- वंदना अत्रे
मालकंस आणि गांधी मल्हार. काळाच्या वेगळ्या तुकड्यांवर निर्माण झालेले दोन राग. त्यांच्या निर्मितीच्या दोन वेगळ्या कहाण्या. एक मिथकामधून रूढ होत गेलेली. दुसरी प्रत्यक्ष राग निर्माण करणाऱ्या कलाकाराने सांगितलेली. दोहोंचे नायक वेगळे; पण निर्मितीची प्रेरणा मात्र जवळ-जवळ एक. व्यक्त होणारा अंतःस्वर, भाव हातात हात घालून जाणारा. त्या कहाण्या ऐकताना मनात असलेली भारतीय संगीताची प्रतिमा अधिक विराट होत गेली.
“दरबारी कानडा शिकायचाय? Make yourself able for that…” हा राग शिकण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या पंडित निखिल बॅनर्जी यांना गुरू अन्नपूर्णा देवी यांनी एकदा फटकारले होते म्हणे. एखादा राग म्हणण्यासाठी स्वतःला able, पात्र करायची काय असते ही तयारी? गळ्याची, मनाची की विचारांची? नेमका कसा असतो आणि दिसतो या प्रगल्भतेचा रंग? मालकंस आणि गांधी मल्हार रागांच्या निर्मितीच्या कथा वाचताना हा प्रश्न नव्याने पडला. एखाद्या रागात असलेले तपस्वी एकाकीपण दाखविण्यासाठी, त्यातील नायकाची निर्भय साधना श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय असते कलाकाराची तपश्चर्या?
मिथक सांगते, मालकंस रागाची निर्मिती झाली ती राजघराण्यातील सतीने कफल्लक शिवाला वरले म्हणून, एका राज्याचा राजा असलेल्या तिच्या वडिलांकडून झालेल्या त्याच्या उपेक्षेमुळे. आपल्या पतीचा हा अपमान सहन न झाल्याने संतापलेल्या सतीचा देह अक्षरशः फुटला. विखरून पडला. फुटणाऱ्या सतीच्या वेदना बघून क्रोधीत शिवाने सुरू केले संहारक तांडव. अवघे भूमंडल अस्थिर, डळमळीत आणि भयचकित करणारे. हे संहारक रूप बघून अस्वस्थ झालेले सगळे देव विष्णूला शरण गेले. विष्णूने या सतीला पृथ्वीवर पुनर्जन्म दिला तो पार्वती नावाने.
शिवाच्या नावाचा जप करीत त्याच्या शोधार्थ डोंगर- दऱ्यामधून भटकणारी पार्वती गात होती तो राग मालकौशिक. तिला शोध होता गळ्यात माळेप्रमाणे सर्पाला धारण करणाऱ्या आणि तिला प्रिय असणाऱ्या शिवाचा. मालकौशिक रागाचे ते सूर पार्वतीने तुडवलेल्या रानामधील हिरव्या पानांमध्ये, त्या रानांमधील झाडांवर बसणाऱ्या पाखरांच्या गळ्यात आणि उंच-सखल वळणे घेत वाहणाऱ्या झऱ्यामधील पाण्यात रेंगाळत राहिले. त्यातून म्हणे निर्माण होत गेला मालकंस. आयुष्यात जे अतिशय उत्कटपणे हवे आणि जे मिळविल्याशिवाय आयुष्य निरर्थक अशा श्रेयसाच्या शोधात एका कणखर तपस्वी स्त्रीने केलेली ही साधना. त्यासाठी सर्वस्वाचे समर्पण करण्याचा एक समंजस डौल आहे. या रागाची मागणीच सगळ्या जगाकडे पाठ फिरवून उभ्या तपस्वी एकाकीपणाची. पुढे कितीतरी वर्षांनंतर, साधनेचा हाच डौल कुमार गंधर्व यांना दिसला महात्मा गांधी यांच्या सत्याच्या निर्भय साधनेत. हिंसेने भरलेल्या जगात अहिंसेचा आग्रह घेऊन ठामपणे उभ्या या माणसात कुमारांना दिसले तेच तपस्वी एकाकीपण.
८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईत गोवालिया टँक इथे सुरू असलेल्या सभेत गांधीजींनी ‘छोडो भारत’चा खणखणीत नारा दिला तेव्हा शिवपुत्र कोमकली तिथे इतर विद्यार्थ्यांसोबत भजन गाण्यासाठी गेले होते. भजन सुरू असताना वेगवेगळ्या लयीत ताल धरणाऱ्या जमावाला थांबवून गांधीजी म्हणाले, “जोवर पूर्ण देश एका लयीत ताल धरू शकत नाही, तोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही”
कोणत्याही परिणामांना न जुमानता, आपल्या दृढ स्वरात इंग्रजांना ‘छोडो भारत’चा इशारा देणारी गांधीजींची ती अजानबाहू मूर्ती तरुण कुमारांच्या मनात खोलवर ठसत गेली. श्रेयसाच्या ध्यासात सर्व समाजाला असे सहज गुंफून घेणारे ते आवाहन या तरुण कलाकाराला चकित करणारे होते. त्यानंतर आठच वर्षांत गांधीजींच्या वधाची बातमी आली तेव्हा त्यांच्या मनात आले, स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशाला एका लयीत बांधण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यासाठी अहिंसेसारख्या जगावेगळ्या साधनाचा आग्रह धरणारी त्यांची ही निर्भय साधना हे गाण्यातून कसे मांडता येईल? वसंतातील तांबूस-पोपटी पालवी आणि ग्रीष्मातील उन्हाचा तडाखा हा एखाद्या रागाचा विषय होऊ शकतो तशीच ही साधना विलक्षण. ते लिहू लागले,
तुम हो धीर होरे संजीवन भारतके विराट होरे
आह्तके आरतके साखरे पावन आलोक अनोखे हो रे....हे तप जेव्हा त्यांच्या गाण्यातून कानावर येते, तेव्हा सगळा भवताल थरारतो...
(लेखिक संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)