- सतीश पाकणीकर
सुमारे वर्षापूर्वीची आठवण आहे. काही कामासाठी मला पुण्याच्या सिंहगडरोडनजीक ‘आवर्तन गुरुकुल’ येथे जाण्याचा योग आला. गुरुकुलात गायन-वादन-नृत्य यांची आराधना केली जाते. ‘गुरु-शिष्य’ परंपरेतून विद्यादान केले जाते. तेथील जागेत काही कलाकारांच्या भावमुद्रा लावण्याचे ठरले. त्या कामासाठी मी पोहोचलो होतो. आजचा लोकप्रिय व प्रतिभावान तबलावादक, माझा गेल्या चाळीस वर्षांपासूनचा मित्र रामदास पळसुले मला एक-एक हॉल दाखवत होता. कोठे कोणता फोटो लावता येईल याचा आम्ही अंदाज घेत होतो. माझ्या मनात कलाकारांच्या नावाची यादी तयार होत होती. इतक्यात आम्ही एका हॉलमध्ये पोहोचलो. कानावर आवाज आधीच पडत होता. इंग्रजी सी या आकारात साधारण तीस ते चाळीस तबलावादक बसले होते. लहान- मोठे सर्व वयाचे. ते सर्व एकत्रितपणे वादन करीत होते. तबल्याच्या क्लासच्या गॅदरिंग कार्यक्रमात मी पाच-सहा जणांचा एकत्रित तबला ऐकला होता. पण हे दृश्य वेगळेच होते. त्या प्रत्येकाच्या वादनातून निघणारे बोल सुस्पष्ट तर होतेच; पण त्यांचे वादन इतके एककालीन होते की प्रत्येकाचा हात शेवटच्या बोलाला एकसारखा एकाच प्रकारे हलून समेवर येत होता. त्या सर्वांच्या एकत्रित वादनाने तो हॉल नादमाधुर्याने ओसंडून वाहत होता. त्यांच्या समोरील आसनावर पुढय़ात तबला-डग्गा घेऊन बसले होते त्यांचे गुरु तालयोगी पंडित सुरेश तळवलकर. प्रत्येक शिष्यावर त्यांची नजर फिरत होती. सर्व ग्रुपने एक जोरदार तिहाई घेतली आणि गुरुंच्या चेहर्यावर समाधानाचे हसू उमटले.त्यांच्या चेहर्यावरचे ते हसू पाहून मला एकदम मी त्यांचा केलेला पहिला फोटोसेशन आठवला. एखाद्या कलावंताचा मला करायला मिळालेला तो पहिलाच फोटोसेशन असावा. सुरेशजी त्यावेळी मुंबईत राहत असत. पण अधून मधून पुण्यात येत. नृत्यांगना शमाताई भाटे यांच्या कथकनृत्याच्या ‘नादरूप’ या क्लासवर. शनिवारवाड्याच्या जवळ असलेल्या या क्लासवर विद्यार्थिनींची नृत्यसाधना सतत सुरूच असे. तेथे फोटोसेशन करण्याचे ठरले. त्यावेळी माझ्याकडे ना होता स्वत:चा स्टुडिओ ना होते अद्ययावत असे स्वत:चे फ्लॅश लाइट्स. पण एक ‘सनगन’ नामक साधा फिलॅमेंट लाइट होता. कॅमेरे मात्र दोन. एक रंगीत फोटोंसाठी व एक कृष्णधवलसाठी.ठरलेल्या वेळेपूर्वी तेथे पोहचून मी तयारी केली. थोड्याच वेळात पं. सुरेशजी आले. त्यांच्याबरोबर हार्मोनियमवादक र्शी. आप्पासाहेब जळगावकर व सारंगीवादक र्शी. मधुकर खाडिलकर होते. तसेच सुरेशजींचे काही शिष्य होते. त्यातच त्यांच्याबरोबर तबला साथीला होता शांतीलाल शाह. त्याची व माझी मैत्री होतीच. वाद्यांची जुळवाजुळव झाली. सुरेशजींनी समोरील तबल्यावर थाप मारली आणि पुढच्याच क्षणी सारंगीचे व संवादिनीचे सूर वातावरणात भरून गेले. त्या दोघांच्याही लेहर्याची सम पकडत सुरेशजींनी पेशकार सुरू केला. त्यांच्या एकेक आवर्तनाबरोबर वादनात आणि वातावरणात उत्साह भरत गेला. आवर्तनांच्या सलग मालिकेतून लयीशी खेळत खेळत सुरेशजी व आप्पासाहेब एकमेकांना जी दाद देत होते त्या भावमुद्रा टिपताना मीही त्यांची ती सम गाठण्याचा आपोआप प्रय} करू लागलो होतो. र्शी. खाडिलकर मात्र मधूनच हसून दाद देत होते.