- प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
सप्टेंबर 1992चा महिना. अद्याप पावसाळा सरला नव्हता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रतील मातीचे कच्चे रस्ते बंद होते. छोटय़ा छोटय़ा ओहळांनी रस्त्याला जागोजागी छेद दिले होते आणि उतारावर तर हे रस्तेच तात्पुरते ओहळ बनले होते. काळी माती (मेळघाटात क्वचितच आढळते) असणा:या जागांवर इतका रबरबाट झाला होता की तिथं चालणं मुश्कील झालं होतं. वनरस्त्यांचं अस्तित्व तात्पुरतं नाहीसं झालं होतं. झाडं नसलेल्या भागातील, जंगलात मिसळून गेलेल्या गवताळ पट्टय़ांनाच सुरक्षित रस्ते मानावं लागत होतं. या रस्त्यांवरील गवताची विविधता उल्लेखनीय होती, अगदी घोटय़ाएवढय़ा उंचीपासून हत्तीच्या उंचीइतकं त्यांच्या उंचीत वैविध्य होतं.
अशा पाश्र्वभूमीवर सप्टेंबरमध्ये मेळघाटच्या गाभा क्षेत्रत जीपने गस्त घालणं मानवी आवाक्याच्या बाहेरचं होतं. कुत्र्यांच्या मदतीने शिकार करणारे शिकारी ही मेळघाटमधली पावसाळी डोकेदुखी होती. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रणासाठी पायी गस्त घालण्याशिवाय पर्याय नसायचा. क्षेत्र संचालक या नात्याने अशा ऋतूत आणि अशा ठिकाणी मी गस्ती पथकाचं नेतृत्व करत असे. सप्टेंबरच्या एका पावसाळी सकाळी मी वैराटला दिवसभराच्या गस्त कम ट्रेकिंगला जाण्यासाठी जाऊन पोचलो होतो. (वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना हस्तक्षेपविरहित अधिवास मिळावा म्हणून हेही गाव आता प्रकल्पाबाहेर पुनर्वसित करण्यात आले आहे.)
वैराट चिखलदरा पठाराच्या अगदी पश्चिम टोकाला चिखलद:यापासून 24 किलोमीटरवर वसलेलं होतं आणि जवळच्या टेकडीवर मेळघाटातली सर्वात उंचीवरची जागा होती. (समुद्रसपाटीपासून जवळपास 4क्क्क् फूट.) वैराटच्या थोडंसं आधी रस्त्याची एक चिंचोळी पट्टी लागत असे. त्याच्या दोन्ही बाजूस डोळे फिरवणा:या खोल द:या होत्या. पावसाळ्यात ही जागा बहुतेकवेळा दाट धुक्यात वेढलेली असायची, तर हिवाळ्यात रानजाईच्या सुगंधी फुलांनी घमघमाट सुटलेला असायचा. वैराट हे गवळ्यांचं गाव होतं. गायी पाळणो आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवणं हा त्यांचा महत्त्वाचा व्यवसाय होता. गाभा क्षेत्रची हद्द वैराटला लागून होती. गाभा क्षेत्रत चराईला बंदी होती. वैराटच्या गवळ्यांना तिथलं हिरवंगार लुसलुशीत गवत लुभावत असे आणि चोरूनमारून ते तिथे घुसत असत. त्यामुळे या विषयावर व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि वैराटच्या गावक:यांत तणाव उत्पन्न व्हायचा. वैराटच्या दोन गावक:यांनी 1991 च्या फेब्रुवारीत दोन वाघांना विष घालून मारल्याचा गुन्हा घडला होता. वैराट गावातील एक म्हैस चरत चरत गाभा क्षेत्रतल्या दरीत खोलवर घुसली होती आणि तिला दोन वाघांनी मारलं. म्हशीचा थोडासा भाग खाऊन झाल्यावर वाघ पाणी प्यायला गेले असावेत. दरम्यानच्या काळात आरोपींनी त्या म्हशीच्या मृतदेहात जालिम विषारी कीटकनाशक घातलं असावं. या घटनेची माहिती मिळाल्यावर व्याघ्र प्रकल्पाचा कमर्चारीवर्ग आरोपींना अटक करण्यासाठी वैराट गावात गेला तेव्हा गावक:यांनी चिडून त्यांच्यावर हल्ला चढवला होता.
