- अंकुश काकडे - पुणं विद्येचं माहेरघर आजही आहे, पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात असेल, मग ते शिक्षण शालेय, महाविद्यालयीन आणि आता तर एमपीएससी, यूपीएससी, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारीत पुण्याचा हात दुसरं कोणतंही शहर धरू शकणार नाही, अर्थात ग्रामीण भागातून, परप्रांतांतून येणाºया या विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो तो निवाºयाचा, जेवणाचा, सकाळी-सकाळी गरम चहाचा, पण ही अडचण पुण्यात कुठेच येत नाही, हेही तितकेच खरं!पुण्यात १०-१५ वर्षांपर्यंत शहराच्या मध्यवस्तीत साधारणत: १५ बाय १५ फुटांची छोटी-छोटी हॉटेल होती, अर्थात ती फक्त चहासाठीच प्रसिद्ध होती. ‘अमृततुल्य’ नावानं ती पुणेकरांना सुपरिचित होती.राजस्थानातील दवे समाजातील मंडळी पुण्यात व्यवसायाच्या निमित्तानं आली आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. ब्राह्मण समाजातील दवे, ओझा, डांगी, व्होरा, त्रिवेदी, जोशी अनेक नावं या व्यवसायात आपण पाहत होतो, साधारणत: ४०० दवे मंडळी त्या वेळी पुण्यात हा व्यवसाय करीत होती. यांच्या हॉटेलचे नावांत बहुतेक शंकराशी संबंध असे, जसे की ॐ नर्मदेश्वर, ॐ नागनाथ, कैलास भुवन, वैजनाथ भुवन, जबरेशर भुवन, आबू निवास, महालक्ष्मी भुवन, अंबिका भुवन, बंदुकक्षणी भुवन ( हे देवीचे नाव आहे) अशी ही नावे. पुण्यातील पहिले अमृततुल्य सोन्या मारुती चौकातील ‘आद्य अमृततुल्य’! तसं म्हटलं तर आद्य अमृततुल्यला ९५ वर्षांचा इतिहास आहे. २७ जुलै १९२४ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी या हॉटेलची विश्वनाथ पन्नालालजी नर्तेकर यांनी स्थापना केली. पुढे त्यांचे चिरंजीव खोबाचंद यांनी ते सुरू ठेवले. खोबाचंद यांची तीन मुलगे शरद, चंद्रशेखर, विजय आणि आता चौथ्या पिढीतील राहुल, रोहित हेदेखील या व्यवसायात आहेत.बैठी व्यवस्था बदलून आता नाविन्यपूर्ण सजावट केलेले अमृततुल्य आजही चहासाठी प्रसिद्ध आहे. आजही तांबोळी मस्जिद पोलीस चौकीतील पोलिसांच्या कामाची सुरुवात ‘आद्य’चा चहा घेतल्याशिवाय होत नाही, असे चंद्रशेखर नर्तेकर अभिमानाने सांगतात. स्वच्छ बैठी मांडणी स्टोव्ह, पितळी मोठे भांडे, त्यात दूध-चहा, शिवाय तो चहा करताना तो वरगाळ्यातून अगदी वरपर्यंत नेताना ती पाहण्यातही एक वेगळी अशी मजा असे, काचेची कपबशी, पितळी किटली असे छोटे स्वरूप तेथे असे. मालकच स्वत: चहा बनविणारा असे. बहुतेक मालक धोतरधारी होते, साधा चहा म्हटला तर त्यात इलायची असे, स्पेशल चहा म्हटला तर आलं, इतर मसाला त्यात असे. काही ठिकाणी कॉफीही मिळत असे, पण कुठेही जा, चहा-कॉफी तयार करूनच मिळत असे, हॉटेलमध्ये नोकरवर्ग फार नसे, २ किंंवा ३ नोकर खूप होते. काळानुरूप यात थोडा-थोडा बदल होत गेला. चहा-कॉफीबरोबरच खारी, क्रीमरोल, बिस्कीट, केक काही ठिकाणी मिळू लागले, रॉकेलच्या स्टोव्हची जागा पुढे गॅसने घेतली, व्यवसायात स्पर्धा होऊ लागली, मग साहजिकच सामोसा, पॅटीस, टोस्ट काही ठिकाणी पाव सँपलही मिळू लागला, पण गेल्या १०-१२ वर्षांत चहा व्यवसायाला वेगळं असं स्वरूप येऊ लागलं. चांगलं फर्निचर, देखणी मांडणी, कारण ग्राहकवर्गही बदलत गेला. कॉलेज तरुण-तरुणींचा मोठा वर्ग या नवीन चहाकडे वळू लागला, त्यात चहाची नावेदेखील अशीच प्रेमाचा चहा, बासुंदी चहा, पुरंदर चहा, कडक स्पेशल, येवले चहा अशी नावीन्यपूर्ण, तर हॉटेलात चहाची किटली, गाळणी, वेगवेगळ्या पाट्या पाहावयास मिळतात. शिवाय पूर्वी छोटी असलेली चहाची दुकाने आता त्यांचा विस्तारही मोठा झालाय, मोठ-मोठी जागा, बसण्यास एैसपैस जागा, त्यामुळे दवे मंडळींचा चहाचा व्यवसाय या नवीन मंडळींनी घेतला.