माझी तांत्रिक अडचण अशी होती की तेथे असलेला उपलब्ध प्रकाश मला प्रकाशचित्रणास पुरेसा नव्हता. प्रकाशचित्रात करकरीत सावल्याही मला नको होत्या. त्यामुळे ‘सनगन’ छताच्या बाजूस वळवून परावर्तित प्रकाशात मी चित्रण करीत होतो. पण ‘प्रकाशाची तीव्रता ही ऊर्जेच्या स्रोतापासून चित्रविषयाचे जे अंतर असेल त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात कमी होत जाते’ हे मी शिकलेलो असल्याने प्रकाशाची पुरेशी तीव्रता मला मिळत नसूनही मी प्रकाशचित्रण करण्याचे ठरवले होते. कॅमेर्यावरील शटरस्पीड बराच स्लो वापरायला लागत होता. सुरेशजींची बोटे, त्यांचा हात त्यापेक्षा जास्त वेगाने हलत होता. पण माझी ही अडचणच माझ्या मदतीला धावून आली. कोणत्याही प्रकाशचित्रात आपण कमी-जास्तपणे तीन मिती अनुभवू शकतो. लांबी, रुंदी व खोली. प्रत्यक्षात असलेली चौथी मिती म्हणजे काळ. स्लो शटरस्पीडमुळे मला त्यांच्या हाताच्या बोटांची तसेच हाताची हालचाल आपोआप मिळत होती. त्यामुळे त्या प्रकाशचित्रात एक प्रकारचा जिवंतपणा येऊ शकत होता. आणि मी तेच केले.घरीदारी सतत सूर, ताल यांच्या उपासनेत व चिंतनात रममाण झालेल्या, समरस झालेल्या व सतत संगीतातच राहणार्या एका कलासक्त तबलीयाचे चित्रण मी करीत होतो. हा तबलीया स्वत:च्या वादनातून आनंद तर घेत व देत होताच; पण आपल्या शिष्यालाही भरभरून देत होता. आपलं ज्ञानदानाचं उत्तरदायित्वही सांभाळत होता. साधना म्हणजे स्व-अहंकार वजा करून आनंदाने केलेला रियाझ - याची प्रचिती देत होता. लयीचे निरनिराळे छंद निर्माण करीत ती अवघड लयकारीही करायला सोपी आहे असे माझ्यासारख्या अज्ञाला वाटेल असे वादन करीत होता. आणि त्या बरोबरच ऊर्जा प्रवाह निर्माण करीत होता. वेळ व माझी फिल्म कधी संपून गेली हे कळण्याचं भानही मला राहिलं नव्हतं. तो फोटोसेशन मी म्हणूनच कधीही विसरू शकणार नाही. त्यात मी टिपलेली प्रकाशचित्रेही सुरेशजींना खूपच आवडली. त्यानंतर कार्यक्रमात त्यांची भेट नेहमी होत राहिली. कलाकार म्हणून मोठे असूनही मला त्यांच्याभोवती अहंमन्यतेचे वलय जराही अनुभवास आले नाही. कधीही संपर्कात अडसर आला नाही.नंतर काही काळाने ते पुण्यातच राहायला आले. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांची भेट होत राहिली. 2015 साली माझ्या थीम कॅलेंडरच्या मालिकेत मी एका थीमचा बर्याच दिवसांपासून विचार करत होतो. भारतीय संगीत परंपरेतील लय-ताल समृद्ध करणारे व संगत करणारे वाद्य म्हणजे ‘तबला’. नुसतेच साथीचे वाद्य म्हणून नव्हे तर स्वतंत्र वादनासाठीही या वाद्याचे वेगळे असे स्थान आहे. संगीत रसिकांना तबलावादकांबद्दलही अतिशय आपुलकी आणि उत्सुकता आहे. म्हणून मी तबला ही थीम म्हणून घेण्याचे ठरवले. माझ्या मनात कलाकारांची यादीही तयार झाली. मनात अजून एक विचार आला की, या सर्व कलाकारांच्या वादनाची वैशिष्ट्य जर कोणी जाणकार व्यक्तीने उलगडवून दाखवली तर त्यांच्या प्रकाशचित्रांबरोबरच रसिक या वैशिष्ट्यांचेही जतन करतील.मनात एकाच व्यक्तीचे नाव आले ते म्हणजे तालयोगी पं. सुरेश तळवलकर. त्यांची सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, कार्यशक्ती सारेच अलौकिक आहे याचा अनुभव होताच. ते तबलानिपुण तर आहेतच; पण एक ऊर्जावंत गुरु व एक रसिक संगीततज्ज्ञ भाष्यकार आहेत हेही माहीत होतेच. शिवाय माझ्या थीममध्ये समाविष्ट कलाकार उस्ताद अहमद जान थिरकवाँ खाँसाहेबांपासून ते पं. अनिंदो चटर्जी यांच्यापर्यंत सर्व वादकांना समक्ष ऐकलेले व त्यांचा सहवास लाभलेले असे आहेत हाही मुद्दा महत्त्वाचा होता. ‘पण ते याला तयार होतील का?’ हा मुद्दा बाकीच होता.नुकतेच त्यांचे ‘आवर्तन’ नावाचे ‘भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता’ यांचा ऊहापोह करणारे अप्रतिम असे पुस्तक प्रकाशित झाले होते. ‘सर्वच कलाकारांना आपल्या कलेतील तन्मयतेचे ज्यांनी टिपलेले फोटोचित्र पाहावेसे वाटते, त्या सतीश पाकणीकर यांना मनापासून अनेक शुभेच्छा !’ असे लिहून त्यांनी त्याची प्रत मला दिली होती. मी त्यांना फोन केला व भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यांनी ‘दोन दिवस मी जरा कामात आहे, नंतर भेटू’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी फोन करायचा हेही ठरले.पण लगेच थोड्याच वेळात मला त्यांचा फोन आला. म्हणाले - ‘सतीश, काम काय आहे हे तू सांगितलेच नाहीस.’ मी त्यांना माझ्या मनातील थीमविषयी सांगितल्यावर पुढच्याच क्षणी ते म्हणाले - ‘तू यादी लिहून घे !’ माझ्या मनात यादी तयार असूनही मी ‘हं’ म्हणत यादी लिहू लागलो. ती पूर्ण झाल्यावर मी म्हणालो - ‘सुरेशजी, तुम्ही प्रत्येक कलाकाराबद्दल, त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोला. मी ते रेकॉर्ड करून घेईन. नंतर तो मजकूर एडिट करता येईल.’ याच्यावर ते म्हणाले - ‘मी दोन-तीन दिवसांनी ढाक्यास जाणार आहे. पण हे कामही महत्त्वाचे आहे. तू उद्याच ये. मी विचार करून ठेवतो.’ दुसर्याच दिवशी 21 ऑक्टोबर 2014 रोजी मी, माझा भाऊ हेमंत, त्यांची शिष्य व कन्या सावनी, शिष्य रामदास पळसुले व र्शीकांत शिरोळकर यांच्या उपस्थितीत ‘तालतत्त्व’ हे नामाभिधान असलेल्या कॅलेंडरसाठी पं. सुरेशजींनी सर्व कलाकारांविषयी आस्थेने; पण नेमकेपणे भाष्य करीत मैफल रंगवली. त्यांनी सांगितलेल्या नावांपैकी फक्त पं. चतुरलाल हे नाव माझ्या यादीत नव्हते. मग विचार करून त्यांनी माझ्या यादीतील एकामागून एक अशा कलाकारांच्या आठवणी आणि त्यांची गुणवैशिष्ट्य ऐकवताना आमचे साडेचार तास कसे गेले हे कळलेही नाही. त्यांच्याच सूचनेनुसार र्शी. केशव परांजपे यांनी त्या बोलण्याचे कॅलेंडरला योग्य अशा भाषेत व शब्दात रूपांतर केले.माझ्या सुदैवाने त्या कॅलेंडरच्या मुखपृष्ठाच्या फोटोसाठी साक्षात उस्ताद अहमद जान थिरकवाँ खाँसाहेबांचा त्यांनी वाजवलेला तबला माझे मित्र सुरेंद्र मोहिते यांनी उपलब्ध करून दिला. माझ्या दृष्टीने तर तो या कॅलेंडरला मिळालेला थिरकवाँ खाँसाहेबांचा आशीर्वादच. यादरम्यान पं. सुरेशजींची एक खासियत मला जाणवली. आपल्या पूर्वसुरींबद्दल बोलताना ते आदराने तर बोललेच; पण आपल्या समकालीन व आपल्यापेक्षा लहान असलेल्या कलाकारांबद्दलही हातचे न राखता व अत्यंत आपुलकीच्या नात्यानं बोलले. ‘तालतत्त्व’चे प्रकाशन सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते व पं. सुरेशजी व त्यांचाच सुप्रसिद्ध शिष्य विजय घाटे यांच्या उपस्थितीत पार पडले.