लोकमत न्यूज नेटवर्क
कोणाला कशामुळे पोटदुखी होईल हे सांगता येत नाही. अनेकांना दुसऱ्याचं भलं झालं तरी पोटदुखी होते, पण खरोखरच्या पोटदुखीचा विकारही जगभरात वाढतो आहे. यासंदर्भात युनायटेड युरोपियन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या संस्थेनं केलेल्या पाहणीत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जगभरात ‘इन्फ्लमेटरी बाॅवेल डिसिज’ (आयबीडी - आतड्यांच्या आजारामुळे होणारी पोटदुखी) झपाट्याने वाढते आहे. पोटदुखीचं प्रमाण किती असेल याचा जो अंदाज केला जात होता, त्याच्या तिप्पट लोकसंख्येमध्ये पोटदुखी आढळून आली आहे आणि त्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंच आहे, असा संशोधकांचा निष्कर्ष आहे. आतड्याच्या आजारांमध्ये मुख्यत: कोलायटीस आणि क्रोहन्स डिसिज हे दोन प्रकार येतात. दोन्हीही तितकेच वेदनादायी आहेत. तुमच्या पचनाच्या प्रक्रियेवरच ते हल्ला चढवतात, त्यामुळे तुमची पचनक्रिया तर बिघडतेच, पण सहन होणार नाही इतकी पोटदुखीही होऊ शकते. याशिवाय तीव्र डायरिया, थकवा, वजन कमी होणे, कुपोषण इत्यादी प्रकारांनाही रुग्णाला सामोरे जावे लागते. याशिवाय आणखी महत्त्वाचे म्हणजे रुग्णानुसार हा आजार त्याच्या पचनक्रियेच्या वेगवेगळ्या घटकांवर आघात करतो.
मोठ्या प्रमाणात ब्रिटिश डेटाचं विश्लेषण करून डॉ. डॉमिनिक किंग यांनी असा निष्कर्ष काढला की, संपूर्ण जगातच पोटदुखीचं प्रमाण सन २००० पासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वीस वर्षांत अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोहन्स डिसिज यांचं प्रमाण अनुक्रमे ५५ टक्के आणि ८३ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शिवाय ते वाढतच चाललं आहे. एकीकडे माणसाचं आयुष्यमान वाढत असलं, तरी पोटदुखीच्या आजारांमुळे अधिकाधिक लोक त्रस्तही होत आहेत. हा आजार प्रसंगी जीवघेणा असू शकतो, शिवाय कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो.
आपली जीवनशैली आणि आहारशैलीही याला मुख्यत्वे कारणीभूत असून त्याकडे आपल्याला तातडीने लक्ष द्यावे लागेल. आहारशैली जर सुरुवातीपासूनच चांगली ठेवली, तर पोटाच्या आजारांना आपण बऱ्यापैकी लांब ठेवू शकतो, असंही किंग यांचं म्हणणं आहे.