शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

शीतलच्या जिवंत मैत्रिणी

By admin | Published: April 22, 2017 2:57 PM

पुरुषी मक्तेदारी नसानसात भिनलेला बंदिस्त गावसमाज आणि तिथल्या धर्म-जात-संस्कृतीला साक्षी ठेवून जपल्या जाणाऱ्या प्रथा-परंपरा या सगळ्याची रीतसर हातमिळवणी झालेली आहे.

- शुभांगी गबाले 

दुष्काळाने पोळलेला विदर्भ-मराठवाडा असो वा कोल्हापूर-सांगली-सातारकडचा संपन्न भाग; खेड्यापाड्यातल्या तरुण मुली एका विचित्र घुसमटीला सामोऱ्या जात आहेत. 
शिक्षणाने विचार दिला, मतं दिली; पण 
लग्नाचं वय झालं की मुस्कटदाबी सुरू!
हुंड्याच्या मागण्यांपायी जेरीला आलेला बाप कर्जाच्या ओझ्याने मरायला टेकतो, 
‘लग्नच नको’ म्हटलं, तर चारचौघात अब्रू जाते..
हुंडा ‘घेण्या’ला प्रतिष्ठा, आणि हुंडा ‘देणं’ म्हणजे ‘स्टेटस’ समजणारी तालेवार कुटुंबं गरिबांना फरफटत नेतात..मरतात त्या तरुण पोरी!

पुरुषी मक्तेदारी नसानसात भिनलेला बंदिस्त गावसमाज आणि तिथल्या धर्म-जात-संस्कृतीला साक्षी ठेवून जपल्या जाणाऱ्या प्रथा-परंपरा या सगळ्याची रीतसर हातमिळवणी झालेली आहे. म्हणूनच गावं मोकळ्या वाऱ्यातही मनाने मात्र कोंडलेली वाटतात. लांबवर पसरलेल्या रानवाटा अदृश्यपणे पायांना बोचत राहतात. गावखेड अनुभवलेल्यांना त्यातला कोंडवाडा चांगलाच परिचित असतो. आणि या कोंडीची अधिककरून झळ लागत राहते ती तिथल्या बायामुलीना. शीतल वायाळ या अवघं विसावं ओलांडलेल्या मुलीने आयुष्याची अखेर याच कोंडीतून तर करून घेतली आणि जाता जाता या व्यवस्थेतलं चिरफाळणारं वास्तवही ती सांगून गेली. आता प्रश्न आहे तो महाराष्ट्रभरातल्या गावागावांमधून मागे उरलेल्या शीतलसारख्या इतर अनेक मुलींचा आणि गेलेल्या नव्हे; नाइलाजाने ही दुनिया सोडून जावे लागलेल्या शीतलला न्याय कोण आणि कसा देणार याचा.. ‘मी आत्महत्या करतेय त्याचा दोष मला आणि माझ्या कुटुंबाला देऊ नका’, असं बजावत जीव नकोसा करणाऱ्या इथल्या रूढीबाज उपचारांवर, त्यांना खतपाणी घालणाऱ्या समाजमनावर आणि पर्यायानं त्यातून पोसल्या जाणाऱ्या पितृसत्तेवरच शीतलने बोट रोखलं आहे.. माझ्या आत्मघाताला हेच सारे जबाबदार आहेत असं थेटपणे सांगून तिनं स्वत:ला संपवलं आहे.. या तिच्या मारेकऱ्यांना आपण कसा जाब विचारणार आहोत? रोज एकीचा बळी घेणारी ही हुंड्याची चाल कशी नी कधी थांबवणार आहोत? शीतलच्या आत्महत्येची बातमी कळल्यावर सुन्न होऊन काही वेळ मी नुसतीच बसून राहिले. मग थोडं भानावर येऊन अनेक वर्षं लग्न लांबलेल्या माझ्या एका मैत्रिणीला फोन लावला. तिच्याशी काहीबाही बोलत राहिले. अवांतर. निरर्थक. तिची मन:स्थिती मला चाचपायची होती. ती तणावात