लग्न मस्त झालं; पण ‘माल खराब’ निघाला...’लग्नसमारंभासाठी दोन दिवसांच्या सुटीवर गेलेल्या विवेक तमाईचीकरला त्याच्या शिकवणीच्या बार्इंनी विचारलेल्या प्रश्नाला त्यानं हे उत्तर दिलं होतं. शाळकरी विवेकच्या या उत्तरातून बार्इंना काहीच समजलं नाही. त्यांनी त्याच्या आईला बोलावणं पाठवून ‘माल खराब निघणं’ म्हणजे काय ते विचारलं. आईने कशीबशी वेळ मारून बार्इंचं समाधान केलं. पण विवेकच्या डोक्यातला प्रश्न अनुत्तरितच राहिला होता. नातेवाइकांच्या लग्नासाठी एवढे नवे कपडे घेतले, जेवणात मस्त चमचमीत पदार्थ होते, मग अचानक संध्याकाळी सगळे भांडायला का लागले?... लग्नाच्या मांडवातली ही भांडाभांडी आणि माल खराब निघणं या दोन घटना कंजारभाट समाजातल्या विवेकने शाळकरी वयात अनुभवल्या, पुढे मोठा झाल्यावर मित्रांच्या गप्पांमधून त्याला या माल खराब निघण्यामागची ‘माहिती’ समजली.कंजारभाट समाजात विवाहाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी घेतली जाते. पहिल्या रात्रीच्या शरीरसंबंधात रक्तस्राव झाला नाही तर मुलीचं कौमार्य लग्नाआधीच नष्ट झालं होतं, असं स्पष्ट समजून जात पंचायत त्या नववधूला ‘खराब माल’ घोषित करते. स्त्रीचा सर्वोच्च अपमान आणि तोही ढळढळीत चारचौघांसमोर करण्याची ‘जिती (गुण)’ नावाची परंपरा आजही कंजारभाट समाजामध्ये आहे. वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठविला गेला असला तरी ती परंपरा जात पंचायतींचं दडपण आणि रूढीवादी लोकांमुळे कायम राहिली आहे.हा विवेक तमाईचीकर. पुढे टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसमध्ये शिक्षण घेताना त्याच्या मूळच्या बंडखोर स्वभावाला अभ्यासाचं आणि नव्या माहितीचं पाठबळ मिळालं. त्या बळावर आता विवेकनेच जितीच्या प्रथेविरोधात ठिणगी टाकायचं ठरवलं आहे.गेल्या वर्षाअखेरीस तो या प्रथेविरोधात ठामपणे उभा राहिला. कंजारभाट समाजातीलच एका मुलीशी त्याने प्रेमविवाह करायचं ठरवलं. विवाह निश्चित झाल्यावर त्याने आम्ही ही कौमार्य चाचणी करणार नाही असं जाहीर केलं. पाठोपाठ ही प्रथा थांबावी म्हणून त्याने जमातीमधल्याच काही समविचारी मुलांचा व्हॉट्सअॅपवर गट स्थापन केला. ‘स्टॉप व्ही टेस्ट’ (व्ही म्हणजे व्हर्जिनिटी/कौमार्य) नावाने उभी राहिलेली ही व्हॉट्सअॅप, फेसबुक चळवळ जातीत आणि पंचायतीत समजायला फार वेळ लागला नाही.कौमार्य चाचणीविरोधात उभ्या राहिलेल्या विवेकच्या विरोधात आता जात पंचायतीने दंड थोपटले आहेत. अंबरनाथच्या वांद्रेपाडा वस्तीमध्ये झालेल्या बैठकीत विवेकवर कारवाईचा निर्णय झाला. विवेक सांगतो, ‘हे सगळं आम्हाला घाबरवण्यासाठी चाललंय. माझ्या होणाºया बायकोची याला संमती आणि पाठबळ आहे म्हणूनच मी हे पाऊल उचललंय. समाजातल्या काही सुशिक्षित लोकांनीही माझी ‘समजूत’ काढायचा प्रयत्न केला. पाच मिनिटांची तर चाचणी, त्याचं एवढं का वाढवताय? असं हे लोक सांगतात.’