- डॉ. एम.आर. रमेश कुमार
उर्वरित जगाची कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे तगमग होत असताना मॉन्सूनचे वारे भारतीय उपखंडासाठी पावसाचे आश्वासक वरदान घेऊन येतात. मे ते ऑक्टोबर या काळात उपखंडातल्या उत्तर भागात आणि आसपासच्या प्रदेशात तापमान भलतेच वाढलेले असते. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो, त्याचवेळी किनारपट्टीनजीक समुद्रसपाटीवरील शीतलतेमुळे उच्च दाबाचा पट्टा तयार होतो. वारे नेहमीच उच्च दाबापासून कमी दाबाच्या दिशेने धाव घेत असतात. ते आपल्यासोबत भारतीय महासागराच्या दक्षिण क्षेत्रातली आद्र्रताही वाहून नेतात. विषुववृत्त पार करताच ते पश्चिमगामी होत भारतीय उपखंडाची वाट धरतात. अर्थातच सोबत मुबलक पाऊस असतो.मूलत: मॉन्सून याचा अर्थ दरवर्षी होणारा वार्यांचा दिशाबदल, मात्र सामान्य माणूस या घटनेकडे आपल्या गरजांच्या पूर्ततेच्या कोनातून पाहात असतो, पिण्यासाठी, शेतीकामासाठी आणि वीज निर्माणासाठी त्याला पाण्याची आवश्यकता भासत असते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भारतातला 75 टक्के पाऊस आणणारे मॉन्सूनचे वारे या देशाच्या अर्थव्यवस्थेचे वर्तमान निश्चित करत असतात. एखादे वर्ष कमी पावसाचे किंवा अवर्षणाचे निघाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत हाहाकार माजू शकतो.प्रत्येक मॉन्सूनची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात; पण साधारणत: केरळच्या किनार्यावरले त्याचे आगमन, 122 दिवसांच्या मोसमातला चढउतार आणि उपखंडातल्या 36 पूर्वनिर्दिष्ट उपविभागातले एकंदर पर्जन्यमान यावरून दरेक मोसमाचे महत्त्व अधोरेखित होत असते. पाऊस आणि महासागरपॅसिफिक समुद्राच्या विषुववृत्ताकडील क्षेत्रात निर्माण झालेली उष्णता ‘एल निनो’च्या निर्मितीला हातभार लावत असते. याउलट ‘ला निना’ची निर्मिती शीतलतेतून होत असते. एल निनोच्या प्रभावक्षेत्रात आता सारे जगच येऊ लागले आहे. त्यात आता भर पडलीय ती ‘एल निनो मोडकोई’ या आणखीन एका अनोख्या घटनेची. पॅसिफिकच्या उष्ण कटिबंधातील भागात उद्भवणार्या एल निनो मोडकोईची वैशिष्ट्ये एन निनोपेक्षा बरीच वेगळी असतात. पॅसिफिकच्या मध्यवर्ती क्षेत्रात उष्णता तर किनार्याच्या भागात शीतलता असे परस्परविरोधी तापमान येथे निर्माण होत असते. भारतीय महासागरात समुद्रसपाटीच्या तापमानात प्रचंड बदल होऊ लागतात, ज्याला इंडियन ओशन डायपोल (आयओडी) असे संबोधले जाते. महासागराच्या पश्चिम क्षेत्रात सरासरीपेक्षा कितीतरी प्रमाणात तापमान वाढते व बाष्पीभवनाची प्रक्रियाही गतिमान होते, तर पूर्वेकडील क्षेत्रात तापमान बरेच खाली येते. परिणामत: इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या समुद्रसान्निध्य असलेल्या भागात दुष्काळ पडतो. कधीकधी याच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण होते. पूर्वेकडे तापमान वाढून बाष्पीभवनाची प्रक्रिया वेग घेते तर पश्चिमेकडे शीतल तापमानाचा अनुभव येतो. या दोन्ही प्रक्रिया कधी घडून येतील, याचे अनुमान काढता येत नसते. या प्रक्रियाच शेवटी भारतीय उपखंडात किती पाऊस पडेल याची निश्चिती करत असतात.आपल्याकडला पाऊस एल निनोने प्रभावीत आहे का?2018च्या शिशिर ऋतूदरम्यान एल निनो मोडकोईचा उद्भव झाला आणि त्याचा प्रभाव जुलै 2019पर्यंतच्या भारतीय उपखंडातल्या पावसावर पडला. 2019च्या जून महिन्यातला पाऊस सरासरीपेक्षा कमी होता. जुलैनंतर भारतीय महासागराचे उष्ण कटिबंधातील क्षेत्र सकारात्मक आयओडीच्या प्रभावाखाली आले. पर्जन्यकालाच्या सुरुवातीचा एल निनो मोडकोईचा प्रभाव आणि नंतर सकारात्मक आयओडीचा प्रभाव यामुळे गतवर्षी अनेक वादळांचा सामना करावा लागला. यातली दोन वादळे (वायू : 10 ते 17 जून) व हिक्का (22 ते 25 सप्टेंबर) अरबी समुद्रात होताना आपण अनुभवली. गतवर्षी केरळात मॉन्सूनचे आगमन झाले 8 जून रोजी. पण वायू वादळामुळे मॉन्सूनचे अभिसरण शिथिल झाले व त्यामुळे 1 ते 18 जूनदरम्यानच्या कालावधीत एरवीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला.