- सुलक्षणा व-हाडकर
लीवांग माझी मॅँडरीनची टीचर. वय वर्ष 32. सुंदर, नाजूक, उत्तम इंग्लिश बोलणारी. आईवडील लहानपणीच गेलेले. अन्हुई प्रांतात आजीने वाढवलेली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इंग्लिश शिकून, सिंगापूरला जाऊन त्या विषयातील डिग्री घेऊन आलेली. ती अविवाहित होती. म्हणजे ठरवून नाही.
करिअरच्या सापशिडीच्या खेळात लग्न हुकून गेलेले. संसाराची आस होती. पण चिनी समाजात तिच्यासारख्या 27 किंवा तिशीच्या आसपास असलेल्या यशस्वी स्त्रियांना ‘लेफ्ट ओव्ह’र स्त्रिया किंवा ‘शंग न्यू’ असे म्हटले जाते. त्यांच्याशी सहसा कुणी लग्न करीत नाही. ‘कोन्क्युबायीन होशील का?’ म्हणून विचारणारे खूप असतात. म्हणजे एखादा यशस्वी पुरु ष असेल तर तो नक्की अशा मुलींना जवळ करतो. म्हणजे काही ठरावीक दिवशी त्या त्याच्याबरोबर राहतात. त्यांचा घरोबा स्वतंत्र घरी असतो. या नात्यातून मुलेही जन्माला येतात. त्यांना अधिकार मिळतात. मध्यंतरी एक उच्च अधिकारी 15 हून जास्त स्त्रियांना जवळ बाळगून होता. त्याच्यावर खटले झाले कारण इतक्या स्त्रियांना जवळ ठेवण्याइतके पैसे त्याने सरकारी नोकरीतून कसे मिळवले हा वादाचा मुद्दा होता. स्त्रियांची मुबलक संख्या याबद्दल फारशी कुणाची तक्रार नव्हतीच.
तर त्या दिवशी माझी टीचर तिच्या कपाळावरच्या माराच्या खुणा लपवत मला चिनी संस्कृती शिकवीत होती. ‘बाथरूममध्ये पडले’ असे वैश्विक कारण सांगत डोळ्यातले पाणी खुबीने सांभाळत ग्रेसफुली हसत होती. ती ज्या पुरुषाबरोबर आठवडय़ाचे तीन दिवस राहत होती तो अधूनमधून तिला मारत असे. कारण तिचे इंग्लिश चांगले होते. ती त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवीत होती. तो तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्ठा होता. तिला आशा होती की तो जास्त काळ तिच्याबरोबर नाते ठेवू शकेल. ली वांग म्हणाली, मी ‘शंग न्यू’ आहे. माझ्याशी कोण लग्न करणार? लोक मला विचारतीलच. मग आहे तो काय वाईट आहे.
‘शंग न्यू’ हा शब्द, ही सामाजिक संकल्पना मला नवीन होती. चिनी प्रसारमाध्यमातून हा शब्द खूपदा कानी आला होता. तेथील मालिका, कथा यामध्ये याबद्दल लिहिले-बोलले जात होतेच. फक्त चीनमधील स्त्रियाच नाही, तर भारतीय उपखंडातील, आशियामधील आणि उत्तर अमेरिकेतील यशस्वी स्त्रियांना उद्देशून अनेकजण खासगीमध्ये हा शब्द वापरताना दिसले. म्हणजे याबद्दल दोन्ही बाजूने बोलणारे प्रसारमाध्यमातून दाखवले गेले. आपण ज्याला ‘थ्रीएस’ जनरेशनच्या स्त्रिया म्हणजे ‘सिंगल, सेवनटीज (1970) अॅण्ड स्टक’ म्हणतो.
चीनमधील सरकारी पत्रकांमध्ये आणि वेबसाइटवर हा शब्द वापरला जात नाही. कारण त्यासाठी फार मोठी चळवळ केली गेली. परंतु सामाजिक कुजबुजीमध्ये हा शब्द सर्रास वापरला जातो. शेजारच्या जपानमध्ये अशा यशस्वी आणि विवाहित स्त्रियांना ‘ख्रिसमस केक’ किंवा ‘पॅरासाइट्स’ म्हटले जाते म्हणजे खासगीमध्ये हा शब्द मी ऐकला होता. ‘माके इनू’ म्हणजे तिशीतील अविवाहित आणि मुलबाळ नसलेली बाई. थोडक्यात ‘लूजर डॉग’. जपानमधील एका सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे हे नाव होते. तेव्हापासून हा शब्द खूप प्रचलित झाला.
‘शिकून सवरून स्वत:च्या पायावर उभे राहायचे’ हे वाक्य आशिया खंडातील कोणत्याही देशातील तरुणी म्हणू शकते. अगदी चीनमध्ये सुद्धा असेच म्हणतात. परंतु याचा त्रास भारतीय स्त्रियांप्रमाणो चिनी स्त्रियांनासुद्धा व्हायला लागलाय. 27-28 किंवा तिशीनंतरच्या अविवाहित स्त्रियांना तर तिथे सर्रास ‘उरलेल्या बायका’ म्हणजे ‘लेफ्ट ओव्हर्स’ असे म्हटले जाते. विशेष मैत्रीण म्हणून किंवा विवाहबाह्य मधुर संबंधासाठी अशा स्त्रियांना विचारले जाते.
चीनमधील माझ्या काही चिनी मैत्रिणींची अशी कुचंबणा पाहिलीय मी. उत्तम इंग्लिश बोलणा:या, द्विपदवीधर असलेल्या, खूप पैसे कमावणा:या परंतु 28-30 च्या पुढील मुलींना लग्न जमविण्यासाठी खूप त्रस होतो.
