- दिनकर रायकरउंच, धिप्पाड शरीरयष्टी. आवाजतही जरब. मात्र स्वभाव अत्यंत मनमिळावू तेवढाच स्पष्ट. जे आहे ते समोर बोलून मोकळे होण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना अनेकदा नडला असेलही, पण त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. राज्याचे व देशाचे महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्या सख्ख्या मोठय़ा बहिणीशी त्यांचा विवाह झाला; पण कधीही त्यांनी ही ओळख मिरवली नाही. आज ते सक्रिय राजकारणात नाहीत, मात्र कोणी जर त्यांना मदत मागितली तर ते त्याच्या सोबत मंत्रालयात प्रसंगी व्हीलचेअरवर बसून धावत येतात हा त्यांचा विलक्षण स्वभाव अनेकांनी अनुभवलेला आहे. कोणतेही क्षेत्र त्यांना कधी वज्र्य राहिले नाही.राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, कामगार जगत आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे शिक्षण क्षेत्र यातले असे एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी एन. डी. पाटील यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला नाही. परिवर्तन, प्रबोधन, पुरोगामी, समतावादी, समाजवादी, साम्यवादी, विज्ञानवादी, विवेकवादी अशा सर्वच चळवळींचे ते कायम आधारवड राहिलेले आहेत. बेळगाव-महाराष्ट्र सीमाप्रश्न असो की एखाद्याच्या छोट्या कामासाठी मंत्रालयात कुठल्या मंत्र्याकडे जायचे असो, एन.डी. तेथे नाहीत असे कधी पहायला मिळाले नाही. सतत, सर्वत्र नेटका संचार करणारे हे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत आदराने घ्यावे असे एक नाव बनले आहे. हल्लीच्या राजकारण्यांमध्ये दुर्मीळ असणारा प्रामाणिकपणाचा गुण एन.डीं.कडे ओतप्रोत भरलेला आहे. हे सगळे आज लिहिण्याचे कारण म्हणजे, त्यांना जाहीर झालेला यंदाचा मानाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार.एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही एन.डी. यांनी पुणे विद्यापीठातून एम.ए. आणि एलएल.बी. या पदव्या घेतल्या. त्याच काळात त्यांनी ‘कमवा आणि शिका’ या योजनेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे रेक्टर म्हणून काम केले. याचदरम्यान ते प्राध्यापक झाले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूरचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आणि रयत शिक्षण संस्थेशी ते कायमचे जोडले गेले. ते रयतचे अध्यक्ष असतानाचा एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. कॉलेज, होस्टेलला लागणारे फर्निचर तात्यासाहेब कोरे यांच्या कोडोली येथील सहकारी संस्थेमार्फत खरेदी केले जात होते. या कामात काही मध्यस्थ होते. कॉलेज आणि या सहकारी संस्थेशी मध्यस्थी करून त्यातून ते स्वत:चे कमिशन काढायचे. त्यामुळे फर्निचर महाग मिळते हे लक्षात आल्यानंतर एन.डी. स्वत: त्या सहकारी संस्थेत फर्निचर पहायला गेले. तेथे भाव ठरवून त्यांनी किंमतही कमी करून घेतली. शिवाय मी स्वत: आल्यामुळे मध्यस्थांची आता गरज नाही, असे म्हणत मध्यस्थांमुळे जाणारे कमिशन वाचवले.कालांतराने ते विधान परिषदेचे तीनवेळा सदस्य झाले. ‘पुलोद’चे सरकार असताना ते सहकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. त्यावेळी कापूस एकाधिकार योजना सुरू होती, ती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे व प्रामाणिकपणाने राबवली. र्शीमंत शेतकरी आणि व्यापार्यांचा या कापूस एकाधिकार योजनेला विरोध होता. मात्र तो विरोध त्यांनी मोडून काढला. कापूस केंद्रावर कापूस आल्यानंतर कायद्यानुसार शेतकर्यांना लगेच 80 टक्के रक्कम मिळेल याकडे त्यांनी स्वत: लक्ष दिले. त्यानंतर व्यवहार पूर्ण होताच उर्वरित 20 टक्के रकमेचे वाटपही वेळच्या वेळी होईल याकडेही त्यांनी लक्ष दिले. पुढे मात्र त्या योजनेचे वाटोळे झाले हा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच.मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी अधिकार्यांना मंत्रालयासमोर कायमस्वरूपी घर हवे होते. त्यासाठी त्यांनी सरकारची जागा घेऊन तेथे सहकारी संस्था स्थापन करत टोलेजंग इमारत उभी केली. या इमारतीत राहणार्या काही अधिकार्यांच्या बदल्या मुंबईबाहेर होत असत. त्यावेळी ते अधिकारी स्वत:चे फ्लॅट सरकारलाच भाड्याने देत असत. हे लक्षात आल्यानंतर एन.डीं.नी हा व्यवहार थांबवला.ज्येष्ठत्व केवळ वयातून येत नाही, त्यासाठी तुमचे आचरणही तसे असायला हवे. आपल्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीवर धाक असायला हवा. मला ‘साहेब’ म्हणा, असे सांगण्याने कोणी साहेब होत नाही. त्यासाठी स्वत:जवळ नैतिकतेचे मोठे अधिष्ठान असावे लागते. जे एन.डी. पाटील यांच्याकडे आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी म्हण उगाच आलेली नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्यांनी त्यांच्या कृतीने एक धाक समाजमनावर तयार केला आहे. कित्येक आंदोलनात सहभागी होताना त्यांनी कधी एस.टी. बसने, तर कधी ट्रकनेही प्रवास केला आहे. कोणत्याही विषयावर ते उगाचच बोलायचे म्हणून बोलत नाहीत. ज्या विषयावर बोलायचे त्याचा पूर्ण अभ्यास करायचा, त्या विषयाची टिपणं स्वत: काढायची आणि नंतरच मुद्देसूद मांडणी करायची हा त्यांचा स्वभाव आजच्या बोलबच्चनगिरी करणार्या नेत्यांनी आवर्जून शिकला पाहिजे. शरद पवार यांचा राजकीय प्रवास आधी काँग्रेस, नंतर पुलोद, पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी असा झालेला असताना एन.डी. पाटील मात्र आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षातच राहिले आहेत. पक्षबदलाचा त्यांनी कधी विचारही केला नाही. विधिमंडळात असो की विधिमंडळाच्या बाहेर, त्यांनी सतत त्यांच्या मुद्दय़ांवर अनेकवेळा शरद पवारांशी संघर्षच केला आहे. त्यात त्यांनी कधी स्वत:चे व्यक्तिगत नाते मधे येऊ दिले नाही. शरद पवार यांनीदेखील कधी ते नाते त्यांच्यावर लादले नाही. दोन मोठय़ा राजकीय नेत्यांच्या एवढय़ा जवळच्या नातेसंबंधातला हा कोपरा कायम अभ्यास करावा असा आहे.कापसाचे असो की उसाचे, कांद्याचे असो की कामगारांचे, एन.डी. पाटील यांनी सतत लोकांच्या न्याय्य हक्कासाठी झगडा केला आहे. त्यासाठी प्रसंगी ते रस्त्यावरही उरलेले आहेत, तुरुंगवास भोगला आहे, लाठय़ा-काठय़ा खाल्ल्या आहेत. आज एन.डी. यांनी वयाची नव्वदी पार केली असली तरी त्यांची जगण्याची उमेद आजही तरुणांना लाजवेल अशी आहे. अशा या नेत्याचा, अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा होणारा सत्कार हा केवळ त्यांचा एकट्याचा नाही, तर तो त्यांनी आजपर्यंत जपलेल्या मूल्यांचा, विचारांचा आणि जाणिवांचा आहे. असे नेतृत्व कोणत्याही राज्याचे मोठे धन असते आणि ते जपायचे असते. त्यांना ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.!dinkar.raikar@lokmat.com(लेखक लोकमतचे सल्लागार संपादक आहेत.)
‘एनडी’ - अजातशत्रू एन. डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 6:03 AM
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, कामगार, शिक्षण. प्रत्येक क्षेत्रात एन. डी. पाटील यांनी आपला ठसा उमटवला. कापसाचे असो की उसाचे, कांद्याचे असो की कामगारांचे. लोकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. त्यासाठी प्रसंगी ते रस्त्यावर उतरले, तुरुंगवास भोगला, लाठय़ा-काठय़ा खाल्ल्या. वयाची नव्वदी पार केली असली तरी त्यांची जगण्याची उमेद आजही तरुणांना लाजवेल अशी आहे.
ठळक मुद्देख्यातनाम विचारवंत, नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे.