अपर्णा वाईकर
जगाच्या पाठीवर पसरलेल्या मराठी माणसांनी कमावलेल्या अनुभवांची, त्यांनी चालवलेल्या धडपडीची कहाणी...
आल्सबाख हे जर्मनीतलं एक खूप सुंदर खेडेगाव होतं. अगदी लहानसं आणि आजूबाजूला भरपूर शेतं असलेलं हे गाव मला खूप आवडलं. आजूबाजूला शेती असलेलं आपल्याकडचं खेडेगाव म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा वास. आजूबाजूने फिरणाऱ्या गाई, बैल, कुत्री असं चित्र डोळ्यापुढे येतं. त्या तुलनेत हे गाव मात्र खूपच वेगळं होतं. अतिशय स्वच्छ, मोकळे रस्ते, टुमदार घरं आणि अगदी शांतता. इतक्या जास्त शांततेची अजिबात सवय नव्हती. नाही म्हणायला पक्ष्यांचे भरपूर आवाज होते.
मी रोज माझ्या मुलाला शाळेतून आणायला जात असे. अर्धा रस्ता ट्रामने आणि अर्धा चालत असा जवळपास दीड किलोमीटरचा प्रवास होता. हा माझा दिवसभरातला ‘बेस्ट टाइम’ असायचा. त्या टुमदार घरांसमोरच्या सुंदर बागा बघत जायला खूप मस्त वाटायचं. प्रत्येक बाग अतिशय सुंदर होती. त्या घरात राहणारे आजी-आजोबा किंवा एखादी गृहिणी बागेत काम करताना दिसायची. अगदी निगुतीने हे लोक आपल्या बागेची काळजी घ्यायचे. प्रत्येक ऋतुप्रमाणे वेगळे रंग आणि वेगवेगळी फुलं बघत जाणे हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम होता.
प्रत्येक सणाला आपण जसं घर सजवतो तसंच जर्मनीतसुद्धा लोक आपली घरं आणि बागा त्यांच्या सणांना सजवतात. त्यांचे सण म्हणजे मुख्यत: हॅलोविन आणि ख्रिसमस. त्यामुळे सप्टेंबरपासूनच सगळ्यांच्या दारात मोठेमोठे कोरलेले लाल भोपळे दिसायला लागायचे. जसजसा हॅलोविन जवळ यायचा तसतसे मोठमोठ्या जाळ्यांत अडकलेले कोळी, झाडूच्या लांब दांड्यावर बसलेल्या चेटकिणी, हाडांचे सापळे, वटवाघुळं असे अनेक चित्रविचित्र भयंकर प्रकार या भोपळ्यांच्या आजूबाजूला जमायला लागायचे. या हॅलोविनचा नक्की काय उद्देश आहे ते मला अजूनही नीटसं कळलेलं नाही. पण शाळेतसुद्धा हॅलोविन परेड असायची. माझ्या मुलाला हॅलोविनचे वेगवेगळे पोशाख घालून जायला मजा येत असे. पण आपल्या घराच्या दारात ऐन दिवाळीच्या तोंडावर अशी भुतंखेतं, कोळ्यांची जाळी आणि वटवाघुळं लावायला माझ्या फार जिवावर यायचं. त्यामुळे ३१ आॅक्टोबरला एकदाचा तो हॅलोविन झाला की या सगळ्या आपल्यासाठी अशुभ असलेल्या गोष्टी मी ताबडतोब गुंडाळून ठेवत असे. शुभ-अशुभ वरून आठवलं, आम्ही जर्मनीत अगदी नवे होतो. घरातल्या सगळ्या वस्तू एक एक करून लावत होतो. तिथल्या भिंतींवर आपण हातोडीने खिळे ठोकू शकत नाही आणि स्वत: ड्रिलिंग मशीन वापरून कपाटं, फ्रेम्स भिंतीवर लावायचा आत्मविश्वास तेव्हा नव्हता. आपल्या भारतात एक फोन केला की ही कामं करायला सुतार येतो. आम्हाला मदत करायला अमितच्या आॅफिसमधला एक माणूस आला होता. हा मनुष्य दारातून आत येताना एक मिनिट जरा थबकला, दारात लावलेल्या तोरणाकडे त्याने निरखून पाहिलं आणि नंतर जरा वेळाने विचारलं,
‘दारात ही जी दोन स्वस्तिकाची चिन्हं लावली आहेत ती का लावली आहेत?’
मी म्हटलं, आमच्याकडे दारात अशी स्वस्तिक आणि ओम लावतात. ती शुभचिन्हं आहेत.
तो जरा दबकत म्हणाला, तुम्हाला जर चालणार असेल आणि खूप त्रास होणार नसेल तर ती दोन स्वस्तिक तेवढी काढून ठेवा. नाहीतर काही लोक तुम्हाला हिटलरचे समर्थक समजून उगाच घरावर दगडफेक वगैरे करतील.
