- सतीश पाकणीकर
यदाकदाचित तुम्ही जर मुंबईत असाल आणि तेसुद्धा कलानिकेतन, केसन्स किंवा इन स्टाइलच्या आसपास असाल, जर तुम्ही कोलकात्यात असाल आणि मीरा बसू अथवा कुंदहारच्या नजीक असाल, जर तुम्ही पुण्यात असाल आणि टिळक रोडवर नीलकंठ प्रकाशनच्या जवळ असाल तर तिथे किंवा अगदी मंडईत गेलेले असाल तर तिथे तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा अथवा गुलाबी पेरूची खरेदी करताना एक व्यक्ती सहज भेटू शकते. त्या व्यक्तीने जगभरातील तमाम स्वरमंचांवरून रसिकांच्या मनाचा ठाव अगणित वेळा घेतलेला आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही इतक्या साधेपणाने, सहजपणाने तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. ती व्यक्तीही तुमच्याशी दिलखुलासपणे बोलेल. खळाळून हसेल आणि आयुष्यात तुमचा तो दिवस सार्थकी लागून जाईल. हो, तुम्ही ओळखलंय, त्या स्वरस्वामिनीचे नाव आहे ‘आशा भोसले’.वयाच्या दहाव्या वर्षी माईकसमोर कारकीर्द सुरू केलेल्या आशाताई आजही गात आहेत. वयाची शहाऐंशी वर्षे पूर्ण करत आहेत. म्हणजे कारकिर्दीचीपण पंचाहत्तरी. या पंचाहत्तर वर्षांत त्यांनी स्वाभिमानाची, अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई लढलेली आहे. कालपरवापर्यंत नियतीने केलेले आघात सोसले आहेत. पण त्यातूनही स्वत:ला शाबीत करीत आजही त्या प्रसन्नमुखे उभ्या आहेत. नियतीला वाकुल्या दाखवत. ‘‘मला गाण्यात करिअर करायचं नव्हतं. संसार, मुलं-बाळं यात रमून जायचं होतं.’’ हे उद्गार आहेत पंचाहत्तर वर्षे र्शोत्यांना आपल्या गाण्याचा भरभरून आनंद देणार्या या सुहास्य स्वरस्वामिनीचे.मी भाग्यवान. मला त्यांना बर्याच वेळेला भेटता आलंय. त्यांचं खास फोटोसेशन करता आलंय. ऑगस्ट 1993 सालची ही आठवण आहे. आशा भोसले साठ वर्षांची पूर्तता करणार होत्या. वय हे शरीराला असतं. ‘आशा भोसले’ या स्वराला वय कसे असेल? ‘साप्ताहिक सकाळ’साठी त्यांची मुलाखत घ्यायची ठरले. प्रसिद्ध लेखिका सुलभा तेरणीकर या मुलाखत घेणार व मी आशाताईंचे फोटो काढणार असे संपादक र्शी. सदा डुंबरे यांनी आम्हाला सांगितले. त्याप्रमाणे आशाताईंची वेळ घेतली. त्या दरम्यान त्यांच्या ‘साठाव्या’ वाढदिवसानिमित्त सर्वच वर्तमानपत्ने व मासिकांनी मुलाखतींचा दणका उडवला होता. प्रत्येकालाच त्यांची मुलाखत व फोटो हवे असल्याने आशाताई खूप उत्साही असूनही जरा कंटाळलेल्या होत्या.मी, माझा भाऊ हेमंत व सुलभाताई असे डेक्कन क्वीनने मुंबईस पोहोचलो. ‘प्रभुकुंज’वर जाण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव होता. चित्नपट संगीतातील आमची दोन आराध्यदैवते प्रभुकुंजच्या त्या पहिल्या मजल्यावर विराजमान होती. कित्येक वेळा पेडररोडवरून जाताना ‘प्रभुकुंज’मध्ये जायला मिळाले व त्या स्वरांची भेट झाली तर.. अशी स्वप्ने मी पाहिली होती. त्यापैकी एक स्वप्न आज पूर्ण होणार होते. आशाताईंबद्दल त्यांच्या कारकिर्दीबद्दल आम्हाला बरीचशी माहिती होतीच. पण सर्वकाही सुरळीत पार पडेल ना? त्या कशा वागतील? फोटोसाठी सहकार्य करतील ना? असे अनेक प्रश्न मनात येत होते.