माङया छोटय़ा आयुष्यात मला प्रमाणाबाहेर आणि न मागता जे काही चांगले मिळाले ते म्हणजे
माङो शालेय शिक्षक. त्यातलेच एक ‘श्रीवा’. नेमून दिलेले धडे शिकवण्याआधी अनेक लेखक, कवी त्यांनी व्यक्ती म्हणून आमच्या समोर आणले. दलित साहित्याशी ओळख करून दिली तेव्हा आयुष्यातील वेदना, दु:खाशी आमचा सामनाच झाला नव्हता. मी माङया दु:खाविषयी काही वर्षानी लिहिणार होतो, त्यावेळी ही ओळख मला सहअनुभूतीची ठरली. हे सगळं घडत असताना आम्ही तेरा ते पंधरा या वयातील मुले होतो आणि माङया मते फारच नशीबवान!
- सचिन कुंडलकर
क्रि सर्व गोरी माणसे त्यांना स्वत:ला जरी वाटत असले तरी नट नसतात, ती फक्त गोरी माणसेच असतात. सर्वच साक्षर माणसे त्यांना जरी वाटत असले तरी लेखक नसतात, ते फक्त साक्षरच असतात. आणि सर्व प्रकाशित लेखक हे साहित्यिक नसतात. ही साधीशी गोष्ट; जी आपल्या सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिका:यांना कळायला हवी, ती आम्हाला लहानपणी शाळेतच शिकवली गेली होती. असे काही महत्त्वाचे अप्रत्यक्षपणो शिकवणा:या आमच्या मराठीच्या शिक्षकांचे नाव होते श्री. वा. कुलकर्णी. माङया गेल्या सर्व वर्षातील माङया वाचन, लेखन प्रवासात ही व्यक्ती मला सतत सोबत करत राहिली आहे.
आपल्याला प्रत्येकाला असे काही मोलाचे शिक्षक भेटलेले असतात. ते शिक्षक शिकवत असताना फार वेगळे आणि भारावलेले असे काही वाटत नाही. पण नंतर शाळा मागे पडली, आयुष्य जगायला लागलो, काम करायला लागलो की त्या व्यक्तीने आपल्याला कितीतरी महत्त्वाचे दिले आहे हे लक्षात येते. आमच्या भावे स्कूलमध्ये शिकताना आम्हाला अनेक चांगले, कळकळीने शिकवणारे, विद्याथ्र्यावर प्रेम करणारे शिक्षक लाभले. त्यामध्ये अगदी महत्त्वाचे असे होते ते म्हणजे आमचे श्री. वा. कुलकर्णी. आमच्या शाळेत शिक्षकांचा उल्लेख मराठीतल्या त्यांच्या नावाच्या आद्याक्षरानी करायची जुनी पद्धत तेव्हा अस्तित्वात होती. त्यामुळे आम्ही त्यांना ‘श्रीवा’ असेच म्हणत असू.
श्रीवांनी माङया वाचनाला शिस्त लावली. अगदी शालेय वयात असताना. अशी शिस्त आपल्याला लावली जात आहे हे आपल्याला अजिबातच कळत नसताना. शाळेमध्ये आम्ही त्यांना टरकून असू. ते शिक्षा म्हणून ज्या पद्धतीने हातावर पट्टी मारत त्याची आठवण मला अजूनही आहे. पण मी कोणतेही पुस्तक वाचायला उघडले आणि त्याच्या नोंदी करण्यासाठी टोक केलेली पेन्सिल घेऊन बसलो की मला नेहमीच त्यांची आठवण येते.
अभ्यासक्र मात असलेल्या लेखकांचे सर्व साहित्य आम्ही आगून मागून वाचावे असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी कोणताही धडा शिकवताना ते त्या लेखकाची नीट ओळख करून देण्यात एक संपूर्ण तास कारणी लावत असत. सोबत प्रत्येक लेखकाची, कवीची पुस्तके घेऊन येत आणि त्या लेखकाच्या कामाचे विस्तृत टिपण त्यांनी तयार केलेले असे. हा त्यांचा अगदी खास आवडता मराठी शब्द. ‘टिपणो काढा’. ‘जे वाचाल त्याबद्दल विस्तृत नोंदी ठेवत जा. न समजणा:या गोष्टी शब्दकोशात पाहत जा. मग पुढे जात जा’ असे ते ओरडून ओरडून सांगत. आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, बहिणाबाई, इंदिरा संत, विंदा करंदीकर, पाडगावकर, वसंत बापट, दळवी, सुनीता देशपांडे, गो. नी. दांडेकर, बा. सी. मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू, विठ्ठल वाघ, माधव आचवल असे विविध मिश्र काळातील लेखक, कवी त्यांनी आम्हाला शाळेचे नेमून दिलेले धडे शिकवण्याआधी व्यक्ती म्हणून समोर आणले. लेखक कोण होता, कसा घडला, त्याची मते काय होती, तो कसा लिहिता झाला, समाजाने त्याला लिहिताना कसे वागवले, हे सगळे त्यात आले. दलित साहित्याच्या संदर्भात त्यांनी सोप्या भाषेत ‘दु:ख आणि वेदना’ या विषयावर आम्हा शालेय मुलांसाठी एक छोटे टिपण बनवले होते, तेव्हा आमचा आयुष्यातील दु:खाशी सामनाच झाला नव्हता. पुढे होणार होता. मी माङया दु:खाविषयी काही वर्षांनी लिहिणार होतो. ज्यासाठी दलित साहित्याची त्यांनी करून दिलेली ओळख अनेक वर्षांनी मला सहअनुभूतीची ठरली. दया पवार यांच्या ‘बलुतं’ची त्यांनी करून दिलेली ओळख.
