शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

थलैवा...शिवाजीराव गायकवाड, आज काय करणार आहात तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 7:29 PM

‘राजकारण मला नवं नाही. मी अधिकृतपणे कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नसला, तरी १९९६ पासून मी आहेच की राजकारणात’ असं सांगून रजनीकांतने आपला ‘फायनल’ निर्णय जाहीर करण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला आहे... ‘दीपोत्सव २०१७’ या ‘लोकमत’च्या बहुचर्चित दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या प्रदीर्घ लेखातला हा संपादित अंश त्यानिमित्ताने...

मुकेश माचकर

आज जो दिसतो, त्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे, देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. सफेद लुंगी आणि शर्टातल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही ! - असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या डिझायनर राजकारणात उतरेल का? उतरला तर चालेल, टिकेल का? राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते. ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का? तामिळ जनता गेली २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...

नान एप्पो वरूवेन एप्पडी वरूवेन यारुक्कुम तेरूयादु. आणा वर वेण्डिय नेरित्तले नान करेक्टा वरूवेन. - मी कधी येणार, कसा येणार, हे कोणालाही माहीत नसतं... मात्र, योग्य वेळी मी नक्कीच येतो.त्यानं त्याच्या खास मिस्कील शैलीत हे आश्वासन दिलं होतं, त्यालाही आता बावीस वर्षं उलटून गेली... तरीही अख्खा तामिळनाडू त्याच्यावर विश्वासून त्याची वाट पाहतोय...जवळपास दरवर्षी दबक्या आवाजात काही चर्चा होतात, लोक एकमेकांना अगदी खातरीनं सांगतात, यंदा नक्की. आता तो येणार म्हणजे येणारच. तोही काही सूचक हालचाली करतो. कधी पक्षाच्या ध्वजाची चर्चा सुरू होते, कधी नावाची. कधी दिल्लीतल्या काही हुशार मंडळींना वाटायला लागतं की आपल्या पक्षाचा झेंडा आता तोच खांद्यावर घेणार तामिळनाडूमध्ये. लोक तयारीला लागतात. सगळ्या प्रस्थापितांची धाबी दणाणतात. पण, ऐनवेळी काहीतरी वेगळीच चक्रं फिरतात आणि तामिळनाडूच्या भाग्यावकाशातला सुपरमेगा महानायक रजनीकांतचा उदय पुन्हा एकदा लांबणीवर पडतो... आपल्या लाडक्या थलैवाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत पाहण्याची तामिळनाडूच्या जनतेची इच्छा अधुरीच राहते... पडद्यावर जनतेच्या सगळ्या सगळ्या समस्यांचा चुटकीसरशी निकाल लावणारा हा महामानव वास्तवातही तोच चमत्कार घडवेल आणि एका रात्रीत, अगदी त्याच्या सिनेमातल्यासारखा सुखी, आनंदी, समस्यामुक्त तामिळनाडू उभा करेल, याची खातरी असलेल्या त्याच्या कोट्यवधी चाहत्यांचा पुन्हा एकदा हिरमोड होतो... - खरं तर रजनीकांतच्या ‘मुथ्थू’ या १९९५ सालच्या सुपरहिट सिनेमातला हा संवाद... निवळ एक टाळ्याखेचक पल्लेदार डायलॉग... त्यातून एवढा मोठा अर्थ का काढायचा? पण, तामिळ सिनेमा इतक्या सोप्या पद्धतीनं चालत नाही... रजनीकांतचा सिनेमा तर नाहीच नाही... तामिळनाडूत सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम नाही, जीवन आहे...