मानोबी बंडोपाध्याय
ट्रान्सजेण्डर?
म्हणजे हिजडा का?
नाही हो, सगळे ट्रान्सजेण्डर काही हिजडे नसतात!
सगळ्या माणसांचं आयुष्य रेल्वेत आणि सिग्नलवर टाळ्या पिटत भीक मागण्यात नाही खर्ची पडत!
पण हे कुणी कुणाला सांगायचं? आणि कुणाला पटतं हे सगळं असं सांगून?
आमच्या बंगालमधला सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतूपर्णो घोष, अत्यंत मृदू मनाचा माणूस. सुंदर-तरल-नितांत देखणो चित्रपट बनवायचा. समाजाला त्याचे गुण फार उशिरा दिसले. तोर्पयत त्याची ‘तृतीयपंथी’ म्हणून यथेच्छ टवाळी झाली.
आपल्या समाजात तृतीयपंथी म्हणून जगताना किती टोकाची अवहेलना, किती पराकोटीचा अपमान सहन करावा लागतो याची एरव्ही कुणी कल्पनाही नाही करू शकत. या अशा माणसांनी जगूच नये असंच समाजाला वाटतं!
आपल्या समाजाला लागलेलं किटाळ असावं तशी माणसं आम्हाला आयुष्यातून पुसायला निघतात. इतकं छळतात की, अनेकदा वाटतं मरून जावं!
मलाही वाटलं होतं!! पंख्याभोवती दोर गुंडाळून जीव द्यायचा प्रयत्न मीही केला होता. वाटलंच होतं, की रोजचा हा छळ सोसण्यापेक्षा एकदाच संपवून टाकावं सारं!
माझा लैंगिक कल इतरांपेक्षा वेगळा आहे, माझा ओढा चारचौघांसारखा नाही. या एका गोष्टीसाठी किती छळवणूक करून घ्यायची यालाही मर्यादा होतीच!
मध्यमवर्गात जन्म, समाजाला घाबरून मध्यममार्गी जगण्याच्या दावणीला बांधलेलं आयुष्य आणि त्यामुळे होणारी कमालीची घुसमट मी अनुभवलेली आहे.
एका बंगाली मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. तेही दोन मुलींच्या पाठीवर. आईबाबांनी कौतुकानं माझं नाव सोमनाथ ठेवलं. चारचौघांसारखाच होतं लहानपणचं आयुष्य. मुलं जशी हुंदडतात, फुटबॉल खेळतात, सुरपारंब्या खेळत झाडांना लटकतात तसंच सगळं मीही करत होतो. मुलांमध्येच रमत होतो. पण का माहिती नाही तेव्हापासून मला वाटायचं की, मी मुलगा नाही. मी मुलगी आहे, माझ्या पुरुष देहात एक स्त्रीचं मन आहे, माझा आत्माच स्त्रीरूप आहे. पण सांगणार कुणाला, बोलणार काय?
लहान अजाणत्या वयात एवढंच कळत होतं की, आपलं शरीर मुलाचं असलं तरी, आपण आतून, मनाने, स्वभावाने मुलगीच आहोत. मुलींसारखे आहोत.
आपल्याला हे असं काहीतरी वाटतंय हे लक्षात येऊन ते स्वत:शी मान्य करणं हाच एक मोठा झगडा असतो.
इतरांना पटवून द्या, नका देऊ; स्वत:ला स्वत:ची ओळख पटण्याचा टप्पा अत्यंत अवघड आणि बैचेन करणारा असतो.
हे सारं एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मी शिकावं म्हणून माझी आई स्वत:ची हौसमौज मारत माझ्या शिक्षणावर खर्च करत होती. तिनं कधी अंगाला नवी साडी लावली नाही, जो हाती येईल तो तो पैसा माझ्या शिक्षणासाठी राखून ठेवला. मी माझं एमए पूर्ण केलं. नंतर ‘ट्रान्सजेण्डर स्टडिज’ या विषयात पीएचडी पूर्ण केली.
- आणि एका सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इथून पुढचा प्रवास मात्र अत्यंत अवघड होता. शिक्षणक्षेत्रतल्या पुरोगामी, बुद्धिवादी प्राध्यापक सहका:यांनी मला जगणं मुश्कील केलं. माझे पदोपदी अपमान केले. माझं दिसणं, माझी शारीरभाषा यांची टवाळी केली. माझ्या लेक्चरला बसू नका असं विद्यार्थ्यांना बजावण्यात आलं. मी पुरुष होते वरकरणी, तरी वेगळी दिसायचे. माझी शारीरभाषा वेगळी होती. लोक माझ्याकडे टक लावून पहायचे, खुसफुसायचे. या सा:याकडे मी दुर्लक्ष केलं. थोडीथोडकी नाही, आठ वर्षे चालला हा सिलसिला. लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यापूर्वीचा हा काळ. आमच्या कॉलेजात एकच सगळ्यात अवघड आणि सगळ्यांच्या दृष्टीनं आत्यंतिक उत्सुकतेचा प्रश्न एकच होता, मी कुठल्या स्वच्छतागृहात जायचं? पुरुषांच्या की महिलांच्या?
