पवन देशपांडे(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)आफ्रिकेतल्या अंधाऱ्या जगाला उजेडात न्हाऊ घालणारी ‘अनवाणी’ ऊर्जा.. राजस्थानातल्या बेअरफुट कॉलेजमध्ये शिकून आफ्रिकेतल्या घरोघरी परतलेल्या सोलर ममांची पाचा उत्तरांची कहाणी.तो म्हणाला, तुला जायचं असेल तर जा भारतात.. पण मला राहवलं नाही तर मी दुसरं लग्न करीन.ती म्हणाली, ठीक आहे. माझी हरकत नाही. पण मला जायचंच आहे. उभा राहिलेला संसार, पाच लेकरं घरच्यांवर तशीच सोडून ती भारतात आली. जवळपास पाच हजार किलोमीटर दूर. दक्षिण आफ्रिकेतून थेट राजस्थानातल्या एका छोट्या गावात.या छोट्या गावात तिनं शिक्षण घेतलं आणि ती आपल्या गावात परत गेली. तिनं आपल्या संसारापेक्षा गावाकडं जास्त लक्ष दिलं़ अख्खं गाव सौरदिव्यांनी उजळवून टाकलं. तशी ती आता एकटी राहिली नाहीये. तिच्यासारख्या सौरमातांची फौजच आफ्रिकेत उभी राहिली आहे. थोड्याथोडक्या नव्हे तर त्यांनी हजारो सौरदिव्यांनी अनेक गावं उजळवून टाकली आहेत. वीजबिल भरण्यासाठी सोडाच, साधा मिणमिणता दिवा पेटवण्यासाठी रॉकेल विकत घेण्यासाठीही पैसा नसलेली माणसं जिथे राहतात अशा गावातली पडकी-अर्धीउभी घरं आता सौरदिव्यांनी उजळली आहेत.या आहेत सौरमाता. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर सोलार ममाज... आफ्रि केच्या काळ्याकुट्ट अंधारात दररात्री लुप्त होणाऱ्या गावांना प्रज्वलित करणाऱ्या ‘ममा’. भारतात प्रशिक्षण घेऊन त्या आफ्रिकेत परतल्या आणि भारतात घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारावर त्यांनी आफ्रिकी देशांमधली गावंच्या गावं सौरदिव्यांनी उजळवून टाकली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना या ‘सोलर ममाज’ना भेट दिली, तेव्हा कुठे त्यांची कहाणी उजेडात आली.या सौरमाता (सोलार ममाज) आहेत आफ्रिकेतल्या, पण त्या खऱ्या अर्थानं जन्मल्या राजस्थानातल्या एका छोट्या गावात. या गावाची, गावातील अनोख्या कॉलेजची अन् सौरमातांची कहाणी रंजक आहेच; शिवाय प्रेरकही आहे.आजीबार्इंना शिकवा, जग बदला... अशा अनोख्या ब्रिदवाक्याने जगभरात नावाजलेलं बेअरफुट कॉलेज. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात तिलोनिया या छोट्याशा गावात ते उभं राहिलं. ज्याकाळी खेड्यातली बाई केवळ अन् केवळ चुलीजवळ, लेकरं सांभाळत बसलेली असायची किंवा फारफार तर शेतावर काम करायची त्याकाळी हे तिलोनिया गाव कधीतरी जगाच्या नकाशावर ठळकपणे येईल, जगाला त्याची दखल घ्यावी लागेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण या गावात एक तरुण आला. नाव होतं संजित रॉय. उच्च शिक्षण आणि घरची श्रीमंती सारं काही विसरून नवं शाश्वत जग उभं करण्याची ऊर्मी घेऊन त्यानं एक संकल्पना मांडली. तो तरुण तिलोनियामध्ये आला तेव्हा खरं त्याला विचारलं गेलं- बाबा तू घर सोडून पळून आलास का? की तुला पोलीस शोधताहेत म्हणून आमच्या गावात आलास? मग एवढं शिक्षण असून, सरकारी नोकऱ्यांची दारं खुली असताना तू तिलोनियात करतोस तरी काय? - तेव्हा संजितने तिलोनियाच्या सरपंचाला आपली कल्पना सांगितली. सरपंच नव्या विचाराचा होता. त्याला ते पटलं. त्यानं गावकऱ्यांनाही सोबत घेतलं. पण जमीन नव्हती. त्यासाठी सरकारनं गावातली पडीक जमीन - जिथं काहीच उगवणार नाही - त्याला एक रुपया महिना अशा भाड्यानं दिली.