- डॉ. यश वेलणकर
सजगता वाढवण्याचे वेगवेगळे उपाय गेला एक महिना तुम्ही समजून घेत आहात. श्वासामुळे होणारी शरीराची हालचाल जाणणे, बाह्य आवाज ऐकत राहणे, श्वासाचा स्पर्श जाणत राहणे, आपले हातातील काम पूर्ण जाणीवपूर्वक करणे असे चार मार्ग आपण पाहिले. या सर्व उपायांचा उद्देश मनाला वर्तमानात आणणे आणि अधिकाधिक वेळ क्षणस्थ राहणे हा आहे. सजगतेचा, माइंडफुलनेसचा एक उद्देश तोच आहे; पण ती पूर्ण सजगता नाही.काही उदाहरणे पाहू.कुत्रा माइंडफुल असतो का? माणूस सोडून अन्य सर्व प्राणी नेहमी क्षणस्थच असतात. कुत्रा भविष्याची तरतूद करीत नाही. तो प्रत्येक क्षण वर्तमानात जगत असतो. जागा असताना तो त्याक्षणी येणारे सर्व आवाज, गंध घेत असतो. तरीही तो माइंडफुल असतो असे म्हणता येत नाही. कारण माइंडफुल असणे, सजग असणे म्हणजे केवळ बाह्यविश्व नाही तर अंतर्विश्वदेखील प्रतिक्रि या न करता जाणत राहणे होय. असे केवळ माणूसच राहू शकतो. कुत्रा किंवा अन्य प्राणी फक्त बाह्यविश्व जाणत असतात. पण आता मला हे हाड चघळण्याचा कंटाळा आला आहे हे कुत्र्याला समजत नसावे, त्याला कंटाळा येतो आणि एक हाड टाकून तो दुसरीकडे जातो. पण मला कंटाळा आला आहे हे त्याला समजत नाही. ते फक्त माणसालाच कळते. कारण माणसाच्या मेंदूत प्रीफ्रंटल कोर्टक्स विकसित झालेले आहे, तेवढे अन्य कोणत्याच प्राण्यात नाही. त्यामुळे माइंडफुल असणे, सजग असणे केवळ मानव प्राण्यालाच शक्य आहे. मतिमंद नसलेली कोणतीही व्यक्ती सजग राहू शकते; पण त्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्यावे लागते. सजग राहणे हे एक कौशल्य आहे, ते प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते. बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात या क्षणी काय चालले आहे हे जाणत राहणे म्हणजे सजगता होय.माणसाच्या अंतर्विश्वात काय काय असते? विचार, भावना, समज, विश्वास, मूल्ये, संस्कार, आवडीनिवडी यांनी आपले अंतर्विश्व घडत असते. मला चॉकलेट फ्लेवर आइस्क्र ीम आवडते; पण स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत नाही, मला भाषण करता येते; पण चित्र काढता येत नाही. याची जाणीव मला असते याला आत्मभान म्हणतात. आत्मभान हा माइंडफुलनेसचा एक महत्त्वाचा घटक आहे. असे आत्मभान अन्य प्राण्यांना नसते. माणसालादेखील हे भान जन्मत: असतेच असे नाही. सजगतेच्या अभ्यासाने ते वाढते. त्यासाठीच सजगतेचे विविध व्यायाम नियमितपणे करायला हवेत. आपले मन कसे काम करते हे समजून घ्यायला हवे.माणसाचे मन तीन प्रकारे काम करते असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात. संगणकाचे जसे वेगवेगळे मोड असतात तसे आपल्या मनाचे तीन मोड असतात. याला मल्टिमोडल थिअरी आॅफ माइंड या नावाने ओळखले जाते. एक उदाहरण घेऊन हे तीन मोड समजून घेऊया. पहिला प्रकार म्हणजे माझ्या मनात एखादा विचार किंवा भावना येते आणि त्याची जाणीव न होताच मी लगेच कृती करतो. रस्त्याच्या एका बाजूला मी उभा असतो आणि पलीकडे जावे असा विचार माझ्या मनात येतो आणि मी लगेच रस्ता ओलांडू लागतो. शाळेतील लहान मुले असेच वागतात म्हणून शाळेजवळच्या रस्त्यावर वाहने हळू चालावा अशी सूचना असते. माणूस रागाच्या भरात एखादी कृती करतो त्यावेळी त्याचे मन याच मोडमध्ये असते. याला इम्पल्सीव किंवा ‘सैराट’ वागणे म्हणता येईल. या मोडमध्ये आपले आत्मभान नसते, आपले