आपल्या रितेश देशमुखच्या भाषेत सांगायचं तर, तामिळ जनता भारी, तिचं सिनेमाप्रेम भारी, राज्याचं वास्तवही फिल्मी बनवून घेण्याची तिची हौस भारी आणि सिनेमातून सगळ्या अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं देणारी मंडळी प्रत्यक्षातही आपल्या राज्याचे तारणहार बनतील, हा तिचा दुर्दम्य आशावाद तर लय भारी!सिनेमाच्या कचकड्याच्या जगाकडून त्यांनी केवढ्या मोठ्या अपेक्षा किती काळापासून बाळगल्या आहेत. दरवेळी त्या जगानं त्यांचा आधीपेक्षा मोठा अपेक्षाभंग केला तरी त्यांची ‘भक्ती’ काही ढळत नाही. उर्वरित भारतात अगदी अलीकडेपर्यंत अशी निस्सीम भक्ती पाहायला मिळत नव्हती. कदाचित इतका ‘फिल्मी’ महानेता अगदी अलीकडेपर्यंत उदयाला आला नव्हता, हे त्याचं कारण असेल.तामिळनाडूमध्ये मात्र ही ‘भक्ती’ परंपरा किमान साठ-सत्तर वर्षांपासून बरकरार आहे.‘पराशक्ती’ ते ‘पराशक्ती हीरो’ असा तामिळ जनतेच्या चिकाटीचा अद्भुत प्रवास आहे.‘पराशक्ती’ हा १९५२ साली आलेला तामिळमधला क्रांतिकारक सिनेमा. पराशक्तीचा हीरो म्हणजे थलैवा द ग्रेट- रजनीकांत.‘पराशक्ती’ हा दक्षिणेतल्या द्रविड चळवळीतला एक महत्त्वाचा अध्याय. नंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले एम. करु णानिधी हे या सिनेमाचे लेखक होते आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेले फुलोरेबाज संवाद हे या सिनेमाचं एक प्रमुख आकर्षण होतं. मुळात दक्षिणेतला - मल्याळी जनतेचा काहीसा अपवाद वगळता - एकंदर प्रेक्षकवर्ग भयंकर भावनाशील. दक्षिणेत तर प्रतिमा आणि प्रत्यक्ष यांची अद्भुत सरमिसळ झालेली आणि देवांच्या भूमिका साकारणारे नट देवासमान मानले जाऊ लागलेले... ‘पराशक्ती’ने तर सगळे आयामच बदलून टाकले... तत्कालीन राजकीय-सामाजिक नॅरेटिव्ह थेट सिनेमावाल्यांच्या हातात आलं आणि तत्कालीन सगळ्या चळवळी जणू सिनेमातून व्हायला लागल्या... करुणानिधी आणि मंडळींचे सगळे सिनेमे काही अनुबोधपट किंवा प्रचारपट नव्हते. मात्र, दाक्षिणात्यांच्या आवडीचा कौटुंबिक, सामाजिक आशय मनोरंजनाच्या भडक मालमसाल्यामध्ये घोळवून त्यांनी चटकदार सिनेमे तयार केले आणि त्यांच्यातून आपल्या विचारांचा अगदी व्यवस्थित प्रचार केला... - या सिनेमाच्या राजकारणातूनच द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे आजचे दोन प्रमुख पक्ष उदयाला आले. करुणानिधी आणि एम.जी. रामचंद्रन, जयललिता यांच्या राजवटीही सिनेमाच्या ‘पराशक्ती’मधूनच निर्माण झाल्या. सिनेमातला कोणताही नायक सक्रिय राजकारणात असो-नसो ‘राजकारणा’त नव्हता, असं कधीच नव्हतं. दक्षिण भारतातल्या या अद्भुत जगात पडद्यावरून सिनेमांच्या रूपानंही राजकारण आणि समाजकारणच चालतं.त्यामुळेच, आता ‘पराशक्ती हीरो’ रजनीकांत सक्रिय राजकारणात केव्हा पाऊल टाकतो, याकडे तामिळ जनता डोळे लावून बसली आहे...एम.जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर जयललिता यांनी अण्णा द्रमुकवर पकड बसवली आणि १९९१ साली त्या सत्तेत आल्या. त्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आलेल्या जयललिता यांचा लहरी हैदरसारखा कारभार रजनीकांतच्या फारसा पसंतीला उतरला नसावा. त्यांना सत्तेची नशा चढली आणि त्या तारेत त्या बेताल झाल्या. त्यांच्या विरोधात जो असंतोष उसळला त्याला रजनीकांतनं पडद्यावरून वाट करून दिली.