- अपर्णा वेलणकर
प्रस्तावित दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा आधुनिक भारतातला महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट. 1483 किलोमीटरच्या या पट्टय़ाच्या कडेने आठ महानगरे उभी राहतील. अहमदाबादपासून शंभर किलोमीटर अंतरावर 920 चौरस किलोमीटर क्षेत्रत बांधले जाणारे सर्वात मोठे शहर असेल ढोलेरा. हे शहर 2040पर्यंत कार्यान्वित होईल. गुजरातमधली ‘गिफ्ट सिटी’ हे ग्रीनफिल्ड प्रोजेक्टचे आणखी एक उदाहरण आणि त्यामागोमाग आता आकाराला येऊ घातलेली
आंध्र प्रदेशची नवी
हायटेक राजधानी अमरावती.
वाहत्या नदीच्या काठी माणसांचे समूह एकत्र येऊन राहू लागले, त्या पहिल्या-वहिल्या वस्त्या हे आजच्या अत्याधुनिक भाषेतल्या ‘ग्रीनफिल्ड डेव्हलपमेंट’चे आद्यरूप. आधी माणसे पाण्याची उपलब्धता पाहून (प्रामुख्याने नदीकिनारी) वसाहती करीत, मग त्यामागोमाग (जंगली श्वापदांपासूनची) सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आला. शेती सुरू झाली तशी पिकत्या जमिनीच्या भोवती गावे आकाराला येत गेली. मग व्यापाराला संघटित रूप आले. मालाची वाहतूक सुरू झाली तशा नगरविकासाच्या नव्या गरजा आणि रचना आकाराला आल्या. यंत्रयुगाच्या आगमनानंतर उत्पादन आणि व्यापाराची केंद्रे असलेली शहरे वेगाने महानगरांमध्ये परावर्तित झाली. आर्थिक समृद्धीच्या काळात या शहरांमध्ये कला-संस्कृतीला बहर आला. आर्थिक मंदीच्या संकटांपासून युद्धासारख्या अरिष्टांर्पयत अनेक आपत्तींचा सामना करीत ही महानगरे झगडत, वाढत राहिली. आपल्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांचे प्रतिबिंब शहरातच पाहणा:या माणसांच्या लोंढय़ांनी शहरे गजबजून गेली आणि नियोजनाच्या चौकटीआधीच फोफावलेल्या या अर्निबध वाढीने नगर-प्रशासनासमोर अनेक नवे प्रश्न उभे केले. कमी-अधिक फरकाने हे सारे जगभर होत गेले.
- भारतीय महानगरांच्या कोंडवाडय़ांचे दारुण चित्र आपण अनुभवतोच आहोत.
या सगळ्या महानगरी गदारोळात विचार करून नियोजनपूर्वक आखलेली आणि जवळपास शून्यातून उभारलेली महानगरे तुरळक का असेना, होती. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी स्वप्नातल्या भारताबरोबर स्वप्नातली शहरे वसवण्यासाठी परदेशातून तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. चंदीगढ हे त्यांच्या स्वप्नाचे प्रत्यक्ष रूप. स्वतंत्र भारतातला पहिला ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असण्याचा मान चंदीगढचा. मग पुढे भुवनेश्वरपासून अशा नव्या नगरनियोजनाचे प्रयोग भारतात आकाराला आले. मुंबईवरला न पेलवणारा भार हलका करण्यासाठी आखलेली नवी मुंबई हे आपल्या जवळचे सर्वात ठळक उदाहरण. अनेकानेक कारणांसाठी वादग्रस्त ठरलेले, डोंगरकुशीत नव्याने वसवलेले लवासा हादेखील ग्रीनफिल्ड प्रोजेक्टच!
