शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

Thank You !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 6:00 AM

आजही आपण जिवंत आहोत, जगण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला! पण त्यासाठी कोणीकोणी आपल्याला मदत केली? आपलं शरीर, पंचमहाभुतं, ज्यांच्याबद्दल कृतज्ञ राहावं, पण आपल्याकडून दुर्लक्षित राहिलेल्या अनेक व्यक्ती! त्यांचे आभार एकदा जरुर माना..

ठळक मुद्देजन्म-मरणाच्या अरुंद टोकदार धारेवर आपले आयुष्य सततच उभे असते पण त्याची तीव्र जाणीव या काळात झाली. या जाणीवेने ओळख करून दिली कृतज्ञ भावाची...!

- वंदना अत्रे

दुसऱ्या लाटेचा जीवघेणा तडाखा उग्र होऊ लागला तेव्हाची गोष्ट. कोणी तरी प्रियजन गमावल्याची बातमी देणारा एक तरी फोन दिवसातून यायचा. मावळत्या संध्याकाळी गच्चीवरील छोट्याशा बागेत बसून आसपासची हलणारी नारळाची झाडे बघतांना रोज एकच विचार मनात यायचा. आजही आपण वाचलो, जगण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला. अशावेळी आकाशातील एखाद्या ढगाच्या आडून डोकावणाऱ्या किरणांच्या आड मला त्याचा चेहरा दिसायचा. मिस्कीलपणे हसणारा...! जन्म-मरणाच्या अरुंद टोकदार धारेवर आपले आयुष्य सततच उभे असते पण त्याची तीव्र जाणीव या काळात झाली. या जाणीवेने ओळख करून दिली कृतज्ञ भावाची...!

कृतज्ञता मला निरोगी राहण्यासाठी साथ देणाऱ्या शरीराबद्दल. या शरीराच्या आरोग्याचा तोल सांभाळणाऱ्या पंचमहाभूतांबद्दल. ही जाणीव तुम्ही कधी अनुभवली आहे? कधी स्वस्थ बसून आपल्याच शरीराच्या कारभाराकडे बारकाईने बघितले आहे? अन्नाचे पचन करून त्यावर कित्येक गुंतागुंतीच्या प्रक्रिया करणारे, दिवसभरात हजारो संदेशांची मेंदूबरोबर देवाणघेवाण करणारे, एका वेळी कित्येक आघाड्यांवर काम करीत राहणारे आणि त्याची जाणीवही न करून देणारे हे शरीर नावाचे अद्भुत यंत्र, तेही एक छदाम न मोजता मिळालेले...! कधी मनोभावे कृतज्ञ होऊन त्याचे आभार मानले आहेत? शरीर आपलेच मग आभार मानणारेही आपणच वेगळे कसे? पण तरीही मनात त्याची जाणीव तर हवी ना? भोवताली आपल्या आसपास हाकेच्या अंतरावर संसर्गाच्या लाटा येऊन माणसाना गिळत असतांना आपल्याला जराही स्पर्श न करता ती लाट कशी आणि का निघून गेली हा प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे? मी स्वतःला कित्येकदा विचारला, विचारीत राहिले..! अशा वेळी आपले रक्षण करणाऱ्या शरीराच्या प्रतिकार शक्ती नावाच्या कवच कुंडलांची जाणीव प्रकर्षाने झाली आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या शरीराबद्दल मन भरून कृतज्ञ भाव ओसंडून आला. डोळ्यात पाणी आणणारा हा भाव गेल्या महिन्या-दीड महिन्यात वारंवार अनुभवला. आणि त्यानंतर ज्याच्याबद्दल कृतज्ञ राहावे अशा कित्येक गोष्टी भोवताली दिसू लागल्या.. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या!

भीष्मराज बाम सरांच्या सत्रांमध्ये ते कित्येकदा टीम आणि टीम स्पिरीट याबद्दल बोलायचे. टीम ही फक्त क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मैदानावर असते असा आपण समज करून घेतला आहे. प्रत्यक्षात आपल्या प्रत्येकाच्या जगण्यात आपली म्हणून एक टीम असते जिचा आपण कधी विचारही करीत नाही. आपल्या सुखरूप राहण्यात कुटुंबातील माणसांचा मोठा वाटा असतो असे आपण मानत असतो, कारण ती आपल्या अवतीभोवतीच असतात. मुद्दाम लक्ष देऊन बघितले तर आपल्या निर्वेध जगण्यासाठी मदत करणारी कितीतरी माणसे परीघावर उभी आपल्याला दिसतील. ज्यांच्याकडे सहसा आपले लक्षच जात नाही, मग कृतज्ञ असणे दूर राहो..! घरात काम करणारी मोलकरीण- स्वयंपाक मावशी, कचरा नेणारा बिल्डिंगचा रखवालदार, दुध-पेपर घरपोच देणारी माणसे, कोपऱ्यावरचा भाजीवाला, नाक्यावरचा किराणा दुकानदार असे कित्येक..! आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचा कृतज्ञ भाव कधी त्यांच्याकडे व्यक्त केलाय? .

कोरोनाने बदलून टाकलेल्या जगात आपल्याला अनेक गोष्टी नव्याने कराव्या लागणार आहेत. त्यातील एक गोष्ट असेल, रोज स्वतःच्या शरीराला आणि अशा माणसाना कृतज्ञतेने नमस्कार करण्याची ! आपल्या भटकण्यात आपल्या साथ देणारे पाय, कित्येक कामांमध्ये सहभाग देणारे हात, डोळे, कान, मेंदू, रसाळ चवींची जाणीव देणारी जीभ आणि दात, मान-पाठ.... डोक्यापासून पायापर्यंत या शरीराबरोबर मनाने काही सेकंद प्रवास करा आणि आभार माना त्याचे, रोज!

कृतज्ञ भाव मनात सकारात्मक उर्जा निर्माण करतो. महत्वाची बाब म्हणजे, सकारात्मक उर्जा आणि आपली प्रतिकारशक्ती यांचे फार जवळचे नाते आहे. नैराश्य शरीराच्या प्रतिकारशक्तीला दुबळे करून टाकत असतो हे आता विज्ञानाने सिध्द केले आहे...!

तर या बदललेल्या जगात, तुम्हाला ज्यांना-ज्यांना thank you म्हणावेसे वाटते त्याचे एकेक नाव कुटुंबातील प्रत्येकाने घरात असलेल्या व्हाइट बोर्ड वर लिहायला हरकत नाही! मनातील भाव जाहीर करून बघण्याचा हा प्रयोग खरच एकदा करून बघाच. तुमच्या भोवतालचे सगळे जग बदलून जाईल, अधिक आनंदी असेल ते...!

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

vratre@gmail.com