एरव्ही माझे पुरुष सहकारी ‘बायकी’ म्हणून मला चिडवायचे, बाई म्हणून माझा उल्लेख करत टोमणो मारायचे. पण मी स्वच्छतागृहात कुठल्या जायचं याचे नियम ते ठरवणार! त्यांचं मतच होतं की, मी पुरुषांसारखे कपडेच घालायला पाहिजेत, पुरुषांसारखं वागलं पाहिजे. म्हणजे एकीकडे बायकी म्हणून चिडवायचं आणि दुसरीकडे तू पुरुष आहेस, पुरुषासारखं वाग अशी सक्तीही करायची. मला या ढोंगीपणाचा उबग यायचा.
मात्र त्याही काळात ज्यांनी मला खुल्या दिलानं स्वीकारलं, ते होते माझे विद्यार्थी. बुद्धिवादी प्राध्यापक आणि समाज मला नाकारत-छळत असताना ग्रामीण भागातल्या माङया विद्यार्थ्यांनी मात्र मला सहज स्वीकारलं. प्राध्यापक म्हणून मला योग्य तो मान दिला. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
हाच खरं तर आपल्या समाजातला एक मोठ्ठा विरोधाभास आहे. जी माणसं सुशिक्षित आहेत, विचारबिचार करण्याचा दावा करतात तेच ‘वेगळ्या’ गोष्टी स्वीकारताना बिचकतात, किंवा टाळतातच! आणि जिथं विरोध होईल असं वाटतं ती अडाणी-मागास माणसं मात्र सहज आहे ते स्वीकारून मोकळी होतात. आदिवासीबहुल आणि माओवाद्यांचं वर्चस्व असलेल्या भागात मी शिकवत होते. पण त्या माणसांनी मला सहज स्वीकारलं. निसर्गाचा एक भाग म्हणून आहे ते नैसर्गिक वास्तव स्वीकारून ते मोकळे झाले!
स्वत:ला नागरी आणि बुद्धिजीवी म्हणवणा:या माणसांना माझ्याविषयी आक्षेप होते. मी पुरुष असून बायकांसारखे कपडे घालून कॉलेजात शिकवायला येते याविषयी प्रश्न होते. एका प्राध्यापकाने मला एकदा मारलं. माझ्यावर काहींनी खोटय़ानाटय़ा केसेस टाकल्या.
आणि मग मी ठरवलं की, आता बास! मी जी आतून आहे तेच माझं बाह्य स्वरूप असलं पाहिजे. मी स्त्री आहे असं मला वाटतं तर मी स्त्रीसारखंच दिसलं, जगलं आणि असलं पाहिजे.
2003 मधे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. हार्मोनल बदलांसाठी औषधं सुरू केली. लिंगबदलाची शस्त्रक्रिया ही एक किचकट-लांबचलांब प्रक्रिया असते. अवघडही असते. पण ते सारं मी निभावून नेलं, कारण मला ‘सोमनाथ’ म्हणून जगायचं नव्हतं, मी सोमनाथ कधी नव्हतेच!
शस्त्रक्रिया केली आणि मी ‘मानोबी’ झाले!
- आणि एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राचार्यपदार्पयत माझा हा प्रवास येऊन ठेपला. या बातमीचा एकच गवगवा झाला. चर्चा सुरू झाली. लिंगबदल केलेली एक व्यक्ती एका महाविद्यालयाची प्राचार्य होणार याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं! आता शहरातल्या टीव्ही चॅनल्सच्या एसी कार्यालयात बसलेले अनेक पत्रकार मला प्रश्न विचारताहेत की, तृतीयपंथीयांना समाज स्वीकारतो का? त्यांच्या सामाजिक सामिलीकरणासाठी कुठले प्रयत्न करायला हवेत?
या प्रश्नाचा अर्थ काय ?
या लोकांनी शहरात राहून स्वत:च ठरवून टाकलंय का की, समाज तृतीयपंथींना स्वीकारणारच नाही??