विवेक या ‘शिकलेल्यां’ची चांगलीच हजेरी घेतो. आमच्या समाजात गेल्या दोन पिढ्यांमध्ये शिक्षणाची दारं उघडली आहेत. त्यामुळे आम्ही शिकलो, नोकºयाही मिळाल्या; पण समाजात ‘सुधारणा’ नाही. इतकी वर्षं आमच्या जातीचे नियम तोंडी लक्षात ठेवले जात होते, आता ते लिहून काढले गेलेत हाच काय तो शिक्षणामुळे झालेला बदल,’ असं सांगून विवेकने कंजारभाट समाजाने २००० साली छापलेल्या घटनेची प्रतच मोबाइलवर दाखवली. ‘अखिल भारतीय संहसमल कंजारभाट समाज संघा'ने छापलेली ही ‘संहसमल जात पंचायत कायदा कानून’ नावाची ‘घटना’! समाजासाठी विवाह, घटस्फोट, भांडणं या सगळ्यांचे नियम त्यात दिले आहेत. त्यातच महाराष्ट्र-कर्नाटक प्रदेश शाखा अशा नावाने दिलेल्या दुसºया भागात कलम ३८ मध्ये या ‘जिती’चे १ ते ४ असे उपनियम दिले होते.विवेक तमाईचीकर आणि त्याचा भाऊ अक्षय यांच्याशी बोलताना त्यांच्याच समाजाची वैशाली गागडे नावाची मुलगी येऊन बसली. जात पंचायतीच्या नावाखाली होणाºया दडपशाहीचा तडाखा तिलाही बसला होता. साधारणत: दहा वर्षांपूर्वी तिचा एका श्रीमंत मुलाशी विवाह झाला. पण विवाह झाल्यापासून मारहाण, त्रास सहन करणाºया वैशालीला दोन वर्षांतच एकतर्फी घटस्फोटाला सामोरं जावं लागलं. न्यूमोनिया झाल्याचं निमित्त काढून सरळ घटस्फोट देण्याचा निर्णय तिच्या नवºयाने घेतला. बरं हा घटस्फोट नेहमीच्या न्यायालयात न होता जात पंचायतीसमोरच झाला. वैशाली म्हणाली, ‘माझी बाजू मांडणारा माणूस आणि ‘न्यायदान’ करणारे पंच सगळे दारूच्या नशेतच होते. अशा स्थितीत मला कसा न्याय मिळणार होता? मला सोडलं आणि दोन-तीन महिन्यांत त्यानं दुसरं लग्नही केलं.’ आमच्याकडे जितकी वर्षे मुलगी मुलाकडे राहते तितक्या काळासाठी तिला पैसे दिले जातात. त्याला ‘जिंदगी’ असं म्हटलं जातं. त्याचा थेट अर्थ ‘मी इतके दिवस तुझ्याबरोबर झोपलो त्याचे हे पैसे’ असा होतो,’ असं वैशाली सांगत होती.कौमार्य चाचणीबद्दलही वैशालीने अधिक तपशील सांगितला. मुलीला लहानपणापासून त्या एका दिवसासाठी प्रचंड ताणाखाली ठेवलं जातं. हे काचेचं भांडं तडा न जाता मुलाच्या हाती जावं यासाठी सगळे आई-वडील जिवाचं रान करतात. विवाहाच्या दिवशी तर ती मुलगी प्रचंड ताणाखाली असते. तिला सगळे रात्री ‘कसं वागायचं’ हे शिकवत असतात. संध्याकाळी विवाह झाल्यावर नवरा-बायकोच्या एकत्र सहवासाची व्यवस्था होते. कोणतीही धारदार, टोकदार वस्तू जवळ नाही याची खात्री केली जाते. मुलीच्या बांगड्याही मोजून रुमालानं बांधल्या जातात आणि मगच त्यांना खोलीत पाठवतात. अर्ध्या तासात मुलीला रक्तस्राव झाला नाही तर बाहेरून त्यांचे नातेवाईक सतत दार वाजवून झालं का, काय झालं असं विचारू लागतात. तिकडे आई-वडिलांचे प्राण अडकल्यासारखे झालेले असतात. ‘आपला माल’ खराब निघाला तर सगळी अब्रू धुळीस मिळेल अशा भीतीखाली ते असतात. जणू सगळ्या घराची, जातीची अब्रू स्रीच्या एका अवयवात अडकल्यासारखे सगळे दडपणाखाली असतात. या रात्री जर नवरा अपेक्षित ‘कामगिरी’ करू शकला नाही तर त्याला आणखी दोनवेळा संधी दिली जाते. तिन्ही वेळेस काही न जमल्यास त्याला थेट ‘लंगडा घोडा’ (नपुंसक) ठरवलं जातं. विवाहाच्या पहिल्या रात्रीनंतर मुलाला ‘कसा होता माल? तू काच तोडलीस की आधीच फुटलेली होती?’ - असे प्रश्न उघडपणे विचारले जातात. नवविवाहित जोडप्याच्या खासगी क्षणांबद्दल अशी उघड चर्चा करण्यात कोणालाही संकोच किंवा विचित्र वाटत नाही.