-वंदना अत्रे
युद्ध पेटतात, आपल्या मागण्यांसाठी एखाद्या शहरात हजारो माणसे रस्त्यांवर उतरून जगणे अस्ताव्यस्त करतात किंवा कोरोनासारख्या महामारी गळ्याला नख लावून उभी राहते अशा जीवघेण्या काळात रंग-शब्द-सूर अगदी निरर्थक होत असतात? गाणे ऐकत राहणे, चित्रात रंग भरत राहणे ही अशा वेळी चैन असते? तसे असेल तर मग भोवती दाटलेल्या काळोखातून पुढे कसे जात राहायचे? टीचभर देठाची ताकद फळाला झाडापासून दूर होऊ देत नाही, असे माणसाने कोणते देठ धरून राहायचे? रंग-शब्द-सूर हेच कदाचित त्याचे उत्तर असेल. नाहीतर, जगणे म्हणजे फक्त टिकून राहणे असे लाखो लोकांना वाटत असताना, त्याच्या पलीकडे जात काही वेगळे करण्याचा प्रयत्न करणारे काही कलाकार नुकतेच भेटले. स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांचा विचार त्यांच्या मनात सतत होता.
दिल्लीत सास्कीया आणि शुभेंद्र या जोडप्याच्या घरात सुरू असलेली बासरीची मैफल असताना भोवतालच्या सगळ्या प्रश्नांचा विसर पडून मन निवांत होत गेले तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. जेमतेम २०-२५ रसिक असतील मैफलीला. एखाद्या घराच्या दिवाणखान्यात सामाजिक अंतर पाळून अशी किती माणसे मावणार? पण त्यावेळी प्रश्न संख्येचा नव्हता. मैफलीत हजेरी लावणाऱ्या त्या कलाकाराच्या मनात त्याच्या कलेबद्दलचा विश्वास, हमी टिकवून ठेवण्याचा होता. जगाला त्याच्या स्वरांची नक्कीच गरज आहे हे त्याला पटवून देण्याचा होता. ही गरज सास्कीया आणि शुभेन्द्र या दोघांना जाणवली ती कोरोनाने जगाभोवती आपला विळखा घट्ट करणे सुरू केल्यावर. सुटकेसाठी जो-तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत असताना या दोघांना वाटले, एकत्र भेटण्याचे सगळे नियम पाळून कलाकारांना आपल्या घरात बोलवूया. लाखात मानधन नाही देता येणार कोणाला; पण अवघडून राहिलेले स्वर तर मोकळे होतील आणि कदाचित टिकून राहण्यासाठी आवश्यक धीर तर मिळेल लोकांना..! मग त्या घरात छोट्या-छोट्या बैठकी होत राहिल्या. रसिक त्याची वाट बघू लागले. पावलापुरता प्रकाश द्यावा असेच या मैफलींचे स्वरूप होते. पण गेल्या वर्षभरात किमान दहा-बारा कलाकारांना तरी या मैफलींनी नक्कीच उमेद दिली, स्वतःवरचा विश्वास दिला आणि मैफलींसाठी आलेल्या रसिकांना निखळ आनंदाचे क्षण. आसपासचा काळोख उजळून टाकणारे असे प्रयत्न सुरू असतात म्हणूनच संगीत आपली मुळे पकडून जिवंत राहते.
सास्कीयाच्या घरातील मैफल ऐकत असताना आठवण आली ती दूरच्या देशातून कानावर आलेल्या मारू बिहाग रागाची. स्क्रीनवर दिसत असलेल्या रोबाब नावाच्या वाद्यावर वाजत असलेला राग मारू बिहाग आहे ना याची मी पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होते. एका घराच्या छोटेखानी दिवाणखान्यात मोबाइलच्या कॅमेऱ्यामधून केलेले रेकॉर्डिंग होते ते. वादक होता रामीन साक्विझाडा नावाचा अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध रोबाबवादक. अफगाणिस्तानमध्ये धार्मिक मूलतत्ववाद फोफावला असताना आपली संस्कृती, स्वातंत्र्य, कला हे सांभाळून ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या मोजक्या कलाकारांमधील रामीन एक. सूफी आणि अफगाणी संगीताच्या वैभवशाली कालखंडातील शास्त्रीय संगीताची झलक जगापुढे जावी यासाठी रामीन आणि त्याचे काही साथीदार यांनी २०२० साली मार्च महिन्यात जर्मनीत दौरा आखला होता. कार्यक्रमाचे नाव होते, ‘सफर’. अफगाणिस्तानच्या संगीताच्या इतिहासात डोकावून बघण्याची, युद्धाने जर्जर झालेल्या देशाच्या वेदनांची झळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल जर्मन माध्यमांनी भरभरून लिहिले आणि रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली. पण निघण्याची वेळ आली आणि कोरोनाचा रट्टा पाठीत बसला. खचून मटकन खाली बसावे असाच हा तडाखा होता! त्यानंतर काहीच दिवसांनी केलेले हे रेकॉर्डिंग आहे. रामीन म्हणतो, कोरोनासारखी महामारीच फक्त संस्कृतीवर हल्ला करीत नसते, आक्रमक राष्ट्रवाद किंवा कट्टर धर्मांधतासुद्धा एखाद्या संस्कृतीला गिळून टाकण्यासाठी आ वासून उभा असते. अफगाणिस्तान गेले कित्येक वर्ष हे सोसतो आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे तालिबानसारखे कडवे आव्हान गळ्यावर बंदुकीची नळी ठेवून उभे असताना, भारत-अफगाणिस्तानमधील संगीतविश्वाच्या परस्पर नात्याचा शोध घेत रोबाबवर राग मारू बिहाग छेडणारा रामीन त्यावेळी त्रिभुवन व्यापून चार अंगुळे वर उभा असलेला दिसला मला. आणि मन कृतज्ञतेने भरून आले...
(लेखिका संगीताच्या आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
vratre@gmail.com