अलीकडच्या काळात नव्याने वसवल्या जाणा:या महानगरांच्या नशिबी मात्र माहिती-तंत्रज्ञानाच्या कृपेने जन्मत:च ‘स्मार्ट’ होण्याच्या शक्यता आहेत. जुन्या रचना, जुने अडथळे या कशाचाही विचार न करता संपूर्ण नव्या नगररचनेमध्ये ‘स्मार्ट टेक्नॉलॉजी’चा वापर अर्थातच अधिक सुकर असतो. परस्परांच्या आधाराने उभारलेल्या अनेक नव्या व्यवस्थांचे सुसूत्रीकरण साधण्याची संधी असल्याने स्मार्ट टेक्नॉलॉजीचे जास्तीत जास्त फायदे साधता येतात. वाहतुकीचे उदाहरण घेऊ. नागरिकांच्या शहरांतर्गत प्रवासाच्या शक्यता- दिशा आणि वेळा, सार्वजनिक वाहतुकीचे मार्ग आणि पद्धती, बस-मेट्रोची स्थानके, पार्किंगच्या सुविधा, निवासी-औद्योगिक-कार्यालयांचे परिसर या सा:या नियोजनामधले परस्परावलंबित्व स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आधाराने साधता येते. कारण या सा:या व्यवस्था एकाच वेळी आखल्या जाऊन प्रत्यक्षात येणार असतात. तीच गोष्ट पाणी-वीजपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाची. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापराचे अधिकाधिक फायदे घ्यायचे, तर नुसती शहर बससेवा स्मार्ट असून चालत नाही. या बससेवेचे थांबे आणि इतर वाहतूक साधनांच्या वापराच्या दिशा यामध्येही सुसूत्रता असावी लागते. तुम्हाला जिथे जायचे आहे, ती बस आता याक्षणी कुठे आहे आणि ती तुमच्या जवळच्या बसथांब्यावर कधी येईल, ही रिअल टाइम माहिती देणारे स्मार्टफोनसाठीचे अॅप तयार करणो अतिशय सोपे आहे; पण तुम्हाला जिथून जिथवर जायचे आहे, त्यासाठीचे बसमार्ग अस्तित्वात असणो, बसचा थांबा तुमच्या निवासाच्या/कामाच्या जागेपासून जवळ असणो, नसेल तर त्या थांब्यावर खासगी वाहने पार्क करण्याची व्यवस्था असणो.. एकुणातच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करेल असे अन्य अनुषंगिक व्यवस्थांचे जाळे असणो महत्त्वाचे!
- अशा अनेक गोष्टींवर स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापराची शक्यता आणि परिणामकारकताही अवलंबून असते. आधीच अस्तित्वात असलेल्या शहराच्या व्यवस्थेमध्ये ‘स्मार्ट लेअर’ विणण्यामध्ये आव्हान आणि अडथळे असतात ते याच परस्परपूरक रचनेचे. संपूर्णत: नव्याने वसवल्या जाणा:या शहरामध्ये हे अडथळे नसतात, हा स्मार्ट तंत्रज्ञानासाठीचा सर्वात मोठा फायदा. शहर-नियोजनाच्या सर्व प्रमुख घटकांची परस्परांमध्ये गुंतलेली आणि परस्परांवर अवलंबून असलेली रचना एकत्रितपणो आखता येण्याने अनेक दुवे नियोजनाच्या टप्प्यावरच सांधता येतात, हा ग्रीनफिल्ड स्मार्ट नगररचनेचा मोठा फायदा.
जमीन संपादनाच्या किचकट आणि महागडय़ा प्रक्रियेमुळे काम रखडून पडणो, आधुनिकीकरणाच्या हव्यासाने पर्यावरणावर कु:हाड चालवली जाण्याचे दोष (लवासा), उद्योग-गुंतवणूकदार यांना आकर्षित करण्यात आलेले अपयश (पुन्हा लवासा), एका छोटय़ा भूभागात अचानक आलेल्या वेगवान आर्थिक चलनवलनाने बिघडलेला सामाजिक समतोल (गुरगाव), वास्तवाशी नाते राखण्याचे भान सुटून झालेल्या बेबंद स्वप्नरंजनाचे ओङो (चंद्राबाबूंच्या अमरावती डिझाइनवर तज्ज्ञांचा असलेला आक्षेप) अशा अनेक कारणांनी ग्रीनफिल्ड शहरांचा हा प्रयोग उलटसुलट चर्चेत आहे. या भारतीय प्रयोगांच्या यशापयशाचे मोजमाप कालांतराने होईल, पण त्यापूर्वी जगभरात याआधीच झालेल्या काही प्रयोगांकडे पाहता येणो शक्य आहे.
- अर्थात प्रत्येक ग्रीनफिल्ड प्रकल्प हा पूर्णत: ‘स्मार्ट’ असतो, असे नव्हे. स्मार्ट हा या आधुनिक शहरांचा अत्यंत महत्त्वाचा पण ‘एक’ स्वभावविशेष आहे.
दक्षिण कोरियातले सोंगडो हे समुद्रात भराव घालून तयार केलेल्या 15क्क् एकर भूभागावर वसलेले नवे ‘ग्रीनफिल्ड’ शहर.. जन्मत:च स्मार्ट असलेल्या आधुनिक महानगरांच्या यादीतले पहिले शहर मानले जाते. हे स्मार्ट शहर नव्या नगरनियोजनाची एक ‘टेम्प्लेट’ म्हणून उदयाला आले आहे.
- भारतात कुणी सोंगडोचे सख्खे/चुलत भावंड या घडीला आहे का?
तर हो. सोंगडोसारखे नव्हे, पण त्या वाटेवर चालू पाहणारे भारतातले पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट शहर म्हणून विकसित होऊ घातले आहे नया रायपूर. छत्तीसगडची नवी राजधानी.
या दोन्ही शहरांचा प्रवास करून पाहूया तरी, की इथे आहे काय..?
- पुढच्या रविवारपासून!
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com