संतोष कुंडकरयवतमाळ:गावात भजनाची मैफल असली की, तो त्याच्या आजीसोबत भजनाला जात असे. त्यातून त्याच्यावर सुरांचे संस्कार झाले. आजी भजन गायची तेव्हा तो तल्लीन होऊन भजन ऐकत असे. यातून त्याला संगीताची भाषा कळू लागली. वाद्यांचा अभ्यास होऊ लागला. ही वाद्य आपल्याला घरीच बनवता येतील का, या प्रश्नाने पुढे तो अस्वस्थ व्हायचा. त्याचं हे अस्वस्थ होणं त्याला एका आगळ्या छंदाकडे घेऊन गेलं. आज तो घरच्या घरीच अनेक वाद्य तयार करीत आहे. शैैलेश उमेश राखुंडे असं या छंदवेड्या युवकाचं नाव आहे. माणसाला कोणत्याही गोष्टीची आवड असली की, ती गोष्ट पूर्णत्वास येण्यास वेळ लागत नाही. त्याच्याही बाबतीत नेमकं तेच घडलं. १९ वर्षीय या नवतरूणाचा हा छंद आता सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट हे साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शैलेशचे आजोबा दिनकर राखुंडे हे सुतार काम करतात. नातवाची आवड त्यांनी हेरली आणि त्याला विविध वाद्य कसे तयार करायचे, याचे धडे दिले. यातून शैलेश घडत गेला.तो १२ वर्षांचा असताना सर्वात अगोदर त्याने खंजिरी बनविली. त्याचा वाद्य बनविण्याचा एकूणच प्रवास कौतुकास्पद आहे. त्याने आजवर विणा, तानपुरा, सीतार, सोलमंडल, सारंगी, गिटार, बॅन्जो, किंगरी, मेंडोलीन, व्हायोलिन, बासरी, शहनाई, डमरू, तबला, ढोलक, नाल, हार्मोनियम, शैैल स्वर, शैल सारंगी, तारपेटी आदी वाद्ये तयार केली आहेत. वाद्य बनविण्यासाठी लागणारं साहित्य तो नागपूर, पुणे गुजरात, कोलकाता आदी भागातून आणतो. आयटीआयचे प्रशिक्षण घेणारा शैलेश हार्मोनियममध्ये विषारद होण्यासाठी तयारी करीत आहे.तो उत्तम हार्माेनियम वादकदेखील आहे. विविध संघटनांमार्फत अनेकदा पुरस्कार पुरस्कार देऊन त्याच्या या छंदाचा गौरवदेखील करण्यात आला आहे. ‘सूर’वेड्या शैैलेशला हा ‘नाद’ वेडा छंद भविष्यात व्यवसायात रूपांतरीत करायचा आहे. स्वत:चा उद्योग उभारून त्याद्वारे विविध वाद्ये तयार करायची असल्याचे तो म्हणाला.
‘सूर’वेड्या शैलेशचा ‘नाद’वेडा छंद...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:21 PM