त्याच्या पुढच्या वर्षीही सुरेशजींनी मला बोलावून घेतले व त्यांच्या मनातील थीम सांगत त्या बारा कलाकारांविषयीही बोलले. त्याची परिणती म्हणजे 2016 सालचे ‘स्वर-दर्शी’ हे कॅलेंडर. स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळात ख्याल गायनाची ध्वजा फडकती ठेवण्यात ज्या कलाकारांचे योगदान महत्त्वाचे आहे अशा बारा गायक-गायिकांचा या कॅलेंडरमध्ये समावेश होता. याच काळात मी त्यांचे ‘आवर्तन’ हे पुस्तक हळूहळू वाचले. हळूहळू यासाठी की, मी कोणी ‘गाणे-बजावणे’ करणारा नाही. मी आहे एक रसिक व गाणे-वाजवणे प्रेमानं ऐकणारा. बरोबरीनेच प्रकाशचित्रकलेचा एक साधक. ‘गाणे-बजावणे’ करणार्यांसाठी तर हा ग्रंथ उपयोगाचा आहेच; पण वाचल्यावर माझ्या लक्षात आले की इतर कलांची साधना करणार्या कलाकारांनाही यातून अनेक मार्गदर्शक गोष्टी दिसतील.‘आवर्तन’मध्ये सुरुवातीच्या भागातच एक प्रकरण आहे. ‘शास्र, तंत्र, विद्या, कला’ या नावानी. पं.सुरेशजींनी जरी हे प्रकरण भारतीय शास्रीय संगीत समोर ठेवून लिहिलेले असले तरीही मला असे वाटते की, हे प्रकरण जसेच्या इतर कलांना लागू होईल. पं. सुरेशजींच्या मते थोडक्यात - ‘काय करू नये हे काटेकोरपणे सांगतं ते शास्र. शास्राचा संबंध बुद्धीशी आहे. कलानिर्मितीसाठी कठोर शास्रबंधनं लवचिक करणं हेही शास्राचं सार्मथ्य. नंतर येतं तंत्र. गायन-वादन-नृत्य तिन्हींना सक्षम तंत्राशिवाय तरुणोपाय नाही. तंत्राचा संबंध थेट शरीराशी आहे. त्यानंतर येते विद्या. विद्या म्हणजे ‘मॅटर’. विद्येचा सागर हा अगाध आहे. बुद्धी हे विद्येचं आर्शयस्थान आहे. नंतर येते कला. कला म्हणजे सौंदर्य, आनंद, ऊर्जा, प्रेरणा. सर्वसामान्यांना मोहून टाकते ती कला. कला म्हणजे प्रत्येक कलाकाराची वैयक्तिक अभिव्यक्ती. जसा शास्राचा व विद्येचा संबंध बुद्धीशी, तंत्राचा संबंध शरीराशी आहे तसा कलेचा संबंध मनाशी आहे.’ हे सारे विवेचन मी प्रकाशचित्र या कलेला लावले. आणि माझ्या असं लक्षात आलं की, ते सर्व तंतोतंत लागू पडते. पं. सुरेशजींनी या लिखाणाने सर्व कलांवरच महत्त्वपूर्ण भाष्य करून ठेवले आहे.पं. सुरेशजींचा आणखी एक विशेष असा पैलू म्हणजे त्यांची गुरु-शिष्य परंपरेवर असलेली नितांत र्शद्धा आणि त्याचे आचरण. ते शिष्याची सहा लक्षणं सांगतात - सर्मपणभाव, भक्तिभाव, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि निष्ठा. तर गुरुकडे आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे तो ज्ञानी हवा, कसं शिकवावं हे त्याला माहीत हवं व त्याची शिकवण्याची मनापासून इच्छा हवी. त्यांच्या सर्व शिष्यांकडे पाहिल्यावर शिष्यांचे हे गुण पारखून त्यांनी विद्यादान केलंय यावर विश्वास बसतो व त्यांच्या गुरुकुलाबाबत आदर वाढतच जातो. परंपरा आणि नवता यांचा यथायोग्य वापर करणार्या, संगीत हीच अर्चना, तीच साधना व उपासना मानणार्या, संगीताबद्दल चौफेर व सखोल चिंतन करणार्या या ‘तालयोगीं’चा सहवास आपल्यासाठी भाग्यवैभव नाही का?
sapaknikar@gmail.com(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)