- रवींद्र राऊळ
क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचा कलंक पुसण्यासाठी सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यात यावी, या निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्वोच्च न्यायालयाला केलेल्या धाडसी शिफारशीने क्रिकेटपंढरीच्या भाविकांना चांगलाच धक्का दिला आहे. क्रिकेट बेटिंग, सटोडिये, त्यातून होणारी हजारो कोटींची उलाढाल, त्यावरील अंडरवर्ल्डची पकड, देशविदेशात पसरलेलं बुकींचं जाळं अशा रसभरीत कहाण्या केवळ ऐकणारे आणि वाचणारे क्रिकेटशौकिन या शिफारशीने चांगलेच हडबडले आहेत. पण क्रिकेट सट्टय़ाचं भारतातील नेटवर्क आणि व्यवहार - गैरव्यवहार पाहता समितीने केलेल्या शिफारशीचा भविष्यात गंभीरपणो विचार करावा लागणार आहे.
लॉटरी, अश्वशर्यती वगळता भारतात क्रिकेटसह सर्व प्रकारच्या सट्टय़ावर बंदी आहे. भारतीय कायदा खेळांच्या बाबतीत ‘कौशल्याचा खेळ’ आणि ‘संधीचा खेळ’ अशी वर्गवारी करतो. केवळ नशीब अजमावले जाते अशा खेळांना सार्वजनिक जुगार कायद्याने प्रतिबंध केला जातो.
कायद्याचा बडगा उगारला की गैरप्रकार थांबतात, असा एक ढोबळ समज आहे. पण भारतात सट्टय़ावर बंदी असली तरी सट्टेबाजी मात्र बारमाही जोरात सुरू असते. क्रिकेटच्या सट्टेबाजीचा निश्चित आकडा उपलब्ध नसला, तरी बुकींच्या व्यवहारावरून भारतात एका क्रिकेट मॅचमागे 10 ते 20 हजार कोटींची उलाढाल होत असते, असा पोलिसांचा अंदाज आहे. विकेंद्रित रचना असलेल्या या सट्टाबाजाराने जणूकाही समांतर अर्थव्यवस्थाच उभी केली आहे.
अशा या सट्टय़ावर केवळ कागदोपत्रीच लागू असलेल्या बंदीला अर्थ काय? आणि ती अधिकृत करून त्यातून सरकारला महसूल मिळणार असेल तर हरकत तरी का घ्या, असे सवाल करणारा एक मोठा वर्ग आहे. सर्वसामान्य नागरिक बेटिंग, सट्टेबाजीच्या केवळ बातम्याच ऐकत असताना, हा ‘मोठा’ वर्ग प्रत्यक्षात सट्टा खेळत हजारो कोटींच्या उलाढालींमध्ये सहभागी असतो. क्रिकेट सट्टा हे एक शिस्तबद्ध आणि संघटितपणो चालणारं प्रकरण आहे. जागोजाग पसरलेल्या बुकींचं एक वेगळंच जग असतं. हे बुकी वेगवेगळ्या ‘कॅपॅसिटी’चे असतात. गेल्या मार्च महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद युनिटच्या अधिका:यांनी मुंबईतील कांदिवली (पूर्व) येथील महेंद्र मित्तल या बुकीच्या घराची झडती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बेटिंगमधील 2600 कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत ही कारवाई होती. इंटरनेटवरून बेटिंग घेणारा मित्तल हवालामार्गे रकमेची देवाणघेवाण करीत होता. त्या रॅकेटचे धागेदोरे दुबई आणि पाकिस्तानातही होते. क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान किरण माला, टॉमी पटेल, मुकेश शर्मा, रितेश बन्सल, अंकुश बन्सल अशा अनेकांना अटक झाली. या सगळ्या बुकींच्या आर्थिक व्यवहारांचे हजारो कोटींचे आकडे डोळे विस्फारणारे होते. हे झालं हिमनगाचं केवळ एक टोक. असे हजारो बुकी जगाच्या पाठीवर पसरलेले आहेत.
एका बडय़ा बुकीच्या म्हणण्याप्रमाणो केवळ दहा टक्के खेळाडूच ठामपणो मॅच फिक्सिंगला नकार देतात. बाकी सर्व खेळाडू येनकेनप्रकारे फिक्सिंगमध्ये सहभागी होतात. लष्करी गुपितं फोडण्यासाठी हेर संघटना जसा प्रसंगी ललनांचा वापर करतात तसा याही जगात तो केला जातो.
यूके, मोनॅको आणि अमेरिकेत लास वेगास येथे स्पोर्ट्स बेटिंगला कायदेशीर मान्यता आहे. या बेटिंगमधून तेथील सरकारी तिजोरीत मोठय़ा प्रमाणात महसूल जमा होतो. भारतात या सट्टय़ाला मान्यता मिळाल्यास लॉटरीप्रमाणोच त्याला कायदेशीर व्यवस्थेचं स्वरूप येऊ शकतं, असं म्हटलं जातं. कारण सध्या हा धंदा पूर्णपणो अंडरवर्ल्डच्या ताब्यात आहे. बेटिंगमध्ये कशाला किती भाव द्यायचा, हे दाऊद इब्राहिमची गँग ठरवते. दुबई, पाकिस्तानातून तो ठरवला जातो. त्यामुळेच की काय, पूर्वी दाऊद नेहमी क्रिकेटच्या मैदानावर दिसायचा. बॉलिवूडमधील अनेक सितारे सट्टेबाजीत गुंतलेले असल्याचं सांगण्यात येतं.