तामिळनाडूसारख्या सिनेमातच जगणाºया राज्यामधले सिनेमालेखक समकालीन परिस्थितीवर भाष्य करणाºया कथाच सांगू पाहत असतात. त्यात रजनीकांतसारखा जनमानसावर अचाट पकड असलेला नायक हाताशी असला, तर तडतडणाºया लाह्यांसारखे संवाद फुटाफुटाला फुटत जातात. त्या सगळ्यांत खासकरून संवाद आणि गीतांमध्ये रजनीकांतचा सक्रिय सहभाग असतोच. म्हणून तर १९९१ साली जयललिता सत्तेत आल्यानंतर आणि अवघ्या वर्षभरात त्यांचे गुण दिसल्यानंतर १९९२ साली रजनीकांतच्या ‘मन्नन’ या सिनेमात नायकाचा संघर्ष होतो तो एका गर्वोन्नत महिलेशी. हा योगायोग नसतो. त्याच वर्षी ‘अण्णामलै’ या सिनेमात नायक रजनीकांत एका मंत्र्याला जनतेनं दिलेली सत्ता जनतेसाठी वापरण्याचा सल्ला देताना दिसला होता, तो योगायोग नव्हता. हा जयललितांना दिलेला इशाराच होता. या सिनेमात सायकलवर बसलेल्या रजनीकांतची छबी लोकप्रिय झाली होती. सायकल हे तामिळ मनिला काँग्रेसचं निवडणूक चिन्ह. त्यांची द्रमुकबरोबर युती होती. त्यामुळे, रजनीकांतच्या या रूपाचा वापर कोणी कसा केला असेल, हे सांगायला नकोच.१९९५च्या ‘मुथ्थू’मध्ये राजकीय अर्थ भरलेल्या संवादांच्या फैरीच्या फैरी झाडल्यानंतर १९९६ साली रजनीकांतनं जयललिता यांना एकाच विधानानं पायउतार करून दाखवलं. ‘जयललिता पुन्हा सत्तेवर आल्या तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही’, असं ते विधान होतं. हा सिनेमातला संवाद नव्हता, थेट विधान होतं. त्यावर द्रमुकनं झडप घातली नसती, तरच नवल. द्रमुकची सत्ता आल्यानंतरही रजनीकांतचा जयललितांवरचा ‘लोभ’ कायम असावा म्हणूनच १९९९च्या ‘पडैयप्पा’मध्येही मन्ननप्रमाणेच खलभूमिकेत एक स्त्री आहे. त्यामुळे, तो टिपिकल दक्षिणी नायकांप्रमाणे सिनेमाभर स्त्रियांवर तोंडसुख घेताना दिसतो. ‘पोंबळ पोंबळेया इरूक्कनुम’ म्हणजे बाईनं बाईसारखं राहावं, असा परंपरावादी पुरुषांच्या टाळ्या-शिट्या घेणारा संवाद म्हणजे जयललितांशी त्यानं घेतलेल्या शत्रुत्वाचा कळसाध्याय. ‘तुझ्याकडे सत्तेची शक्ती आहे, माझ्याकडे जनतेची शक्ती आहे. माझ्या शक्तीपुढे तुझी शक्ती फुटकळ आहे’, असंही त्यानं या सिनेमात थेट बजावलं होतं.जयललितांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रजनीनं खास त्याच्या पद्धतीनं त्यांना दिलेला झटका म्हणून एक किस्सा सांगितला जातो.चेन्नईच्या एका रस्त्यावरून रजनीकांतची कार चालली होती. मध्ये ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. ड्रायव्हरनं चौकशी केल्यावर कळलं की मुख्यमंत्री जयाबार्इंच्या ताफ्यासाठी पुढचा रस्ता अडवण्यात आला आहे.त्या कुठूनतरी विमानानं येणार आहेत. विमानतळावरून त्यांना घरी विनात्रास जाता यावं, यासाठी वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. विमान अजून विमानतळावर उतरायचं असताना काही किलोमीटर दूरचा हा रस्ता बंद करण्यात आला होता.- रजनीनं गाडीतून उतरून पोलिसांना गाठलं. त्यांनी नम्रपणे त्याला त्यांची अडचण सांगितली. रजनीनंही नम्रपणे ‘हे बरोबर नाही’, असं पोलिसांना सांगितलं आणि एक सिगारेट शिलगावून तो आपल्या गाडीच्या बॉनेटवर येऊन बसला...