तर त्या पावसाळी धुक्यातल्या सकाळी जीपने मला वैराटला सोडलं. साधारण तीस किलोमीटरवर असणा:या कोहा गावाला पायी जाण्याचा माझा विचार होता. जंगलातल्या रस्त्यावरून फिरताना ‘टू इज कंपनी, थ्री इज क्राऊड’ या माङया तत्त्वानुसार (कमीत कमी माणसं म्हणजे वन्यप्राण्यांना कमीतकमी व्यत्यय आणि त्यामुळे त्यांच्या दर्शनाची संधी अधिक) माङया चमूत माङो दोन विश्वासू सहकारी होते. एक होते तेव्हा सहायक वनसंरक्षक रवि वानखडे आणि दुसरे म्हणजे वनक्षेत्रपाल अजय पिलारीशेट. दोघेही हाडाचे वन्यजीवप्रेमी होते. रविला प्राण्यांच्या आवाजांची तीक्ष्ण जाणीव होती, तर अजयची दृष्टी सजग होती. थोडक्यात काय तर त्या दिवशी माङयाकडे दृक-श्रव्य सहाय्य भारी होतं.
गाभा क्षेत्रच्या वैराट गेटपासून आम्ही धुक्यातून चालायला सुरुवात केली. सोबत रिमङिाम पावसाची साथ होती. काही अंतर चालून गेल्यावर धुकं थोडंसं निवळल्याने खाली गच्च झाडीत विखुरलेली चिमुकली गावे असं मेळघाटच्या जंगलाचं विहंगम दृश्य दिसू लागलं. त्यात जवळचं गाव होतं कुंड. लवकरच ग्रे फाऊल जंगल ह्या जंगली कोंबडय़ांचे मोठे नादमय आवाज ऐकू येऊ लागले. त्यानंतर आम्ही सावधपणो बानाकपार (स्थानिक बोलीभाषेत बाना म्हणजे अस्वल) ओलांडलं. या भागात मी स्वत: कित्येकवेळा अस्वलं बघितली होती. मुख्य रस्त्यापासून 2-3 किलोमीटर आत चाचर्डा नावाचा एक पाणवठा आहे. मागच्या उन्हाळ्यात काही अंतरावर जीप ठेवून मी त्या पाणवठय़ावर गेलो होतो. हा कोण आगंतुक माङया पाणवठय़ावर आलाय असं म्हणत एक अस्वल महाशय मागच्या पायावर उभे राहून माझं निरीक्षण करत आहे हे पाहिल्यावर मी जीपकडे धाव घेतली. मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता.
दुस:या एका प्रसंगात माझी कार मुख्य रस्त्यावर ठेवून मी उताराच्या दिशेने 2-3 किलोमीटर चालत गेलो होतो. चाचर्डा पाणवठय़ाची पाहणी करून मी परतत होतो. माङया परतीच्या मार्गावर माङया कार आणि माङयामध्ये अस्वलाची स्वारी होती. माझा ड्रायव्हर हसनने हुशारी करून मला वॉकी-टॉकीवरून सावध केलं होतं व वेगळा रस्ता पकडायला सांगितलं होतं.
चाचर्डा मागे टाकून आम्ही रंगरावपाशी पोचलो. रंगरावचं मोडकळीस आलेलं विश्रमगृह भुताखेताच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होतं. विशेष करून ‘शीर नसलेल्या घोडेस्वाराच्या’. (अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही.) गवती छप्पर असणारं हे विश्रमगृह काही वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. आम्ही जोता, अर्धवट पडलेल्या भिंतीची पाहणी केली. रंगरावच्या जवळ ‘सुकली भुरा’ (स्थानिक भाषेत सुकली म्हणजे रानडुक्कर) नावाचा पाणवठा आहे. मला असं सांगितलं गेलं की इथे एक तहानलेलं रानडुक्कर पाणी पीत असताना पाण्यात बुडून मेलं होतं, त्यामुळे त्याचं तसं नाव पडलं होतं.
पूर्वी रंगराव नावाचं एक छोटं गाव होतं. साथीच्या आजारामुळे हे उजाड झालं होतं. गावाजवळ एक विहीर होती. व्याघ्र प्रकल्पाच्या आधीच्या अधिका:यांनी वन्यप्राण्यांना उपयोगी पडेल या दृष्टीने विहिरीवर पवनचक्की बसवली होती. या विहिरीजवळ टाकळा ही वनस्पती बेसुमार वाढलेली होती. टाकळ्याचं अस्तित्व मानवी वस्तीचं द्योतक आहे. साधारणत: टाकळा 2-3 फूट वाढतो, पण इथे मी दहा फूट उंचीच्या टाकळ्यामधून मार्ग काढत होतो. मी असा माजलेला टाकळा पाहिला नव्हता किंवा त्याबद्दल काही ऐकलंही नव्हतं.