वागणे अन्य प्राण्यांसारखे होत असते. लहानपणी म्हणजे साधारण दहा-बारा वर्षापर्यंत मुलांचे वागणे बºयाचदा असे असते. कारण आत्मभानासाठी आवश्यक असलेला मेंदूतील भाग तोपर्यंत काम करू लागलेला नसतो. त्यामुळेच शाळेतील मुले अचानक रस्त्यावर धावू शकतात. तेथे अपघात टाळायचे असतील तर वाहनचालकाने अधिक सजग असावे अशी अपेक्षा असते. त्याला सजग करण्यासाठी ‘शाळा - वाहने हळू चालवा’ अशी पाटी असते. मानवी मनाचे अन्य दोन मोड वयाच्या दहा वर्षानंतर अधिक विकसित होतात. ते विकसित झाले की मला माझ्या विचाराचे भान येते. रस्त्याच्या पलीकडे जाऊया असा विचार माझ्या मनात आला आहे हे मला समजते. पण मी लगेच रस्त्यावर पळत नाही. रस्त्यावर डाव्या उजव्या बाजूने वाहन येत नाही हे मी पाहतो आणि मगच रस्ता ओलांडतो. जर वाहने येत असतील तर थांबतो, वाट पाहतो.मी ज्यावेळी असा थांबतो त्यावेळीही माझे मन दोन मोडमध्ये काम करू शकते.. या दोन मोडना ‘डुइंग’ म्हणजे कर्ता आणि ‘बीइंग’ म्हणजे साक्षी अशी दोन नावे दिली जातात. कृती प्रकारात मी शारीरिक किंवा मानसिक पातळीवर काही कृती करीत असतो. मला रस्ता क्र ॉस करायचा असतो, पण रस्त्यावर गाड्या भयंकर वेगाने सतत धावत असतात, त्या थांबतच नाहीत, त्यामुळे मी रागावतो. पण रागवायचे कुणावर? त्यामुळे राग व्यक्त करू शकत नाही, मी त्याचे दमन करतो. माझे मन कुठेतरी दुसरीकडे गुंतवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मनातील विचार बदलतो. हा आपल्या मनाचा कर्ताभाव आहे. काहीवेळा तो उपयुक्तही असतो. पण मी माझ्या भावनांचे असे सतत दमन करीत राहिलो तर त्याचा मला त्रास होऊ लागतो. माणसाला होणाºया अनेक शारीरिक, मानसिक आजारांचे कारण मनातील भावनांचे दमन हे आहे.मनात एखादी भावना आली की त्यानुसार कृती करायची किंवा तो राग गिळायचा असे दोनच पर्याय बºयाच जणांना माहीत असतात. पण या शिवाय आणखी एक तिसरा पर्यायही शक्य आहे. सजगतेच्या अभ्यासाने हा तिसरा पर्याय म्हणजेच मानवी मनाचा तिसरा मोड आपण वापरू शकतो. हा तिसरा मोड म्हणजे बीइंग किंवा साक्षीभाव होय. माइंडफुलनेस म्हणजे हा साक्षीभाव, हा बीइंग मोड बलवान करायचा, त्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्यायचे.त्यासाठी माझ्या मनात जी भावना आहे तिला नाकारायचे नाही. मला राग आला आहे, किंवा मला निराश वाटते आहे हे मान्य करायचे आणि मनातील भावनेला नाव द्यायचे. मी माझ्या भावनेला नाव देतो त्यावेळी तिची माझ्यावर ताबा घेण्याची शक्ती कमी होते. मनातील भावनांचा परिणाम म्हणून आपल्या शरीरात काही रसायने पाझरत असतात. त्यांचा परिणाम म्हणून माझ्या शरीरात काही संवेदना निर्माण होतात. छातीत धडधडते, घाम येतो, अंगाची आग होते, छातीवर, डोक्यावर वजन येते. सजग व्हायचे म्हणजे शरीरावरील या संवेदना जाणायच्या, पण त्यांना घाबरायचे नाही, प्रतिक्रि या न देता त्या कितीवेळ टिकतात ते पाहत राहायचे. असे केल्याने त्रासदायक भावनांची तीव्रता कमी होते, त्यांचा शरीर मनावर होणारा दुष्परिणाम कमी होतो. प्रतिक्रि या न देता शरीराच्या संवेदना आणि मनातील भावना, विचार जाणत राहणे म्हणजेच माइंडफुल असणे, सजग असणे. यापुढील आठवड्यात असे साक्षी राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या मेंदूला त्याचे प्रशिक्षण दिले तर ते जमू लागते. ते कसे द्यायचे हे पुढील आठवड्यात समजून घेऊया..