शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

सुधीर फडके यांच्या गीतनिर्मितीची जादू आणि तंत्र दोन्हीही वेड लावणारेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 3:00 AM

मराठी भावसंगीताच्या संपन्न इतिहासात एक हळवे, सुरेल स्थान असलेले ख्यातनाम गायक- संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ 25 जुलै रोजी होतो आहे. त्यानिमित्ताने!

-डॉ. मृदुला दाढे-जोशी

कलाकार म्हणजे अखंड बेचैनी ! सृजनाचे कित्येक दंश पचवत, झुंजत, झगडत नवनिर्मिती करणं, ही एक जीवघेणी कसरतच. व्यक्त होण्याच्या सगळ्या शक्यता त्या एका निर्मितीत गोठवून ठेवणं सोपं नसतं.किती सांगता येतं त्यातून?.. काय सांगायचं नेमकं?.. हा सगळा खटाटोप कशासाठी? वीज चमकावी तशी मेंदूत लख्ख चमकून जाणारी एखादी सुरावट. एखादीच जागा. हा एकच क्षण असतो. या क्षणाला घट्ट धरून ठेवत, तो जाळ सोसत, त्याला मूर्तरूप देत एक संपूर्ण कलाकृती, एक घडावाचा दागिना निर्माण करणं, या सगळ्यात प्रचंड भावनिक, मानसिक संघर्ष असतो. एका ठिणगीला फुलवत फुलवत त्यातून अग्निशिल्प निर्माण करणारा, शब्दांमधली - नव्हे - अक्षरांमधली लय, त्यातील भावतरंग, अस्फुट उद्गारही संगीतबद्ध करणारा ,अलौकिक बुद्धीचाच नव्हे तर विलक्षण तंत्र  सार्मथ्य ताकदीने वापरणारा संगीतकार म्हणजे आपले बाबूजी अर्थात सुधीर फडके !प्रतिभा ही उपजत असावी लागते. पण गीतनिर्मितीसाठी तेवढंच पुरेसं नाही. चमकदार मुखडा, एखादी फ्रेज सुचेपर्यंत प्रतिभा साथ देते. काही स्वरावली डोक्यात येतात-जातात. हे सगळं एका वेगळ्याच प्रतलावर सुरू असतं. सुचलेल्या त्या फ्रेजशी संगीतकार खेळत असतो. एखादा स्वर वेगळा घेऊन बघणं, त्याचा दर्जा वेगळा ठेवणं हे सगळं करत असताना संगीतकार नेमकं काय शोधत असावा? शब्द जर हाती असले  तर त्या फ्रेजमुळे त्या शब्दाचा अर्थ झळाळून उठतोय का, हे बघत असतो आणि आधी चाल सुचलेली असली तर त्या भावनेला सुरातून थेट भिडण्याचा प्रयत्न असतो.बाबूजींचं वैशिष्ट्य हे की एखादा चमकदार मुखडा सुचल्यानंतर पुढे गाण्याचा अंतरा, अंत-याच्या शेवटच्या ओळीची धृवपदाशी असलेली जोडणी या तंत्नावरही त्यांची विलक्षण हुकमत होती.काही मोजक्या गाण्यांच्या रचना या दृष्टींनी अभ्यासून बघू.

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’ हे एक अत्यंत खोल काव्य. आयुष्यातल्या नग्न सत्याला थेट भिडतं. शब्दाशब्दात असलेली ती देहाची नश्वरता संगीतबद्ध करताना बाबूजी ताल निवडतात तो असा की हातमागाच्या लयीला सामावून घेणारा. कारण पडद्यावर राजा परांजपे हातमागावर बसून विणता विणता गात आहेत त्यामुळे या गाण्यात कसलाही ठेक्याचा खेळ नाही. तालाचे विभ्रम नाहीत. एका लयीत, विशिष्ट ठेक्यात हे गाणं आपल्यासमोर येतं. पहिले दोन अंतरे एका चालीत आहेत. तिस-या  अंत-यात एक प्रश्न येतो.‘या वस्राते विणतो कोण?एक सारखी नसती दोन !’ 