नुकताच याच विषयावरील एक लेख मी वाचला तेव्हा मला ‘स्वत:च्या पायावर उभे असणा:या’ स्त्रियांच्या या समस्या पुन्हा एकदा जाणवल्या. तेहतीस वर्षीय वे पान ही इंजिनिअर आहे. दिसायला देखणी, कमवती, शहरी परंतु तिचे लग्नच जमत नाहीये. त्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेत. ऑनलाइन डेटिंग, सेट अप्स, टोस्ट मास्टर्ससारखे सोशल क्लब, शांघाय पीपल्स पार्कमध्ये जिथे लग्नाळू मुलामुलींचे आईबाबा त्यांचा बायोडेटा घेऊन येतात. परंतु तिथेही खूप कमी मुले आली होती. मुलींचीच संख्या खूप होती.
चिनी मुलीचे लग्न जमण्यासाठी तिचे वय, उंची, शिक्षण, पगार आणि संपत्ती किंवा घर पाहिले जाते. (शांघायमध्ये ‘हाऊस हजबंड’ लोकप्रिय आहे. शांघायमधील नवरे खूप गृहकृत्यदक्ष असतात.)
या सर्व मोजमापात बसूनही वे पानला योग्य मुलगा मिळत नाही.
या अशा लग्न न झालेल्या तरु ण स्त्रियांचा क्लबसुद्धा चीनमध्ये लोकप्रिय आहे. पुरु षांना इतकी जास्त हुशार बायको नको आहे. शिवाय तीसच्या पुढे तर त्यांना नकोच नको आहे. तिथल्या स्टारबक्समध्ये या स्त्रिया भेटत असतात. सामाजिक दबाव, वाढते वय हा त्यांच्या चिंतेचा विषय नाही, तर लोक त्यांना समजू शकत नाही याची काळजी त्यांना वाटतेय. गावाकडे तर मुलांची संख्या मुलींपेक्षा खूपच जास्त आहे. तिथे मुलींना खूप त्रस होतो. मुलांना खूप मागणी आहे. ‘गोल्ड डीगिंग’ ही संकल्पनासुद्धा तिथे लोकप्रिय आहे.
श्रीमंत मुलासाठी स्त्रिया काहीही करतात. वयाचे अंतर पाहत नाही, शिक्षण पाहत नाही, दिसणो पाहत नाही. फक्त पैसेवाला आहे हा गुण पाहतात आणि लग्न करतात.
अशा एकटय़ा राहणा:या स्त्रिया मोठय़ा गाडीची किंवा पैसेवाल्याची वाट पाहत असतात अशी टीकाही होते. मीसुद्धा अशा अनेक स्त्रियांना तिथे भेटलेय. चेन ही डीव्हीडीचे दुकान चालवते. उत्तम इंग्लिश बोलणारी बत्तीशीची मुलगी. तिच्या दुकानामुळे अख्खे घर चालते. वर्षातून तीन वेळेस ती वेगवेगळ्या देशात जाते. स्पॅनिश, फ्रेंच, जपानी भाषा येतात तिला. भारतातसुद्धा ती खूपदा येते. भारतातील हिमालय हा ब्रांड तिला आवडतो. आम्ही दोघी एकमेकींना मदत करतो. ती मला हव्या त्या डीव्हीडी भारतात पाठवते आणि मी तिला ‘हिमालय’ची औषधे. सुंदर दिसणा:या चेनचे लग्न जमत नाही, कारण तिचे मूल होण्याचे वय निघून गेलेय. आणि ती परदेशात जाते म्हणजे तिच्यामधील स्त्रीसुलभ भावना संपल्या असतील अशी भीती मुलांना वाटतेय. लग्नाची इच्छा असूनही तिचे लग्न जमत नाही.
जास्त शिकलेल्या, हुशार मुली चिनी मुलांना नकोत. एक मूल संकल्पनेमुळे तर प्रत्येक घरातील मूल हे राजकुमार किंवा राजकन्या आहे. 8क् च्या दशकात जन्मलेली ही मुले कुणाचेही ऐकून घेणारी नाहीत. मुलांना पारंपरिक मुलींशी लग्न करायची आहेत. स्वावलंबी मुली त्यांना जड जातील असे वाटतेय. मला तर हे सर्व पाहून वाटतेय की चीनमध्ये लग्न न झालेल्या मुलींचीसुद्धा महासत्ता होऊ शकते.
ब्राझीलमधील लग्न न झालेल्या स्त्रियांबद्दल तर लिहू तेवढे कमीच. इथे प्रेमालासुद्धा रंग आहे. कृष्णवर्णीय स्त्रिया जास्त अविवाहित आहेत आणि घटस्फोटितसुद्धा. इथले पुरु ष कमिटमेंट करायला मागत नाहीत. त्यांना निवडीला स्वातंत्र्यसुद्धा आहे. कुमारी मातांना सामाजिक त्रस तसा नाही.
मुलीच्या लग्नाबाबत आपल्याकडेही बँका कर्जे देतात. खरं म्हणजे मुलीचे लग्न ही आर्थिक समस्या असण्यापेक्षा सामाजिक समस्या जास्त वाटते. चीन, जपानसारखे संस्कृती जोपासणारे देशही थोडेसे खरवडले की पुरु षप्रधान संस्कृतीकडे झुकताना दिसतात.
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
sulakshana.varhadkar@gmail.com