ओंकार करंबेळकर
साहित्याचं नोबेल मिळवणारे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या मुंबईतील जन्मस्थळावरुन वाद सुरु झाला आहे. किपलिंग यांचा जन्म जेजे स्कूल ऑफ आर्टच्या डीन बंगल्यात झाल्याचा दावा पुरातत्त्व विभागाने केला आहे, तर किपलिंग यांचा जन्म परिसरातील एका कॉटेजमध्ये झाल्याचे जेजे व्यवस्थापनाचे म्हणणो आहे. हा बंगला ‘संरक्षित वास्तू’ म्हणून
जाहीर करण्यास जे.जे.चे माजी विद्यार्थीआणि चित्रकारांनी विरोध केला आहे. यानिमित्ताने रुडयार्ड किपलिंगच्या वास्तूचा हा कलंदर शोध.
----------------------------
जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे नावच ऐकले की मनामध्ये महाराष्ट्रातील कलापरंपरेबाबत आदराची भावना तयार होते. मुंबईच्या मध्यभागी भव्य आवार, झाडी, ब्रिटिशकालीन दगडी इमारती, भविष्यात उदयास येणा:या कलाकारांची लगबग आणि आपल्याला माहिती असणा:या आणि आता जगविख्यात झालेल्या चित्रकारांची मालिका लगेच डोळ्यासमोर येते. गेल्या दीड दशकाहून अधिक काळ ही परंपरा अधिकाधिक समृद्ध होत आहे.
उपयोजित कला, फाईन आर्ट, आर्किटेक्चर अशा स्वतंत्र इमारती, भारतातील उपयोजित कलेची सर्वाधिक पुस्तके असणारे ग्रंथालय एकाच आवारात येथे पाहायला मिळते. या सर्व इमारतींबरोबर एक हिरव्या रंगाची लाकडी आणि तितकीच पुरातन वास्तू आपले लक्ष वेधून घेते ती म्हणजे जे.जे.च्या डीन पदावरील व्यक्तीस राहण्यासाठी बांधलेला बंगला. हा बंगला आता वेगळ्याच कारणाने गाजू लागला आहे. 1882 पासून साधारणत: 2क्क्2 र्पयत या बंगल्यात जे.जे.च्या डीनचे वास्तव्य असे. परंतु 2क्क्2च्या नंतर मात्र डीन बंगल्याची ओळख किपलिंग बंगला अशीच ठासविण्याचा जबरदस्त प्रयत्न सुरू झाला आहे.
जंगल बुकमुळे ओळखीच्या झालेल्या रुडयार्ड किपलिंगचा या परिसराशी कोणो एकेकाळी संबंध होता हे निश्चित. त्यांचा जन्मही मुंबईच्या याच परिसरात झाला असण्याची शक्यता आहे. मात्र एवढय़ावरून त्यांचे जन्मस्थळ हाच बंगला आहे असे म्हणण्यात येऊ लागले आणि त्यावर अनेकांनी मनातून शिक्कामोर्तबही करून टाकले. गेल्या दशकभरामध्ये या वास्तूत किपलिंगचे स्मारक करण्याचे घाटत आहे. त्यासाठी त्यांचा जन्म याच बंगल्यात झाला अशी पाटी आणि प्रवेशद्वारावर त्याचा पुतळाही बसविला आहे. केवळ किपलिंगच्या प्रेमापोटी किंवा इतर हेतू डोळ्यासमोर ठेवून जर येथे त्यांचे स्मारक झाले तर इतिहासातील घटनांशी ते विसंगत होईलच आणि चुकीचे पायंडे आपण घालू अशी भीती वाटते.
