- सुभाष अवचट
ठ म्हणता भ उमगत नाही. तगमग थांबत नाही. दार उघडत नाही. उजेड दिसत नाही. कसली ठिणगी म्हणून पेटत नाही. ओला चिकट कंटाळा पसरून असतो.. ही अवस्था सगळ्याच कलाकारांच्या नशिबात लिहिलेली असते.मी तरी असा कोण वेगळा लागून गेलो?सारखी तीच तीच गवारीची पांचट भाजी खाऊन खाऊन कंटाळा यावा, तसं मला झालं होतं. मी रोज तेच तेच करतो आहे. तेच कॅन्व्हास. तेच रंग. तीच टेक्श्चर्स. तेच तंत्र. विषयही तेच. खूप काम झालेलं, खूप कौतुक झालेलं. त्या कौतुकाचं ओझं डोक्यावर वाढत चाललेलं आणि जे जे जुनं केलं ते ते सगळंच साचून राहिलेलं. लोक म्हणत, कसला भारी रे तू, आणि मी माझ्या आत साचत चाललेल्या डबक्याने चिडीला आलेलो.हे होतं असं.सगळ्यांचंच होतं. कलाकारांना तर शापच असतो तो. सुटका होत नाही. हळूहळू आपण या गुंत्यातून सुटायला हवं; ही इच्छाच मरायला लागते. मग माणसं जुन्या रांगोळ्या घालत राहतात. सवयी सुटत नाहीत. स्टाइल्स बदलत नाहीत. कारण माणसं भिऊन असतात. टरकून असतात. ओवळं सापडलं नाही तर नागडं राहावं लागेल या भीतीने सोवळी सोडत नाहीत. मी तसा नागडेपणाला घाबरणारा नव्हे; पण अंगावरच्या रंगांचे जुने लेप सोलून सोलून निघत नव्हते. सगळ्यापासून दूर जायचं, ते कुठे? हे ठरत नव्हतं. मी काम करत होतोच. कॅन्व्हासमागून कॅन्व्हास हातावेगळे होत होते. पण मला ज्याची तहान लागली आहे, ते ‘हे’ नव्हे; याची जाणीव मनात टक्क जागी असे. छळ.शेवटी त्या जीवघेण्या डिप्रेशनमध्येच एका कुठल्यातरी क्षणी डोळ्यापुढे देवराई सळसळली.कितीतरी वर्षं गावाबाहेर वाढत राहिलेल्या पुरातन वृक्षांचं गूढ वन. लहानपणी होतं ते माझ्या आसपास. तिथून जे मनात घुसलं, ते बहुतेक मग तिथेच वाढत राहिलं. त्याची मुळं खोल घुसत राहिली असावीत. पारंब्या शरीरात पसरत राहिल्या असाव्यात. कधी कधी दिसायचं. पानांच्या उंच पसार्याच्या चिमटीतून उजेडाचे कवडसे पाझरत खाली बुंध्याशी येतात, तिथे ध्यानस्थ बसलेल्या आकृत्या दिसत. या जिवंत आकृत्या त्या झाडाखाली स्वस्थ बसून काय करत असतील, असं मनात येई. देवराईतली झाडं कुणी मुद्दाम लावत नाही. वाढवत नाही. ती आपोआप रुजतात. वाढत जातात. माणसाच्या स्पर्शाविना वाढलेलं हे जंगल देवाचं असतं. त्या गूढ जगाला उद्देश नाही, व्यवस्था नाही, रीत नाही, नियम नाहीत.. पुराणपुरुष असावेत अशा त्या झाडांनी बघता बघता माझा कब्जा घेतला आणि त्यांच्या त्या ओल्या काळ्या सावलीत मनातले पशू वितळू लागले.खूप वर्षांपूर्वी परदेशात प्रवासाला निघालेलो असताना झेन तत्त्वज्ञानाचं एक चिटुकलं पुस्तक हाती लागलं होतं. त्यातले झेन गुरुजी भारी होते. एक शिष्य त्यांना म्हणाला, गुरुजी, मला स्वत:चा शोध घ्यायचा आहे, मदत करा.गुरुजी म्हणाले, जंगलात जा. जंगल तुला शिकवेल. परत येऊन काय शिकलास ते सांग !