- इंद्रजित सावंत-साहित्य
जागतिक कीर्तीचे तुलनाकार आणि इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. आनंद पाटील यांचा महाराष्ट्राला माहीत नसलेला ‘सम्राट शिवाजी’ हा ग्रंथ दिमाखात प्रसिद्ध होत आहे. मराठीतील इतिहासाचा पुनर्विचार करायला लावणारा हा ग्रंथ आहे.
नवी कागदपत्रे, हत्यारे, नानी, जुने पुरावे वगैरे शोधणे म्हणजे इतिहास. विशेषत: मोडी कागदपत्रांचा अनुवाद व शाहिरीमिश्रित सनावळ्या, वेळापत्रके व काळानुक्रमे घटनांची लोकप्रिय जंत्री म्हणजे इतिहास अशी आपली साधी सरळ कल्पना असते. या सगळ्या बाबींना प्रगत देशातील इंग्रजीतील संशोधनाच्या आधारे डॉ. पाटील यांनी कालबाह्य ठरविले आहे. बखरींच्या सत्यता तपासायला फ्रेंच संरचनावाद्यांच्या सहा कसोट्या लावायला ते सांगतात. मुळात ‘‘तुलनात्मक सांस्कृतिक प्रतिमा अभ्यास’’ हे या ग्रंथीचे उपशीर्षकच कळायला कठीण आहे. प्रारंभीचे अवघड सिद्धांत व संकल्पना समजावून घेतल्या तरच हा ग्रंथ कळू लागतो.
त्यांच्या ग्रंथाच्या शेवटी दिलेली इंग्रजी ग्रंथाची यादी व संशोधनासाठी दिलेले प्रगत विषय आणि पाच परिशिष्टे मी आधी वाचली. ‘पावनखिंडीचा पुनर्विचार’, ‘शिरकाण’, ‘जेम्स लेन प्रकरण’, ‘सयाजीराव गायकवाड महाराजांचे इतिहासाला योगदान’ ही परिशिष्टे नव्या माहितीची भांडारेच आहेत. समग्र ग्रंथाची संकल्पना व सिद्धांताची परिभाषा चांगली माहिती झाली म्हणजे ‘हे सारे नवे आहे’ असे वाटू लागते. उदाहरणार्थ जोतिबा फुले यांच्या लेखनाचा आरंभच ‘कुळवाडी भूषण राजा शिवाजी’ या पोवाड्याने झाला. त्याची चर्चा रोझॅलिण्ड ओ इॅन्लॉनने सत्यशोधकांच्या चळवळीवरील प्रबंधात कशी केली हे ते सांगतात. त्याचवेळी सावित्रीबार्इंचे कुणालाही माहीत नसलेले शिवरायांवरचे अप्रतिम दोन अखंडही शोधून तुलनेसाठी मांडतात. पोवाडे व पुरंदऱ्यांच्या शाहिरीत लपलेल्या वेगळ्या सांस्कृतिक राजकारणाचाही उलगडा करतात. हा सगळा तुलनांचा लोलक वाचकाला त्याचे आजवरचे इतिहासावरील प्रभुत्व पणाला लावायला लावतो. एवढ्यात या पुस्तकात काही ओळी खोडलेली चार पाने पाहून वाचक चक्रावून जातो.
१९१४ साली बडोद्यात सयाजीराव महाराजांनी सम्राट शिवाजी यांचा पुतळा उभारला. त्याप्रसंगी त्यांनी केलेले तीन पानी इंग्रजी भाषण डॉ. पाटील यांना मराठीमधील बाळबोध भाषणापेक्षा श्रेष्ठ वाटले. इतिहास व सांस्कृतिक विचाराला वेगळी दिशा देणारा हा ग्रंथ संग्राह्य आहे. लेखकाच्या वाचन व्यासंगाचा वैश्विक पटदेखील तरुणांसाठी आदर्श आहे.