- डॉ. राजेंद्र बर्वे
पहाटेची झुंजूमुंजू वेळ, पक्ष्यांचा चिवचिवाट अशा रम्य गोष्टी सोडून हल्ली जाग येते ती कोणीतरी कोविडने दगावल्याची बातमी देणाऱ्या सेलफोनच्या कर्कश मेसेज टोनने.. मग नमस्कार आरआयपीचे लोट.. कोणीतरी नुकतंच पॉझिटिव्ह असल्याच्या टेस्टचा फोटो.. सकाळी सकाळी अगरबत्तीचा वास दरवळण्याऐवजी टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूजचा दणदणाट सुरू होतो आणि तो दिवसभर तसाच चालू राहातो. सकाळचा चहा रटाळ आणि शिळा वाटतो. आंघोळ करूनही पारोसं वाटतं. बाहेरून अचानक ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजतो आणि छातीत धस्स होतं.. ‘कोणाची आज पाळी?’
कामाची यादी पाहिली की फक्त सुस्कारा! व्यायाम करायचाय.. पण येत्या सोमवारपासून नक्की! ..जरा बिछान्यावर पडू या म्हटलं तरी चिंतेचं काहूर... डोळे मिटण्याआधीच निराशा आत शिरलेली..
मग कुणीतरी सल्ला देतं, सकारात्मक राहा. पॉझिटिव्ह विचार करा. त्याने तर फारच चिडचिड होते. काही कळत नाही. इतक्या भयावह परिस्थितीत कसा करायचा सकारात्मक विचार?
- तर मित्रहो, तेच आज शिकू या! कसं शिकायचं?- त्यासाठीच तर शेजारी दोन वर्तुळांची गोष्ट दिलीये. त्यातल्या बाहेरच्या वर्तुळात भटकणं कमी करा.. मग थांबवाच!
तेवढं जमवलंत तर गरमगरम चहाच्या कपातून वर येणारी वाफेची वलयं आकर्षक वाटतील, खिडकीतून डोकावणाऱ्या आडव्या उभ्या फांदीवरची कोवळी पालवी दिसेल, भिरभिर उडणारी निष्पाप पाखरं दिसतील.. व्यायाम? मस्त वेळ. शरीराच्या तंदुरुस्तीची मस्त मशागत. योगासनं म्हणजे लवचीकपणाचा वळणदार अनुभव! प्राणायाम म्हणजे मेंदूकडे पोहोचवलेला जिवंत झोत. मनातल्या विचारांचा अखंड प्रवाह.. त्यातल्या लहरी आणि लाटा.. त्यातून मागेपुढे होणारी आठवणींची गलबतं फक्त साक्षी भावानं पाहायची!!
प्रयत्न केलात, तर जमेल तुम्हाला! त्यासाठी कानाला लावलेला फोन, हाताला चिकटलेला रिमोट आणि स्क्रीनला चिकटलेले तुमचे डोळे तेवढे सोडवावे लागतील!.. बास, की सोप्पंच!!
1. सोबतच्या आकृतीत दोन समकेंद्री वर्तुळं आहेत. या वर्तुळांच्या केंद्रस्थानी तुम्ही आहात. ही वर्तुळं म्हणजे तुमचा अवकाश, तुमच्या भोवतालचं वास्तव. ही तुमच्या पूर्णपणे मालकीची जागा.
2. होकारात्मक मानसशास्त्राचा पहिला नियम : तुमच्या मानसिक अवकाशावर फक्त तुमचंच राज्य चालतं. या अवकाशात काय असतं? तुमचे विचार, भावना, भाववृत्ती (मूड) तुम्ही ठरवलेली उद्दिष्ट आणि तुमची कल्पनाशक्ती यांनी बांधलेला तुमचा ‘स्व’. तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे याचं सर्व नियंत्रण याच स्वकडून होतं.
3. आता या दोन वर्तुळांत लिहिलेले मुद्दे पाहा. आतल्या वर्तुळात लिहिलेल्या सर्व गोष्टी तुमच्या आवाक्यातल्या, तुमच्या नियंत्रणातल्या आहेत. यालाच इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात.
4. आता त्या पलीकडचं मोठं वर्तूळ पाहा. आपल्या आवाक्यापलीकडच्या घटना आणि गोष्टी ह्यात आहेत. आपल्या नियंत्रणकक्षा पलीकडच्या!! त्या घटना आणि घटकांविषयी आपण काही करू शकत नाही म्हणजे त्या आपल्याशी संबंधित असल्या तरी त्यावर आपला ताबा नाही. या सर्व घटना आणि घटक म्हणजे एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल.
5. सहज विचार करा, स्वत:शी प्रामाणिक कबुली द्या : या बाहेरच्या वर्तुळातल्या गोष्टींचाच तुम्ही जास्त, सतत विचार करता, त्याचा तुम्हाला इतका त्रास होतो, की आतल्या वर्तुळातल्या गोष्टींचा विचारच तुमच्या डोक्यात शिरत नाही. त्यावर कृती तर दूरच राहिली! बरोबर?
6. म्हणजेच, जे घटक आणि घटना आपल्या व्यक्तिश: आवाक्यापलीकडच्या आहेत, ज्यावर आपलं नियंत्रण नाही; तरीही आपण त्याच गोष्टींवर लक्ष देतो आहोत. आपला वेळ आणि शक्ती त्याच गोष्टींचा विचार करण्यात खर्च करतो आणि आपल्या नियंत्रणातील सहज जमणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहोत. त्या गोष्टी मनापासून पार पाडण्याची जबाबदारी टाळत आहोत.
7. थोडक्यात, बाह्यनियंत्रणकक्षाच्या प्रभावाखाली असल्यानं आपण निराश होतो, असहाय्य होतो. चिडचिडतो, घरातलं वातावरण अस्वस्थ करतो आणि आपल्या आरोग्याची आबाळ करतो.
8. निराशा, उद्वेग, चिडचिड, अस्वस्थता ही नकारात्मकता आपली प्रतिकार शक्ती कमी करते. अशा नकारात्मक भावनांमुळे आपण आनंदाला आणि सकारात्मकतेला मुकतो. जीवन निरर्थक वाटू लागतं.
9. आता आपल्या आवाक्यातल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू. त्यांना आवर्जून वेळ देऊ. त्या निकडीच्या ठरवू आणि मुक्त मनाने रोजच्या नित्यनेमाच्या गोष्टींत मन रमवूू. त्यातली मजा घेऊ.
(ख्यातनाम मनोविकारतज्ञ)
drrajendrabarve@gmail.com