हा गेला जंगलात. तर त्याला अचानक विचित्र आवाजच ऐकू येऊ लागले. कोणीतरी जोरात उधळलंय. मोठे घुत्कार घालतंय. झाडांच्या बुंध्याला अंग घासतंय. डरकाळ्या फोडतंय. दगडांना टक्कर देत सुटलंय. त्याला वाटलं, माजावर आलेला बैल असावा. भयंकर मोठय़ा आकाराचा अवाढव्य, अजस्र बैल !.. त्याला दुसरं काही दिसेना.तो परत आला, तर गुरुजी म्हणाले, काय शिकलास?तो म्हणाला, काही नाही गुरुजी. फक्त एक आडदांड बैल होता असावा जंगलात. दुसरं काही दिसलं नाही.गुरुजी हसले. म्हणाले, वेड्या, बैल होता; पण तो जंगलात नव्हे, तुझ्या मनात होता. आहे अजून तो तिथे. पाहिलास का? आत्मशोधाला निघालाहेस ना.? आधी त्या बैलाला हाकल; तरच दुसरं काही दिसेल!- खूप वर्षांपूर्वी पुस्तकात भेटलेले ते झेन गुरुजी अचानक मदतीला धावल्यासारखे आठवले मला. एका रात्री त्यांना मिठी मारून रडलो. म्हटलं, माझा बैल सापडला मला, गुरुजी !त्या बैलाला हाकलला, आणि अचानक माझ्या मनात झाडं वस्तीला आली. देवराईतली झाडं. त्यांचा स्वभाव, त्यांची सुख-दु:खं घेऊन आली. मी नम्र होऊन त्यांना शरण गेलो. मग त्या झाडांनी मला त्यांचे आकार दिले. रंग दिले. टेक्श्चर्स दिली. सावल्यांचे तुकडे दिले. कवडशांच्या झिरमिळ्या दिल्या. बुंध्यांचे खरबरीत स्पर्श दिले. पानांची हिरवी ओल दिली. माझ्या यशस्वी, र्शीमंत; पण शुष्क आयुष्यात नवं कोवळं रक्त भरलं.. तिथून मग मी सुटलो... मी पूर्वीसारखा अजिबातच नव्हतो. कातडी सोलून काढावी, तसा ताजा, कोवळा, मऊ होऊन गेलो होतो. माझ्या वसवसत्या अस्वस्थ आयुष्यात अचानक शांतता पसरली. सतत उसळ्या खाणारं माझं अस्वस्थ मन वडीलधार्या खोल तळ्यासारखं नि:शब्द होऊन गेलं. पहाडे तीन तीन वाजता उठून मी कॅन्व्हाससमोर बसू लागलो. तहानभुकेची जाणीव संपली. व्यसनांच्या गरजा सरल्या. माझ्या हातातल्या रेषा वळल्या. रंग सौम्य झाले. थरावर थर चढवून टेक्श्चर्स रचण्याचं हातखंडा, कसब वितळून गेलं. मी वापरतो ते अँक्रेलिक रंगसुद्धा वॉटर कलर्ससारखे पातळ, पारदर्शी होऊन गेले. कितीतरी दिवसांनी मी माझ्या कॅन्व्हासवर गाणी वाहत चाललेली अनुभवत होतो...हेच तर हवं होतं मला. नवं. आधीसारखं नसलेलं. कधीच न केलेलं. न अनुभवलेलं. कोरं. अस्पर्श.कधीचा शोधत होतो.आधीच का नाही सापडलं? वयाच्या चाळिशीत? निदान पन्नाशीत? आता तर साठी उलटली की !कदाचित, त्यासाठी रक्तामांसाची किंमत मोजावी लागत असावी. नशिबात लिहिलेला असह्य छळ सोसून पूर्ण करण्याची गरज असावी. ‘प्रोसेस’मधून जाण्याला पर्याय नसावा. या विचित्र ट्रान्झिटमधून खंगतखंगत हिंमत ठेवून पुढे सरकत राहातात, ते सुटतात. बाकीच्यांचं माकड होतं.अपवाद एकच.ज्ञानेश्वर !वयाच्या सोळाव्या वर्षीच हा माणूस सगळ्यातून सुटून ‘तिथवर’ कसा पोहोचला, देव जाणे!मी आत्तापुरता तरी ‘सुटलो’ आहे ! ------------------------------subhash.awchat@gmail.com(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)