- डॉ. सुषमा रोटेपाश्चिमात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. यातूनच भारतीय जैन तत्त्वज्ञानाची ओढ असणाऱ्या ग्रेटर अटलांटा, (यू.एस.ए.) येथील जैन सोसायटीने मला व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. णमोकार मंत्र महात्म्य, श्रमण (जैन) धर्माचा उद्भव आणि विकास, कर्मसिद्धांताची जैन अवधारणा, वर्धमान महावीरांच्या विचारांची वर्तमानातील प्रासंगिकता, जैन आगम साहित्य, अहिंसक जीवनशैली, श्रावकाचार - बारा व्रत यावर तेथे व्याख्यान दिले.लौकिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या नव्या पिढीला जैन तत्त्वज्ञान, त्यातील वैज्ञानिकता आणि धर्मसंस्कार यांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने अटलांटा येथील जैन समुदायाने मला आमंत्रित केले होते. मी केलेल्या जैन विद्या शोध संस्थानच्या माध्यमातून जैनागम, प्राकृत भाषा आणि जैन साहित्याचे तुलनात्मक अध्ययन, अध्यापन, तसेच संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन ‘जैन सिद्धांताची वर्तमान संदर्भातील प्रासंगिकता’ या विषयांतर्गत जैन धर्म व तत्त्वज्ञानातील अनेक पैलूंवर व्याख्यानासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते.
‘णाण णरस्स सारं’ अशी महावीर वाणी आहे. मानवी जीवनाचे साफल्य व खरा पुरुषार्थ ज्ञानी होण्यामध्ये आहे. ज्ञानानेच सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते. भगवान महावीर यांच्या चिंतनातील आत्मकल्याणकारी अध्यात्मपक्ष या साधना पद्धतीत ईश्वराचे कर्तृत्व नाकारले आहे. जो तो आपापल्या सुखदु:खाचा कर्ता व भोक्ता आहे, अशी धारणा आहे. प्रत्येक आत्म्याचे अस्तित्व स्वतंत्र असून, प्रत्येकाला परमात्मपद प्राप्त करून घेता येते.
भगवान महावीर यांच्या चिंतनाचा दुसरा महत्त्वपूर्ण पैलू सामाजिक चिंतनाचा आहे. जैन धर्म हा वैज्ञानिक स्वरूपाचा आहे. जैन धर्म व्यक्तीची पूजा करीत नसून, व्यक्तित्वाची पूजा करण्याची प्रेरणा देतो. अहिंसेचा, शुद्ध सात्विक निर्मळ जीवनाचा, अनेकांताचा विचार आजही जगात स्वीकृत होत आहे, याचे कारण जैन तत्त्वज्ञान व धर्म मानवाच्या मूलभूत आत्मतत्त्वाशी सुसंगत आहे. महावीरांनी स्वत: आचरणाने लोकांसमोर जीवन जगण्याच्या कलेचा आदर्श ठेवला.
महावीरांचा मार्ग हा त्यागाचा, अनासक्तीचा मार्ग आहे. आजही जैन धर्माचे सिद्धांत प्रासंगिक आहेत, जेवढे यापूर्वी होते किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आजच्या दु:खी मानवाने जर महावीरप्रणित अहिंसा, अनेकांत, अपरिग्रह या सिद्धांताचे निष्ठापूर्वक पालन केले, तर चोहोबाजूंना व्याप्त वर्तमानातील अशांती दूर होण्यास वेळ लागणार नाही. मानवी जीवनात अहिंसेला अत्यंत महत्त्व आहे. मनुष्याच्या जीवनातील आचार, विचार, मनातील भाव अहिंसेवर आधारित असतील तरच तो जीवनामध्ये साम्यभाव ठेऊ शकतो.आज समाजामध्ये धार्मिक संघर्ष, जीवनमूल्यांचा वैचारिक संघर्ष, राजकीय पक्षांचा संघर्ष उच्च कोटीवर पोहोचला आहे. महावीर याला एकांतवादी दुराग्रही वृत्ती मानतात. इतर धर्म व तत्त्वज्ञानाचाही विचार करून समन्वय साधून व्यवहार करणे याला अनेकांतदृष्टी म्हणतात. महावीरांच्या विचारातील अनेकांताच्या पालनाचा उद्देश विभिन्न जाती, धर्म, वर्ग, राष्टÑ, भाषा, संस्कृती यांच्यामध्ये समन्वय व सद्भावना स्थापित करणे हा आहे.
मनुष्याचा स्वार्थ व कामवासना हे आजच्या जीवन संघर्षाचे मूळ कारण आहे. महावीरांनी या विषमतेचे समाधान अपरिग्रहाचे पालन सांगितले. मनुष्याने संचयी वृत्तीवर संयम ठेवल्यास अपरिग्रहाचे पालन होईल व समाजातील संघर्ष कमी होऊन मनुष्य सुखी होईल. धर्म आणि अध्यात्म जीवनाला सावरतात. जीवनात भरकलेल्या व्यक्तीला परत स्थिर करणारी अध्यात्म ही कला आहे. आजच्या काळातील मानवी जीवनातील सामाजिक व राष्टय समस्यांची समाधानकारक उत्तरे भगवान महावीर यांच्या सामाजिक चिंतनात आढळतात. त्यांच्या सामाजिक विचारांचे प्रत्यक्षात आचरण केल्यास व्यक्ती, समाज, राष्ट व विश्वमात्राला सुख-शांती व लाभू शकेल.