मा. डॉ. कुमार सप्तर्षी,
‘मंथन’मधील आपल्या लेखात आपण कुरुंदकरांविषयी अनेक विधाने केली आहेत.
‘‘मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणा:या विचारवंतांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, इस्लामबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता. हा दोष कुरुंदकरांमध्ये सुप्त अवस्थेत होता.’’
- म्हणजे मराठवाडय़ातील विचारवंत स्वत:ला पुरोगामी म्हणत असत. तुम्ही त्यांना पुरोगामी समजता की नाही? तर नाही. त्यांचे पुरोगामित्व त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर, केलेल्या, स्वीकारलेल्या कृतीद्वारे सिद्ध होत असते. सगळ्याच मुस्लिमांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता हे खरे नाही. त्यांनी केलेल्या प्रासंगिक कृतिसंबंधाने राग होता. प्रासंगिक राग सा:या समाजाबद्दलचा सार्वत्रिक व व्यापक स्वरूपाचा गृहीत धरून त्यांच्यावर दोषारोप करणो कितपत योग्य आहे? याच काढलेल्या अतार्किक निष्कर्षाद्वारे कुरुंदकरांमध्ये हा दोष सुप्त अवस्थेत होता, असे म्हणणो त्यांच्या मृत्यूनंतर, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.
आपण म्हणता, ‘‘रझाकारांनी अत्याचार केले, तो इस्लामच्या, धर्मग्रंथाच्या शिकवणीचा भाग नव्हता. याबद्दल मी कुरुंदकरांशी खूप वेळा वाद घातलेला आहे; पण ते भूतकाळातील आठवणी विसरावयास तयार नव्हते. तेवढा भाग सोडला तर कुरुंदकर पुरोगामी विचारांचे होते.’’
- रझाकारांनी अनन्वित व अमानुष अत्याचार केले, ते सगळेच निंदनीय व अमानवी होते. ते ज्यांनी जवळून पाहिले, अनुभवले, भोगले आहेत, त्यांना त्या कृत्याचा राग येणो स्वाभाविक आहे. त्या कृत्याचा विरोध म्हणजे मुस्लिमांचा द्वेष आणि विरोध, असे अनुमान काढणो योग्य ठरेल काय?
आंबेडकरांच्या विचारांना आणि दलितांच्या विकासाला त्यांचा कधीच विरोध नव्हता. त्यांचा त्या वातावरणात राजकीय उद्दिष्ट बनलेल्या नामांतराच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पवित्र होता. एस. एम. जोशी यांच्या भूमिकेबाबतही तोच विरोधाचा पवित्र होता. कुरुंदकरांनी कितीतरी दलित विद्याथ्र्याना जीवनात उभे केले आहे, त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली आहे. अनेकांना लिहिते-बोलते केले आहे. आपले वेगळेपण जोपासणारे नाटककार दत्ता भगत यांच्याकडे त्यांचे मानसपुत्र म्हणून पाहिले जाते. सुव्र्यासारख्या कवीच्या कवितांना सर्वप्रथम उचलून धरणारे आणि समीक्षक सुधीर रसाळांशी ‘प्रतिष्ठान’मधून वाद घालणारे तेच होते. पुढे तर सुव्र्याना मानमान्यता प्राप्त झाली. हे सारे ते दलितविरोधी होते, याचे पुरावे मानावयाचे
का?
ते स्वत:ला समाजवादी, पुरोगामी विचारांचे समजत आणि ख:या अर्थाने होतेही. ते खरे तर मानवतावादी होते. मानवाच्या जीवनातील वेदनेवर फुंकर घालून त्यांना जगणो सुसह्य करण्यासाठी समाजवादी विचार पूरक आहेत, अशी त्यांची धारणा होती. समाजवाद आणि मानवतावाद यात ते मानवतावादाची कास धरीत असत. हे करीत असताना समाजवादी विचारांना छेद जात असेल तर त्यांनी ते स्वीकारले आणि त्याची किंमत मोजली. सारे हार-प्रहार सहन केले. जीवन जगणा:या माणसांवर आणि माणसांच्या जीवनावर त्यांची गाढ निष्ठा होती. हे लक्षात घेतले तर त्यांना समजून घेणो अधिक वास्तववादी ठरेल.
सहज जाता जाता - आपण लेखामध्ये आक्रमकपणो मांडणी करून मोरे यांच्या वैचारिक भूमिकेचा समाचार घेतला आहे. अध्यक्षीय व्याख्यानातून ‘पुरोगामी दहशतवादी’ अशी जी संज्ञा मोरे यांनी मांडली आहे, ती खून करणो, बॉम्बफेक करणो, आतंकवाद निर्माण करणो, जाळपोळ करणो, निरपराध लोकांचा बळी घेणो या अर्थाने नसावी असे वाटते. समाजवाद्यातील विचारांचा आक्रमकपणा म्हणजेच वैचारिक दहशतवाद अशीच कदाचित त्यांची भूमिका असेल. एखादी वैचारिक भूमिका भावनिक पातळीवरून आवेशपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झाली, तर त्याची परिणामकारकता उणावण्याची शक्यता असते. त्यातील जोश आणि आवेशच लक्षवेधी ठरत असतो, हे मी आपणाला सांगणो उचित होणार नाही. आपला लेख वाचून पुरोगाम्यांच्या वैचारिक दादागिरीचे - वैचारिक दहशतवादाचे उत्तम उदाहरण हेच आहे, असे प्रा. मोरे यांना वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी काय लिहावे?
- आपला स्नेहांकित
प्रा. मधुकर राहेगावकर,
नांदेड