सिपनाखंडीला (बोलीभाषेत सागाची भरपूर झाडं असणारी खिंड) जंगली केळ्याच्या पानावर आरामात जेवण उरकून आम्ही गंगराम नाल्याच्या दिशेने निघालो. इथल्या हापशावर आम्हाला एक वेगळंच दृश्य बघायला मिळालं. हापश्यातून आपोआप जोरात पाणी बाहेर पडत होतं. गंगाराम नाल्याच्या वळणाशी एक कढई गोंदाचं भलं मोठ्ठं झाड होतं. कढईच्या झाडाला ‘जंगलातली गोरी तरुणी’ असंही म्हटलं जातं. चांदण्या रात्रीतल्या त्याच्या पर्णहीन रूपामुळे काही जण त्याला ‘जंगलातलं भूत’ असंही म्हणतात. (या झाडापासून अतिशय उत्कृष्ट खाण्याचा डिंक मिळतो.) भूत कुठे आणि तरुणी कुठे!
आम्ही घनदाट जंगलातून चालत होतो. हलकीशी खुसपूस ऐकून रविने आम्हाला सावध केलं. लगेचच अजयला आमच्या उजव्या हाताला टेकडीवरून काळ्या धोंडय़ासारखी वस्तू घरंगळत येताना दिसली. ते पाहताच गुडघ्याइतक्या गवतात पुतळ्यासारखं बसण्याची प्रतिक्षिप्त क्रिया आमच्याकडून घडली. आम्ही गवताच्या पडद्याआडून त्या धोंडय़ाची पुढची कृती पाहू लागलो. तो ‘धोंडा’ म्हणजे एक मस्तवाल सुळेवाला रानडुक्कर होता. तो आमच्यापासून पाच मीटरवर रस्त्यावर येऊन थांबला. त्याला कसलातरी संशय आला म्हणून त्याने त्याचं डोकं आणि नाकपुडय़ा जेवढय़ा वर करता येतील तेवढय़ा हवेत उंचावल्या. तो वास घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. पुतळ्यागत बसलेलो आम्ही आणखीनच थिजून बसलो. खुसपूस चालूच होती. आणखी एक रानडुक्कर आलं. त्यानंतर आणखी एक असं करत एकेक येतच राहिले. तब्बल एक डझनपर्यंत आकडा गेला. सगळेच 6क् किलोच्या वर असणारे आडदांड होते. गमतीचा भाग म्हणजे त्या कोणालाच आमचा मागमूस लागला नव्हता. त्यांच्या पुढा:याप्रमाणो नाकं उंचावून वास घेण्याचा ते प्रयत्न करत होते.
किती नाटय़पूर्ण प्रसंग! तीन नि:शस्त्र मानवप्राणी असहाय्यपणो रस्त्यावर बसून होते आणि डझनभर श्वापदं त्यांच्या हाताच्या अंतरावर होती. त्या प्रत्येकाकडे आम्हा तिघांनाही लोळवण्याची क्षमता होती. हे नाटय़ फारतर तीस सेकंद चालू होतं. त्यानंतर आमच्यापैकी कोणाची तरी कुजबूज किंवा हालचाल म्हणा किंवा त्यांच्या दृष्टीने हवेच्या दिशेत झालेला बदलामुळे त्यांच्या बॉसला आमचं अस्तित्व जाणवलं. क्षणार्धात त्याने एक मोठा फुत्कार सोडला आणि त्यासरशी सगळा कळप आमच्यापासून दूर पळत सुटला.
त्यांच्या खुरांचे आवाज हवेत पूर्णपणो विरेपर्यंत आम्ही वाट पाहिली. त्यानंतर आम्ही आमचे थर्मास उघडले आणि चहाच्या घोटाबरोबर नुकताच घडलेला नाटय़मय घटनाक्रम चघळला. या घटनेतून मी दोन धडे घेतले. एक म्हणजे जंगली श्वापदं नैसर्गिक प्रेरणोने माणसाचं अस्तित्व टाळतात आणि दुसरं म्हणजे वन्यप्राण्यांच्या राज्यात पुतळा बनणं फायद्याचं असतं!
संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही कोहा गावाजवळ पोचलो. इथे गडगा नदी फुगलेली होती. त्यामुळे मानवी साखळी करून ती पार केली.
मी वरचेवर अशी भ्रमंती करत असे आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी ती फार उपयुक्त ठरत असे.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com