त्यानं गरीब महिला, केवळ शेती आणि शेतमजुरी करणारी माणसं यांच्या साथीनं ‘बेअरफुट कॉलेज’ साकारलं. इमारत उभी राहिली तीही गावकऱ्यांच्या मदतीनं. भिंती, छप्पर सारं काही लोकांनी तयार केलं. जगाला नव्या दिशेनं जाण्यास भाग पाडणारा हा माणूस आज बंकर रॉय या नावानं ओळखला जातो. चाळीस वर्षांनंतरही त्याचा प्रयोग जगाला प्रकाशमान करतो आहे. या बेअरफुट कॉलेजची एक अट आहे. चांगलं शिक्षण झालेल्या व्यक्तीला इथं प्रवेश मिळत नाही. नापास असेल, अशिक्षित असेल, अर्धशिक्षित असेल तर प्रवेश. अशिक्षित आणि स्त्री असल्यास प्रवेशात प्राधान्य. शिवाय गरीब असणं ही महत्त्वाची अट. अशा लोकांना इंजिनिअर-डॉक्टर बनवायचं. सर्टिफिकेट कोणतंही नाही. काम मात्र हमखास. शाश्वत विकासही शंभर टक्के. या कॉलेजची सुरुवात झाली तेव्हा शिकणाऱ्या स्त्रिया खूप कमी होत्या.पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला शिकवत गेली आणि संख्या वाढत गेली. बंकर रॉय म्हणतात, की स्त्री शिकली किंवा घरातली आजी शिकली की ती इतर अनेक स्त्रिया घडवते. पुरुषांचं तसं नसतं. ते स्वत: शिकतील पण इतरांना शिकवणार नाहीत. त्यांना चांगल्या शहरात चांगली नोकरी हवी असते, सर्टिफिकेट हवी असतात. स्त्रिया आणि त्यातही आजी झालेल्या स्त्रियांचं मात्र वेगळं असतं. त्यांना समाजात मान असतो आणि त्यात त्या शिकलेल्या असतील तर ते आणखीनच प्रतिष्ठेचं ठरतं. शिवाय इतरांना ज्ञान वाटण्यात समाधान मिळतं. खरं तर त्यामुळंच आतापर्यंत सौरदिव्यांचं प्रशिक्षण मिळण्याचं प्रमाण वाढलंय आणि आफ्रिकेतील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या २०० हून अधिक आजीबायांना शिक्षण मिळालंय. त्यांनी २० हजारांहून अधिक घरं सौरदिव्यांनी प्रकाशमान केली आहेत. सौरदिवा चालतो कसा, त्याची उपकरणं कोणती, तो तयार कसा करायचा, दुरुस्त कसा करायचा, खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची असं सगळं शिक्षण त्यांना बेअरफुट कॉलेजमध्ये दिलं जातं. बंकर राय यांनी जॉर्डनच्या वाळवंटी भागातून अशाच काही महिलांची निवड केली. त्यात एक होती राफी अनादी. पाच मुलांची आई. इराकच्या सीमेपासून काही मिनिटांच्या अंतरावर तिचं गाव होतं. तिच्या दोन शेजारणींची खरं तर राय यांनी बेअरफुटमध्ये शिकवण्यासाठी निवड केली होती. राफीला ते कळलं आणि तिनंही भारतात असं काही शिकायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांत पासपोर्ट मिळाला अन् घरच्यांचा रोष पत्करून ती भारतात आली.त्यावेळी केनिया, ग्वाटेमाला, बुर्किना फासो, कोलंबिया, कोंगो आणि जॉर्डनमधून आलेल्या अनेक स्त्रियांची एक बॅचच बेअरफुटमध्ये आली होती. त्यांचं स्वागतही बाहुल्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. सगळंच नवीन होतं. माणसं, भाषा, संस्कृती, राहण्याची पद्धत, पेहेराव अन् व्यक्त होण्याची पद्धत... एकमेकांना भेटण्याची पद्धत.. सगळं वेगळं. एका जगातून दुसऱ्या अनोळखी जगात आल्यासारखं. पण शिकण्याची जिद्द सगळ्यांचीच कायम होती. शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला इंग्रजीची तोंडओळख, मग इलेक्ट्रॉनिक्समधील छोट-छोट्या गोष्टींची ओळख असा एक एक टप्पा शिकवला जात होता. वेगवेगळ्या देशांतील स्त्रिया एकत्र बसत होत्या. सौरदिवा कसा बनवायचा, दुरुस्त करायचा हे शिकत होत्या. सगळं सुरळीत चाललं होतं. पण महिनाभरातच राफीला तिच्या घरच्यांनी परत जॉर्डनला बोलावून घेतलं. तिच्या लहान्या लेकीला आजार झाला होता. ते कारण काढून तिला बोलावून घेतलं गेलं. ती गेली, पण