- साक्षात थलैवा या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलाय, हे कळल्यावर त्याच्या दर्शनासाठी अडलेल्या रस्त्यांवरचे सर्व भाविक मोकळ्या रस्त्यावरून धावत निघाले. पोलीस रस्त्यातून चालणाºया माणसांच्या लोंढ्यांना कसा आवर घालणार? आता सगळ्या बंदोबस्ताचा बोºया वाजणार हे लक्षात आल्यावर रजनीकांतची मनधरणी करून त्याला गाडीत बसवलं गेलं. सगळे रस्ते मोकळे केले गेले. रजनीकांतची गाडी बाहेर पडल्यानंतर मग पुन्हा बंदोबस्त लागला आणि रस्ते बंद झाले!- तर वास्तवातही रजनीकांतची ही ‘थलैवा स्टाइल’ आहे प्रश्न सोडवण्याची.रजनीकांतच्या उघड राजकीय भूमिकांमुळे जयललितांचा कट्टर विरोधक असलेल्या द्रमुकचीही अभूतपूर्व गोची झालीच होती. त्यांना रजनीच्या जयाविरोधाचा तात्कालिक फायदा होत होता; पण उद्या हा स्वत:च राजकारणात उतरला तर आपलं काय होईल, या भीतीची तलवारही करुणानिधींच्या डोक्यावर कायमस्वरूपी टांगली गेली होती. रजनी तेव्हा राजकारणात आला असता, तर जयललिता यांना त्यानं भुईसपाट केलंच असतं; पण त्या वावटळीत द्रमुकचाही पालापाचोळाच झाला असता. पण, का कोण जाणे, समकालीन राजकीय परिस्थितीवर सिनेमांच्या माध्यमातून चपखल भाष्य करणारा आणि सत्ताधीशांना ‘तामिळनाडूत त्यांच्यावरही एक महाशक्ती बसलेली आहे’, याची जाणीव करून देणारा रजनीकांत त्या शक्तीचा प्रत्यक्ष प्रयोग करायला मात्र अजूनपर्यंत तरी कचरला आहे.खरं तर त्याच्यात तामिळच नव्हे, भारतीय जनतेला मोहात पाडणारे सगळे गुण आहेत. तो स्वत:च्या बळावर मोठा झाला आहे. एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातून खस्ता खात प्रचंड कर्तबगार, यशस्वी, धनवान व्यक्ती बनण्याचा त्याचा प्रवास त्याच्या कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाट्यमय आणि स्फूर्तिदायी नाही. यशाच्या शिखरावर विराजमान झाल्यानंतरही त्याच्यात कमालीचा साधेपणा आहे. औपचारिक नम्रता आणि ऋजुता तर अमिताभमध्येही आहे; पण ते सुसंस्कारित अलंकृत व्यक्तिमत्त्व आहे. तो त्याचा स्वभाव नाही. रजनीकांतला सिनेमाच्या पडद्यापलीकडे पाहिल्यानंतर आकर्षून घेतं ते त्याचं दिलखुलास हसणं आणि अगदी आतबाहेर नितळ वागणं. ऐन तारुण्यात त्यानं अफाट यश उपभोगलं आहे. यशाबरोबर आलेली सगळी सुखंही मन:पूत भोगून झाली आहेत. या सुखांच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे, असलं पाहिजे, अशी आंतरिक जाणीव असलेल्या माणसाचा हा तृप्त, निर्लेप संन्यास आहे... तोही राजस. देवानं आपलं काम नेमून दिलंय; तो सांगतो, तसं आपण वागतो; तो ठरवतो, त्या मार्गानं आपण चालतो; जे काही करायचं ते मन:पूर्वक करतो, असा त्याचा खाक्या आहे. सुपरस्टारपदाचे कसलेही तामझाम तो मिरवत नाही, पार्ट्या करत नाही. रंगरोगन थापून, खोटे केस लावून, वय लपवून फिरत नाही. क्र ॉफर्ड मार्केटच्या कोणत्याही गाळ्यावर सहज खपून जाईल, असं त्याचं खरंखुरं रूप घेऊन तो बिनधास्त सगळीकडे फिरतो.तामिळ जनतेनं नायकात किंवा पडद्यावरून राज्याच्या सिंहासनावर पोेहचलेल्या कोणत्याही महानायकात अशी परिपक्व निरिच्छा आणि प्रांजळपणा पाहिला नसेल. म्हणूनच ही जनता ‘मुथ्थ’ूमध्ये त्यानं ‘नान एप्पो वरूवेन एप्पडी वरूवेन यारूक्कुम तेरूयादु. आणा वर वेण्डिय नेरित्तले नान करेक्टा वरूवेन’ असं वचन दिल्यापासून २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...भारतातल्या घातक अस्मितावादी राजकारणात करेक्ट वेळ यायची वाट पाहायची नसते; आपण जी वेळ साधू ती करेक्ट बनवून दाखवायची असते, हे रजनीकांतला तेव्हाही कळलं नसावं, अजूनही कळलेलं दिसत नाही...