(परिक्रमा)
- सचिन जवळकोटे
सातारा जिल्ह्यातल्या
फौजीवाल्यांच्या गावात
पतीमागे झुंजलेल्या
वीरपत्नींच्या शौर्यगाथा...
‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून
साता:याची परंपरागत ओळख.
त्यातलंच हे एक गाव.
पहिल्या महायुद्धात इंग्रजांकडून लढताना
या गावातले तब्बल 46 फौजी
धारातीर्थी पडले होते.
त्यावेळी गावाची लोकसंख्या होती
नव्वदच्या आसपास!
जवळपास पन्नास टक्के गाव कामी आलं.
मात्र नंतरही या गावाचं
मिलिटरीचं वेड काही सुटलं नाही.
शेवटी आपसूकच या गावाच्या पुढे
‘मिलिटरी’ शब्द जोडला गेला आणि
गाव झालं ‘अपशिंगे मिलिटरी’!
आजही या छोटय़ाशा गावात
तीनशे आजी-माजी सैनिक राहतात.
सातारा.
‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आजही या जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे. इथल्या ‘मिलिटरी स्कूल’नं आजवर हजारो जवान घडवले आहेत, शेकडो फौजी अधिकारी देशाला समर्पित केले आहेत. या सा:यांनीच देशासाठी रक्त सांडताना आपल्या गावाचं आणि देशाचं नाव रोशन केलं आहे.
ही परंपरा आजही खंडित झालेली नाही.
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. काश्मीरच्या खो:यातील कूपवाडय़ात सेवा बजावत असताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरतो ना सावरतो तोच सियाचीनमध्ये बर्फात गाडल्या गेलेल्या दहा जवानांची बातमी थडकली. या दहांपैकी एक माणदेशातला. सुनील सूर्यवंशी हे त्या जवानाचं नाव. महाडिक हे जसे सातारा जिल्ह्यातील ‘पोगरवाडी’चे तसेच सूर्यवंशीही याच जिल्ह्यातील ‘मस्करवाडी’चे सुपुत्र. बंदुकांच्या फैरींची सलामी जशी दोन्ही वाडय़ांनी ऐकली, तशीच धडाडत्या चितेवर धगधगतं आयुष्य संपलेलंही याचि देही याचि डोळा पाहिलं. एकीकडे ‘अमर रहे’च्या घोषणा, तर दुसरीकडे त्यांच्या अकाली मृत्यूचा चटका! सातारा जिल्ह्यातील गावोगावी सैनिकी शिस्तीचा बाणा.
‘घरटी एक तरी मिलिटरीवाला पाहिजेच!’ या ध्येयानं झपाटलेल्या असंख्य गावांच्या वेशीवर हुतात्मा सैनिकांच्या नावानं कमानी उभारल्या गेलेल्या. काही गावांची ओळख तर ‘फौजीवाल्यांचं गाव’ अशीच!
असंच एक आगळं-वेगळं गाव म्हणजे ‘अपशिंगे मिलिटरी’.
सातारा तालुक्यातल्या अंगापूर-बोरगावसारख्या सधन पट्टय़ात शिवकाळात वसलेलं हे गाव. छत्रपती शिवरायांनी तयार केलेल्या मावळ्यांच्या फौजेत या गावातील बहुतांश मंडळी सामील होती असं म्हटलं जातं.
स्वातंत्र्यपूर्व काळातही इंग्रजांच्या सैन्यदलात या गावातील तरुणांची संख्या लक्षणीय. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांकडून लढताना या गावातील तब्बल 46 फौजी धारातीर्थी पडले होते. त्यावेळी गावाची लोकसंख्या होती ईनमीन नव्वद-शंभरच्या आसपास. म्हणजे जवळपास पन्नास टक्के घरांत कुणाचा वंशाचा दिवा विझलेला, तर कुणाचं कपाळ पांढरं झालेलं. कुणाची राखी तुटलेली, तर कुणी लेकरू पोरकं ठरलेलं; मात्र तरीही मिलिटरीत भरती होण्याचं वेड काही या गावानं सोडलं नाही. पुढची पिढीही झपाटल्यागत फौजी बनली. हे पाहूनच जगानं या गावाच्या पुढे ‘मिलिटरी’ शब्द जोडला. आणि गावाची नवी ओळख बनली ‘अपशिंगे मिलिटरी’!