मी म्हणते, समाज आम्हाला चटकन स्वीकारतो, खेडय़ापाडय़ात जी साधीसुधी माणसं आहेत ती आम्हाला पटकन स्वीकारतात. मनं कोंडलेली आहेत ती चर्चाबिर्चा करणा:या माणसांची आणि भ्रम निर्माण करण्यातही हीच माणसं आघाडीवर असतात!
समाजातले प्रश्न अशा चर्चानी सुटत नाहीत.
एखाद्या घरात अपंग, गतिमंद, विशेष मूल जन्माला आलं तरी आपला समाज अजून बिचकतो. घाबरवतो पालकांना. जर त्याच घरात तृतीयपंथी मूल असेल तर त्या पालकांचं काय होत असेल याचा विचार करा. मग हे पालक त्या मुलांना टाकून देतात. आणि तीच मुलं मग सिग्नलवर भीक मागतात. मोठी झाली की गाडय़ा थांबवून टाळ्या वाजवत पैसे मागतात.
भीक मागणा:यांना समाज कसा मान देईल? कसं त्यांचं सामिलीकरण होईल?
त्यामुळे माझं तरी ठाम मत आहे की, जर तृतीयपंथी लोकांना समाजात मान-प्रतिष्ठा-पद आणि पैसा हवा असेल तर उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अनेक प्रश्नांचं एकच उत्तर आहे- उच्च शिक्षण!
जे लोक उच्चशिक्षित आहेत, तेच या समाजात आपलं स्थान निर्माण करू शकतात, पैसा कमावू शकतात.
पद-पैसा-प्रतिष्ठा या तीनही गोष्टी असतील तर मग तुम्हाला कोण नाकारू शकेल?
माझं उदाहरण घ्या, माङया वडिलांना माझं हे रूप एकेकाळी मान्य नव्हतं. आज ते माङयाबरोबर, माङया घरात आनंदाने आणि अभिमानाने राहतात. कारण उघड आहे, प्राध्यापक आणि आता प्राचार्य म्हणून मला मिळणारा सन्मान त्यांना दिसतो आहे.
जे त्यांचं, तेच बाकीच्यांचंही!
आपला समाज हा असाच ढोंगी आहे. माङयासंदर्भात तर अनेकांना वेगळाच प्रश्न होता. मी लिंगबदल करायचं ठरवल्यावर किंवा स्त्रीच्या वेशभूषेत रहायचं ठरवल्यावर अनेकांना हा प्रश्न पडला की, मी हे कशासाठी करतेय?
त्यांचा माझ्या लिंगबदलाला विरोध नव्हता तर मी पुरुष असून मला बाईपणाचे म्हणजे त्यांच्या लेखी दुय्यमपणाचे जगणं जगण्याचे डोहाळे लागले होते. ज्या समाजाला मुलगी होणं कमीपणाचं वाटतं, ज्या समाजाला बाई असणं कमीपणाचं वाटतं त्या समाजात एखाद्या पुरुषानं बाई व्हायचं ठरवणं हाच एक अनाकलनीय गहजबाचा विषय होता!
त्यामुळे मी पुरुष की बाई की तृतीयपंथी हा प्रश्न नंतरचा,
त्याआधीचा प्रश्न - माझं शिक्षण काय, माझी समाजात पत काय?
पत असेल तर पैसा येतो आणि सामिलीकरणाच्या या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचाही ठरतो. उच्चशिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास असेल, पद असेल आणि पैसा असेल तर गोष्टी सोप्या होतील.
अनेक अपमान आणि अवहेलनेनंतर, नरक यातनांच्या दिव्यातून बाहेर पडल्यानंतर आज माङया वाटय़ाला आलेला सन्मान हे त्याचंच एक उदाहरण आहे.
आज मी दत्तक घेतलेला एक मुलगा आहे, त्याच्यासह माङो कॉलेजातले विद्यार्थी मला भरभरून प्रेम आणि आदर देत आहेत, हे त्या बदलाचं रूप आहे.
आणि प्राचार्य म्हणून येत्या आठवडय़ात सूत्र स्वीकारताना अशा बदलांची अनेक स्वप्नं माङया डोळ्यात आहेत.
ही एका नव्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे. इतकंच!
(मानोबी बंगाली भाषेच्या प्राध्यापक असून पश्चिम बंगालमधल्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातल्या माणिकपारा गावातल्या कॉलेजात त्या शिकवत होत्या. नुकतीच त्यांची कृष्णनगर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली असून येत्या आठवड्यात त्या कार्यभार स्वीकारतील)
मुलाखत आणि शब्दांकन : मेघना ढोके