शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

शरदागम

By admin | Published: October 25, 2014 1:45 PM

शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं, ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्‍याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हीव’ शिलंगणावरून परत येताना आपल्यासोबत गावात, घरात येतं आणि हिवाळा सुरू होतो.

- प्रा. विश्‍वास वसेकर 

 
'रघुवंश’ काव्यात कालिदासानं शरद ऋतूच्या आगमनाची खूण सांगितली आहे. शरद ऋतू सुरू झाला. त्याने पुंडरीकरूपी छत्र आणि काशतृणरूपी चामरे धारण केली.. पुंडरीक हे कमळ पावसाळा संपला, की फुलू लागते. काश नावाच्या तृणास फुले येतात.
कवी अनिलांच्या तोंडून ‘शरदागम’ ही कविता मी अनेकदा ऐकली आहे. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा या शरदागमाच्या खुणा आहेत. साचून राहिलेल्या गढूळ पाण्याचे हळूहळू निर्मळ जळात रूपांतर होतंय आणि त्या आरशात डोकावून बाभळी आपलं सावळं रूप पाहतात. ज्वारी टवटवली आहे. काळी आता काळजी करते, की अजून कापूस का फुलत नाही? त्या संबंधी अधिक चौकशी करायला निळे तास पक्षी खाली उतरतात. कुणीतरी शेवंतीच्या कानात सांगतं, अजून तुझी वेळ आलेली नाही. गवत अजून हिरवे आहे. त्याचे पिकून सोने होण्याआधी पिवळ्या फुलांची घाई करू नकोस. अनिलांच्या कवितेतली ही चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली, की समजायचे ऋतुराज शरदाचे आगमन झाले.
मोगरा आणि कुंद यांनी बरोबर सहा-सहा महिने वाटून घेतले आहेत. जानेवारी ते जून हे मोगर्‍याचे दिवस. जुलै ते डिसेंबर हे कुंदाचे दिवस. शरद ऋतू हा कुंद, शेवंतींच्या बहरण्याचा ऋतू आहे. काश या गवताची ओळख करून घ्यायला मी उत्सुक आहे. उसासारखे सुंदर तुरे येणारे ते गवत असले पाहिजे. शरद ऋतूचे वर्णन असलेल्या वसंत बापटांच्या ‘निचिंत’ या कवितेत काश फुलांचा उल्लेख आहे. बापट असतानाच त्यांना विचारायला हवे होते. बापटांची ‘सेतू’ ही प्रसिद्ध कविता शरद ऋतूची आहे. तिच्यातल्या प्रतिमा एकावेळी निसर्ग आणि प्रेयसी दोहोंनाही लागू पडणार्‍या आहेत किंबहुना शरद ऋतूतील पहाटच सेतू होऊन कवीला ‘तिच्या’कडे घेऊन जात आहे. 
‘ही शरदातील पहाट..
.. की.. तेव्हाची तू?
तुझीयामाझीयामध्ये पहाटच झाली सेतू’ 
 