आजही या छोटय़ाशा गावात तब्बल तीनशे आजी-माजी सैनिक राहतात. मिलिटरीतून सेवानिवृत्त झालेल्या ‘एक्स-आर्मी’वाल्यांनी इथे संघटनाही काढलीय. गावच्या मुख्य चौकात संघटनेचं छोटंसं कार्यालयही थाटण्यात आलंय. रोज सकाळी सारी मंडळी इथे जमतात. युद्धातल्या आठवणी काढून जुन्या इतिहासात रमतात. ‘लोकमत’ची टीम गावात येणार म्हटल्यावर तर आज झाडून सारेच आलेले!
संघटनेचे अध्यक्ष शंकरराव देशमुख सांगत होते, ‘मिलिटरीतल्या कोणत्याही बटालियनमध्ये असू देत; पण नोकरीच्या काळात एकदा तरी बर्फाळ प्रदेशात डय़ूटी करावीच लागते. मी सलग तीन वर्षे सिक्कीममध्ये कॅप्टन होतो. यातील किमान तीन महिने तरी बर्फाच्छादित हिमकडय़ांवर जाऊन राहावं लागतं. त्यानंतर खाली बेस कॅम्पवर डय़ूटी!’ फौजेतल्या शिस्तीची कहाणी सांगताना देशमुखांच्या डोळ्यांत एका अस्सल फौजीचा करारी बाणा आणि वयाच्या 82 व्या वर्षीही आवाजातला कणखरपणा स्पष्टपणो जाणवतो.
सैन्यदलात असताना काश्मीरमधील लेहसारख्या बर्फाळ प्रदेशात कर्तव्य बजावलेले संघटनेचे उपाध्यक्ष रामचंद्र निकम म्हणाले, ‘बर्फाळ पर्वताच्या शेवटच्या टोकाला राहणं म्हणजे अक्षरश: नरकयातना. दहा पावलं चाललं तरी प्रचंड धाप लागते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेणं अवघड बनतं. डोकं प्रचंड धरतं. या बर्फात माणूस एक वर्ष राहिला तरी त्याचं आयुष्य किमान दहा वर्षे कमी होतं.’
- निकम यांचं बोलणं ऐकत असताना सा:यांच्याच डोळ्यांसमोर शहीद सुनील सूर्यवंशीचा चेहरा तरळला. बर्फात गाडलं गेल्यानंतरही तब्बल पाच दिवसांनंतर जिवंत आढळलेल्या हनुमंतअप्पांची सहनशीलता अनुभवताना अंगावर शहारे आले.
‘मिलिटरी’वाल्यांच्या या गावानं 1962 ते 1971 र्पयतच्या तीन युद्धांमध्ये आणखी चार हुतात्मे देशाला दिले. 1962 च्या भारत-चीन युद्धात नेपाळजवळच्या सीमेवर जवान इमाम शेख शहीद झालेले. त्यांची पत्नी तैबुनबी आज तब्बल 8क् वर्षाची. पतीला वीरमरण आलं तेव्हा त्या होत्या अवघ्या पंचवीस-सव्वीस वर्षाच्या. पदरात दोन छोटी पोरं.
तैबुनबी आपली कहाणी कथन करू लागल्या. ‘मेरे घरवाले गये, तब मेरे हात में आती थी सिरीफ पंधरा रुपयोंकी पेन्शन!. पोरांना जगवायचं असेल तर कष्ट उपसले पाहिजेत, हे मला तेव्हा नीट समजलं. म्हणून मी दुस:यांच्या शेतात कामाला जाऊ लागले. दिवसभर खुरपण करून घर चालवलं. आज दोन्ही पोरं मोठी झालीयेत. आपापल्या पायावर उभी आहेत. नव्या कायद्यामुळे पेन्शनपण वाढलीय. आज दर महिन्याला पंचवीस हजार रुपये हातात पडतात.’