- हा ‘वेगळेपणा’ कसा दिसावा? तर या दोन्ही ओळींचे सुरुवातीचे शब्द एकाच चालीचे ठेवून, फक्त शेवटचा शब्द वेगळ्या स्वरावर ठेवला आहे, ‘कोण’ हा शब्द कोमल गंधारावर, तर ‘दोन’ हा शब्द रिषभावर. बाकी सगळी ओळ सारखीच ! हे सुचणं आणि तशी स्वरयोजना करणं, ही प्रतिभा आणि तंत्नाची किमया.निव्वळ तालाची एक साधी सरळ मांडणीसुद्धा एखाद्या गाण्याची गरज असू शकते, हे ‘ज्योती कलश छलके’ ऐकल्यावर लक्षात येतं. एक गृहिणी भल्या सकाळी उठून नित्यकर्माला लागली आहे. रोजचीच कामं, अंगणात सडा घालणं, तुळशीला पाणी घालणं.. सगळ्याला एक निश्चित असा क्र म असतो. एका विशिष्ट लयीतच कामं चाललेली, त्यात कुठे चढ उतार नसतात. या गाण्याचा सरळ ठेका, एक विशिष्ट लय हे सगळं सांगून जाते. आणि ‘हुए गुलाबी लाल सुनहरे, रंग दल बादलके’ म्हणताना हळू हळू प्रकाशमान होणारी ती पूर्व दिशा भासमान होत जाते. लिंबलोण उतरू कशी अससी दूर लांब तू,इथून दृष्ट काढते, निमिष एक थांब तू ‘अससी दूर’ म्हणताना, दू22222र असं दोन्ही अक्षरातलं वाढवलेलं अंतर आपल्याला चकित करतं. त्याच वेळी, संगीतकाराला तो काळ तिथेच थांबवतासुद्धा येतो.  ‘हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता’ मध्ये शेवटच्या कडव्यात ‘वेड वाढवून तो, उडून जाय मागुता’ म्हणताना ‘वाढवून’ शब्द  ‘वा22222ढवून’ असा येतो. ‘त्या तिथे पलीकडे’ नंतर एका किंचित विरामानंतर ‘तिकडे’ हा शब्द ठेवणं हे कसं सुचलं असेल?‘निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो’सारख्या रचनेत, ‘हरी दर्शनास द्या हो’ म्हणताना त्या  ‘द्या’ या एका शब्दात सगळी तळमळ, दर्शनाची आस व्यक्त होते. ते ‘द्या’ अक्षर अशा पद्धतीनी लांबवणं, यात संगीतकाराचं कसब आहे.

चाल सुचण्याची घटना आधीच घडलेली आहे. पण पडद्यावरच्या प्रसंगात, देवाचं त्या त्या रूपात दर्शन देणं फार महत्त्वाचं आहे. भक्त दामाजीच्या सत्त्वपरीक्षेची वेळ आहे. म्हणून ते ‘द्या’ अक्षर फार महत्त्वाचं. या गाण्यात मला स्तिमित करते ती अंतर्‍यातली शेवटची ओळ. त्या प्रत्येक ओळीचा शेवट ‘हो’ या शब्दावर असलेल्या विशिष्ट तानेनी होतो. काय सुरेख जोडणी आहे ही ! अंगावर काटा उभा करणारी. अंत-यातल्या शेवटच्या ओळीत ज्या पद्धतीनी त्या ‘हो’ला बाबूजी वळवतात आणि तालाची कुठलीही मात्ना वाया जाऊ न देता, न वाढवता उपलब्ध असलेल्या अवकाशात ती तान बसवण्यात हा प्रतिभा- तंत्नाचा मिलाफ स्वच्छ जाणवतो. असंच एक अक्षर बाबूजी फार सुंदर रीतींनी खेळवतात.   ‘आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे’ मधलं ‘वे’ हे अक्षर आणि मग हा खेळ अंत-यातल्या शेवटच्या ओळीतही अनुभवता येतो. काय ताकद असते संगीतकारात ! ‘तसे तयाने यावे’, ‘हाती हात धरावे’, ‘कुठे ते ही ना ठावे’ या प्रत्येक ओळीत ‘वे’ या शब्दात तान गुंफलीय. मुळात हे गाणं इतकं समृद्ध की प्रत्येक अंतरा वेगळा!‘सोडुनिया घर नाती-गोतीनिघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे!’

