- शर्मिष्ठा भोसले
कवी आणि तत्त्वज्ञ बट्रोल्ड ब्रेख्तचं सांगणं होतं,
In the dark times, will there also be a singing?
yes, there will also be a singing, about the dark times.
कोरोनाकाळाच्या अंधारवेळांमध्येही गाणी रचणारे, गाणी गाणारे लोक आहेत. त्यांच्यामुळेच हा अंधार घाबरवत असला, तरी त्याला पराभूत करून आपण पुन्हा उजेड मिळवणार आहोत, ही उमेद जागी राहते आहे.
इटलीतल्या सिमोना कॅमोसी या अशाच उजेडाची उमेद जागवणाऱ्यांपैकी एक. सिमोना नर्स आहे. दिवसरात्र श्वासांसाठी संघर्ष करणाऱ्यांना मरणाच्या दाढेतून ओढून आणण्याचं काम ती करते. मात्र, सोबतच अजूनही एक गोष्ट तिनं केली. मागच्या एप्रिलमध्ये इटलीत कोरोना ऐन भरात होता. पहिल्या लाटेच्या तडाख्यानं सगळा देश मोडून पडलेला. अशावेळी सिमोननं एक गाणं लिहिलं. आपल्या पेशंट्सना 'फील गुड' वाटावं, वाटत राहावं यासाठीचं ते गाणं होतं.
२०२० असंच गेलं आणि त्यानंतरही पुन्हा जवळपास संबंध इटलीत पुन्हा 'शट डाऊन' करावा लागला. अशा काळात सिमोननं लिहिलेलं 'लाइट अप द रेनबो' हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. सध्या विद्यार्थिदशेतील नर्सेससाठी फंड्स उभे करण्याच्या कामी हे गाणं वापरलं जातं आहे. याबाबत बीबीसीसोबत बोलताना सिमोन म्हणते, 'आपण अक्षरश: कोसळून पडणार, असं वाटाण्याच्या या काळात पुन्हा उभं राहण्याची आशा मला तेवत ठेवायची होती. काहीतरी ताकद देणारं लिहायचं होतं. त्यातून मी या गाण्याचे ऊर्जा देणारे बोल लिहिले.'
मागच्या मार्चमध्ये इटलीतल्या बोलोग्ना शहराला कोविडचा तडाखा बसला तेव्हा सिमोनची बदली नुकतीच एका स्थानिक आरोग्य केंद्रातून विशेष सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये झाली होती. पाहता पाहता तिच्या हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरचं रूप आलं. तिची ड्युटी पेशंट्सची चाचणी करून त्यांना विलग करण्याच्या ठिकाणी लागली. सिमोन सांगते, 'माझे सहकारी डॉक्टर, नर्सेस यांना अगदी सैरावैरा धावताना, बेड्स इकडून तिकडे हलवताना पाहणं खूपच अंगावर येणारं होतं. आमचे ऑपरेशन थिएटर्स कोविड वॉर्ड्स बनले होते आणि एरवीचे वॉर्ड्स अतिदक्षता कक्षात रूपांतरित झालेले होते. माझ्या नव्या पिढीतल्या सहकाऱ्यांनी मला कोरोना प्रतिबंधक सूट आणि साहित्य अंगावर कसं चढवायचं ते शिकवलं. एकच फेस शिल्ड रोज निर्जंतुक करून कसं वापरावं हे तर खूप महत्त्वाचं ठरलं. कारण आमच्याकडे तेव्हा सगळ्याच साहित्याची चणचण होती.'
शारीरिक, मानसिकदृष्ट्या दमवणाऱ्या ड्युटीदरम्यानही जेव्हा जेव्हा एखादा प्रकाशमान विचार सिमोनच्या मनात चमकून जायचा, ती तो ऑफिसच्या संगणकात लिहून ठेवायची. दोन महिन्यांत तिनं एक पूर्ण गाणं लिहून काढलं!
सिमोनानं इंद्रधनुष्याची प्रतिमा निवडली कारण तिच्या मते, इंद्रधनुष्य कधी उगवतं? तर मुसळधार पाऊस, भयानक वादळ ओसरल्यावर. आपण निर्धास्त होत घराचे दरवाजे-खिडक्या पुन्हा एकदा उघडतो तेव्हा हे सप्तरंगी स्वप्न पुन्हा आपलं स्वागत करतं या जगात. हे गाणं आता स्वरात गुंफून त्याचा वापर कोरोना संघर्षाचा निधी जमवण्यासाठी करायचा, असं सिमोननं ठरवलं.
ऐंशी वर्षे वयाचे प्रसिद्ध गायक अँड्रिया मिनगार्डी यांनी आपला आवाज दिला. 'कोरो इन द कॉर्सिया' अर्थात 'वॉर्डमधला कोरस' गीतरूपात येण्यासाठी खूप अडथळ्यांची शर्यतही पार करावी लागली. दिवसरात्र ड्युटी करताना तालमीसाठी वेळ काढणं आव्हान होतं. मग केवळ तीन वेळा तालमी करता आल्या. 'कडाक्याच्या थंडीत घराच्या खिडक्या उघड्या ठेवत, डिस्टन्सिंग पाळत, मास्क लावून आम्ही तालमी पार पाडल्या,' सिमोन सांगते.
यंदाच्या फेब्रुवारीत 'लाइट अप द रेनबो' गाणं लोकांसमोर आलं. सध्या बोलोग्ना पुन्हा एकदा रेड झोनमध्ये गेलाय. हॉस्पिटल्सची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक सतत वाढते आहे. लोक उपचारांसाठी मोठमोठ्या रांगा लावून ताटकळत बसलेत.
'आता पुन्हा एकदा परिस्थिती आमची परीक्षा पाहते आहे; पण नाही, आम्ही वाकणार नाही. लढणार! आणि हा आशावाद केवळ याचसाठी कारण अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटाला मला उजेड दिसतो आहे, इंद्रधनुष्य दिसतं आहे...' ड्युटी करताना सिमोन सांगते.