बदलत्या काळानुसार दवे मंडळींनी मात्र हा बदल स्वीकारला नाही. काही ठिकाणी नवीन तरुण मंडळींनी हा बदल आत्मसात करून काळाबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वीही झाले, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे टिळक रोड सदाशिव पेठेतील तिलक स्नॅॅक्स सेंटर, आज केव्हाही जा, या हॉटेलच्या बाहेर कॉलेज तरुण-तरुणींचा मोठा जथा तेथे पाहावयास मिळतो, अगदी रस्त्यावर उभे राहून, बाईकवर बसून प्रेमाच्या गप्पा मारत ‘तिलक’चा चहा घेणं ही तर आता फॅशनच झाली आहे. अनेक वेळा गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी तेथे होते. पण त्याची फिकीर ना ह्या तरुणाईला असते ना हॉटेलमालकाला. अर्थात ही नवीन चहाची हॉटेल आपण पाहतो. गेल्या ४-५ वर्षांत त्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे, पण थोडं बारकाईनं पाहिलं, तर जेवढ्या जोशात ही सुरू झाली, तेवढा त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. पण हा प्रतिसाद अनेक ठिकाणी ओसरला जाऊ लागला आहे. काही ठिकाणी नेहमी ५०-६० तरुणांचीच गर्दी जेथे असे तेथे आता ७-८ पर्यंत ही संख्या रोडावलेली दिसते. अर्थात दवे मंडळींची ‘अमृततुल्य’सुद्धा कमी होत चालली आहेत, ज्या पुणे शहराच्या कानाकोपºयात २५०-३०० ची संख्या असलेली ही हॉटेल आता अगदी ३०-४० पर्यंत आली असल्याचे टिळक रोडवरील ॐ नागनाथ भुवनचे मदन दवे यांनी सांगितले. दवे मंडळींनी आता आपल्या अमृततुल्यची जागा कपडे, औषधे, चष्म्यांनी घेतल्याचे रणजित दवे यांनी सांगितले. या अमृततुल्यपासून सुरुवात केलेले काही जण व्यवसाय बदलून फार मोठे झाल्याची उदाहरणेही आहेत. लक्ष्मीकांत त्रिवेदी यांचे रास्ता पेठेत ‘श्री निवास’ हे छोटं अमृततुल्य होतं, पण पुढे त्यांनी ते बंद करून विद्युत ट्रान्सफॉर्मर व्यवसायात ते शिरले, आज देशातील मोजक्या मोठ्या उद्योगपतींमध्ये त्यांची गणना केली जाते. अगदी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला, तर दिलीप ठाकूर यांनी नाना पेठेत सुरू केलेलं अमृततुल्य बंद करून बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. आज त्याच ठाकूरांच्या अनेक मोठ्या स्किम्स पुणे शहरात उभ्या राहिल्याचे आपण पाहतो. पूर्वीच्या हॉटेलमध्ये चहासाठी पितळी किटली, नंतर स्टिलची किटली, आता ती जागा थर्मासने घेतली आहे. पण आज जग एवढे पुढे गेले आहे तरी हे चहा हॉटेल व्यावसायिक आपल्या धंद्याची सुरुवात एक ग्लास पाणी व एक कप चहा जमिनीला अर्पण केल्याशिवाय करीत नाहीत, हे मात्र खरं.(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
' अमृततुल्य' ची चवच लई न्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 9:39 PM