तिच्यात या महिनाभराच्या काळात नवी ऊर्जा संचारली होती. विचारात तेज आलेलं होतं आणि स्वतंत्रपणे काम करण्याचं बळ मिळालं होतं. त्यामुळेच तिची परत भारतात यायची इच्छा कायम होती. लेकीचं दुखणं बरं झाल्यावर तिनं घरच्यांकडे तगादा लावला. पण नवऱ्यानं धमक्या द्यायला सुरुवात केली. तो म्हणाला, जायचं तर जा. पण मला राहवलं नाही तर मी दुसरं लग्न करेन. मुलं सांभाळायची जबाबदारी माझी नाही. तिनं या धमक्यांना जुमानलं नाही. ती भारतात आली. मोठ्या जिद्दीनं सहा महिन्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आणि पुन्हा जॉर्डनला परतली. ती जेव्हा गेली तेव्हा ती खऱ्या अर्थानं ‘सोलर ममा’ झालेली होती. सोलर इंजिनिअर होती. तिला सौरदिव्याची सारी कामं येत होती. सौरदिवा तयार करण्यापासून ते त्याची देखभाल आणि दुरुस्तीपर्यंत ती करू शकत होती. बेअरफुटमध्ये येण्याआधी धुणं-भांडी-चूल-मूल एवढंच जीवन असलेली राफी इंजिनिअर झालेली होती आणि तिच्यासमोर अवघं जग लख्ख झालेलं होतं. आता इतरांना याच व्यवसायात आणायचं हे तिनं ठरवलेलं होतं. शिक्षण घेतल्यापासून आतापर्यंत राफीनं शेकडो घरांना प्रकाशात न्हाऊन सोडलंय आणि शेकडो स्त्रियांना याचं प्रशिक्षण देऊन सौरमातांची एक साखळीच तयार केली आहे. जॉर्डनच्या राफीचं हे उदाहरण जगाच्या डोक्यातच प्रकाश टाकणारं होतं. त्यातून आफ्रिकेतल्या अनेक महिलांचं कामही पुढे आलं. त्यांनीही बेअरफुटमधून घेतलेलं शिक्षण आणि त्यानंतर आफ्रिकन देशांतील उजळवलेली खेडी याची अनेक उदाहरणं आहेत. एक मोठी चळवळ उभी राहते आहे. खरं तर रॉय यांनी प्रत्यक्षात आणलेली बेअरफुट कॉलेजची संकल्पना ग्लोबल वॉर्मिंगवर जगभरात सुरू असलेल्या उपाययोजनांना पूरक अशी आहे. गरीब, अशिक्षित महिलांना उभं करण्याची क्षमता असलेली ही सौर चळवळ वाढत राहिली तर पर्यायी इंधनाचा वापर करून विजेची गरज कमी होईल आणि त्यातून प्रदूषणही कमी होईल. पण त्यासाठी अशा ‘सोलर ममां’ची मोठी फळी भारतात आणि जगभरात उभी राहणं गरजेचं आहे. सौरमातेच्या रूपातली दुर्लक्षित जगाला प्रकाशमान करणारी ही अनवाणी ऊर्जा उद्याच्या जगासाठी फार गरजेची आहे...स्वयंपाकही सौरऊर्जेवर..सौरमातांच जिथं ट्रेनिंग होतं, त्या बेअरफुट कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी, शिक्षक अन् कर्मचाऱ्यांसाठी मिळून ६० जणांचं जेवण तयार केलं जातं.. पण तेही सौरऊर्जेवरच. रात्रीच्या वेळी बनवण्याची गरज पडलीच तर गॅस वापरला जातो़ अन्यथा सौरऊर्जेवरच चालणारा कुकर आणि इतर साधनांचा वापर होतो. हे सारं तयार केलंय स्त्रियांनीच! अगदी वेल्डिंग करण्यापासून ते फिटिंग करण्यापर्यंत सारी कामं स्त्रियांनीच केली आहेत; शिवाय हे सगळं चालवतातही स्त्रियाच!केनिया, ग्वाटेमाला, बुर्किना फासो, कोलंबिया, कोंगो... हे सगळे देश दूर आफ्रिकेतले. पाच हजार किलोमीटरवरच्या या अंधाऱ्या देशातून काही स्त्रिया येतात थेट राजस्थानातल्या तिलोनियामध्ये! इथल्या बेअरफुट कॉलेजात त्या सौरदिवे तयार-दुरुस्त करण्याचं शिक्षण घेतात आणि आपापल्या देशा-गावात परत जातात! - परत जातात तो तिथला अंधार उजळण्यासाठीच! जो अशिक्षित त्यालाच फक्त प्रवेश देणाऱ्या आणि कसलीही सर्टिफिकिटं, डिग्य्रा अजिबात न वाटणाऱ्या एका अनोख्या शिक्षणपद्धतीने जग उजळू लागले आहे...