- सतीश पाकणीकर
रात्नीचे पावणेअकरा वाजलेले. तारीख होती 10 ऑक्टोबर 2009. पुस्तक वाचता वाचता झोपी जाण्याची माझी तयारी झालेली. इतक्यात मोबाइल वाजला. विशिष्ट रिंगटोन लावलेली असल्याने तो फोन कुणाचा आहे हे कळण्यास मला वेळ लागला नाही. पलीकडून पंडित हृदयनाथ मंगेशकर बोलत होते. पंडितजी म्हणाले- ‘पाकणीकर, मी आत्ता दीदीला तुमच्या कॅलेंडरची थीम सांगितली. तिला आवडलीय. तिनं तुम्हाला 14 तारखेला तिच्या रेकॉर्डिंगला बोलावलंय. तुम्ही तिचे त्यावेळी फोटो काढू शकता.’ त्यांचं हे वाक्य ऐकून मला अतिशय आनंद झाला. कारण या फोटोसेशनमुळे माझी दोन वर्षांची प्रतीक्षा संपणार होती.मंगेशकर कुटुंब हे एक असे कुटुंब आहे की त्याच्या तीन पिढय़ा संगीतात आहेत. आणि ही पाच भावंडे तर भारतीय सिनेसंगीतावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करीत आहेत. अजूनही त्यांच्या सुरेल गळ्यातून येणार्या स्वरांनी रसिकांचे कान तृप्त होत आहेत. थीम ठरली. त्यांच्या या संगीतमय साठ वर्षांची वाटचाल दाखवायची. मग एक जुना व एक आत्ताचा असे फोटो लागणार. लतादीदी व मीनाताई यांचे रेकॉर्डिंगच्या वेळचे फोटो माझ्या संग्रही नव्हते. ते काढणे आवश्यक होते. आशाताई, उषाताई व पंडितजी यांचे फोटो विविध कार्यक्रमांत मी टिपले होते. जुने फोटो मिळवायला लागणार होते. मी मनातल्या थीमवर कामही सुरू केले होते. नाव ठरले ‘स्वर मंगेश’.म्हणून मी पंडितजींना मनातील कल्पना सांगितली होती. त्यांना ती आवडलीही. अडचण एकच होती ती म्हणजे दीदींचा आताचा फोटो लागणार होता. मी पंडितजींना म्हणालो होतो की जेव्हा कधी दीदींचे रेकॉर्डिंग असेल त्यावेळी मला सांगा. मी तेथे येईन. त्यावेळी पंडितजी म्हणाले ‘पाकणीकर, तुम्ही फारच अवघड काम मला सांगताय.’मी त्यांना लगेचच म्हणालो, ‘दीदींना सांगू शकेल अशी या जगात एकच व्यक्ती आहे. आणि ती म्हणजे तुम्ही!’. यावर ‘मी विचारतो दीदीला.’ असे म्हणून तो विषय थांबला. मध्ये जवळ जवळ दोन वर्षे गेली. ते जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा मला म्हणत, ‘पाकणीकर, तुम्ही फारच अवघड काम मला सांगितलं आहे. मी तुम्हाला नंतर फोन करतो.’ पण ती गोष्ट त्यांच्या लक्षात मात्न असेच. आणि आज त्यांनी माझं हे काम केलं होतं. पुस्तक वाचनाऐवजी मी त्या येणार्या फोटोसेशनबद्दल विचार करत निद्रेच्या आधीन झालो.मधले तीन दिवस मी कसेबसे घालवले. 14 ऑक्टोबर 2009च्या संध्याकाळी चार वाजता मी, माझे दोघेही बंधू हेमंत व हरिष व माझा सहायक जितेंद्र असे जुहूच्या स्वरलता स्टुडिओत पोहोचलो. आदरणीय दीदी रेकॉर्डिंग करायला येणार होत्या. त्या व्यंकटेश स्तोत्नाचं रेकॉर्डिंग करणार होत्या. ते स्वर्गीय संगीताचे स्वर ऐकायचे आणि त्यांची प्रकाशचित्नेही टिपायची असा दुहेरी लाभ. मी जितेंद्रला म्हणालो- ‘दीदींचा मूड कसा आहे ते पाहून मी तुला इशारा करीन. तो जर उत्तम असेल तर मग तू मी त्यांचे फोटो घेत आहे असे काही फोटो काढ. मला ते हवे आहेत. फोटोसेशनचे फोटो!’ तेथे पोहोचल्यावर आम्हाला प्रथम मयुरेश पै भेटले. त्यांना आम्ही येणार याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी लगेचच दीदींना फोन केला. रेकॉर्डिंगची आम्हाला कळलेली वेळ होती चार वाजताची; पण तिथे तर काही तयारी दिसत नव्हती. मयुरेश यांनी फोन माझ्या हातात देत सांगितले की दीदींना तुमच्याशी बोलायचंय. ‘पाकणीकर, तुम्ही फार लवकर पोहोचलात. रेकॉर्डिंंग तर सहा वाजता आहे.’ त्या मोबाइलमधून मंजूळ स्वर किणकिणले. त्यांचा बोलण्याचा आवाजही तसाच स्वर्गीय. मी म्हणालो, ‘दीदी नमस्कार, काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेला या. आम्ही तोवर लाइट्सची तयारी करून ठेवतो.’ थोड्याच वेळात आम्ही तयार होतो.मध्यंतरीच्या दीड-दोन वर्षांत मी दीदींना भेटलो नव्हतो. त्याच काळात दीनानाथ रुग्णालयात त्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी तेथे गेलो होतो; पण तेव्हा कोणालाच त्यांना भेटायची परवानगी नव्हती. पण आता त्या एकदम तंदुरुस्त झाल्या होत्या. बरोबर सहा वाजता भारतरत्न लता मंगेशकर स्वरलता स्टुडिओत पोहोचल्या. त्या गाडीतून उतरल्या. सोबतच उषाताई होत्या. दोघीही अत्यंत प्रसन्न मूडमध्ये होत्या. दीदी मला म्हणाल्या , ‘किती दिवसांनी भेटत आहात?’ मला हा प्रश्न अनपेक्षित होता. मग मी हॉस्पिटलमध्ये येऊन गेल्याचे त्यांना सांगितले. त्यांचा तो मूड पाहून मी जितेंद्रला इशारा केला. त्याने त्याचे काम सुरू केले. दीदी सर्व पाहत होत्या. त्यांच्या समोर स्तोत्न लिहिलेला कागद होता. रेकॉर्डिंंगच्या आधीची तयारी. मी त्यांना मला कसे कसे फोटो हवे आहेत ते सांगितले. म्हणजे हातात समोर गाण्याचा कागद धरून गाताना, तो कागद स्टॅण्डवर लावून गाताना, हेडफोन लावलेला. मला हे सर्व टिपायचं होतं. ‘आपण रेकॉर्डिंंगच्या आधीच फोटो काढू!’ विश्वातला सर्वात सुरेल आवाज मला सांगत होता. आम्ही तयारच होतो. मायक्रोफोनसमोर साक्षात भारतरत्न लता मंगेशकर उभ्या होत्या. मी फोटो काढण्यास सुरु वात केली. मला त्यांच्या गानमुद्रा टिपायच्या होत्या. पण त्या तर समोरील लिहिलेल्या कागदाकडे बघून तो मनातल्या मनात वाचत होत्या. मी काही फोटो टिपले; पण त्यात ‘एक्स्प्रेशन’ नव्हते. मी नम्रपणे त्यांना म्हणालो, ‘दीदी, तुम्ही ते स्तोत्न गायला लागल्यावर मला पाहिजे तसे भाव चेहर्यावर आपोआप येतील. आणि मी ते चित्रित करीन.’ हे सांगण्याचे धाडस त्यावेळी मला कसे काय झाले याचा आज विचार करताना खूपच आश्चर्य वाटते. पण त्या स्वत: एक उत्तम प्रकाशचित्नकार असल्याने त्यांनी माझी अडचण समजून घेतली. पुढच्याच क्षणी त्यांच्या दिव्य स्वरात व्यंकटेश स्तोत्नाच्या रचनेने स्टुडिओ भरून गेला. एकीकडे कानावर पडणारे दिव्य स्वर अन् दुसरीकडे तो क्षण चिरंतन करण्याचे कर्तव्य अशा दुहेरी कात्नीत अडकलेले माझे मन. पुढच्याच ‘फ्रेमने’ माझे काम झाले होते. आम्ही सर्व त्या अलौकिक क्षणाचे साक्षीदार आहोत का स्वप्नात आहोत हे मनाला समजत नव्हते. त्या दिवशी विविध कोनातून विविध भाव असलेली त्यांची अनेक प्रकाशचित्नं मला टिपता आली. डिजिटल असल्याने ते फोटो त्यांनाही लगेचच दाखवता आले. त्यांनाही ते आवडले. मी त्यांना म्हणालो, ‘दीदी, एक विनंती आहे. आम्हा तिघा भावांना तुमच्याबरोबर एक फोटो हवा आहे.’ - ‘अहो, त्यात विनंती कसली करताय?’ असं म्हणत त्या परत आमच्या बरोबर फोटोसाठी उभ्या राहिल्या. एवढंच काय, पण त्या बरोबरच त्यांच्या काही जुन्या रेकॉर्र्डिंंगचे फोटोही त्यांनी दिले. एक कधीही न विसरता येणारा अनुभव घेऊन आम्ही पुण्याला परतलो.लवकरच ‘स्वरमंगेश’ कॅलेंडर तयार झाले. दीनानाथ मंगेशकर ते राधा मंगेशकर एक संगीत परंपरा. सुलभाताई तेरणीकरांनी सर्व मंगेशकरांची गुणवैशिष्ट्ये शब्दबद्ध केली. सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाचे शिलेदार म्हणून कॅलेंडरमध्ये सोनेरी शाईचा वापर करून छपाई केली. आता त्याचे प्रकाशन. मग ठरले की दीनानाथांच्या 110व्या वाढदिवसाचे निमित्त साधत 30 डिसेंबर 2009 ला म्हणजेच सरत्या वर्षाला निरोप देताना त्याचे प्रकाशन ‘प्रभुकुंज’मध्येच करायचे. अर्थात, सर्व मंगेशकरांच्या उपस्थितीत आणि लतादीदींच्या शुभ हस्ते. प्रभुकुंज सोसायटीचे एक छोटे सभागृह आहे तेथे. असा एखादा कार्यक्र म मुंबई येथे जाऊन करणे याचा मला अनुभव नव्हता. त्यातच सिनेसंगीतातील ‘ब्रॅडमन’ व ‘सोबर्स’ यांच्या ग्राउण्डवर जाऊन (संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या मते दीदी म्हणजे ‘ब्रॅडमन’, तर आशाताई या ‘सोबर्स’) खुद्द त्यांच्याच उपस्थितीत स्कोअर नाही तर नाही, पण मला विकेट तरी जाऊ द्यायची नव्हती. इथे माझ्या मदतीला धावल्या सौ. भारती मंगेशकर. त्यांना मी म्हणालो- ‘केटरर कोण असेल, स्नॅक्स काय असतील, चहा हवा की कॉफी, हे सर्व तुम्ही ठरवा. मी तेथे आल्यावर लगेचच त्यांचे पैसे देऊन टाकीन.’ त्यांच्या र्मजीतला केटरर त्यांनी निवडला. प्रसिद्धीमाध्यमांना निमंत्नणाची जबाबदारी र्शी. आदिनाथ मंगेशकर यांनी घेतली. सर्व तयारी झाली. सौ. भारतीमामींनी मला विचारलं की, ‘आधी तुमचं बोलणं झालंय हे माहीत आहे मला; पण ज्यांच्या हस्ते प्रकाशन आहे त्या व्यक्तीस म्हणजेच लता मंगेशकर यांना निमंत्नण दिलंय का तुम्ही?’ ही सूचना फारच महत्त्वाची होती. मी लगेचच दीदींना फोन केला आणि एका दमात म्हणून टाकले - ‘दीदी, 30 तारखेला संध्याकाळी प्रभुकुंजच्या हॉलमध्ये ‘स्वरमंगेश’ या माझ्या कॅलेंडरचे तुमच्या हस्ते प्रकाशन आहे. तुम्हाला निमंत्नण देण्यासाठी फोन केलाय.’ त्या नेहमीप्रमाणे प्रसन्न हसल्या आणि म्हणाल्या- ‘हो, मी नक्की येते. तुम्ही काही काळजी करू नका. छान होणार आहे कार्यक्र म.’ त्यांच्या या बोलण्याने माझं टेन्शन कुठल्याकुठे नाहीसं झालं. ठरल्याप्रमाणे 30 डिसेंबरला चार वाजता आम्ही पुण्याहून प्रभुकुंजच्या हॉलवर पोहोचलो. इतर तयारीत काही वेळ गेला. मीडियाचे प्रतिनिधी जमू लागले. भारतरत्न लता मंगेशकर बर्याच दिवसांनी जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याने ते प्रतिनिधी भरपूर तयारीने व संख्येने आले होते. जवळजवळ सतरा चॅनेल्सचे कॅमेरामन होते. इतर पत्नकारही होते. मी वर घरी जाऊन सगळ्यांना तयारी झाल्याचे सांगून निमंत्नण दिले. सर्व मंगेशकर जिना उतरून हॉलमध्ये आले. बरोबर सहा वाजता सोनेरी काठांची पांढरीशुभ्र साडी नेसलेल्या ‘स्वरसम्राज्ञी’चे आगमन झाले. त्यांची ती हसरी मुद्रा व हात जोडून सर्वांंना नमस्कार करण्याच्या शैलीनेच उपस्थितांची मने काबीज केली. थीम कॅलेंडरबद्दल मी माहिती दिल्यावर व सर्वांंना विनंती केल्यावर ‘स्वरमंगेश 2010’ या कॅलेंडरचे प्रकाशन झाले. नंतर पंडितजी म्हणाले- ‘तुम्हाला जर दीदीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता.’ त्यांच्या या वाक्यानंतर काहीच क्षणात मागे उभे राहून तो प्रसंग टिपणारे कॅमेरामन, त्यांचे सहायक, पत्नकार यांनी एकदम पुढे धाव घेतली. दीदींच्या समोरील टिपॉयवर मायक्रोफोन्सचा भला मोठा गुच्छच तयार झाला. प्रतिनिधींची ती गडबड ओसरल्यावर माझ्याकडे पाहून दीदी म्हणाल्या- ‘पाकणीकर, या कॅलेंडरच्या निमित्ताने मी मुलाखत देणार आहे. त्यामुळे ते घेऊन तुम्ही इथे शेजारी बसा.’ प्रश्नोत्तरे सुरू झाली. दीदींनी काही जुन्या आठवणी जागवल्या. सर्वांंनाच वाटत होते की त्यांनी काही ओळी गुणगुणाव्या; पण त्यांनी नकार दिला. इतर प्रश्न झाले. मग परत एकदा एक तरुण महिला पत्नकार म्हणाली- ‘आज आपके पिताजी का जनमदिन है, तो आप उनको कौनसा गाना सर्मपित करेंगी.’ प्रश्नात खोच होती; पण प्रश्न संपता संपताच हजरजबाबी असलेल्या दीदींनी उत्तर दिले- ‘अरे, मेरा पुरा जीवनही उनके प्रति सर्मपित है. आप गाना क्या लेकर बैठी?’ आर. डी. त्यांना ‘ब्रॅडमन’ का म्हणाले याचं उत्तर मला मिळालं होतं. पण परत परत गाण्याचा आग्रह होत राहिल्यावर या महान गायिकेने विचारले- ‘कोणतं गाणं म्हणू?’ सर्वांंकडून उत्तर आलं ‘ऐ मेरे वतन के लोगों.’ दीदींनी डोळे मिटले. स्वर लावला. मी त्यांच्या जाहीर कार्यक्र मात त्यांच्या तोंडून हे गाणं ऐकलंय; पण इथे वेगळीच अनुभूती होती. हॉलभर शांतता पसरली. हवेत फक्त आणि फक्त ‘स्वरसम्राज्ञी’चे स्वर. कोणत्याही वाद्याच्या अथवा ठेक्याच्या साथीशिवाय हॉलमध्ये विहरणारे स्वर! माझ्या अगदी शेजारून येणारे व थेट माझ्या हृदयात घुसणारे स्वर. आदरणीय र्शीमंत बाबासाहेब पुरंदरे एका भाषणात म्हणाले होते की, ‘हवेत दोन्ही हात फिरवून हवा गोळा करून जर का पिळली तर त्यातून लताचे स्वरच ठिबकतील.’ - 1947 सालापासून ही जादू भारतात रोज घडत आहे. आणि होता होता या अद्वितीय स्वराने सारं विश्वच व्यापून टाकलं आहे. ग्रीक तत्त्वज्ञ प्लॅटो यानं असं म्हटलं आहे की. – “Music and rhythm find their way into the secret places of the soul.” - खरं आहे. दीदींच्या दिव्य स्वरांनी करोडो रसिकांच्या आत्म्याचा एक असा कोपरा व्यापून टाकला आहे की जिथे इतर कशालाही थारा नाही.sapaknikar@gmail.com (लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)