मराठी साहित्य व्यवहारातील अनेक सुसंस्कृत व्यक्तींची माहिती देण्यासाठी ते आम्हाला छोटी व्याख्याने देत, ज्याची तयारी ते तास सुरू होण्याआधी करून येत असत. श्री. पु. भागवत कोण आहेत? आणि ‘मौज प्रकाशन’ हे मराठी साहित्यविश्वातील किती महत्त्वाचे आणि मानाचे प्रकरण आहे हे सांगता सांगता एकदा आमचा मराठीचा तास संपून गेला होता. जी. ए. कुलकर्णी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्यावर किती बोलू आणि किती नको असे त्यांना होत असे. जीएंची ‘भेट’ ही कथा आम्हाला शाळेत अभ्यासाला होती, त्या धडय़ाच्या अनुषंगाने जवळजवळ चार दिवस ते विस्तृतपणो जीएंच्या सर्व साहित्यावर बोलत होते. आम्हाला शाळेच्या ग्रंथालयात जाऊन त्यांनी जीएंचे सर्व साहित्य वाचायला प्रोत्साहन दिले. संत ज्ञानेश्वर शिकवायला लागण्याआधी त्यांनी आम्हाला त्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती हे सोप्या भाषेत सांगितले होते. त्यामुळे आम्ही संतसाहित्य भाबडय़ा श्रद्धेच्या पलीकडे जाऊन समजून घेऊ शकलो. हे सगळं घडताना आम्ही तेरा ते पंधरा या वयातील मुले होतो. आणि माङया मते फारच नशीबवान मुले होतो.
गाणो शिकवावे तशी भाषा सातत्याने शिकवावी आणि शिकावी लागते. ती लहान मुलांच्या आजूबाजूला बोलीतून, गाण्यांमधून, शिव्यांमधून, ओव्यांमधून, लोकगीते, तमाशे, सिनेमा, नाटकातून प्रवाही असावी लागते. पण तरीही ती शिकवावी लागतेच. तिची गोडी मुलांना लावावी लागते. भाषेची तालीम असणो एका वयात फार आवश्यक ठरते. श्रीवा हे माङयासाठी कळकळीने शिकवणा:या एका आख्ख्या मराठी शालेय शिक्षकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्या पिढीचे शिकवण्याच्या कामावर अतोनात प्रेम होते. ती नुसती नोकरी नव्हती. जातीच्या आणि आरक्षणाच्या राजकारणात ती एक पिढी वाहून गेली. मराठी शाळाच नष्ट झाली. आज मी लिहिलेले कुठेही काही वाचले, माझा चित्रपट प्रदर्शित झाला, की आमच्या भावे स्कूलमधील सर्व शिक्षकांचे मला आवर्जून फोन येतात. श्रीवा त्यांच्या खास शैलीत एक एसेमेस आधी पाठवतात आणि मग मागाहून विस्तृतपणो फोन करतात.
माङया छोटय़ा आयुष्यात मला प्रमाणाबाहेर आणि न मागता जे काही चांगले मिळाले ते म्हणजे माङो शालेय शिक्षक आहेत. अजूनही काम करताना, वाचन करताना, काही नवीन शोधताना सतत आपला शब्दसंग्रह अपुरा आहे, आपण कमी वाचन केले अशी मनाला बोच लागून राहते. वाचनाची एक शिस्त असते. जगातले सर्व भाषांमधील मोठे विद्वान लेखक किती परिश्रमपूर्वक वाचन करतात हे मी जेव्हा पाहतो, तेव्हा प्रत्येक वेळी मला श्रीवांचा मराठीचा तास आठवतो. आजच्या काळात तर फार प्रकर्षाने आठवतो, कारण आज मराठी भाषेतील साहित्याबद्दल आपल्याकडे अभिमान सोडून काहीही शिल्लक नाही.
शाळा संपल्यावर अनेक वर्षांनी श्री. पु. भागवतांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्या घरात शिरताना माङो अंग कोमट झाले होते. भीतीने वाचा पूर्ण बंद. सोबत मोनिका गजेंद्रगडकर बसली होती. श्री. पु. भागवत शांतपणो माङया पहिल्या कादंबरीचे हस्तलिखित हाताळत होते आणि मला काही प्रश्न विचारत होते. मी चाचरत उत्तरांची जुळवाजुळव करत होतो. तितक्यात दाराची बेल वाजली आणि सहज म्हणून सकाळचे गप्पा मारायला पाडगावकर तिथे आले. ते येऊन एक नवी कविताच वाचू लागले. मला हे सगळे आजूबाजूला काय चालले आहे तेच कळेना. मला तेव्हा श्रीवांची खूप आठवण आली. मी आनंदाने भांबावून गेलो. मला इतका अद्भुत आनंद सहन करता येत नव्हता आणि मला सोबत ते हवे होते असे वाटले.
चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हा माझा शाळेतील वर्गमित्र. आम्ही दोघेही श्रीवांचे विद्यार्थी. त्याच्या ‘विहीर’ या चित्रपटात श्रीवा आहेत. ते वर्गातील मुलांना ‘भेट’ हा धडा शिकवत आहेत. माङया आणि त्याच्या स्वत:च्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा अनुभव खूप सुंदर पद्धतीने चित्रपटात गोठवून साजरा केल्याबद्दल मी वेळोवेळी उमेशचे आभार मानत असतो. अशा काही वेळी आपण चित्रपट बनवण्याचे काम निवडले आहे याचे मला फार म्हणजे फारच बरे वाटते.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com