारी ही घरं. गाडी चालवता चालवता रोझी रोजच एका मागोमाग एक फोन करत एक-दोन दिवसांसाठी ही घरं मिळवते. दिवस गाडीतून फिरतच रस्त्यावर काढता येतो. मुलं शाळेत जातात. नवरा कामाच्या ठिकाणी जातो. परंतु रात्नी डोक्यावर छप्पर हवंच. कधी कधी तर एका रात्रीपुरतंही घर मिळत नाही आणि कुठल्या तरी रेस्तराँमधून बाहेर काढेपर्यंत डिनर करायचं. मुलांचा अभ्यास उरकून घ्यायचा. बाथरूम वापरून घ्यायचं. झोपण्यापूर्वीच दात घासणं वगैरे उरकून घ्यायचं आणि रेस्तराँवाले खूपच मागे लागले तर बाहेर पडायचं आणि एखादी रात्न गाडीतच काढायची. ही सर्व फरफट, ओढाताण हाताळताना रोझी आपलं मानसिक संतुलन प्रयत्नपूर्वक सांभाळते. फक्त दोनदाच तिचा तोल जातो.
छोट्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जेव्हा ती शाळेत जाते तेव्हा ती मुलगी इतर मुलांपासून दूरच एकटी उभी असते. रोझी आणि इतर भावंडं हाका मारतात, तरीही ती जागची हलत नाही. रोझी जाऊन तिला घेऊन येते. गाडीशी पोचते तोच तिच्या कानावर मुख्याध्यापिकेची हाक येते. ती जवळ जाते. मुख्याध्यापिका म्हणते, हीचं नाव मिली आहे. पण मुलं तिला स्मेली म्हणतात. कारण तिच्या अंगाला दुर्गंधी येते. आंघोळ घालून स्वच्छ कपड्यांनी का नाही पाठवत तिला शाळेत?
रोझीचा तोल जातो.. म्हणणं काय तुमचं? माझी मुलं रोजच आंघोळ करतात. स्वच्छ धुतलेले कपडे वापरतात. कोण कसं काय म्हणतं माझ्या मुलीला..
- ती ताडताड बोलतच सुटते. खरंतर प्रेक्षकांना वास्तव माहीत असतं, तसं ते रोझीलाही माहीत असतं. पण तिला ते स्वीकारायचं नाही. तिनं जर ते स्वीकारलं तर ज्या निकरानं ती प्राप्त परिस्थितीशी लढते आहे ती लढाईच तिच्या अंगावर कोसळेल. तिचा लढाऊबाणाच लेचापेचा होऊन जाईल. तिची सरळ हारच होईल आणि तसं होऊन चालणार नाही, असं तिनं अगदी आतून ठोसपणे ठरवलेलं आहे.
दुसरा प्रसंग, तिची थोरली मुलगी हरवते तेव्हाचा. मुलीला घ्यायला रोझी शाळेत जाते तर मुलगी तिथे नसते. मग हवालदिल झाल्यासारखी तिची शोध मोहीम सुरू होते. इथेतिथे जात ती एका घराशी येते. दारातच उभी राहून वृद्ध घरमालकिणीकडे पोरीची चौकशी करते. रोझी तिला विचारते, माझ्या छोट्या मुलांना बाथरूमला जायचं आहे. वृद्धा परवानगी देते. पुढे म्हणते, हे असं रस्तोरस्ती भटकत राहण्यापेक्षा इथेच का नाही राहायला येत?
..आणि पुन्हा रोझीचा तोल सुटतो. त्यातून त्या दोघी मायलेकी आहेत आणि कधी तरी आईच्या वागण्याने दुखावलेल्या रोझीला आईची अगदी याही परिस्थितीत अजिबात मदत नकोय एवढाच तपशील कळतो. ..‘आठवतं तुला तू माझ्याशी त्यावेळी कशी वागली होतीस?’- हा सवाल ना रोझी करते, ना आई. दोघीतलं भांडण मिटविण्याची सोप्पी सोय असती तर रोझीनं कधीच केली असती पण ती तशी राहिलेली नाही एवढं मायलेकीतलं नातं तणावग्रस्त आहे एवढंच यातून कळतं आणि रोझी पुन्हा रस्त्यावरच्या आपल्या जगण्याला भिडते.
..म्हणजे अगदी कुणी अशी शंका उपस्थित केली की गावात नात्यागोत्याचं कुणीच नाही का? तर आहे. नायिकेची आईच आहे. पण माझं काही वाट्टेल ते झालं तरी चालेल परंतु अमुकतमुकाची पायरी चढणार नाही, या आत्मसन्मानाचं काय? आणि कोणाचा आत्मसन्मान किती महत्त्वाचा हे दुसरं कुणी कसं ठरवणार?
..हे प्रश्न मी विचारत नाही. वर उल्लेख केलेला आपल्या कथेचा फोकस ठरवताना दिग्दर्शकाने ते आधीच विचारात घेतले आहेत. कुणाच्याही बाबतीत कसलेही निष्कर्ष सहजपणे काढणार्या वृत्तीचा नकळतपणे दिग्दर्शक असा परस्पर समाचारच घेतो.
शेवटी एका मैत्रिणीच्या घरी पोर सापडते. मैत्रीण म्हणते, आज राहा माझ्याच घरी!
..पुन्हा रोझीचा स्वर चढतो. इथेही तिचा तोच आत्मसन्मान वरचढ होतो. परिस्थिती बिकट आहे, पण आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय, कुणाची मदत घेण्याचा प्रश्नच नाही, असा तिचा रोख आहे. जगणं तर अवघडच आहे, पण आत्मसन्मान नावाची काही गोष्ट आहे की नाही हे तिच्या या अशा हिस्टेरिक वागण्यामागचं सूत्र आहे आणि ते चित्रपटभर जाणवत राहातं. .. यातून रोझी मार्ग कसा काढते? तिला कायमस्वरूपी घर मिळतं का? तिचा हा फिरता संसार एका जागी स्थिरावतो का? या प्रश्नांची सोप्पी उत्तरं न शोधता आणि..अँण्ड दे लिव्हड हॅपीली एव्हरआफ्टर या शेवटाशी न येता चित्रपट संपतो. - कारण गोष्ट ती नाहीच आहे. गोष्ट एवढीच आहे की या प्रचंड कोंडीग्रस्त परिस्थितीत रोझीनं कसं निभावून नेलं? किंबहुना कसं निभावून नेण्याचा प्रयत्न ती करते आहे?
ही इतकी सविस्तर चर्चा करण्याचं कारण एवढंच आहे की फापटपसारा न लावता मुद्दय़ाला धरून राहणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित व्हावं.- हे मुद्दय़ाशी चिकटून राहाणं आपल्या भारतीयांच्या फार सवयीचं नाही, हेच खरं!रोझी म्हणूनच मला आवडला. दिग्दर्शक म्हणून पॅडी ब्रेथनाकची माध्यमावरची हुकूमत क्षणोक्षणी जाणवत राहते. जे प्रत्यक्षात सांगितलं नाही तेही अप्रत्यक्षपणे तो ज्याप्रकारे सांगतो ते थोरच आहे.
सिनेमावर काही लोकांचा आरोप असतो की, त्यात सर्वच स्पष्टपणे दाखवलेलं असतं. मग अर्थनिर्णयाला वावच कुठे आहे? - रोझी हे त्याचं उत्तर आहे.
( लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आहेत)
ashma1895@gmail.com