हे सगळं निदान आतातरी थांबावं म्हणून याच समाजातले तरुण-तरुणी जिवाची बाजी लावून लढाईला उतरले आहेत. पण त्यांचा मार्ग सोपा नाही. वैशाली सांगत होती, ‘अंबरनाथमध्ये झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत आम्हाला बोलूच दिलं नाही. ‘आम्ही सांगू ते तुम्ही गुमान ऐकायचं’ असा सगळा मामला होता. इतकंच नाही तर स्रियाच ही परंपरा कशी योग्य आहे आणि या नव्या पोरांचं कसं सगळं चुकीचं आहे असं मत तावातावाने मांडत होत्या.’या मुलांच्या कामामध्ये रोज नवे अडथळे आणले जात आहेत. मानहानीचे खटले टाकण्याचे निर्णय घेतले जात आहेत. त्या प्रथेला विरोध करणाºया मुलांना पिंपरीमध्ये जोरदार मारहाण झाली, तेव्हाच लक्षात आलं विवेक आणि त्याच्या सगळ्या सहकाºयांचा लढा सोपा नाही!
घरातच लढाई!विवेक तमाईचीकर, त्याची चुलत बहीण प्रियांका आणि वैशालीसारख्या तरुण मुलांनी आपल्या जमातीतल्या कुप्रथा नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. या कुणालाही सामाजिक आंदोलनांची पार्श्वभूमी नाही. पण त्यांनी सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, बातम्यांची मदत घेऊन समविचारी तरुणांना जोडायचं ठरवलं आहे. विवेकने ‘स्टॉप द व्ही टेस्ट’ नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन केल्यावर सुरुवातीलाच त्यामध्ये ४० मुलं सहभागी झाली. आपल्या जातीमधील कुप्रथा रोखण्यासाठी काय केलं पाहिजे यावर या गटामध्ये आदानप्रदान होतं. विवेकबरोबर या चळवळीमध्ये असणारी सगळी मुलं-मुली २२-२३ वर्षांची आहेत. विवेक-अक्षय-प्रियंका आणि प्रशांत तमाईचीकर, सिद्धांत इंद्रेकर, सौरभ मठले, वैशाली गागडे आणि त्यांचे सहकारी या लढाईच्या अग्रभागी आहेत.५ फेब्रुवारीला ही चळवळ करणाºया मुलांविरोधात बैठक घेतली जाणार आहे. तोपर्यंत या मुलांनी विरोध बंद केला नाही तर राज्यात जेथे जेथे त्यांच्या जातीची वस्ती आहे तेथे विवेक आणि मुलांवर मानहानीचे गुन्हे नोंद होणार आहेत. पण विवेक डगमगलेला नाही. तो म्हणतो, ‘आमचा लढा कोणत्याही जातीविरोधात नाही, तर तो एका कुप्रथेविरोधात आहे यावर आमची निष्ठा आहे आणि ही निष्ठाच आम्हाला ऊर्जा देते आहे.’
कौमार्याची 'खोटी' चाचणीस्त्रीच्या योनीमार्गाच्या तोंडाशी असणारा अगदी पातळ पडदा म्हणजे योनीपटल किंवा हायमेन. हा पडदा अभेद्य नसतो की एकसंधही नसतो. या पटलाचे काही वैद्यकीय महत्त्व नाही किंवा उपयोगही नाही. शरीरसंबंधांमुळे या पटलावरील छिद्रे मोठी होतात किंवा पटल पूर्ण फाटूही शकते. धावल्याने, सायकल चालवण्याने, पोहल्याने, मैदानी खेळामुळे हे पटल फाटू शकते. त्यामुळे ‘या’ कौमार्य चाचणीला वैद्यकीयदृष्ट्या शून्य अर्थ आहे. मुलीचे कौमार्य ही गोष्ट पुरुषप्रधान संस्कृतीचा अत्यंत हीन पाया आहे. लग्न हे प्रेम आणि विश्वास या दोन पायांवर उभे राहते, कौमार्य चाचणी हे त्या नात्याला लागणारे नखच आहे!- प्रा. डॉ. कामाक्षी भाटे, सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय, केईएम रुग्णालय, मुंबई
(लेखक ‘ऑनलाइन लोकमत’मध्ये उपसंपादक आहेत)