तब्बल 54 वर्षे एकाकी आयुष्य जगणा:या या विधवापत्नीचे भले-बुरे अनुभव त्यांच्या चेह:यावरच्या सुरकुत्याच सांगून जात होत्या. या वीरपत्नींची अजून एक खासियत. कर्तव्य बजावताना पती शहीद झाल्यानंतरही या सा:याच जणींनी पुढचं सारं आयुष्य एकटीनंच काढलं आहे. अंगावर येणारा एकाकीपणा त्यांनी सहन केला, पण दुसरं लग्न केलं नाही. देशावरच्या निष्ठेपायी प्राणांची आहुती देणा:या शूरवीरांच्या या वीरपत्नीही शेवटच्या श्वासार्पयत पतीच्या नावाशी एकनिष्ठ राहिल्या, राहताहेत.
लष्करातल्या नव्या कायद्यांचा आता बहुतेक सैनिकांना फायदा होऊ लागलाय. पूर्वीच्या काळी वारसदारांच्या हातात फक्त पेन्शन पडायची; पण आता कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या सैनिकाची नोकरी संपेर्पयतच्या कार्यकाळाचा संपूर्ण पगारही वारसदारांना मिळतो. पूर्वी युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या पार्थिवावर मिलिटरी कॅम्पमध्येच अंत्यसंस्कार केले जायचे. नंतर त्यांचे केवळ कपडे घरी गावाकडे पाठवून दिले जायचे. हे कपडे म्हणजेच त्या शूरवीराची शेवटची आठवण ठरायची; परंतु आता दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यानं सियाचीनसारख्या प्रतिकूल प्रदेशातूनही पार्थिव गावात आणणं शक्य होऊ लागलंय. सुनील सूर्यवंशी शहीद झाले 3 फेब्रुवारीला; मात्र त्यांचं पार्थिव मस्करवाडीत पोहोचलं 16 फेब्रुवारीला. तब्बल तेराव्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावावर आली! मात्र, पार्थिवाचं शेवटचं दर्शन तरी कुटुंबीयांना घडलं, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं!
अपशिंगेचे केवळ सुपुत्रच देशासाठी धारातीर्थी पडले असं नव्हे. या गावच्या जावयांनीही सैन्यात वीरमरण पत्करल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अपशिंगेच्या रत्नमाला यांचा विवाह कठापूरच्या मधुकर केंजळेंसोबत झालेला. 1982 मध्ये कानपुरात डोंगराचा कडा कोसळून मधुकर शहीद झाले. त्यावेळी रत्नमालाताई तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. चार वर्षाची एक मुलगी पदरात अन् एक पोटात.. अशा अवस्थेत त्यांना माहेरच्यांनी साथ दिली, भाऊ धावून आले, मानसिक आधार दिला; मात्र जगण्यासाठी लागणारा पैसा त्यांनी दुस:याच्या शिवारात काबाडकष्ट करूनच उभारला. उन्हातान्हात हात राबले, रापले, तेव्हाच त्यांच्या दोन्ही मुली शिकल्या. मोठय़ा झाल्या. लगA झाल्यानंतर आपापल्या सुखी संसारात रममाण झाल्या.
पतीच्या वीरमरणानंतर रत्नमालांसमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे मुलींचं आयुष्य घडवणं. आता ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्या पुन्हा आयुष्यात एकटय़ा पडल्या आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना आपल्या शूर पतीची आठवण अनावर होते, तेव्हा तेव्हा त्या हातात खुरपं घेतात आणि जातात शिवारात. ज्या मातीच्या रक्षणासाठी पती ढिगा:यात गाडला गेला, त्या मातीची सेवा हाच आता या वीरपत्नीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
महाडिकांच्या वीरप}ीचीही लष्करी गणवेशासाठी धडपड!