पुढेमागे लोढा समितीची ही शिफारस स्वीकारली गेली तरी त्यावेळी अनेक प्रश्न सरकारसमोर उभे ठाकतील. बुकींची नोंदणी, त्यांना आकारण्यात येणारी फी, बेटिंगचा हिशेब, विजेत्यांचा कर, अशी सारी महसुली व्यवस्था उभी करावी लागेल. करवसुलीसाठी यंत्रणा तयार करावी लागेल. सट्टय़ाला कायदेशीर स्वरूप दिल्याने सरतेशेवटी फिक्सिंगसारख्या प्रकारांना प्रतिबंध करण्याचं उत्तरदायित्व सरकारवर येईल. ही सारी आव्हानं लक्षात घेऊन सट्टेबाजी कायद्याच्या चौकटीत बसवावी लागेल; शिवाय सरकारी व्यवस्था म्हटली की भ्रष्ट कारभार, लाचखोरी आलीच. त्या सगळ्य़ातून या ’खेळा’ला विश्वासार्हता द्यावी लागेल. हे सारं लक्षात घेता लोढा समितीची ही शिफारस स्वीकारली जाणार की नाही, यावरही सट्टेबाज बेटिंग घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑनलाईन स्पोर्ट्स
बेटिंगचा रतीब
जगभरात ऑनलाईन स्पोर्ट्स बेटिंगच्या अक्षरश: हजारो वेबसाईट असून त्यावर कोटय़वधी पंटर अहोरात्र आपलं नशीब अजमावत असतात. जगाच्या पाठीवर जितके म्हणून खेळ आहेत ते सर्व या वेबसाईटवर मौजूद आहेत. कॅसिनो, पोकर, हॉर्स रेस हे तर जुगा:यांचे कायमचेच फेव्हरीट प्रकार. याशिवाय फुटबॉल हा जगातील अत्यंत लोकप्रिय खेळही ऑनलाईन बेटींगसाठी हजर आहे. याव्यतिरिक्त बास्केटबॉल, टेनिस, व्हॉलिबॉल, हॅन्डबॉल, मोटरस्पोर्ट, बीच व्हॉलिबॉल, सायकलिंग, विंटर स्पोर्टसचाही यात समावेश आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या हवाल्यानुसार भारतातही ऑनलाईन स्पोर्ट्स बेटींग कमालीचं लोकप्रिय आहे. आपलं भारतातील मार्केट वार्षिक तीन लाख कोटींचं असून येथील 40 टक्के इंटरनेट युजर या बेटींग वेबसाईटना भेटी देत असल्याचा दावा या वेबसाईटकडून करण्यात येतो.
या वेबसाईट परदेशातून चालवल्या जात असल्यानेच बहुतेक भारतीय कानून के लंबे हात त्यांच्यार्पयत पोहोचू शकत नाहीत.
बुकी
एक-दोन कोटीच्या पुढे सौदा करणारे बुकी बडे मानले जातात, तर 50 लाख ते एक कोटीर्पयतचे बुकी मध्यम! 50 लाखांखालील बुकी अगदीच किरकोळ! क्रिकेटच्या हंगामात एकटय़ा मुंबईत पाच हजार बुकींचं जाळं तयार होतं. एरवी यातील काही हॉटेलमालक, तर कुणी दूध डेअरीचा मालक. कुणी पेट्रोलपंप चालवतं, तर कुणी समाजसेवकाचा अंगरखा घातलेला असतो. सुमारे पाचशे बुकी मात्र कायमस्वरूपी याच धंद्यात पाय रोवून असतात.
बेटिंग
कधी बाजी उलटली तर वरच्या बुकीचे पैसे देऊन आपलं अंग काढून घेता येतं अन्यथा प्राणाशी गाठ. केवळ ओळखीच्या पंटरकडूनच बेटिंग घेण्याची खबरदारी हे बुकी बाळगतात. कारण पैशांची हमी असते. कुणा पंटरने पैसे बुडवले तर ते कसे वसूल करायचे याचीही क्लृप्ती त्यांना ठाऊक असते.
फॅन्सी सट्टा
पंटरांकडून कधी पूर्ण सामन्याच्या निकालावर बेटिंग घेतलं जातं. त्याचप्रमाणो अर्धा सामना,
एक षटक, अथवा एका सेशनवर (एक सेशन म्हणजे दहा षटकं), तर कधी प्रत्येक षटकात किती धावा काढल्या जाणार यावर, तर कधी एका-एका बॉलवर बेटिंग घेतलं जातं.
हरलेल्या पंटरची सर्व रक्कम बुकीच्या
खिशात जमा होते. यावरून या धंद्यातील
कमाई लक्षात यावी.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत
मुख्य वार्ताहर आहेत.)
ravindra.rawool@lokmat.com