- हेमंत बरालेअलीकडेच भागात एका महान नेत्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. अशा नेत्याकडून फक्त अशाच डान्स स्पर्धा, नाचगाणे, पार्टी यांचीच अपेक्षा करावी. कारण त्यांच्याकडून समाजकार्य अशक्यच. अनाथ, अपंग, गरजू विद्यार्थी, मुलांना मदत करावी, वाढदिवसानिमित्त समाजकार्य करावे. पण अशा गोष्टी सुचायलाही डोकं लागतं.
एक काळ असा होता की भारतीय नेते लंडन, केंब्रिज यासारख्या विद्यापीठांत ‘टॉपर’ असत. कायदा, आंतरराष्ट्रीय राजकारण यातील विद्वान असत. त्यामानाने आजचे नेते (अपवाद वगळता ) मंत्रालयात जाऊन काय करतात हा संशोधनाचा विषय ठरेल. कोणत्याही विषयावर बोलायचं झाले की त्या विषयाचा सखोल अभ्यास व कायद्याचे ज्ञान पाहिजे. विधानमंडळातील चर्चा यांच्या डोक्यावरून जाते. हे काय बोलणार?.कायदा करण्यापेक्षा कायदा मोडण्याबाबत मात्र हे आग्रही असतात. ‘मी रस्त्यावर येणार आणि डॉल्बी लावणारच, बघतो मला कोण आडवतो.’बाजूला दवाखाना आहे. वृद्ध, गरोदर स्त्रिया असतात. त्यांच्याशी काही देणं-घेणं नाही. डॉल्बी चाललाच पाहिजे. कारण त्याशिवाय तरुणाई नाही. मग यांच्या पाठीमागे कोण फिरणार. आजचे तरुणही तसेच पार्टी, बिअर, माव्याची सोय झाली बास.... कर्तव्याची जाणीव नाही, भविष्याची चिंता नाही, स्वाभिमान म्हणजे काय; याचा अर्थही माहीत नाही. हे कसले तरुण... आणि अशाच कर्तृत्वहीन, बुद्धिशून्य, क्षणिक सुखाच्या मागे मागे लागलेल्या तरुणांमुळे असे नेते मोठे होतात.गुंड बनतात आणि अशाच गुंडांनी व चमच्यांनी उद्या तुमच्या आया-बहिणींवर हात घातला की सहन करणे किंवा पोलिसांच्या नावाने बोंब मारणे याशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणजे कचऱ्याचा ढीग करायचा तुम्ही आणि साफ करायचा पोलिसांनी?... म्हणून समाजाला तोच नेता मिळतो जी त्या समाजाची लायकी असते. दोष नेत्यांचा मुळीच नाही. दोष आहे तो विचारहीन तरुणपिढीचा. जे अशा नेत्यांना मोठे करतात.
उत्तरेतील व दक्षिण भारतातील मुले युपीएससी, राजकारण, संशोधन, व्यापार, विद्वत्ता याबाबत पुढं आहेत. जेएनयूसारख्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी बोलायला भारतातील नेते का घाबरतात? जगातील अनेक संविधानांचा अभ्यास त्यांनी केलाय. त्यांच्यासमोर असले नेते काय बोलणार?काल रस्त्यावरून जाताना साहेबांच्या वाढदिवसाचे केक पडलेले दिसले. त्यातील एक केक कुत्रा खात होता आणि बाजूला एक गरीब कपडे फाटलेले अनवाणी चार-पाच वर्षाचा मुलगा त्या केककडे पाहत होता...
‘साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’