- हा अंतरा तिन्ही सप्तकात फिरतो. कारण कुठेतरी निघून जायचंय. कुठे ते ठरलेलं नाही. हा स्वैर संचार चालीत उमटलाय तो असा. हे केवळ ‘दैवी’ म्हणून आपण त्या क्षमतेचा अपमान नाही करू शकत. फार खोल विचार आहे त्या मागे.‘जिवलगा कधी रे येशील तू’ - या गाण्यात ऋतू बदलतात तसे रागही. गाण्याचा प्रवाह कुठेही तुटू न देता त्या एका शेवटच्या तानेत हे सगळं सामावून घेतलं जातं. ‘यमन’ या एका महासागराला येऊन मिळणा-या या वेगवेगळ्या नद्या, सप्तरंग सेतू, अंतरीचे हेतू, प्रेमांकित केतू आणि विरहावर ओतू. या सगळ्या स्वरलहरी येऊन मिळतात त्या  ‘जिवलगा कधी रे येशील तू’ या ओळीला ! मग तो केदार असो की सोहनी. बसंत की मिया मल्हार कुठल्या कप्प्यात बसवायची ही प्रतिभा? हा ‘उकार’ आणखीही एका गाण्यात खूप सुंदर रीतीनं वळवलाय. ‘माझा होशील का’मध्ये, सांग तू22222 असा अवरोही दिशेने खाली उतरणा-या उकारानंतर ‘माझा’ हा शब्द येतो आणि थबकतो. काय साध्य झालं यातून? ‘तू’ या शब्दाला पुरेसं महत्त्व दिलं गेलं आणि ‘माझा’ शब्द प्रश्नार्थकही झाला. त्याला प्रश्नार्थक करण्यासाठी किंचित वर उचललाय तो शब्द.फक्त ‘उकार’च नव्हे तर ‘एकार’सुद्धा किती सुंदर वापरलेत बाबूजींनी. ‘आज कुणीतरी यावे’मध्ये तो एकार आहेच; पण ‘काल मी रघुनंदन पाहिले’ या गाण्यात तर तो केवळ अनुपम.‘श्याम मनोहर रूप पाहता पाहतची राहिले’ ..अबोध कसले अश्रू  माझ्या डोळ्यातून वाहिले,.. त्या नयनांचे चन्द्रबाण मी हृदयी या साहिले’- हे सगळे ‘एकार’ एका सुंदर तानेत येतात. त्या तानेच्या आधीचं अक्षर उदा. ‘वाहिले’मधला ‘वा’ ज्या लयीनी येतो ती लय भल्याभल्यांना समजणंच अवघड आहे. काय टायमिंग आहे हे ! त्या एका अक्षरामुळे पुढच्या येणा-या तानेला एक जबरदस्त उचल मिळते. हा लयीचा अंदाज दैवदत्त असावा. पण तानेआधी तो असा वापरणं ही तंत्नावरची हुकमत. - या काव्याला रामायणाचा संदर्भ देत गदिमांनी ते कुठल्या कुठे नेऊन ठेवलं आहे आणि कथेत नायिका तिच्या नायकाच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडलेली असताना हे गाणं येतं. अत्यंत सुसंस्कारी घरात वडील पूजेला बसलेले आहेत. कालच येऊन गेलेल्या नायकाची आठवण तिला येतीय अशा प्रसंगी हे गाणं आहे. याला आध्यात्मिक प्रणयगीत म्हणावं की अनुरागी अभंग? त्या हळुवार प्रसंगाची तरलता कुठेही कमी होत नाही. आणि अनुरागाला असलेलं दैवी अधिष्ठानही कायम राहतंय. मला स्तिमित करतं हे गाणं नेहमी. ‘या सुखांनो या’ हे एक असंच वेड लावणारं गाणं.‘विरहांतीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगने’साधा एकांत न म्हणता विरहांतीचा एकांत म्हणण्यातच त्याची तीव्रता वाढली. आणि बाबूजी त्या ‘आलिंगन’ शब्दाला अलगद स्वरांच्या मिठीत गुंफतात. त्या अनुस्वाराचा पुरेपूर उपयोग करतात. स्वरांची शब्दांना घट्ट मिठी मिळते.एकटी पथ चालले दोघांस आता हात द्या..साथ द्या..