तर नाही ना, याची खात्री करून घ्यायची होती. काही दिवसांपूर्वी ती बोलली होती, ‘आजकाल कुठल्या कार्यक्र मांना जावंसंच वाटत नाही. उगाच नात्यातल्या लोकांच्या चौकश्या सुरू होतात लग्नाबद्दल. आणि बायका नुसत टकमक बघत असतात तोंडाकडे. कससंच होत. त्यांच्या नजरा अंगावर येतात. अजून कसं हिचं लग्न जमलं नाही, हा त्यांच्या नजरेतला भाव नकोसा वाटतो. शहराच्या तुलनेत गावाकडे अशा नजरा सतत तुमचा पाठलाग करत राहतात...’ - लोकांच्या या टोचऱ्या नजरा कशा हाताळाव्यात हे न समजू शकणाऱ्या या माझ्या मैत्रिणीचा नेमका दोष काय? लग्न जमत नाही हा तिचा दोष कसा असू शकतो? मग या अशा नजरांचं काय करायचं?  शीतलच्या आत्महत्येने लातूर जिल्हा हबकून गेलाय परत एकदा. इथले लोक अजून मोहिनी भिसेची केस पुरती विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं लोण आता त्यांच्या मुलींपर्यंत पोचलंय. मराठवाड्यातल्या उन्हाच्या झळांपेक्षाही हे वास्तव कितीतरी पटीने कातडी जाळणारं आहे. हुंड्याच्या चालीनं अख्खा देश खरवडून निघालाय. गावागावांमधून हा भस्मासुर हातपाय रोवून बसलाय. तिथल्या लेकीबाळींचं आयुष्य त्यानं वेठीला धरलंय. या जुन्या प्रश्नाची नव्यानं वाढलेली दाहकता मात्र मराठवाड्यातूनच पुन्हा समोर आलीय. एरवी ती रोजच्या हुंडाबळीच्या अंगवळणी पडलेल्या बातम्यांच्या शीर्षकांखाली निपचित पडून असते. हे सारं सोसणाऱ्या अनेकानेक मुलींना मी भेटले आहे. त्यांची घुसमट पाहिली आहे. त्यांच्या कहाण्या नजरेसमोरून सरसरत जातात आणि गावखेड्यातलं चित्र किती भीषण वेगानं बदलतं आहे, या जाणिवेने धस्स होतं.काय आहे या मुलींची कहाणी?

शीतलच्या लातूर जिल्ह्यातलीच दीपाली भोसले. ती सांगते, ‘आमचा मराठवाडा दुष्काळी, मागास भाग म्हणून ओळखता तुम्ही. आर्थिक ओढाताण असलेल्या घरात मुली असतील तर त्यांची परिस्थिती अजूनच वाईट बनते. त्यांच्या लग्नाचा, हुंड्याचा ताण आई-बापावर असतो. मग मुलींच्या शिक्षणाची हेळसांड. दहावी-बारावी झाली की येईल त्या स्थळाशी लग्न जमवलं जातं. मुलींचं म्हणणं काय लग्नाबाबत हे तर कुणीच विचारत नाही. हुंडा गृहीतच धरलेला असतो. त्यातल्या त्यात कमी हुंडा मागणारं स्थळ आलं असेल, तर फार काही चौकशी न करताच घाईघाईनं लग्न जमवतात. मुलगा जितका शिकलेला, मोठी नोकरी असलेला असेल तितका हुंडा जास्त. मग आईबाप ऐपतीनुसार स्थळ बघतात, काहीबाही करून पैसा जमवतात आणि लग्न ठरवतात.’