सध्याचा डीन बंगला आणि येथील इतर वास्तू बांधल्याच गेल्या मुळी रुडयार्डच्या जन्मानंतर काही वर्षानी. त्यामुळे डीन बंगल्यामध्ये त्यांचा जन्म झाल्याची शक्यतादेखील मानता येत नाही. रुडयार्डचे वडील जॉन लॉकवूड किपलिंग हे प्रख्यात शिल्पकार म्हणून नावाजलेले होते आणि ते जे. जे. स्कूलमध्ये अध्यापन करीत असत. छत्रपती शिवाजी टर्मिनसमधील अनेक कलाकृती तयार करण्यामध्ये जॉन लॉकवूड यांचा मोलाचा हातभार व मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात येते. क्रॉफर्ड मार्केटमध्येही त्यांच्या शिल्पांचा उपयोग झाला आहे. 1857 साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टची एलफिन्स्टन इन्स्टिटय़ूट येथे स्थापना झाली. 1865 च्या सुमारास ते आताच्या कॅम्पसमध्ये आणण्यास सुरुवात झाली. याच वर्षी 1865 च्या डिसेंबर महिन्यात रुडयार्डचा जन्म झाला, तर डीन बंगला 1882 साली बांधला गेला. काही लोकांच्या मते बांधकाम सुरू असताना येथे कॉटेजेस होत्या. त्यापैकी एखाद्या कॉटेजमध्ये त्यांचा जन्म झाला असावा. पण असे असले तरी त्यामुळे त्यांचा जन्म डीन बंगल्यातच झाला असे म्हणता येणार नाही.
जॉन लॉकवूड जितके प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते तितकेच किंबहुना त्याहून प्रसिद्ध रुडयार्डची आई अॅलिस ही होती. इंग्लंडमध्ये रेव्ह. जॉर्ज ब्राऊन मॅकडोनल्ड यांच्या पोटी जन्मलेल्या आणि मॅकडोनल्ड सिस्टर्स म्हणून त्या काळात नावाजलेल्या बहिणींपैकी ती एक होती. डलनेस अँड मिसेस किपलिंग कॅन नॉट एक्झीस्ट इन सेम रूम अशा शब्दांमध्ये भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिनने त्यासंबंधी वक्तव्य केले होते. अॅलिसची बहीण लुईसा हिचा मुलगा स्टॅन्ले बाल्डविन हे इंग्लंडचे तीन वेळा पंतप्रधानही झाले. त्यानंतरही त्यांच्या पुढच्या पिढय़ा इंग्लंडच्या उद्योग आणि राजकारणामध्ये कार्यरत राहिल्या. थोडक्यात, रुडयार्डचे आई-बाबा हे कोणी साधेसुधे दांपत्य नव्हते. मुंबईत ब्रिटिशांसाठी आणि ब्रिटिशांसाठी नोकरी
करणा:यांसाठी शक्य तितक्या आधुनिक सोयी पुरविण्याचा प्रयत्न सरकार करत असे. अशी पाश्र्वभूमी आणि सामाजिक दर्जा लाभलेले दांपत्य आपले अपत्य कॉटेजमध्ये जन्मास घालण्याची शक्यता थोडी कठीण वाटते. मुंबईच्या तत्कालीन रुग्णालयांमध्ये नोंदी ठेवल्या असतील तर कदाचित किपलिंगच्या जन्माची नोंदही सापडू शकेल.
