- डॉ. श्रीपाल सबनीस
देशभक्ताला जात-धर्म असतो का? गांधी आणि सावरकर, एक महात्मा दुसरा महापुरुष ! दोघेही मातृभूमीच्या प्रेमासाठी तुरुगात गेले. ब्रिटिशांच्या विरोधात तहहयात लढले. दोघेही बॅरिस्टर. दोघेही हिंदू. पण गांधी सहिष्णू उदार हिंदू, तर सावरकर जहाल हिंदुत्ववादी ! दोघांनाही अखंड भारत पाहिजे होता, परंतु मुस्लीम लिगचे धर्मांध राजकारण फाळणीपर्यंत पोचवण्याचे पाप बॅ. जिनांनी निष्ठेने केले. काँग्रेसच्या मध्यवर्ती प्रवाहाचे राष्ट्रीय नेतृत्व म. गांधीजी करीत होते. त्यामुळे पाकिस्तान-भारताच्या फाळणीचे खापर सर्वच विरोधकांनी महात्म्याच्या कपाळी मारले.
राष्ट्रहितासाठी देशभक्त समर्पित असतो. हे समर्पण गांधी आणि सावरकर यांनी सिद्ध केलेय. पण संपूर्ण मानवाच्या कल्याणाची भूमिका महात्म्याची असते. ती गांधींच्या जीवनात स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे गांधींना हिंदुजन्म संदर्भ असूनही त्यांचे कार्य मुस्लीमांसह सर्व धर्मांच्या एकात्मतेचे सूत्र सांगते. सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असल्याने आणि अहिंसावादाचे सोवळे त्यांना अमान्य असल्याने गांधीवादी सर्वधर्म समभावासह अहिंसेला त्यांनी विरोध केला. सावरकरांची देशभक्ती ब्रिटिश सरकारच्या अंदमानी तुरुंगातून तावून सुलाखून निघालीय, पण त्यांची भूमिका गांधीतला ‘महात्मा’ पचवू शकत नव्हती. गांधींची देशभक्ती व्यापक विश्वमानवतेच्या गहिवराने मंडीत होती. त्यामुळे मतभेद अटळ होते.
देशभक्त सावरकरांचा गांधीकृत गौरव
महापुरुषांचे मतभेद तात्विक असतात. तुरुंगात खितपत पडलेल्या सावरकरांच्या देशभक्तीचा यथार्थ गौरव गांधींनी लेखन व विनायक सावरकरांच्या पत्रात जरूर केलाय. तरीही काँग्रेस सावरकरांची देशभक्ती आज का नाकारते आहे? गांधींतला महात्मा तरी काँग्रेसी पुढाऱ्यांनी पचवलाय का? आणि भाजपनेसुद्धा ओठात गांधी, पोटात गोडसे, अशी बेईमान भूमिका का पुजली? गांधींनी सावरकरांना १९२० मध्येच ‘देशभक्त’ म्हटलेय. मग आताची काँग्रेस हे सत्य का नाकारते?
गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोईने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरूंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे.
देशभक्ताला जानव्यात कुजवणे पाप
जात-धर्मांधतेच्या विषाची पेरणी करून सावरकरांची देशभक्ती अनेक विद्वानांनी जानव्यात कुजवली. विद्वानांची ही बेईमानी सत्यासह राष्ट्राशीसुद्धा आहे. सावरकरांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेली ‘माफीपत्रे’ त्यावेळच्या रूढ आकृतिबंधाची पूर्वअट होती, पण ती खरोखरच ‘माफीपत्र’ आहेत का? शिवाजीराजे घाबरल्याचे नाटक करून अफजलखानाला ठार करतात. औरंगजेबाला फसवून तुरुंगातून सुटतात. तशीच भूमिका अस्सल देशभक्त सावरकरांची दिसते. त्याशिवाय ‘सागरा प्राण तळमळला’ किंवा ‘तुजविण जनन ते मरण’ आणि ‘जयोस्तुते’ सारख्या प्रखर राष्ट्रीय भक्तिप्रवण गीतांचा अर्थ कसा लावणार?
सत्याशी बेइमानी का?
अंदमानच्या तुरुंगात अनेक राष्ट्रभक्त जन्मठेप सोसत होते. त्यांनी ‘माफीपत्र’ दिले नाही, हे खरेच ! पण त्यांची भूमिका सावरकरांसारखी डावपेचात्मक नसावी! आणि खरोखरच सावरकरांनी थेट ‘माफी’च मागितली तरी तेवढी जागा त्या देशभक्ताची मर्यादा म्हणून समजून घेता येते. उर्वरित सावरकर देशभक्तच नव्हेत का? मग त्यांच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप का? सावरकरांचा हिंदुत्ववाद व हिंदूमहासभा अनेकांच्या मतभेदाचा विषय जरूर होऊ शकतो, पण त्यांची समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी आणि त्याग बदनामीचा विषय का व्हावा? राजकारणी स्वार्थी असू शकतात, पण विद्वानांनीसुद्धा सत्याशी बेईमानी का करावी?
गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त कसे?
आरएसएस आणि भाजपचे खरेखुरे मानदंड कोण आहेत? गोळवलकरांचे संविधान व समाजवादविरोधी जातव्यवस्था समर्थक ‘विचारधन’ पचवून गांधींतला महात्मा कसा पुजता येतो? सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि जातविरोधी ‘हिंदुत्व’ तरी संघ-भाजपला मान्य आहे का? तरीही सर्वच ऐतिहासिक व्यक्तींची खिचडी व्यासपीठावर पुजण्याची नवी नाटकी परंपरा स्पष्ट झालीय. गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त, हे ढोंग आहे.
खरेतर भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष अस्सल महापुरुषाच्या संस्काराशी इमानदार दिसत नाहीत. त्यांच्या आपसी कलगीतुऱ्यासाठी महापुरुषांना ‘वापरण्याची’ दुकानदारी सध्या जोरात आहे. आता जनतेने सत्य शोधावे. विवेक जपावा. लोकशाही वाचवावी. महापुरुषांच्या मर्यादा वगळून सामर्थ्याची बेरीज करावी. कारण त्यांच्यापेक्षा त्यांचे ध्येय महत्त्वाचे ! दिशा महत्त्वाची.