- ही कहाणी दीपालीची एकटीची नाही. ती तिच्यासारख्या सगळ्यांचीच. विदर्भ-मराठवाड्यात ज्या कर्जापायी शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांनी बहुतेककरून मुलींच्या हुंड्यासाठी, लग्नासाठीच उपसलेलं असतं. आर्थिक कुवत नसली तरी वयात आलेल्या मुलीचं लग्न करणं तर भागच असतं. एकीकडे नापिकीनं हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मुलीचा हुंडाही सतावत असतो. हुंड्याशिवाय लग्न जमणंच कठीण असतं. या दुहेरी चक्र ात त्याची मान अडकलेली असते. दीपालीला वाटतं, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे अशी कुटुंबं मुलगा हवाच या हट्टापायी कितीही मुली होऊ देतात आणि खाणारी तोंडं वाढली की त्यांची स्थिती अजूनच खालावत जाते. मग मुलींची लग्नं, हुंडा याने ती बेजार होतात. यात मुलींवरचं प्रेशर वाढतं. त्या स्वत:कडे याचा दोष घेतात. अपराधी वाटत राहून तुटत तुटत जातात. स्वत:ला आईबापावरचं ओझं समजू लागतात. हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार नाही असा विचार मुलींनीच करायला हवा, हा सल्ला द्यायला सोपा.. पण गावखेड्यात मुलींना अशा निर्णयाचं स्वातंत्र्यच मुळात नसतं. निर्णय सोडा, जिचं लग्न तिला कुणी विचारतही नाही बहुतेकदा. तिच्या आयुष्याचे सगळे निर्णयही वडीलधारे परस्परच घेत असतात. एका हुंड्याच्या प्रथेआड बाईच्या शोषणाच्या कितीतरी व्यवस्था एकमेकात गुंतलेल्या आहेत हे बोलता बोलता दीपाली सहज दाखवत राहते. ती सांगत होती, लातूरमध्ये अनेक कॉलेजांमधून हुंडाबंदीविषयी उपक्र म राबवले जातात. मुलं-मुली सामूहिक शपथ घेतात हुंडा घेणार-देणार नाही म्हणून. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की हे सगळं विसरलं जातं सोयीस्कर. कधी इलाज नसतो म्हणून, तर कधी सोय म्हणून. संधी असते म्हणूनही! मराठवाड्याकडचीच वसुंधरा पाटील म्हणते, इकडचा दुष्काळ तर तुम्हाला माहितीच आहे. वर मुलींची लग्नं हुंड्याशिवाय होतच नाहीत. कधी कधी अर्धा हुंडा आता अर्धा नंतर असा तोडगा निघतो आणि लग्न उरकलं जातं. पण यातूनच माझ्या नात्यातल्या एका मुलीचा सासरच्यांनी पार जीव घेतला. लग्न झाल्यावर उरल्या अर्ध्या हुंड्याची तजवीज झेपली नाही तिच्या वडिलांना, तर चार-पाच महिन्यातच सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत तिचा जीव गेला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेल्या क्लास वन आॅफिसर मुलांची तर हुंड्याची डिमांड तुलनेने केवढीतरी जास्त असते. किलोभर सोनं, रोख रक्कम, लग्न थाटात असं सारं हवं असतं त्यांना. ज्यांनी सामाजिक परिस्थितीचा, कायद्याचा रीतसर अभ्यास केलाय, ज्यांना पुरेसं समाजभान आलंय त्या अभ्यासातून आणि जे वर सरकारी सेवेत कार्यरत असतात निदान त्यांनी तरी हुंडा नाकारायला हवा. पण उलट त्यांचाच हुंड्याचा रेट सर्वाधिक असतो. वसुंधराने हे अनुभवलेलं आहे. पुण्याजवळील गावातल्या एका