या सर्व नोंदी लक्षात घेत घेत आता या बंगल्याची नक्की स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी गेल्यावर निराशाच वाटय़ाला आली. ज्या बंगल्यामध्ये एकापेक्षा एक वरचढ असणारे कलाकार डीन असताना येथे राहिले, कित्येक चित्रकार ज्या बंगल्याच्या आवारात वाढले तो अगदीच मोडकळीस आला आहे. 2क्क्2 पासून बंगल्यात डीन राहत नसल्यामुळे मनुष्यांचा रोजचा वावर तेथे नाही. हिरव्या रंगाच्या लाकूडकामामुळे ओळखली जाणारी वास्तू सर्वार्थाने फिकी पडू लागली आहे. लाकडी सज्जा आणि बाजूच्या भिंतींचेही तुकडे पडत आहेत. याच बंगल्याशेजारी राहण्यासाठी बंगल्याला लागूनच लहान घरे तयार करण्यात आली आहेत, त्यांचीही अवस्था तशीच आहे. बंगल्याच्या दोन्ही बाजूस असणा:या अंगणांमध्ये सुंदर कारंजे लावण्यात आले होते. धातूच्या मूर्तीमधून उडणा:या कारंजालाच कोणीतरी पांढरा रंग लावून टाकलेला दिसला. ज्या आवारात कलेची उपासना होते तेथील कारंजाला असा पांढरा रंग फासण्याचे कोणाच्या डोक्यात आले असावे सांगता येत नाही. बंगल्याच्या वरती चारही बाजूंनी उंच झाडांनी वाकून कमानीसारखे छत्र धरले आहे. याच झाडांच्या फांद्या घराच्या मुळावर उठल्या आहेत. आधीच जीर्ण झालेल्या इमारतीवर या फांद्या कधी पडतील याचा नेम नाही. उजव्या बाजूस कोसळलेल्या मोठय़ा झाडामुळे लवकरच बंगल्यावरील फांद्या एखाद्या पावसात माना टाकायला वेळ लावणार नाहीत हे निश्चित. कावळे-कबुतरांचा मुक्त वावर, धूळीची पुटे, पालापाचोळ्यांनी भरलेली दोन्ही अंगणो आणि स्वागतासाठी शेवाळाने भरलेल्या सिंहांच्या मूर्ती पाहिल्यावर बंगल्याची रया कितपत गेली आहे ते जाणवते.
या बंगल्यात रुडयार्डचा पुतळा किंवा पाटी लावली म्हणून त्याचे जन्मस्थळ ते होत नाही. इंटरनेटवर त्याचे जन्मस्थळ हा बंगलाच असल्याचे सांगितल्यामुळे अधूनमधून पर्यटकदेखील येथे चक्कर मारतात. रुडयार्डनंतर आपल्या सर्वाच्या आवडीचे कॉमन मॅन रेखाटणारे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचेही स्मारक येथे करण्याचा प्रस्ताव अचानक पुढे आला आहे. जे.जे.चे माजी विद्यार्थी आणि आता प्रथितयश चित्रकार असणा:या मंडळींनी याला ठाम विरोध केला आहे. वासुदेव गायतोंडे, बाबूराव सडवेलकर, प्रल्हाद धोंड, जी. डी. गोंधळेकर अशा आणि कित्येक नामवंतांचा संस्थेशी संबंध आला आहे. परंतु एका चित्रकाराचे स्मारक झाले तर त्यामागोमाग इतरांचीही स्मारके करण्याची मागणी हळूहळू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यापेक्षा वर्षातून एकदा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादे प्रदर्शन किंवा प्रदर्शनामध्ये त्यांची माहिती, ओळख नव्या विद्याथ्र्याना करून देता येईल अशी जागा ठेवता नाही का येणार? स्मारके ही लालफितीची घट्ट आवरणो घेऊन आली तर त्यापासून मुले प्रेरणा कशी घेतील?
जे.जे.चा खजिना
गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळामध्ये जे.जे.मध्ये शेकडो चित्रकारांनी शिक्षण घेतले. आज जगभर प्रसिद्ध असणा:या चित्रकारांनी शिकत असताना तसेच नंतरही काढलेली अनेक चित्रे संस्थेच्या साठवणीत आहेत. त्या चित्रंची स्थिती सुधारण्याचे कामही चालू आहे. हा ठेवा मुलांसमोर येण्यासाठी विशेष दालनाची निर्मिती केली पाहिजे. चित्रंच्या संग्रहालयामध्ये ज्याप्रमाणो ती अधिकाधिक टिकून राहण्यासाठी विशेष भिंती त्याचप्रमाणो इतर सोयींची निर्मिती केली जाते अशा सुसज्ज जागेची खरी गरज आहे. डीन बंगल्याच्या मातीच्या व लाकडी भिंतींमध्ये हा अमूल्य ठेवा नक्कीच टिकणार नाही. सुसज्ज दालन उभे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यास चित्रकारांनी, तज्ज्ञांनी पुढे यायला हवे. (ते पुढे आल्यावर सरकारने त्यांचे थोडेतरी ऐकायला हवे).
एकदा ‘हो’ म्हटल्यावर.