त्यांनी दिलेल्या वेळेवर आम्ही प्रभुकुंजवर पोहोचलो होतो. बेल वाजवताना मनात धाकधूक होती. बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि साक्षात ‘आशा भोसले’ यांनी दरवाजा उघडून आमचे स्वागत केले. ज्या आवाजाच्या साथीने शाळा-कॉलेजचे विश्व भारून गेलेले होते, जो स्वर ऐकल्याशिवाय आमचा एक दिवसही जात नव्हता तो दैवी स्वर समोर उभा होता आणि स्वागतही करीत होता. आम्ही आत स्थिरावलो. त्यांच्या घरेलू वागण्यामुळे थोड्याच वेळात आमचे अवघडलेपण एकदम नाहीसे झाले. चहा व प्राथमिक बोलणी झाल्यावर मी त्यांना कसे फोटो हवे आहेत हे सांगताना – कृष्णधवल, रंगीत पारदर्शिका व रंगीत फोटो असे तीनही काढणार आहे असे सांगून टाकले. (तेव्हा डिजिटल तंत्नज्ञान नव्हते ना !) त्यावेळी चाललेल्या सततच्या धावपळीमुळे आशाताईंचे डोके दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मनात परत धाकधूक. पण इतक्या लांब तुम्ही आला आहात मग काम तर झालेच पाहिजे हे त्यांनीच सांगितले. आमच्या देखतच त्यांनी ब्रुफेन 400 ही गोळी घेतली. मी कॅमेरा व लाइट्सच्या तयारीला लागलो. एक एक करून मी स्टुडिओ लाइट स्टॅण्डवर लावले व कॅमेर्यात फिल्म्स भरल्या. काही वेळाने आतमध्ये जाऊन आशाताई अनेक साड्या घेऊन बाहेर आल्या व त्यातून आम्हाला साड्यांचे सिलेक्शन करायला सांगितले. एक गुलाबी नक्षी असलेली व एक हिरव्या जरी-काठाची अशा दोन साड्या आम्ही निवडल्या. त्याबरोबरच मेक-अप अगदी सौम्य असा करा, असेही मी त्यांना सांगितले. ‘आलेच हं मी साडी नेसून’- असे म्हणून त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. या मधल्या वेळात दिवाणखान्याच्या समोरच्या बाजूचा छतापासून जमिनीपर्यंतचा असलेला भरजरी पडदा मी बाजूला केला. बाहेर बर्यापैकी मोठी अशी बाल्कनी. मला अत्यानंद झाला. पेडर रोडच्या बाजूच्या त्या बाल्कनीमध्ये समोरच्या पांढर्याशुभ्र इमारतीवरून परावर्तित होऊन येणारा सुंदर प्रकाश पसरला होता. तिथे फोटो टिपले तर मला स्टुडिओ लाइटची गरजच नव्हती. लायटिंगचे माझे काम निसर्गानेच केले होते. मग मला आशाताईंच्या भावमुद्रा ‘क्लिक’ करण्यावर जास्त लक्ष देता येणार होते. मी आत येऊन लाइट्स आवरून ठेवले. फक्त कॅमेरे व एक मोठा रिफ्लेक्टर तेवढा बाहेर ठेवला. हिरव्या काठापदराची साडी नेसून आशाताई बाहेर आल्या. हातात हिरव्या काचेच्या व त्यांच्या कडेने हिर्याच्या बांगड्या, गळ्यात मोती व पोवळ्याचा सर, बोटात एकच मोठा हिरा असलेली अंगठी, त्याला मॅचिंग कानातली कुडी. आणि मंदसा मेक-अप. येऊन पाहतात तर मी लाइट्स आवरलेले. त्या आश्चर्याने म्हणाल्या – ‘‘अहो, हे काय सर्व सामान तुम्ही ठेवून दिले? आता माझी डोकेदुखी कमी झाली आहे. काढू या फोटो आपण.’’