मित्राला मी विचारते याबाबत आणखी तपशिलात, तर त्याचं म्हणणं असं, ‘या स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही पोस्ट मिळवतो म्हणून त्या लोभाने मुलीचे आईबाप आपली मुलगी आम्हाला द्यायला तयार होतात. पोस्ट नसेल तर आमच्यापर्यंत ते कशाला येतील? मुलीचे घरचेही तिच्यासाठी कायम चांगलं शिक्षण झालेला, पर्मनंट नोकरी, स्वत:चं घर-गाडी असलेलाच मुलगा शोधतात. मग त्यासाठी मुलीवर खर्च केला तर बिघडलं कुठे? ती मुलगी उद्या लग्नानंतर मुलाच्या संपत्तीतली निम्म्यानं हकदार होणार असते. दुर्दैवाने घटस्फोट झाला तर निम्मी मालमत्ता तिला द्यावी लागणार. मग आत्ता लग्नात हुंडा म्हणून काहीएक रक्कम घेतली तर काय हरकत आहे?’- लग्नातून आकाराला येणाऱ्या दोन व्यक्तींच्या सहजीवनाकडे इतक्या कोरड्याठाक व्यवहारी नजरेतून पाहिलं जातंय यावर कसा प्रतिवाद करावा ते बराच वेळ उमगतच नाही. हा मित्र पुढे सांगतो, ‘मुलीला क्लास वन आॅफिसर नवरा मिळतोय याने आईबाप हुरळून जातात आणि वाट्टेल तितका हुंडा मोजायला तयार होतात. दुसरीकडे, मुलीच्या लग्नात खर्च करण्याची ऐपत नसणारे, हुंड्याचा घोर लावून घेतलेले उद्या आपल्याच मुलाच्या लग्नात मात्र ठणकावून हुंडा मागताना दिसतात!’- मुलीचा बाप आणि मुलाचा बाप या दोन भूमिकेत एकच व्यक्ती अशी वेगवेगळे रंग दाखवते. हुंडा देण्या-घेण्याचा ओघ न ओसरायला हीच तर कारणं आहेत. इथल्या व्यवस्थेत, पुरु षधर्मी समाजरचनेत भरून राहिलेली ही दुटप्पी नीती कशी हाताळायची हा प्रश्नही पाठ सोडत नाही. अनेकदा मुलांना हुंडा नको असतो; पण आईवडील त्याच्यावर त्यासाठी दबाव आणतात. तुझ्यात काय खोट आहे म्हणून घ्यायचा नाही हुंडा? लोक वेड्यात काढतील, नावं ठेवतील अशानं. आपल्यात काय कमी आहे म्हणून हुंडा घ्यायचा नाही? - अशी उलटी मानसिकता खेड्यापाड्यात चांगली रुजली आहे. हुंडा नाकारला तर लोकांना वाटेल मुलामध्ये नक्कीच काहीतरी खोट असणार. या भीतीने, चार लोकांत दाखवायला म्हणून बऱ्याचदा हुंडा दिला-घेतला जातो. मात्र तो घेणाऱ्याची दिवाळी होते, तर देणाऱ्याचं दिवाळं निघतं. हल्ली हुंडा हा नवा ‘स्टेटस सिम्बॉल’ झालाय म्हणे. हुंडा घेतला नाही किंवा मुलीला हुंडा देऊ शकलो नाही तर गावात, चार माणसात पत उरणार नाही, ही बहुतेकांची समजूतच हा व्यवहार आजवर टिकून राहायला, वाढायला कारणीभूत ठरली आहे हे लक्षात येतंय आता हळूहळू. मुळात हुंडा देऊन वा घेऊन आपण काहीतरी चूक करतोय हे त्यांच्या गावीही नसतं. हुंडाबंदी कायदा असा कुणाच्या खिजगणतीतही नसतो. असे सामाजिक कायदे, नीतिनियम आपल्या भारतासारख्या रूढीप्रिय समूहव्यवस्थेत कायम वरचढ ठरत आलेत आणि संविधानातले कायदे त्यापुढे