- लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाकाळात अनेकांना आपल्यापासून दूर केलं. काेरोनाचा संसर्ग टळावा म्हणून ज्येष्ठ नागरिकांना तर सक्तीनं अलग ठेवण्यात आलं. इटलीत कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं होतं. आपल्या नातेवाइकांच्या भेटीला आणि स्पर्शसुखाला पारखे झालेले हे नागरिक आयुष्याचे शेवटचे दिवस मोजत असताना डोळ्यांत तेल ओतून आपल्या आप्तेष्टांचीही वाट पाहात होते. त्यांची ही आस पूर्ण व्हावी म्हणून शेवटी एक खास उपाय योजण्यात आला. ‘हग रूम’.
काेरोना संसर्गाची सर्व प्रकारची काळजी घेऊन जीवलगांना थोडा वेळ भेटण्यासाठी आणि मायेनं त्यांना स्पर्श करण्यासाठीची विशिष्ट जागा. बऱ्याच दिवसांनी आपल्या लेकीला भेटताना भावव्याकुळ झालेल्या या आजी ॲना. रोममधील व्हिला सॅक्रा फॅमिग्लिआ नर्सिंग होममधील मायलेकींची ही हृद्य भेट. या भेटीनं ॲना आजीला जगण्याचं नवं बळ मिळालं...