- सद्गुरू पाटील, निवासी संपादक, गोवा अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगाट हिची हत्या तिचा पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर सिंग यांनीच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. जबरदस्तीने ड्रग्ज पाजून सोनालीला संपविण्यात आल्याचे गोवा पोलिसांनी जाहीर केले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. वादग्रस्त कारकीर्द असलेली सोनाली हरयाणात प्रचंड प्रसिद्ध होती. हिसारमधून तिने निवडणूकही लढवली होती. मात्र, तिला त्यात अपयश आले. त्यातून सावरून सोनाली पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होती. परंतु त्याआधीच तिचा घात झाला. सोनालीच्या हत्येमागील कारणे वगैरे यथावकाश बाहेर येतीलच; परंतु या सर्व प्रकरणामुळे गोवा पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहे.
भोगभूमी?गोव्याबाहेरून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे पर्यटक गोव्यात येत असतात. गोवा म्हणजे भोगभूमी याच दृष्टिकोनातून काही पर्यटक या राज्याकडे पाहतात. ‘खाओ, पिओ व मजा करो’ असा विचार करून येणारे पर्यटक येथे कुणाचा खून तरी करतात किंवा स्वत:चे जीवन तरी संपवतात. काही जण कॅसिनोंमध्ये जाऊन सगळा पैसा घालवितात. गोव्यात गेलो म्हणजे अमली पदार्थांचे सेवन करायलाच हवे, प्रचंड दारू प्यायलाच हवी किंवा उधाणलेल्या समुद्राच्या लाटांमध्ये स्वत:ला झोकून द्यायलाच हवे, असा विचार करणारे पर्यटक कमी नाहीत.
यापूर्वीही पर्यटकांनी गोव्यात स्वत:च्या साथीदाराचा खून केल्याची खूप उदाहरणे आहेत. सोनालीचा जीव ज्यांनी घेतला, त्यांचा मेंदूही गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे. प्रसिद्धीमध्ये असलेल्या एका महिलेला ड्रग्ज पाजणे किंवा तिचा खून करणे ही प्रवृत्ती नवी नाही. सोनाली मेल्याचे दु:ख आहेच, शिवाय काळही सोकावतोय याचे अधिक दु:ख वाटते. गोव्याची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना कारण ठरत आहेत, ही वेदना येथे अधोरेखित करावी लागेल. देशभरातील वृत्तवाहिन्यांवर सोनालीची हत्या आणि गोवा हा विषय चघळला जात आहे. राज्याच्या किनारी भागातील एका क्लबमध्ये त्याच साथीदारांसोबत डान्स करतानाचा सोनालीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
कुटुंबीयांचा दबाव महत्त्वाचासोनालीचा भाऊ व कुटुंबीय लढा देऊ लागले आहेत. या प्रकरणी एक सिद्ध झाले की, अशा प्रकारचा गुन्हा घडतो तेव्हा कुटुंबीय व मीडिया यांचा दबाव पोलीस यंत्रणा व सरकारवर असावा लागतो. तरच सत्य बाहेर आणण्यासाठी पोलीस धडपडतात. अन्यथा काही मृत्यू हे कायम संशयास्पद बनून राहत असतात. सोनाली फोगाटला यशोधरा नावाची मुलगी आहे. माझी आई हिरावून घेणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, ही या मुलीची आर्त वेदना कुणाच्याही डोळ्यांत पाणी आणील.
स्कार्लेट प्रकरणाच्या स्मृती जाग्यासोनालीच्या हत्या प्रकरणामुळे स्कार्लेट कीलिंग खून प्रकरणाशी निगडित स्मृतीही जाग्या झाल्या. २००८ साली हणजुणच्याच किनाऱ्यावर स्कार्लेट या १५ वर्षीय ब्रिटिश मुलीवर अत्याचार करून काही जणांनी तिचा जीव घेतला होता. तिलाही ड्रग्ज पाजण्यात आले होते. त्यावेळी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची नाचक्की झाली होती. सोनालीही त्याच हणजुणमध्ये मरण पावली. ती जर विदेशी नागरिक असती तर आज पुन्हा जगात गोव्याची नव्याने अपकीर्ती झाली असती. गोवा म्हणजे ड्रग्ज, असे समीकरण आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक ठळक झाले असते. स्कार्लेटचा मृत्यू झाल्यानंतर तिची आई फिओना हिने दीर्घकाळ लढा दिला. त्या मातेने सर्व प्रतिकूल स्थितीत संघर्ष करत न्यायालयीन लढाई जिंकली. दोघा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.