- सतीश पाकणीकर
मानवाला लाभलेलं एक महत्त्वाचं वरदान म्हणजे त्याची स्मृती अन् विस्मृती. नकोशा आठवणी विसरण्याचे वरदान, तर हव्याशा आठवणी कोणत्याही वेळी समोर आणण्याचे सामर्थ्य. आपल्या स्मृतीतून मनाच्या गाभाऱ्यात अलगदपणे अवतरलेली एखादी आठवण आपल्याला परत एकदा त्या घडलेल्या प्रसंगाची, भेटलेल्या व्यक्तीची, पाहिलेल्या दृश्याची पुन्हा अनुभूती अशा पद्धतीने करून देते की जणू ते सारे आत्ताच घडले आहे.१२ जानेवारी १९९२ रोजी कुमारजी गेले. सलग चाळीस वर्षे कुमारजींनी संगीतप्रेमींना चकित करणारे अनेक धक्के दिले. त्यांचे जाणेही असेच धक्का देऊन जाणारे, चकित करणारे आणि दु:खीही. पण तरीही गेल्या सत्तावीस वर्षांत त्यांच्या आठवणी अशा जागवल्या जातात की जणूकाही कुमारजी हा इहलोक सोडून कुठे गेलेलेच नाहीत. आज प्रकाशचित्रकलेने तंत्रज्ञानामुळे अवकाश भरारी घेतली आहे. मला नेहमीच असं वाटतं की कुमारजींच्या मैफलीत कमी प्रकाशातही उत्तम प्रकाशचित्र घेणारा असा आजचा डिजिटल कॅमेरा घेऊन जाता आलं असतं तर? पण या वाटण्याला काय अर्थ आहे? सुदैवाने माझ्या वाट्याला त्यांच्या काही अतिउत्तम मैफली आल्या. त्या मैफली ऐकता ऐकता कानात साठवलेल्या स्वरकणांबरोबर त्यांची प्रकाशचित्रे घेता आली आणि मनावर कोरल्या गेल्या अगणित भावमुद्रा!एक प्रसंग आठवतो. एकदा पुण्यातल्याच एका मैफलीत एका नामवंत गायकाचा मी नुकताच काढलेला एक फोटो घेऊन गेलो. मला सह्या गोळा करण्याचा शौक नाही; पण वाटले त्या फोटोवर त्या मोठ्या कलाकाराची सही मिळाली तर बहार येईल. त्यांचे गायन झाल्यावर मी दबकत पुढे झालो. माझ्या हातात त्यांचा तो फोटो आणि त्यावर सही घेण्यासाठी एक मार्कर पेन होता. त्यांचे माझ्याकडे लक्ष गेल्यावर मी फोटो आणि पेन दोन्ही त्यांच्या पुढे केले. त्यांनी फोटो हातात घेतला. नीट निरखून पाहिला. माझ्याकडे पाहत म्हणाले - ‘‘बहुतही बढिया फोटो है’’ मी लगेच पेन पुढे केला. आणि माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्यांनी शांतपणे तो फोटो आपल्या झब्ब्याच्या खिशात ठेऊन दिला. फोटो त्यांच्या खिशात अन् माझं पेन माझ्या खिशात. बात खतम.१९८६च्या आॅक्टोबर महिन्यात मी एक कृष्णधवल कॅलेंडर बनवीत होतो. त्यात कुमारजींचा एक फोटो मी वापरणार होतो. इतर कलावंतांबरोबरच मी कुमारजींनाही त्यांच्या फोटोची एक प्रत, त्यांची तो फोटो वापरण्यास परवानगी मागणारे एक पत्र व त्यासोबत माझा पत्ता असलेले एक पोस्टाचे पाकीट हे सर्व देवासच्या पत्त्यावर पाठवून दिले. ७ नोव्हेंबरपर्यंत मला त्यांचे परवानगीचे पत्र पोहोचल्यास मला पुढील कामास अवधी मिळेल याचाही उल्लेख केला होता. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात बाकीच्या सर्व कलावंतांची परवानगीची पत्रे माझ्या संग्रहात जमा झाली होती. राहिले होते ते फक्त कुमारजींचे पत्र. मी रोज आतुरतेने पोस्टमनची वाट पाहत होतो. साधारण ४-५ नोव्हेंबरच्या सुमारास मला माझे पत्ता असलेले पाकीट देवासहून आले. मी आपण नेहमी पाहतो तसे पाकिटात काय आहे हे पाहण्यासाठी ते आकाशाच्या दिशेने धरले. पण पाकिटात तर काही दिसेना. कुमारजींनी नुसतेच पाकीट पाठवले की काय, अशी एक वाईट शंकाही मनात तरळून गेली. घाबरत अगदी कडेने मी पाकीट उघडले. आणि फक्त आश्चर्य आणि आश्चर्य. मी कुमारजींसाठी पाठवलेल्या त्या प्रकाशचित्रावर त्यांनी सही करून व तारीख लिहून ते प्रकाशचित्र मला परत भेट म्हणून पाठवले होते. त्यांच्या परवानगी देण्याच्या या अभिनव पद्धतीने मी खरोखरीच भारावून गेलो. ‘ग्रेट पीपल डोण्ट डू डिफरण्ट थिंग्ज, बट दे डू थिंग्ज डिफरण्टली’.. हे तसं वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य. पण मला कुमारजींच्या त्या कृतीने त्या वाक्याचा अर्थच समजता आला. कुठे दिलेला फोटो खिशात ठेवणारे ते ‘सो कॉल्ड मोठ्ठे’ कलावंत व कुठे त्यांच्याचसाठी पाठवलेला फोटो सही करून पाठवणारे कुमारजी.