- सिद्धार्थ सोनवणे
गेल्यावर्षी म्हणजे महिनाभरापूर्वी १० डिसेंबर २०१८ ला रात्री ७:३० ला हिवरसिंगा (जि. बीड) येथील बाळासाहेब दुधाळ यांचा फोन आला. येथील ओढ्यात एक मोठा पक्षी जखमी अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या रात्री मी आणि सृष्टी मोटारसायकलवरून पायवाटेच्या रस्त्याने हिवरसिंगेच्या बसस्टॉपवर अर्ध्या तासात पोहोचलो. तेथे बाळासाहेब दुधाळांचे मित्र उत्कर्ष राऊत आम्हाला त्या पक्षाकडे घेऊन जाण्यासाठी वाटच पाहत थांबले होते. आम्ही थांबलेल्या ठिकाणांहून तो ओढा हाकेच्या अंतरावर होता. साधारण १० मिनिटे पायी चालत गेल्यावर आम्ही घटनास्थळी पोहोचलो.
तेथे बाळासाहेब दुधाळ आमची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या समोरच गवताच्या कडेला जखमी अवस्थेतील करकोचा दिसत होता. मी त्याला पकडले. पिसवांना झटकत मी त्याचे निरीक्षण केले, तर त्याचा उजवा पाय गुडघ्याच्या खाली मोडलेला दिसला. तो पाय सुकला होता. तो पूर्ण मोडल्याने पूर्ण हालत होता. त्याचे वजनही खूपच कमी झाले होते. तो अनेक दिवसांपासून उपाशीपोटी दिसत होता. आशा अवस्थेत आम्ही त्याला रात्री नऊ वाजता सर्पराज्ञीत घेऊन आलो. वाटेत मात्र त्याच्या अंगावरील पिसवांनी आम्हाला सळो की पळो करून सोडलं होतं.
सर्पराज्ञीत आणल्यानंतर सृष्टी त्याच्या सर्व अंगावर पिसवांना दूर करणारी पावडर लावू लागली तसा तो चोच मारण्याचा प्रयत्न करायचा. पिसवांमुळे इतर प्राण्यांपासून दूर त्याला स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बाहेर काढले. त्याच्या अंगावरील बऱ्याच पिसवा कमी झाल्या होत्या. त्याचा तुटलेला पाय एकदम सुकला होता. झाडाची तुटलेली फांदी सुकत जाते तसा त्याचा पाय सुकून वाळला होता. त्यामुळे पूर्वीच्या पाय जोडण्याच्या अनुभवावरून आम्ही त्याच्या पायाला हळद कुंकू गरम करून लावले. जखमेवर कापूस गुंडाळून त्याच्या पायाला बांबूच्या काठीचा आधार देत पाय सरळ करून घट्ट बांधून घेतला. त्याच्या तुटलेल्या पायाला काडीचा आधार मिळाल्याने तो आता दोन्ही पायावर उभा राहू लागला होता. त्याला आता खाद्य देणे गरजेचे होते.
करकोचे हे मत्स्यहारी पक्षी. पाणथळीतील मासे, बेडूक, पाणकीटक, गोगलगाय, खेकडे हे त्याचे भक्ष्य. मी त्याला मासे आणण्यासाठी जवळच्या उथळा तलावात गेलो. तेथे मासेमारी करणारे लोक तलावात मासे पकडत होते. त्यांना पन्नास रुपये देऊन त्यांच्याकडून लहान-लहान मासे विकत घेऊन प्रकल्पावर आलो. सृष्टीने हातात एक मासा घेऊन त्याच्या तोंडासमोर धरला. तसा त्याने तो एकदम गटम करून टाकला. त्यांनतर दररोज सकाळी मी किंवा सृष्टी तलावात मासे आणण्यासाठी जायचो. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या लोकांनी यासंदर्भात मला विचारले. जखमी पक्ष्यासाठी हे घेऊन जातो, असे समजताच तेही मासे मोफत देऊ लागले.
दररोजच्या खाण्या-पिण्यामुळे कारकोच्याची तब्येत चांगलीच सुधारली होती. आठ-दहा दिवसांत त्याच्या मोडलेल्या पायात जीव आला होता. तो त्याच्या पायावर उभा राहू लागला होता. पायांच्या पंज्यात चांगला रक्तस्राव सुरू झाल्याने पंज्याची हालचाल चांगली सुरू झाली होती. जखम बरी होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. पंधरा दिवसांनी त्याच्या पायाला बांधलेली पट्टी सोडून काढली. जखम बरी झाली होती. जखमेच्या जागेत गाठ तयार झाली तरीही तो चांगला चालू फिरू लागला होता. २२ दिवसांच्या उपचारांनंतर नववर्षाच्या सुरुवातीला त्यानं पुन्हा आकाशात झेप घेतली.
(लेखक सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड येथे संचालक आहेत )