मोरेश्वर येरम, सीनिअर कंटेंट एक्झिक्युटिव्ह''नोकरी केली तर २४ तासांसाठी कोणाचं तरी गुलाम होऊन राहावं लागेल. मी शेतकरी आहे. नुकसान सोसावं लागलं तरी आम्ही जमिनी विकत नाही. ती आमची आई आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी मला मोठं काहीतरी करायचं आहे. तुम्ही साथ दिलीत तर आपण धमाका करू. वडिलांना होणारा त्रास मी पाहिला आहे. मला शेतकऱ्याचं जगणं सुकर करायचं आहे. त्यासाठी १० टक्के इक्विटीच्या बदल्यात ३० लाख रुपये हवेत...''
जुगाड करून अद्ययावत फवारणी यंत्र तयार करणारा मालेगावचा जुगाडू कमलेश धीर एकवटून देशातील ५ बड्या उद्योगपतींसमोर बोलत असतो, तेव्हा आपलाही कंठ दाटून येतो. त्याची एनर्जी, पॅशन, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनाला भावते-भिडते. 'अशा प्रयोगांसाठी कर्ज कोण देणार?' हा त्याचा प्रश्न अस्वस्थ करतो. इतक्यात एक शार्क त्याला ३० लाख रुपये द्यायला तयार होतो. 'आप भारत की उम्मीद हो..' असं म्हणत चेक त्याच्या हातात देतो, तेव्हा कमलेश सोबत आपणही भारावून जातो. 'इंडिया'मध्ये 'भारता'चे प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहणारे अनेक जुगाडू तरुण आहेत, त्यांची भेट शार्क टँक इंडियाच्या स्टेजवरून झाली.
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. कोट्यवधींची उलाढाल करणारा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यास हातभार लावणारा उद्योग उभा करण्याचे स्वप्न उराशी घेऊन अनेक नवउद्योजक मेहनत घेतात. भारतात स्टार्टअप नावाची संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तरुण उद्योजकांनी बदलायला घेतलेली गणिते, बाजारपेठेचे बदलते चेहरे आणि भविष्यातील आव्हाने याबाबत नवउद्योजकांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने 'शार्क टँक इंडिया शो'कडे पाहायला हवे.
टेलिव्हिजन माध्यमाचा उपयोग आजवर खरंतर फक्त मनोरंजन यापुरताच केला गेला आहे. पण 'शार्क टँक इंडिया'ने एक वेगळीच दुनिया सर्वसामान्य प्रेक्षकांसमोर आणली. सध्याच्या इतक्या कठीण काळात आपल्या उपक्रमात कुणीतरी आर्थिक गुंतवणूक करायला तयार होत आहे ही भावनाच खूप सकारात्मक आहे. एक युवा उद्योजक येतो काय आणि त्याच्या कल्पना शिष्टमंडळासमोर सादर करून कंपनीत गुंतवणूक मिळवतो काय हे टेलिव्हिजनवर पाहून खूप प्रेरणा देणारे ठरले. व्यवसायाची सुरुवात करण्यापासून ते सुरू असलेल्या व्यवसायाला पॅन इंडिया स्वरुप देण्यासाठी नेमके काय बदल करायला हवेत, विचारसरणी आणि दृष्टीकोन कसा असायला हवा याचे ज्ञान आज घराघरात बसलेल्या प्रेक्षकांना या कार्यक्रमातून पाहायला मिळाले. त्यामुळे पहिल्याच सीझनमध्ये शार्क टँक इंडियाची चर्चा आज घराघरात झाली. व्यवसाय वाढविण्यासाठी लोक कायकाय कल्पना आणि विचार करत असतात हे पाहणे खूप भन्नाट होते.