मी त्यांना बाहेरील बाल्कनीत फोटो घेऊया असे सांगितले. त्यावर त्या परत म्हणाल्या ‘‘तुम्ही मला बरं वाटत नाहीयं म्हणून तडजोड तर करत नाही ना?’’ त्या काही दिवसात मुंबईतल्या फोटोग्राफर्सनी त्यांच्या - त्यांच्या स्टुडिओमध्ये भरपूर लाइट्स वापरून आशाताईंचे फोटो काढलेले असल्याने, त्या बाहेरच्या उजेडात फोटो चांगले येतील का अशी त्यांना शंका आली. मी बाल्कनीतील उपलब्ध प्रकाशात उत्तम फोटो येतील अशी ग्वाही त्यांना दिल्यावर त्या रिलॅक्स झाल्या. आता वेदनेचा लवलेशही नसलेला त्यांचा तो प्रसन्न चेहरा. माझं काम अजून सोपं झालं होतं. मी परत एकदा खात्नी दिल्यावर मात्न बाल्कनीतील छोट्या स्टूलवर त्या येऊन बसल्या. मी भराभर फोटो टिपत होतो. मोठा सिल्व्हर रिफ्लेक्टर धरून माझा भाऊ उभा होता आणि सुलभाताई अधून मधून त्यांच्याशी संवाद साधत होत्या. माझ्या अपेक्षेपेक्षा पटापट आशाताई चेहर्यावरचे भाव बदलत होत्या. कधी हातातल्या गॉगलशी खेळत, तर कधी एखादी एकदम गंभीर मुद्रा देत तर कधी एकदम कॅमेरा लेन्समध्ये बघत त्या संवाद करत होत्या. मध्येच एखादी तान घेत एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणत होत्या. माझ्यासकट माझे ‘कॅमेरा शटर’पण स्लो झाल्याचा भास मला होत होता. जास्त आनंदपण कधी कधी पचत नाही माणसाला ! पहिल्या साडीतील फोटो झाल्यावर परत एकदा त्या साडी बदलून आल्या. आता त्यांनी गुलाबी रंगात नक्षी असलेली आणि काठावर निळ्या व गुलाबी रंगाचे डिझाइन असलेली सिल्कची साडी नेसलेली होती. त्या सौम्य रंगसंगतीने त्यांचा वर्ण फारच खुलून दिसत होता. पदराला खांद्याच्या जवळ मुखवट्याच्या आकाराचा चांदीचा नेटकेपणाने लावलेला आकर्षक ‘ब्रूच’, हातात ‘ओम नम: शिवाय’ अक्षरे असलेलं ब्रेसलेट, त्यांचा कमीत कमी मेक-अप, केसात खोवलेलं मोठं रंगीत फूल, .. परत एकदा फोटोसेशन सुरू झालं. जवळ जवळ सर्व प्रकारचे भाव माझ्या कॅमेर्यात बंदिस्त झाल्यावर मी थोडा थांबलो. त्यांनी मला विचारले ‘‘आता काय?’’ मी म्हणालो - ‘‘आशाताई, ..ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराईये .. या गाण्यात तुम्ही हसता. ते हसणं मला फोटोत हवंय.’’यावर त्या म्हणाल्या, ‘‘तू तयार झाल्यावर सांग.’’ मी तर तयारच होतो. मी तसे सांगितल्यावर पुढच्याच क्षणी त्या हुकुमीपणे गाण्यातल्या प्रमाणेच खळाळून हसल्या. माझे काम झाले होते. सुमारे तासभर चाललेलं फोटोसेशन दिवाणखान्यातील दीनानाथ मंगेशकरांच्या फोटोफ्रेमसमोर उभे राहून आशाताईंचा फोटो क्लिक करण्याने संपलं. इतक्या कमी वेळात संपलेलं हे पहिलंच फोटोसेशन आहे, असेही त्यांनी मला सांगितलं. आणि याच्या सगळ्यांच्या कॉपी मला नक्की आवडतील हेही सांगण्यास विसरल्या नाहीत. मग परत एकदा चहा व खाण्याची एक राउण्ड झाला. आणि आम्ही तृप्त मनाने पुण्याच्या दिशेने निघालो.