कुमारजींचे फोटो काढण्याचा अजून एक प्रसंग मला आठवतो. पुण्यातच शनिपारापासून पुढे गेल्यावर ‘वाघ सराफ’ यांचे एक अत्यंत छोटे दुकान होते. तीन वाघ बंधू हे ते दुकान पाहत. त्यांच्यापैकी एक राजन हे प्रसिद्ध ‘कैलासजीवन’च्या आॅफिसमध्येही काम करीत. त्यामुळे श्री. रामभाऊ कोल्हटकर यांच्या ओळखीमुळे सप्टेंबर १९९२ मधील एका संध्याकाळी कुमारजी हे वाघ सराफांच्या दुकानात चांदीच्या काही वस्तू खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या कलापिनीही होती. पण मुळातच सगळ्या कलांची आवड असलेले कुमारजी फक्त चांदीच्याच वस्तू बघतील असं होणं शक्य नव्हतं. राजन वाघ आणि त्यांचे लहान बंधू अरु ण वाघ हे कुमारजींना दागिन्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण नवनवी डिझाइन्स दाखवत होते आणि कुमारजींची त्या प्रत्येक कलाकारीला भरभरून दाद येत होती. इतक्यात अरु ण वाघ यांनी त्यांना काही अमूल्य खडे दाखवण्यास सुरुवात केली. ते छोटे खडे, त्यांच्यावर पाडलेले असंख्य पैलू कुमारजी अत्यंत एकाग्रपणे निरखत होते. काय विचार असतील अशावेळी त्या महान गायकाच्या मनात?..आज हे लिहिताना मला कुमारजींचेच एक घनिष्ठ मित्र मधुकर बाक्रे यांनी सांगितलेला प्रसंग आठवतोय..एकदा जयपूरमध्ये एका जवाहिºयाकडे कार्यक्र म होता. यजमानांनी कुमारजींना विचारलं, ‘‘काय पाहायची इच्छा आहे?’’ कुमारजी म्हणाले, ‘‘तुमच्याकडचे उत्तम दागिने पाहायचे आहेत.’’ आणि मग त्या पेढीवरचे दागिने पाहताना कुमारजी हरखून गेले. त्यात एक अप्रतिम मीनाकारी केलेला बांगड्यांचा जोड होता. त्याने कुमारजींच्या मनात कायमचे घर केले. त्यानंतर मात्र..कंगनवा मोरा अतिह अमोला।मीने दारे रखले लुकाईअब मैं कैसे घरवा जाउं।जो तुम दे हो, तो गुन मानुंना तो कन्हैया तेरो नाम।..ही केदार रागातील बंदिश म्हणायची त्यांची पद्धतच बदलून गेली.तसाच अनुभव आम्ही घेत होतो. त्यादिवशी मला कुमारजींच्या वेगळ्या दर्शनाबरोबरच त्यांच्या एक प्रसन्न हास्याची अन् एक एकदम गंभीर भावाची अशा दोन प्रकाशचित्रांची प्राप्तीही झाली.त्या हसºया भावमुद्रेचा एक प्रिंट करून मी तो माझा मित्र अन् कुमारजींचा निस्सीम चाहता संजय संत याला दिला. दोनच महिन्यानंतर १२ डिसेंबर १९९१ ला सवाई गंधर्व महोत्सवात कुमारजींचं गाणं होतं. त्याच्या दुसºया दिवशी संजयनं तो प्रिंट कुमारजींना दाखवून त्याच्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली.कुमारजींनी माझ्यासाठी संजयकडे निरोप दिला की ‘‘मला फोटो खूप आवडलाय आणि मला त्याची एक कॉपी हवी आहे.’’ संजयनं हा निरोप मला दिल्यावर माझी काय अवस्था झाली हे शब्दात सांगणे शक्य नाही.मी लगेचच हसरा व गंभीर अशा दोन्ही प्रकाशचित्रांचे मोठे प्रिंट्स तयार केले. काहीच दिवसांत म्हणजे २८ डिसेंबरला कुमारजींचा मुंबईत कार्यक्र म होता. तेव्हा जाऊन तो देण्याचे आम्ही ठरवले; पण दुर्दैवाने तो कार्यक्र म रद्द झाला. नियतीच्या मनाचा ठाव कोणालाच घेता येत नाही. पुढे पंधराच दिवसांनी बातमी धडकली, ‘प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व यांचे निधन’. मन एकदम सुन्न झालं. आपल्या आवडत्या कलावंताने आपणहून मागितलेले फोटो तयार तर आहेत, पण ते आता कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत ही जाणीव त्या सुन्न झालेल्या मनापेक्षाही जास्त सुन्न करणारी होती.कुमारजींच्या फोटोंचे ते पाकीट पुढे कित्येक महिने माझ्या टेबलावर ठेवलेले होते. येता-जाता माझ्या मनावर त्याने असंख्य ओरखडे उमटवले. नंतर एकदा कलापिनी भेटल्यावर ते पाकीट, त्याचा प्रसंग सांगून तिच्याकडे सोपवले. कुमारजींच्या हयातीत जरी नाही तरी कमीतकमी त्यांच्या देवासच्या ‘भानुकुल’मध्ये त्या प्रकाशचित्रांचे वास्तव्य असेल हाच त्यानंतर आजवर मी मनाला देत आलेला दिलासा!..(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)sapaknikar@gmail.com