सदा कुचकामी ठरलेत. राजकीय, आर्थिक, जातीय, सांस्कृतिक असे एकमेकात गुंतलेले हितसंबंध जोपासण्यात, ते आणखी प्रभावी बनवण्यातही हुंडा महत्त्वाची भूमिका अदा करतो, हे छुपं वास्तव नाकारता येत नाही. मुलीकडच्या लोकांना मुलगी आपल्याहून मोठ्या घरात, अधिक तोलामोलाच्या घराण्यात जावी अशी मनोमन इच्छा असते. त्याचं सामाजिक स्थान - ‘स्टेटस’ - त्यातून वाढणार असतं. त्याकरता वाटेल तितका हुंडा देण्याची, त्यासाठी वाटेल त्या तडजोडी स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. ही अपवर्ड मोबिलिटीची अभिलाषाच हुंडा देण्याघेण्याला आणखी मजबूत बनवत राहते आहे.म्हणजे मुलगी पाटलाच्या घरची सून झाली तर आपण ‘पाटलाचे व्याही’ म्हणवले जाणार हा प्रतिष्ठेचा हव्यास मुलीच्या कुटुंबीयांमध्ये अनेकदा दिसतो. ही मानसिकता जवळपास सगळ्याच जात-समाजात विखुरलेली आहे. हुंडा देणाऱ्याची आणि घेणाऱ्याचीही प्रतिष्ठा अशी वाढणार असते आणि हीच मानसिकता हुंड्याची चाल धरून ठेवते. मुळात धनाढ्य लोक प्रतिष्ठेसाठी मुलीचं दिमाखात लग्न लावून देतात. त्यांच्यासाठी ते श्रीमंती मिरवण्याचं एक आयतं निमित्त असतं. पण हीच अपेक्षा मग प्रत्येक मुलीच्या बापाकडून ठेवली जाते.. त्याची आर्थिक कुवत विचारात न घेताच. हाच ताण आज गावखेड्यामधून कित्येक मुलींचे बाप झेलत आहेत. प्रसंगी घर, जमिनी गहाण ठेवून, शेतीचा तुकडा विकून, गुरेढोरे लिलावात काढून, उसनवारी करून ते हुंड्याची तजवीज करतात. मुलीचं लग्न होणं हीच त्यांची मुख्य चिंता असते. सातारा हा तसा बागायतदारांचा जिल्हा. सधन म्हणवला जाणारा. ‘पण इथे प्रत्येकजण बागायदार नाही हे कोण लक्षात घेत?’ - असा साताऱ्याच्या सीमंतिनीचा प्रश्न आहे. इथल्या आसपासच्या गावात तिच्या नात्यातल्या कितीतरी मुलींच्या लग्नात हुंड्यामुळे अडचणी आल्या आहेत. वडील वारलेल्या तिच्या मावसबहिणीचं लग्न दोन वर्षं रखडलंय. आधी एकत्र कुटुंब होतं तेव्हा ठीक होतं, पण तिचे काका गेल्यावर घरात वाटण्या झाल्या आणि अवघी दोन एकर जमीन मावशीला मिळाली. तिची दोन मुलं इंजिनिअरिंगला आहेत. त्यांच्या खर्चानं बेजार झालेल्या मावशीने मावसबहिणीला बारावीतून घरी ठेवलंय. आता तिचं लग्न करायला मात्र पैसा कसा उभा करायचा या काळजीत ती आहे. कारण आठ-दहा तोळ्यांच्या खाली कुणी उतरतच नाही. स्थळं येतात नी जातात. सीमंतिनीची मावसबहीण रडते आहे...