साप्ताहिकाचा अंक प्रसिद्ध झाल्यावर तो अंक व सर्व फोटोंच्या कॉपीज त्यांना पाठवल्या. ते फोटो पाहून त्यांनी त्यांचे पुण्यातील एक मित्न नीलकंठ प्रकाशनचे र्शी. प्रकाश रानडे यांच्याकडे फोन केला व माझ्यासाठी निरोप ठेवला. तो निरोप म्हणजे मला त्यांच्या ‘प्रभुकुंज’मध्ये सार्जया होणार्या 60व्या वाढिदवसाचे आमंत्नण होते. माझा विश्वासच बसेना. पण ते खरे होते. 8 सप्टेंबर 1993ला परत एकदा आम्ही तिघे प्रभुकुंजवर धडकलो. सर्व घर फुलांनी भरून गेले होते. प्रभुकुंजच्या त्या मजल्यावर उत्सवाचे वातावरण होते. प्रत्येक पाहुण्याचे स्वागत स्वत: आशाताई करीत होत्या. आज त्यांच्याबरोबरच सर्व मंगेशकरही उपस्थित होते. सर्वत्न लगबग सुरू होती. इतक्यात सौ. भारती मंगेशकर यांनी माझी चौकशी केली. मी टिपलेले फोटो घरात सगळ्यांनाच आवडल्याचे त्यांनी सांगितले. चला, आपण केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटत असतानाच आशाताई माझ्याजवळ आल्या व म्हणाल्या, ‘‘तुम्ही काढलेले फोटो मला खूप आवडले. म्हणून हे खास तुमच्यासाठी !’’ असे म्हणत त्या दिवशी एचएमव्हीने प्रकाशित केलेला त्यांच्या गाण्यांचा अकरा कॅसेट्सचा संच त्यांनी मला भेट म्हणून दिला. माझी अवस्था वर्णनापलीकडची झाली. आशाताईंचे ते प्रेम व विश्वासाबरोबरच तो कॅसेट्सचा संच आजही माझ्या संग्रहाची शान आहे.नंतर त्यांच्या कार्यक्र मात किंवा इतर कार्यक्र मात मी आशाताईंची असंख्य प्रकाशचित्ने टिपली. प्रत्येकवेळी त्यांच्यातील नवनव्या ऊर्जेची अनुभूती मला येत गेली. सर्व संकटांवर मात करून जगणे म्हणजे काय याचा उलगडा त्यांच्याकडे बघताना होत गेला. त्यांच्यातील माणूसपण अनुभवता आले.काही वर्षांपूर्वीची आठवण. 13 मे 2012 यादिवशी त्या वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयाच्या एका विभागाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्या भेटण्याची शक्यता वाटल्यामुळे मी त्यांचे मला आवडलेले एक कृष्ण-धवल प्रकाशचित्न मोठय़ा आकारात फ्रेम करून घेऊन गेलो. त्या कार्यक्र मातही त्यांनी त्यांच्या रसरशीत शैलीने जान ओतली. काही अप्रतिम नकलाही केल्या. कार्यक्र मानंतर मी ती फ्रेम देण्यासाठी आत गेलो. तो फोटो कधीचा आहे हे त्यांना आठवणे अवघड होते. मी प्रभुकुंज येथील वीस वर्षांपूर्वीच्या फोटोसेशनची आठवण करून देताच एक क्षणही न दवडता त्या मला म्हणाल्या - ‘‘पाकणीकर, तेव्हाचा फोटो तुम्ही मला आत्ता देताय?’’ मी म्हणालो, ‘‘आशाताई, वीस वर्षात माझ्यात खूपच बदल झालाय. पण तुमच्यात काहीच नाही. म्हणून तेव्हाचा फोटो आत्ता देतोय.’’ यावर त्या मनापासून खळाळून हसल्या. मधली वीस वर्षे पुसली गेली. खरंच आहे. वय हे सर्वसामान्यांना असतं. असामान्य कलावंताचं वय मोजायचं नसतं. त्यांची कलाही अजरामर असते. तर मग ‘आशा भोसले’ या स्वराला ‘जरे’चा स्पर्श तरी होईल का?
sapaknikar@gmail.com (लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)