बेअरफुट कॉलेज १९७२ मध्ये सुरू झालं. आठ एकरावर उभं असलेलं हे कॉलेज संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालतं. अशा पद्धतीचं भारतातलं हे एकमेव कॉलेज आहे. ही पूर्ण सौरयंत्रणा इथं शिकलेल्या तिलोनिया आणि आजूबाजूच्या गावांतील महिलाच चालवतात. हे एकमेव कॉलेज आहे जिथं शिकवलं भरपूर जातं आणि त्याचा शाश्वत विकासासाठी उपयोगही मोठा होतो. पण कसलीही डिग्री किंवा सर्टिफिकेट दिलं जात नाही. भारतभरात आता अशी २४ बेअरफुट कॉलेजेस उभी राहिली असून, तिथंही सौरदिव्यांचं शिक्षण देऊन अशा प्रकारच्या सौरमातांची साखळी उभी राहते आहे.आफ्रिकेत आता सहा बेअरफुट कॉलेज स्थापन करण्यात येणार असून, वर्षअखेरपर्यंत तिथं प्रशिक्षण देणंही सुरू होईल. सेनेगल, साऊथ सुदान, टांझानिया, झंझिबार, लिबेरिया आणि बुर्किना फासो अशा छोट्या देशांमध्ये ही सारी कॉलेजं उभी राहणार आहेत. या देशांमधील काही स्त्रियांनी तिलोनिया इथून प्रशिक्षण घेतलंय. त्याच स्त्रिया आता इतरांना हे प्रशिक्षण देणार आहेत.सध्या बेअरफुटचं काम ५० पेक्षा अधिक देशांमध्ये चालतं आणि ६४ पेक्षा अधिक सामाजिक संस्था या बेअरफुटशी जोडलेल्या आहेत. शिवाय १००० पेक्षा अधिक सोलर इंजिनिअर या कॉलेजनं दिले आहेत. कोणतंही प्रमाणपत्र नसलेल्या किंवा डिग्री नसलेल्या एक आजी डेंटिस्ट आहेत आणि त्या सात हजार मुलांच्या दातांची काळजी घेत असतात. आॅपरेशन करतात.सोलर इंजिनिअरिंग, दंत वैद्यकीय शास्त्र, मेकॅनिकल किंवा लोक आरोग्य ते रेडिओ जॉकी अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण या कॉलेजमध्ये मिळतं. त्यासाठी इथंच ट्रेन झालेले दहा-वीस प्रशिक्षक आहेत. इथं मगन कंवर नावाची महिला सोलर इंजिनिअरिंग शिकवते. तिला तिच्या सासऱ्यानं घरी बसून स्वयंपाक कर किंवा हवं तर स्वेटर विणत बस, असा आदेश दिलेला. पण तिची स्वप्नं मोठी होती. तिला फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. बेअरफुटमध्ये तिला संधी मिळाली अन् ती आता त्याचं सोनं करतेय.तिलोनिया गावातली ६० टक्के मुलं शाळेत जात नव्हती. कारण त्यांना गुरं सांभाळावी लागायची. शेळ्या चरायला न्याव्या लागायच्या. अशा मुलांसाठी बेअरफुटनं शाळाही सुरू केली. या मुलांना वेळ होता तो केवळ रात्रीचा. म्हणून शिक्षकांच्या वेळेनुसार नव्हे तर विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार रात्री इथं शाळा भरते. या शाळेत लोकशाही, नागरिकशास्त्र, जमीन कशी मोजायची, प्राण्यांवर उपचार कसे करायचे याचं शिक्षण दिलं जातं. या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत दर पाच वर्षाला निवडणूक होते. आठ ते चौदा वर्षापर्यंतची मुलं लोकशाहीच्या या प्रक्रि येत सहभागी होतात. मतदान घेतलं जातं. त्यांच्यातला एखादा पंतप्रधान म्हणून निवडून येतो. त्याचं मंत्रिमंडळ असतं. इथं शिक्षणमंत्री, अर्थमंत्री अशी सारीच पदं असतात. ते निर्णय घेतात. इथं एक १२ वर्षांची विद्यार्थिनी पंतप्रधान आहे. सकाळी शेळ्या चरायला नेते अन् रात्री ती पंतप्रधान असते. एकदा तिला परदेशात एका परिषदेला जाण्याची संधी मिळाली. तिचा आत्मविश्वास पाहून सारेच थक्क झाले. तिला विचारलं, पोरी एवढा आत्मविश्वास येतो तरी कुठून. ती म्हणाली, ‘‘आय एम दी प्राइम मिनिस्टर.’’ महिलांना सशक्त बनविण्याचं आणि त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरण्याचं एवढं चांगलं उदाहरण दुसरीकडे सापडणार नाही. शिवाय अशा १५० पेक्षा अधिक शाळा आहेत, ज्यामध्ये सौरदिव्यांवर शिक्षण दिलं जातं.
सौरमाता
By admin | Published: July 15, 2016 5:21 PM