ख्यातनाम चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड जे. जे. स्कूलच्या डीन पदावर असताना किपलिंगच्या या बंगल्याशी असणा:या कथित संबंधांवर चर्चा होऊ लागल्यावर तत्कालीन अध्यापक वर्गाने किपलिंगचे जन्मवर्ष आणि बंगल्याच्या बांधणीचे वर्ष यातील विसंगती लोकांना सांगण्याचे ठरविले होते. मात्र तितक्यात कोणीतरी किपलिंग येथे जन्मास आले असे सांगितल्यामुळे बंगला आणि झाडी शिल्लक राहील असा इशारा दिला. त्यामुळे झाडे व हा सुंदर बंगला वाचविण्यासाठी किपलिंगचा जन्म तेथेच झाला असा प्रवाद कायम ठेवण्याचा निर्णय झाला. हे त्यांनी आपले आत्मचरित्र रापणमध्ये लिहून ठेवले आहे. मात्र असेच होकार मिळत गेल्याने समज रूढ होत जातात. 1965 च्या काळातही बंगल्याच्या जागेत झाडी तोडून सरकारी कार्यालये तयार करण्याचा घाट घातला जात असल्याच्या बातम्या येत होत्या असे त्यांनी नमूद केले आहे. आज इंटरनेटवर सर्वत्र किपलिंगचा जन्म डीन बंगल्यात झाला असे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर रुडयार्डचे वडील जॉन लॉकवूड जे.जे.चे पहिले डीन होते असेही सांगण्यात येते. त्यामुळे सत्यापासून अधिकाधिक दूर जाण्याची भीती वाढते.
बंगल्यात डीनच राहिले पाहिजेत
आम्ही शिकत असल्यापासून या बंगल्यास आम्ही डीन बंगला असेच म्हणत आलो आहोत. किपलिंग बंगला अशी ओळख नंतर निर्माण करण्यात आली आहे. ज्या परिसरामध्ये कलेचे विद्यार्थी दिवसभर असतात, अशा परिसरामध्ये एका जबाबदार व्यक्तीने राहणो गरजेचे आहे. त्यामुळे डीन याच बंगल्यामध्ये राहायला गेले पाहिजेत. आपल्याकडे अनेक तज्ज्ञ उपलब्ध आहेत, तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यांच्या मदतीने बंगल्याचा जीर्णोद्धार करून त्यात डीन राहायला जाऊ शकतात. रुडयार्ड किपलिंग किंवा आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक येथे करण्याऐवजी विद्याथ्र्याना जे. जे. कडे असणारी जुनी चित्रे पाहण्यासाठी एखादे कायमस्वरूपी दालन आवारामध्ये निर्माण केले गेले पाहिजे. राज्यभरातून किंवा देशातून विद्यार्थी आणि कलाप्रेमी मुंबईत येतात तेव्हा त्यांना मुक्तपणो चित्रे पाहता येतील. चित्रे ही केवळ पाहायची नसतात तर ती वाचायची असतात असे मी मानतो. तेव्हा अशा दालनात जर चित्रे वाचता आली तर त्यातील प्रेरणोने नवे चित्रकार घडत जातील. आर. के. लक्ष्मण यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचेच स्थान आहे. पण असे एक स्मारक झाले तर इतरांवर अन्याय झाला अशी भावना होऊन हळूहळू इतरांचीही स्मारके करण्याची मागणी पुढे येऊ लागेल. त्यामुळे स्मारकापेक्षा जे.जे.कडील चित्रंसाठी कलादालन कसे होईल याचा विचार व्हायला हवा. आज चित्रकार परदेशात गेले तरी जे.जे.चे विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे आदराने व विशेष महत्त्व देऊन पाहिले जाते इतका या संस्थेचा दबदबा आहे. एक कलापरंपरा व कुटुंबच जे.जे.ने निर्माण केले आहे. जर आमचा आवाज सातासमुद्रापलीकडे जात असेल तर एक किलोमीटरच्याही पेक्षा कमी अंतरावर असणा:या मंत्रलयात का जात नाही हे कोडेच आहे.
- वासुदेव कामत, ज्येष्ठ चित्रकार
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
onkark2@gmail.com