शार्क टँकमध्ये जेमतेम कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुलांनी आत्मविश्वासाने आपल्या प्रोजेक्टविषयी तळमळीने प्रेझेंटेशन दिले. तर कधी बहिण-भाऊ, मित्र, बाप-बेटा आणि एका एपिसोडमध्ये तर सासू-सूनही त्यांचे स्टार्टअप्स घेऊन आल्या होत्या. प्रत्येकाने त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे प्रेझेंटेशन शिष्टमंडळासमोर दिले आणि त्यांना हवी असलेली मदत मागितली. त्यानंतर शिष्टमंडळाकडून विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांना मिळणारी उत्तरे तसेच शिष्टमंडळाकडून दिले जाणारे सल्ले हे खूप महत्वाचे ठरले. कल्पनेवर काम कसे करावे किंवा उत्पादन, विक्री, डिझाइन, मार्केटिंग अशा विविध भागांमध्ये नेमके कुठे चूक झाली आहे हे शिष्टमंडळाने स्पर्धकांना सांगितले. शिष्टमंडळाने दिलेल्या सल्ल्यांतून स्पर्धकांनी धडे तर घेतलेच पण हा शो पाहणाऱ्यांच्याही ज्ञानात भर पाडण्याचे काम झाले. फक्त दोन गोष्टींवर विश्वास
"मी फक्त दोन गोष्टींवर विश्वास ठेवतो पॅशन (महत्वकांक्षा) आणि पर्सन (व्यक्ती). तुमचा व्यवसाय तुम्हाला यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल. याचा अर्थ सोशल मीडियावर तुमचे २० लाख फॉलोअर्स असणं म्हणजे यश नाही. पण ज्याचा स्वत:वर दांडगा विश्वास असतो आणि जे करायचं आहे त्याबाबत दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याच्यात असते तो खरा स्टार असतो. तुमच्यातील जिद्द हेच खरं तुमचं इंधन असतं की जे तुम्हाला यशस्वी बनवतं. एक नवउद्योजक एकटाच सर्व गोष्टींना तोंड देत असतो आणि जेव्हा कुणी तुमच्यासोबत नसतं तेव्हा महत्वाकांक्षाच तुम्हाला दिलासा देते. बिझनेस तर कुणीही करतं पण प्रत्येकजण फाऊंडर होत नाही."
खरंतर कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करताना मी दोन गोष्टी पाहतो. पहिली म्हणजे संस्थापक कोण आहे आणि त्याचे विचार व दृष्टीकोन मला पटत आहेत की नाही. स्पष्ट सांगायचं झालं तर जेव्ही मी म्हणतो की 'योग्य' व्यक्ती व्हा. तेव्हा माझ्या बोलण्याचा उद्देश तुमच्याकडे १० हजार पदवी असायला हव्यात असं होत नाही. लोकांची मतं काहीही असली तरी तुम्हाला जे योग्य वाटते त्याचा पाठपुरावा करण्याइतकं धाडसी तुम्ही बनलं पाहिजे. 'बोट' कंपनीचंच उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या कंपनीचा सीएफओ (चीफ फायन्साशिअल ऑफिसर) हा 'सीए' नाही. सीपीओ (चीफ प्रोडक्ट ऑफिसर) हा इंजिनिअर नाही आणि कंपनीचा सीएमओनं (चीफ मार्केटिंग ऑफिसर) मार्केटिंगचं शिक्षण घेतलेलं नाही. आम्ही व्यक्तीच्या गुणांवर अधिक विश्वास ठवतो. त्यामुळे तुमच्या पदवीला महत्व नाही. पण तुम्हाला काय वाटतं याला अधिक महत्व आहे. स्वत:वर विश्वास ठेवा, भरारी घ्या आणि चुकांमधून शिका व नव्यानं उभारी घ्या.अमन गुप्ता,सहसंस्थापक आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर, बोट लाइफस्टाइल'शार्क्स'चे सल्ले...
- कोणताही स्टार्टअप सुरू करताना बिझनेसचा विचार करता समस्येचा विचार करावा. एखाद्या समस्येचे समाधान आपण ग्राहकाला देणार असू तरच बिझनेस मोठा होतो. त्यामुळे बिझनेसच्या मागे न धावता समस्येचा पाठलाग करा.
- स्टार्टअप सुरू करण्याआधी बाजाराचा ट्रेंड ओळखणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सर्वात आधी किमान वर्षभर तुम्ही सुरू करणार असलेल्या बिझनेसबाबत आणि प्रोडक्टबाबत ग्राहकांचं मत जाणून घ्या.
- बिझनेसच्या मार्केटिंगवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा आधी स्थानिक पातळीवर ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा जास्त विचार करा. तुमचे खरे ग्राहक तुम्ही स्वत:हून जोडू शकलात आणि पाया उभारू शकलात त्यानंतरच मार्केटिंगवर खर्च करावा.
- स्टार्टअपमध्ये विविध उत्पादने एकाच वेळी ग्राहकांसमोर उपलब्ध करुन देऊ नयेत. सर्वात आधी तुमची स्पेशालिटी असलेल्या उत्पादनावरच पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावे. मार्केटमध्ये एकच दमदार उत्पादन द्यावे आणि त्या उत्पादनातून कंपनीची ओळख निर्माण झाली पाहिजे. एखाद्या उत्पादनामुळे तुमची बाजारात चांगली ओळख निर्माण झाल्यानंतरच इतर उत्पादनांचा विचार करणे जास्त योग्य ठरते. यातून तुम्हाला अधिकाअधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.
- आपण तयार केलेले किंवा बाजारात आणलेले उत्पादन सर्वोत्तम आहे हे तुम्ही स्वत: ठरवू नका. ते ग्राहकांना ठरवू द्या. त्यामुळे 'ग्राहक हाच देव' हे नेहमी लक्षात ठेवूनच काम करत राहिले पाहिजे.