सुधारक ओलवे
हातातला कॅमेरा मला कुठं कुठं घेऊन गेला.
देशाच्या दुर्गम, अपरिचित टोकांवरच्या सुदूर गावखेडय़ात, जिथल्या पायवाटाही नागरी पाऊलांनी मळलेल्या नाहीत अशा लांबवरच्या वाडय़ावस्त्यांवर जायची संधी या फोटोग्राफीमुळेच मिळाली. भारतभर फिरलो, देशाच्या कानाकोप:यात निसर्गाच्या बेसुमार सौंदर्यावर फिदा होत राहिलो.
काही वर्षापूर्वी असाच एक विलक्षण देखणा, अपरिचित क्षण अवचित माङया वाटय़ाला आला. इतका विलक्षण की जणू सृष्टीनं आकाशात सोन्याची मुक्त उधळण करत भंडाराच खेळावा! एक अत्यंत श्रीमंत आणि अपरंपार वैभवी सूर्यास्त पाहत मी उभा होतो. एक क्षणही पापणी मिटू नये इतकं ते गारुड देखणं होतं. आकाशातून सोनेरी रंग जमिनीच्या ओढीनं खाली उतरत होता आणि त्याच्याभोवती लाल-जांभळ्या रंगाच्या अनेक रंगछटा नाच:या झाल्या. माझा आणि माङयासह तिथं उभ्या सा:या गावक:यांचा चेहरा पिवळसर सोनेरी रंगानं उजळून गेला. हळदुल्या सोन्यात सारं न्हाऊन निघालं. आकाशातले ढगांचे पुंजके सोनेरी दिव्यांसारखे टिमटिमू लागले. सोनेरी फुलांची माळ असावी अशी प्रकाशफुलांची मेघमालाच झगमगायला लागली. आणि ज्यानं ही सोनसळी ऊर्जात्मक उधळण मन:पूत केली तो लालचुटूक देखणा गोळा सावकाश मावळतीच्या दिशेनं अंधा:या पर्वताआड विसावला.
इतक्या अद्भुत सोनक्षणांचं वैभव देणारं हे स्थळ म्हणजे झारखंडमधलं नेतरहाट हे गाव. ब्रिटिशांच्या काळापासून हिल स्टेशन ही या गावची ओळख आहे. आणि सूर्यास्त अनुभवायला त्याकाळापासून लोक नेतरहाटमध्ये येतात. नेतरहाटमधल्या मग्नोलिया पॉइण्टवरून मी हा सूर्यास्त पाहिला. या पॉइण्टविषयी अनेक आख्यायिका आहेत. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळातली ही एक गोष्ट. मग्नोलिया नावाची एक ब्रिटिश युवती एका स्थानिक पहाडी गुराख्याच्या प्रेमात पडली होती. पण हे प्रेम तिच्या घरच्यांना मान्य नव्हतंच. आपल्या प्रेमाचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि घोडय़ावरून वेगानं दौडत येत तिनं याच पॉइण्टवरून दरीत उडी घेतली. संपवलं स्वत:ला. आता त्यांच्या या अपयशी प्रेमाची उदात्त गोष्ट गावातली भित्तीचित्र सांगत राहतात.
पण या पॉइण्टवरून तो अद्भुत सूर्यास्त अनुभवल्यावर वाटतं, एकमेकांचे हात हातात घेऊन त्या दोन प्रेमींनी किती उत्कटतेनं त्याकाळी हा सूर्यास्त पाहिला, अनुभवला असेल..
पहाडातल्या या गोष्टी, त्याच गोष्टीत काही वर्षापूर्वी माओवादीही बंदूक घेऊन दाखल झाले, वेगळीच रक्तरंजीत घडामोड सुरू झाली. सुदैवानं आता या भागात शांतता आहे. तो काळही सरलाय. मात्र नव्या जगाचं वारं तसं कमीच येतं या पहाडांत. इथली माणसंही साधीभोळी, लाजरी, शहरी माणसांपासून दूर पळणारी! इथल्याच एका मुलानं मला विचारलं, तुम्ही कुठून आलात? मी सांगितलं, मुंबईहून! पण मुंबई कुठंय याचा काही त्याला पत्ताच नव्हता. बरोबरच्या व्यक्तीनं सांगितलं जिथं शाहरुख खान राहतो ना ते गाव. ते ऐकल्यावर मात्र पोरांचे चेहरे उजळले आणि त्या चेह:यांवर ओळखीचं हसूही उमटलं!
नेतरहाटचा नितांत सुंदर निसर्ग, तिथलं अद्भुत पर्यावरण अजूनही शाबूत आहे ते तिथल्या निसर्गस्नेही स्थानिक जमातींमुळे. सुदैवानं अजूनही शहरीकरणाच्या कर्कश गोंगाटापासून हा भाग कोसो दूर आहे. मग्नोलियाचा आत्मा अजून इथं वास करत असावा तशा तिच्या प्रेमाच्या कथा स्थानिकांच्या गोष्टीतून पर्यटकांनाही समजत जातात. आणि सोनं उधळत रोज मावळणा:या सूर्याबरोबर चकाकणा:या पहाडांसह, घरोघरच्या खिडक्यांमधून डोकावणा:या सोनेरी छटांसहा त्या आठवणी जाग्याही होतात.
रोज या पहाडात हा अवर्णनीय निसर्गसोहळा साजरा होतो, सृष्टीचं अनुपम रूप दाखवतो. तेव्हा जाणवतं की, हा निसर्गच असीम आणि सार्वकालिक आहे.
त्याचं हे अद्भुत, चिरंतन देखणोपण श्रेष्ठ व मानवी आवाक्याबाहेरचं आहे!
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल
पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार
‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)