हे शब्द, मधाळ स्वरांची मिंड घेऊन मंद्र सप्तकात जाऊन येतात. ‘साथ द्या’, ‘गात या’, या सगळ्यात ती लडिवाळ मिंड आहे स्वरांवर. सुखाला आपल्या कवेत बोलावणं. किती रूपात ते सुख येऊ शकतं, त्या त्या सगळ्या रूपांत त्याची विनवणी करणं. साद घालणं सगळं सगळं त्या विलक्षण प्रेमळ स्वरात उमटलंय.‘चल सोडून हा देश पक्षिणी’ किंवा ‘हा माझा मार्ग एकला’ सारखी विषण्ण मनोवस्था टिपणारी गाणी म्हणजे मानसिक कल्लोळ. निराशा स्वरांत कशी झिरपू शकते याची उत्तम उदाहरणं आहेत. ऐकताना जाणवत राहतं की या शब्दांना हीच चाल ! ‘चल सोडून हा’ म्हणताना एक एक स्वर खाली येतो. खचत चालल्याचा भास, हे खाली येणारे सा, नि, ध, प, म स्वर जास्त गडद करतात. ‘हा माझा मार्ग एकला’. हे सांगताना ‘हा’ शब्द एकाकी का? तर बाकी कुठलीच दिशा नाही, केवळ हा अनिवार्य मार्ग उरलाय हे सांगण्यासाठी !  बाबूजी. किती प्रकारे काय काय शिकवतात तुमच्या रचना ! तुम्ही हजारो हातानी इतकं दिलंयत, की आमची झोळी दुबळी ठरते ! त्या  शब्दांच्या, स्वरांच्या, गायकीच्या प्रेमात तुम्हीच पाडलंत आम्हाला. घट्ट बांधणीच्या रचना, अर्थपूर्ण शब्दमांडणी आणि तो अफाट लयविचार ऐकवून आमच्यावर स्वरसंस्कार केलेत. शब्दांवर इतकं नितांत प्रेम केलंत की एकाही गाण्यात शब्दांना साधं खरचटूही दिलं नाहीत. स्वरांच्या मखमलीत त्या मोत्यांना कुरवाळत, सांभाळत अलगद बसवलंत. कणस्वरांचं ही सौंदर्य दाखवलंत. थेट स्वरांना भिडवलंत. तानांमध्ये गिरक्या घ्यायला लावल्यात.तुमच्या संगीताचा वर्णन करण्यात उत्तम, अभिजात, दैवी या शब्दांना स्वत:चं सार्थक झालं असं वाटत असेल!  मराठी मन तुमच्या ऋणातच राहील नव्हे, हे ऋण मानाने मिरवेल. संगीतकार या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी  पिढय़ानपिढ्या  तुमच्याकडे बोट दाखवतील !!

(लेखिका चित्रपट संगीताच्या र्ममज्ञ अभ्यासक आणि गायिका आहेत)

mrudulasjoshi@gmail.com