- राजू नायक
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट म्हणाले, ‘मी दहा वर्षांनंतर गोव्याला आलोय आणि जो गोवा बघतोय तो मनाला यातना देणारा आहे!’.. नेमके हेच ते पुण्याबद्दलही बोलले. त्यांचे म्हणणे पुणे ओळखच विसरून जावी इतके बदलले आहे.माझ्या तिन्ही पुस्तकांत या ओळख विसरण्याइतपत बदललेल्या गोव्याचे प्रक्षोभक चित्रण आहे, जो गोवा सहसा दिसत नाही. सुंदर, तजेलदार आणि बुद्धिमान दिसणार्या गोव्याला अनेक विकारांनी ग्रासले आहे. त्याचा वेध वेगवेगळ्या अंगांनी घेण्याचा प्रयत्न या तिन्ही पुस्तकांत आहे. त्यातील ‘जहाल आणि जळजळीत’ हे पुस्तक राजकारणावरचे, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ पर्यावरणावरचे तर ‘ओस्सय’ हे संस्कृतीवर उमटलेले ओरखडे दाखवते. राजकारणावरचे पुस्तक स्वतंत्र असले तरी प्रत्येक विषयाच्या तळाशी राजकारणच विकारी फुत्कार सोडते आहे, हे जाणवेल.यातील बहुसंख्य लेख ‘लोकमत’च्या ‘हॅलो रविवार’ या विशेष आवृत्तीमधले. संपूर्ण गोव्याचे वैचारिक झरे त्यात वाहतात. राज्यातला प्रत्येक लेखक, विचारवंत त्यात लिहायला उत्सुक असतो. पुस्तकामधील माझे विशेष लेख राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांचा ऊहापोह करतात. ते पुस्तकरूपाने सांगण्याचा अट्टहास एवढय़ाचसाठी केला कारण जे लोकांना आधीच माहीत होते, त्याची पुनरावृत्ती त्यात नव्हती. दुसरे लोकांना, वाचकांना केवळ स्तंभित करणे, धक्का देणे आणि सनसनाटी निर्माण करणे हा हेतू तर नव्हताच. लेख संशोधनात्मक; परंतु समतोल आहेत. शिवाय आक्रमक निश्चित आहेत. कोणाची भीडमुर्वत न बाळगणे हा तर माझा स्वभावधर्म. जो प्रत्येक पत्रकाराचा स्वभावधर्म असलाच पाहिजे.‘जहाल आणि जळजळीत’ या पुस्तकात गेल्या 50 वर्षांतील गोव्याच्या राजकारणाचा वेध आहे. दयानंद बांदोडकर यांच्यापासून ते मनोहर र्पीकर यांच्या कारकिर्दीचा आढावा आहे. बांदोडकर पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी देशाच्या राजकारणात ‘बहुजन’ मुद्दा पहिल्यांदा आणला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना, बहुजन समाजाला सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी लाभलेले राजकीय हत्यार; परंतु स्वत:च्याच करिश्म्यात फसल्यानंतर संघटनेचा र्हास आणि त्यानंतर सौदेबाजीत फसलेला हा पक्ष आज उच्चवर्णीयांनी आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापरणे चालविले आहे. र्पीकरांनीही आपल्यानंतर नवे नेतृत्व राज्यात तयार होऊ दिले नाही. काँग्रेस पक्ष म्हणजे स्वार्थाचीच कहाणी. या राजकीय नेतृत्वाने राज्याचे लचके तोडू दिले आणि गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आणले. ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीने येथील पर्यावरणाच्या प्रश्नांवर नेहमीच सडेतोड भूमिका घेतली आहे. लोह खनिजाच्या खाणींवर ‘लोकमत’ने सातत्याने टाकलेला प्रकाश हा त्याच भूमिकेचा प्रत्यय! राज्यात खाणींच्या प्रदूषणाविरुद्ध आवाज उठविणार्या संघटना आहेतच; परंतु खाणींनी अंकित बनविलेली अर्थव्यवस्था, आदिवासी, शेतकरी, कमकुवत वर्गाचे झालेले खच्चीकरण असे विषय आम्ही घेतले. या विषयांवर जनमत तयार केले. त्यामुळे खाण कंपन्या जेव्हा तथाकथित खाण अवलंबितांचा मोर्चा पुरस्कृत करतात, तेव्हा जनमताचा पाठिंबा त्यांना लाभत नाही. राज्यातील पर्यावरणप्रेमी, खाणींमुळे लुटले गेलेले, शोषण झालेला घटक यांना ताठ मानेने उभे करण्याचे कार्य ‘लोकमत’ने केले आहे. एक प्रबळ अर्थसत्ता, त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे शक्तिशाली नेते व हजारोंच्या संख्येने या व्यवस्थेचा भाग झालेले व त्यांचा मिळून बनलेला माफिया यांच्याविरुद्धची ही लढाई होती. अखेरीस हा लढा यशस्वी झाला. या खाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद झालेल्या असल्या तरी त्या खाणी संपूर्ण कल्याणकारी पायावर उभ्या करण्याचे आव्हान आहे. तसे घडले तर राज्याचा मोठा आर्थिक फायदा होईल. अवघ्या काही खाणचालकांना फुकटात लिजेस देणे बंद होईल. त्यानंतर करांचा बोजा तर मोठय़ा प्रमाणात कमी होईलच; परंतु पुढच्या पिढय़ाही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनतील!- ही सारी कहाणी ‘हिरव्या बोलीचे शब्द’ मध्ये शब्दबध्द झाली आहे.‘ओस्सय’ हा राज्यातील शिगम्यातला जयघोष. या राज्यात वेगवेगळे समाज गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांच्यात तेढ नाही. सौहार्द आहे. अनेक उत्सव तर हिंदू-ख्रिस्ती समाज एकत्रित साजरे करीत असतात; परंतु या एकोप्याला, भावबंध आणि स्वाभाविक विणीला अलीकडे खूप धक्के बसत आहेत. काही आंतरराष्ट्रीय संशोधकांनी त्यावर संशोधन चालविले आहे. एका बाजूला हिंदुत्वाचा फिरणारा वरवंटा व दुसर्या बाजूला ख्रिस्ती तेढ आणि धार्मिक विद्वेष यामुळे गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात विलक्षण अस्वस्थता आहे. दुसर्या बाजूला समाजाचे ‘सनातनीकरण’ जोमाने सुरूच आहे. बहुजन समाज त्याला बळी पडतोय. बुद्धिवादी गोवेकर अंधर्शद्धेच्या डबक्यात ज्या पद्धतीने डुंबताना दिसतो, ते तर शोचनीय आहे. ख्रिस्ती चर्च धर्मसंस्था आक्रमक बनण्याचे कारण त्यांना आपल्या या राज्यात अल्पसंख्य होण्याची भीती आहे आणि दुसर्या बाजूला ‘भायल्यांचे’ वाढते आक्रमण त्यांना हवालदिल बनविते. वास्तविक राज्यावर नितांत प्रेम करणार्या सार्याच ‘गोंयवादी’ घटकांना या अस्तित्वाची प्रखर चिंता आहे.हे विषय नाजूक आहेत, संवेदनशीलही आहेत; म्हणून वादग्रस्तही आहेत; परंतु या प्रश्नांची उत्तरे शोधणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु लिहिले जाते तेव्हा दोन्ही समाज पेटून उठतात. कधी मोर्चे तर कधी खटले गुदरण्याची भाषा ऐकविली जाते. तरीही ते विकार आहेत आणि सर्वांनाच कडू औषधाचा घोट देणे, वास्तवावर नेमके लिहिणे क्रमप्राप्त ठरते. पत्रकार आणि गोव्यावर नितांत प्रेम करणार्या माझ्यासारख्या लेखकाला तर ते न लिहून कसे चालेल? म्हणूनच ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीत प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये भर घालून ही तीन पुस्तके आकाराला आली आहेत.
***
‘जहाल आणि जळजळीत’,‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’लेखक : राजू नायक