- हे ऐकून मी ताबडतोब ती स्वस्तिक काढून आत देवघराच्या बाजूला लावली- हो, उगाच कशाला विषाची परीक्षा घ्यायची!
एकाच प्रतीकाला असलेल्या शुभ-अशुभाच्या या वेगवेगळ्या अर्थांनी आयुष्यभराचा एक महत्त्वाचा धडा मात्र दिला.
दिवाळीची रोषणाई मात्र आम्हाला खूप दिवस ठेवता यायची. अगदी ख्रिसमस काय, न्यू इयरपर्यंत. मुुलासाठी म्हणून एक छोटा ख्रिसमस ट्री पण आम्ही सजवत असू. दिवाळीत वेगवेगळा फराळ बनवायला घेतला तर वरती राहणारी माझी जर्मन शेजारीण खाली येऊन म्हणाली,
‘ प्लीज तुमची स्वयंपाकघराची खिडकी बंद ठेवा, कारण मला तुमच्या जेवणाच्या वासांनी फार त्रास होतो...’
- मी तिला सॉरी म्हणून खिडकी आणि गॅस दोन्ही बंद तर केला, पण मला कळेना की आता करू काय? स्वयंपाक करताना खिडकी उघडी ठेवायलाच हवी पण हिच्या घरात वास जातो त्याचं काय? आपल्या पदार्थांना येणाऱ्या वासाशी आपल्या सणावारांचं नातं असतं. आपली भूक खवळते खरी; पण दुसऱ्या कुणासाठी तोच वास फार त्रासदायक असतो. मी माझ्या घरमालकीणीला विचारलं. ती शेजारीच राहत असे. तर ती म्हणाली, अगं बगिचाच्या बाजूची खिडकी उघडी ठेव, आम्हाला तुझ्या भारतीय पदार्थांचे वास/सुगंध खूप आवडतात... प्रॉब्लेम सुटला!
सुदैवानी आम्हाला जर्मनीत त्या वरती राहणाऱ्या बाईसारखे खडूस जर्मन कमी भेटले. आम्ही असं ऐकलं होतं की जर्मन्स फार शिष्ट असतात. पण मला वाटतं ते भाषेच्या प्रॉब्लेममुळे असणार. बऱ्याच लोकांना इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे ते स्वत:हून आपल्याशी बोलायला येत नाहीत. पण एकदा का त्यांना कळलं की आपल्याला त्यांची भाषा येतेय, मग ते अगदी दिलखुलास गप्पा करतात. अर्थात मैत्री होण्यासाठी भाषेचं बंधन नसतं याचादेखील एक गोड अनुभव आम्हाला आला. माझे सासू-सासरे आमच्याकडे जर्मनीत मुक्कामाला आलेले होते. भयानक थंडी होती. माझा धाकटा मुलगा अगदीच महिन्याचा असल्यामुळे माझे सासरेच रोज मोठ्या मुलाला शाळेतून आणायला जात. घरातून निघून त्याला शाळेतून घरी घेऊन यायला साधारण ४० मिनिटे तरी लागत. १-२ आठवड्यांंनी एकदा नातू आणि आजोबांची जोडी २० मिनिटांतच घरी पोचली! आम्हाला आश्चर्य वाटलं. ‘एवढ्या लवकर कसे आलात?’- मी विचारलं, तर बाबा म्हणाले, ‘तुझ्या जर्मन मैत्रिणीच्या वडिलांनी आज आम्हाला घरी सोडलं.’ ही माझी मैत्रीण अजून पलीकडे राहायची. ती बऱ्याच वेळा आम्हाला तिच्या गाडीतून घरी सोडत असे. हे तिचे वडील, बाबांना रोज थंडीतून चालत जाताना बघायचे. ते थोडे दिवस तिच्या घरी राहायला आले होते म्हणून नातीला शाळेतून आणायची ड्यूटी त्यांनी स्वत:कडे घेतली होती. त्यांना इंग्रजी बोलता येत नव्हतं, पण त्यांनी खुणा करून बाबांना सांगितलं की ते त्यांना घरी सोडतील. आधी बाबा नाही म्हणाले, मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या मुलीकडून इंग्रजीत लिहून आणलं एका चिठ्ठीवर की मला तुम्हाला घरी सोडायला आवडेल. एवढ्या थंडीत तुम्ही चालत जाऊ नका.
- त्यानंतर अगदी महिनाभर त्यांनी हे काम केलं. ते जर्मनमध्ये अधूनमधून एखादा इंग्रजी शब्द घालून बाबांशी बोलत असत. अशी ही अफलातून मैत्री होती. जेव्हा ते परत गेले तेव्हा त्यांनी बाबांना गुड फ्रेंडशिपवरचं एक जर्मन ग्रीटिंग कार्ड दिलं होत. अजूनही खूप वेळा मला त्या काकांची आठवण येते..
(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.)