यंदाच्या मोसमात केरळात मॉन्सून दाखल झालाय 1 जून रोजी. त्याच दरम्यान तयार झालेल्या निसर्ग वादळाचा परिणाम 3 जूनपर्यंत दिसला. पण त्यामुळे मॉन्सूनची गती मंदावली व गोव्यात तो 11 जून रोजी पोहोचला. एरवीची गोव्यात येण्याची त्याची तारीख साधारणत: 5 किंवा 6 जून असते.यंदा तापमानात विशेष चढउतारांविना आहे तसेच राहाण्याची आणि परिणामी जून ते ऑगस्टदरम्यान नेहमीच्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता 60 टक्के असून, ला निनाच्या प्रभावाची शक्यता 30 टक्के तर एल निनोच्या प्रभावाची शक्यता 10 टक्के असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. विविध मॉडेल्सच्या आधारे व्यक्त होणारे अंदाज सप्टेंबर- नोव्हेंबर दरम्यानही पूरक पाऊस पडेल असेच सुचवताहेत. तसे पाहिल्यास पॅसिफिक महासागरात ला निना अवतरणे म्हणजे भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणे.
एल निनो वा ला निना कसे अवतरतात? वातावरणीय अभिसरण, ज्याला वॉकर सेल म्हणतात, हे तापमान आणि दबावातील उतार-चढावावर अवलंबून असते. तुलनेने शीतल असलेल्या पॅसिफिक महासागराच्या पूर्वेकडील भागावर उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते तर पश्चिमेकडील उष्ण भागावर कमी दाबाचे. विषुववृत्ताकडले वारे उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहू लागतात आणि सपाटीनजीकचे वारे व्यापारी वार्यांच्या रूपात पूर्वेकडून पश्चिम दिशा धरतात.जेव्हा एल निनो वा ला निना अवतरत नसतात, तेव्हा पॅसिफिकच्या पश्चिमी भागात एकाच प्रकारचे वातावरणीय अभिसरण होते तर एल निनो मोडकईला अनुकूल असलेल्या परिस्थितीत दोन अभिसरणे निर्माण होत असतात. हे अभिसरण अधिक गतिमान असते. पॅसिफिकच्या वायव्येकडील भागातले संवहन भारतीय उपखंडात येणार्या पावसावर परिणाम करत असते. अरबी समुद्रातील दाबातल्या चढउतारांच्या साहाय्याने ते गतिमान वार्यांचे निर्माण करते जे भारतीय उपखंडात आद्र्रता घेऊन येत असतात.एल निनो आणि ला निनाचा भारतातील पर्जन्यमानावरील परिणाम आता सिद्ध झालेला आहे. पै, लता आणि रमेश कुमार यांनी केलेल्या अभ्यासानुसार मध्य आणि पूर्व पॅसिफिक क्षेत्रात एल निनो कार्यरत असेल तर भारतात मॉन्सूनच्या सातत्यात फरक पडत असतो. हा फरक जितका जास्त तितके पर्जन्यमान कमी व दुष्काळाची शक्यता अधिक. पण 1997 साली एल निनोचा प्रभाव जबरदस्त असतानाही भारतीय महासागरातील ‘डायपोल’ने त्याला निष्प्रभ बनवले व त्यावर्षी आपल्याकडे मुबलक पाऊस पडला. भारतीय महासागरातला हा डायपोल मॉन्सूनवर परिणाम करत असतो. संपूर्ण भारतवर्षात मॉन्सून पोहोचेपर्यंत 8 जुलै उजाडत असतो. यंदा दोन सप्ताह आधीच म्हणजे 26 जून रोजी ही किमया घडली. अलीकडील काळात मॉन्सूनची ही सर्वाधिक गतिमान झेप. अपवाद फक्त 2013 सालचा, त्या वर्षी मॉन्सूनने 16 जून रोजीच म्हणजे 16 दिवसांत भारतवर्ष आपल्या पंखाखाली घेतले होते. या उलट 2002 साली देशभरात मॉन्सूनचे वारे पोहोचेपर्यंत 15 ऑगस्ट उजाडला होता. त्यावर्षी या प्रक्रियेला तब्बल 76 दिवस लागले.यंदा देशातील बहुतेक मॉन्सून उपविभागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. उत्तर भारतातील केवळ 4 उपविभागांचा याला अपवाद आहे.
(लेखक गोव्यातील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत गेली अनेक वर्षे संशोधक- शास्रज्ञ म्हणून कार्यरत होते. प्रमुख शास्रज्ञ पदावरून ते हल्लीच निवृत्त झाले आहेत.)