जागतिकीकरणाचा पसारा वाढू लागला तशी ‘हाय प्रोफाइल’ विवाहसोहळ्यांच्या थाटमाटाला कुठली मर्यादाच राहिली नाही. आणि या वाढत्या बाजारकेंद्री जमान्यात हुंड्यातल्या देवघेवींच्या चीजवस्तूंचीही मागणी काळानुसार बदलत गेली, वाढू लागली. चैनीच्या वस्तू हुंड्याच्या लिस्टमध्ये येऊ लागल्या. त्यासाठी दबावही टाकला जाऊ लागला. पूर्वी लग्नात मुलीच्या प्रेमाखातर स्वखुशीन दिलं जाणारं स्त्रीधन कालांतरान हुंड्यात बदलत गेलं आणि आज तर त्याला एखाद्या खंडणीचं रूप आलंय. दबावातून, जबरदस्तीनं आणि मुलीचा छळ करून ही खंडणी वसूल केली जाते आहे. आणि भीषण म्हणजे बदलत्या काळाबरोबर हे सारं वेगानं वाढतं आहे.काहीएक दशकांपूर्वी कित्येक तळच्या समाजवर्गात हुंड्याची चाल अस्तित्वातच नव्हती. उच्च जात-वर्गीयांची संस्कृती, चालीरिती यांच्या प्रभावातून आणि अनुकरणातून या समाजस्तरांमध्येही हुंड्याची देवाण-घेवाण सुरू झाली आणि वाढीलाही लागली. आदिवासी समाजाचं उदाहरण यात बरंच बोलकं आहे. विदर्भ-मराठवाडा असो अगर पश्चिम महाराष्ट्र, इथल्या कित्येक गावांमध्ये कष्टकरी, शेतकरी तथा एका बहुसंख्य नाही रे वर्गातल्या मुलींचं जगणं हुंड्याच्या प्रश्नाने जिकिरीचं बनलंय ही आजची सगळ्यात प्रखर वास्तवता आहे. शिकून-सवरूनही लग्नात हुंडा द्यावाच लागतो म्हणून मुलींची शिकण्याची संधी अर्ध्यात खुडली जाते आहे. घरातल्या मुलाचं शिक्षण महत्त्वाचं मानलं जातंय. कारण तो एकाअर्थी इन्व्हेस्टमेण्ट असतो. जितका अधिक शिकेल तितकी मोठी नोकरी नी तितकाच जास्त हुंडा! मुलीच्या शिकण्यावर खर्च केला तरी पुन्हा लग्नातही खर्च करावा लागणार म्हणजे दुहेरी बोजा. अशा नजरेतून एकाच घरातल्या मुला-मुलींना तोललं जातं. त्यात मुलगी म्हणून तिचं पारडं कायम खाली. तोट्यातच. निव्वळ लग्न आणि हुंड्याच्या खर्चापायी मुलींना इच्छा असूनही शिकता येत नाही. कमावतं होता येत नाही. या मुली प्रत्यक्षात मेल्या नाहीत, तरी ‘मानसिक हुंडाबळी’ ठरत नाहीत का?

 

 

‘मी आत्महत्या करतेय त्याचा दोष मलाआणि माझ्या कुटुंबाला देऊ नका,’- असं बजावून शीतल वायाळ गेली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गर्भातच खुडल्या जाणाऱ्या मुली या दोन समकालीन प्रश्नांच्या उकलीचे एकमेकात विचित्रपणे गुंतलेले धागे शीतलने लिहिलेल्या चिठ्ठीत शोधता येतात. माध्यमांमध्ये दिसतं ते स्त्रीचं आधुनिक, स्वतंत्र आणि प्रागतिक रूप दिलासा देणारं खरंच! - पण त्याचबरोबरीने सामाजिक दुभंगाचे नवे काच वेढत निघालेल्या गावखेड्यातल्या मुलींच्या नशिबी एक विचित्र घुसमट लिहिली जाते आहे. अधर््यात तुटलेल्या शिक्षणाने दिलेली विचाराची, प्रश्न विचारण्याची त्यांची क्षमता क्रूरपणे पुसून टाकणाऱ्या जुन्या सामाजिक रुढी नव्याने बळकट झाल्या आहेत. या मुलींना आवाज नाही, वाट्याला आलेल्या नरकवासातून सुटण्याची संधी नाही आणि घुसमट सोसण्याला पर्याय नाही. ... या मुलींच्या अस्वस्थ जगाचा एक कानोसा आजच्या अंकात!