- नाहीतर लोखंड तापलेलं असताना हातोडा मारायला तो चुकला असता का?राजकारणात प्रचंड ऊर्जा लागते, ती त्याच्यात आहे. लोकांच्या मनात प्रचंड मोठं स्थान आहे. पण, किलर इन्स्टिंक्ट आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण, आत्ताच्या टप्प्यातल्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे... ती आशकमस्त टाइप बोलघेवडी फकिरी नाही... सर्व प्रकारची सुखं हात जोडून समोर उभी असताना आणि त्यांचा एकेकाळी रसिकतेनं मन:पूत आस्वाद घेतलेला असताना त्याच्यामधला साधा माणूस हरवला नाही. देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. पडद्यापलीकडे तो जसा असतो तसा दिसतो. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. दक्षिणेचा हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो, तेव्हा तिथे त्याला कोणीही ओळखत नाही. सफेद लुंगी आणि शर्ट घातलेल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही. कुटुंबाचं खासगी आयुष्य तो प्राणापलीकडे जपतो. सार्वजनिक शोबाजीसाठी कुख्यात असलेल्या दक्षिण भारतात तो कुठल्याही समारंभात चमच्यांची फौज घेऊन जात नाही. शक्य तिथं गाडी स्वत: ड्राइव्ह करत जातो. सेटवरही त्याचे नखरे नसतात. झोप आली, तर एसी व्हॅनमध्ये न जाता तो सेटवरच एखाद्या कोपºयात डोळ्यांवर थंड पाण्याची घडी ठेवून आडवा होतो. असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या, दिवसातून सतरा वेळा परीटघडीचे कपडे बदलण्याच्या डिझायनर राजकारणात कसा चालेल? राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते. ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का? की ते ‘बस कंडक्टर ते महानायक’ या भल्या मोठ्या झेपेमध्ये संपून गेलं?२००२ साली, फारशा न चाललेल्या ‘बाबा’ सिनेमातल्या गाण्यात त्यानं म्हटलं होतं,‘कच्चगलाई पथविगलाई नान विरूम्बमात्तेन, कालाथी कट्टलईयाई नान मरक्कमात्तेन.’- म्हणजे मला पक्ष आणि पद यांची आवड नाही, पण मी परमेश्वराचा आणि काळाचा आदेश कधीही विसरणार नाही!तो आदेश त्याला कधी मिळणार याची तामिळ जनता वाट पाहते आहे.वयाच्या ६७व्या वर्षी, आपल्या फॅन क्लब्जच्या संमेलनात, आपल्या खास शैलीत तो संवादांची फैर झाडतो. म्हणतो, ‘राज्यव्यवस्था भ्रष्ट झाली आहे. तामिळनाडूमध्ये लोकशाही सडली आहे आणि योग्य वेळी युद्ध छेडायची तयारी ठेवली पाहिजे...’ त्यावर त्याचे फॅन अत्यानंदानं वेडे होतात... आता हृदयसिंहासनाधिष्ठित थलैवा तामिळनाडूच्या सर्वोच्च आसनावरही विराजमान होणार, या भावनेनं त्यांच्या मनात हर्षाची कारंजी उसळू लागतात...तर हे सगळं असं आहे!...रजनीकांतनं आता विद्यमान सत्ताधीशांना नान वारा वेंदिया नेरम वंधुदिची नी पोगा वेंदिया नेरम नेरुन्गिदिची, म्हणजे माझी येण्याची वेळ झाली आहे, तुझी जाण्याची वेळ झाली आहे, असं सुनावून टाकावं, बस्स... त्याचा हा पंच डायलॉगही नेहमीप्रमाणे सुपरहिट ठरेल... या एण्ट्रीवरही टाळ्याशिट्यांची बरसात होईल आणि हा महानायक वास्तवातही अधिराज्य प्रस्थापित करील यात शंका नाही...पुढे काय होईल, हे पाहायला रजनीचा देव समर्थ आहे... तो ठरवतो आणि रजनी करतो, हा करार तर पक्काच आहे ना!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘बिगुल’ या पोर्टलचे संपादक आहेत.)