शहीद कर्नल संतोष महाडिक यांचं पार्थिव जेव्हा पोगरवाडीत आणलं गेलं, तेव्हा दोन्ही लेकरांना जवळ घेऊन त्यांच्या वीरपत्नीनं ताठ मानेनं जाहीर केलं होतं की, ‘माङया दोन्ही मुलांनाही मी लष्करातच भरती करणार!’ खरं तर.. ज्या गणवेशानं देशाचा, गावाचा अभिमान वाढवला, तोच लष्करी गणवेश मुला-मुलीच्याही अंगावर दिसावा, असा निर्धार स्वाती महाडिक यांनी केलेला. त्याचवेळी ‘देश सोडून जाण्याची भाषा’ करणा:या आमीरपत्नीसोबत स्वाती यांची तुलनाही केली गेली. ‘सोशल मीडिया’वर त्याची पोस्टही व्हायरल झाली. स्वाती महाडिक आता तर त्याच्याही पुढे ङोप घेऊ पाहताहेत. केवळ आपल्या मुलांनाच नव्हे, तर स्वत:ही लष्करात भरती होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. लेफ्टनंट कर्नल अथवा तत्सम पदासाठी लागणारी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात त्या सध्या मगA आहेत. मुलीला पुण्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये, तर मुलाला पाचगणीत शिकायला ठेवून लष्करी गणवेश घालण्यासाठी त्या अतिशय उत्सुक आहेत. त्यासाठी शक्य ते सारं काही करण्याची त्यांची तयारी आहे.
..कटू अनुभवांची शिदोरी
देशसेवेचं कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या फौजींच्या वीरपत्नींना लष्कराकडून प्रचंड आदर मिळत असला, तरी समाजाकडून मात्र ‘एकटी विधवा स्त्री’ म्हणून जी वागणूक दिली जाते, ती अकल्पित. संगीता थोरात यांनी हे अनुभवलंय. चार भाऊ अन् एक लाडकी बहीण अशा लाडाकोडात वाढलेल्या संगीता यांचा लष्करी अधिकारी असलेले पती अरविंद यांच्याशी विवाह झाला. परंतु लग्नानंतर अवघ्या तीन वर्षात डेहराडून इथं अरविंद यांना वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी त्यांची मुलगी स्नेहा फक्त पावणोदोन वर्षाची. विशेष म्हणजे, त्यांना आठच दिवसांनंतर ‘कॅप्टन’नंतरचं ‘मेजर’ या पदाचं प्रमोशनही मिळणार होतं. या दुर्दैवी घटनेनंतर संगीता यांनी छोटय़ाशा लेकीसह साता:याची सासुरवाडी गाठली. त्यावेळी सास:यांना पॅरालिसिस झालेला.
माहेरची मंडळी मुंबईला परत घेऊन जाण्यासाठी आलेली असतानाही त्यांनी मनावर दगड ठेवून स्पष्टपणो नकार दिला. त्यानंतर काही लष्करी अधिका:यांनीच प्रयत्न करून ‘सातारा सैनिक स्कूल’मध्ये त्यांना नोकरी लावली. सासरेही आता ठीक झालेत. मुलगी इंजिनिअर बनलीय; मात्र तिलाही बाबांसारखंच ‘आर्मी ऑफिसर’ करण्यासाठी त्यांची धडपड चाललीय. आजर्पयत शेकडो सैनिक घडविणा:या संगीता यांना आलेले काही अनुभव मात्र क्लेशकारक. त्या सांगत होत्या, ‘मी वीरपत्नी आहे, हे फक्त लष्करातील मंडळींकडूनच जाणवायचं. समाजात वावरताना मात्र मी केवळ एकाकी पडलेली स्त्री होते. एकटय़ा बाईला खिंडीत गाठू पाहण्याचे अनुभवही आले. मग मी स्वत:ला बदलून घेतलं. स्वत:भोवती बंदिस्त कुंपण घालून घेतलं. आज मी शाळेत अन् समाजात कडक शिस्तीची म्हणून ओळखली जात असले तरी कधी-कधी या सा:या आठवणी उफाळून येतात; हे अस्वस्थपण आता जन्माचंच सोबती.’
- खरंच आहे ते!