‘सेतू’ ही माझ्या वाचनातील शरद ऋतूवरील सर्वांत सुंदर मराठी कविता आहे. जिला मी दुसरा क्रमांक देईन ती इंदिरा संतांची कविता शरदातली दुपार चित्रांकित करते. ही निळी पांढरी शरदातली दुपार कशी आहे? तर तिचे ऊन तापलेल्या दुधासारखे हळूवार आहे. सव्वीस ओळींच्या मोठय़ा कवितेत शरदातील निसर्गाचे सुंदर तपशील आहेत. आणि हा शेवट..
‘का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी?
का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी?
का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती?
रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती?
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार!’
मराठी कवींप्रमाणे संस्कृत कवींनाही शरद ऋतू तितकाच प्रिय आहे. महाकवी कालिदासाला तो ‘रूपरम्या नववधु’सारखा सुंदर, टवटवीत वाटतो. ‘किरातार्जुनीय’ या भारवीच्या महाकाव्यात यक्ष अर्जुनाला म्हणतो, ‘हे अर्जुना, हा शरद ऋतू फलदायक असून तो परिश्रमांचा मोबदला फुलांच्या रूपाने देतो. या ऋतूत नद्या, सरोवर यांचे जल स्वच्छ व नितळ असते. मेघ शुभ्र असतात. असा हा शरद ऋतू तुझ्या सफलतेचे व्रत वृद्धिंगत करो!’
पूर्णता आणि परिपक्वता यांची प्रतिमा होऊन शरदातले मेघांनी धुतलेले आकाश रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक कवितांतून येते. पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या ‘मुक्काम शांतिनिकेतन’मध्ये आश्रमातल्या शरद ऋतूचे वर्णन केले आहे, तेही रवींद्रनाथांच्या पत्राद्वारा. भानूसिंहेर पत्रावलीच्या अकरा क्रमांकाच्या पत्रात गुरुदेव लिहितात, ‘आज बागेत हिंडताना मालती फुलांचे हे ‘अनुप्रास’ पाहायला मिळाले.’
शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. आकाशातली निळाई हळूहळू स्पष्ट आणि गडद होते. तारांगण निरखावे शरदाच्या रात्रीच. या रात्रीही मोठय़ा असतात. इतर कोणत्याही ऋतूंना रात्रीच्या सौंदर्याचं हे वरदान नाही, म्हणून तर कालिदासाने या ऋतूतील रात्रींना ‘ज्योतिष्मती रात्र’ म्हटलं आहे. शरदात येणारे सणदेखील रात्रींशी निगडित आहेत. कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळी हे रात्रीचेच उत्सव आहेत.
चकोर पक्ष्याचं मला भारी आकर्षण वाटायचं; पण तो कल्पवृक्ष, कामधेनू किंवा परीस यांसारखी कवीकल्पनाच असावी, असा समज. शरद ऋतूच्या चंद्रकलेचे कोवळे अमृतकण चकोर खातो. याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायात येते. मारुती चितमपल्लींनी चकोर नाकारला तर नाहीच; पण त्याचे विज्ञान सांगून कवीकल्पनेला शास्त्रीय पुस्ती जोडली आहे. शरद ऋतूत चकोरीची पिल्ले तिच्याबरोबर जंगलात फिरत असतात. वाळवीच्या किड्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून वारुळातून वाळवी रात्री बाहेर पडते. आपल्या पिलांची जलद वाढ व्हावी म्हणून चकोरी पिलांना वाळवी चारते. शरद ऋतूतल्या चंद्राच्या प्रकाशात चकोराला वाळवी सहज दिसते. हे दृश्य पाहून कवींना वाटते, की चकोर चांदणेच टिपत आहेत! मी ग्रंथप्रेमी असल्याने वाळवी खाणार्‍या चकोरांबद्दल आता कृतज्ञता वाटते.
शरदातल्या चंदेरी रात्री जेवढय़ा सुंदर तेवढाच शारद रात्रींतला अंधारही प्रियतम आणि मोहमयी असतो. अंधार ही प्रेम करण्यासारखीच गोष्ट आहे. हे शरदातल्या रात्रीच  पटते, हे अरुणा ढेरे यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी खरे आहे.
‘पर्वतों के पेडों पर
 शाम का बसेरा है.
 चंपई उजाला है
 सुरमई अंधेरा है.!’
हे साहिरचं वर्णन एखाद्या शारद सुंदर रात्रीलाच उद्देशून असलं पाहिजे. सुरम्यासारखा अंधार! व्वा! कोजागरीची रात्र म्हणजे चंपई उजाला आणि दिवाळीची रात्र म्हणजे सुरमई अंधेरा!
शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्‍याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हीव’ शिलंगणावरून परत येताना आपल्यासोबत गावात, घरात येतं आणि हिवाळा सुरू होतो. याच शरदऋतूत विश्‍वामित्राचा उन्हाळाही होऊन जातो, त्यालाच अलीकडे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतू.
(लेखक साहित्यिक आहेत.)