उमेश काशीकर, जनसंपर्क अधिकारी राजभवन -
मलबार हिल येथील राजभवनाला जवळजवळ ३०० वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत १७१० ते १८०० या काळात मलबार हिल येथे ब्रिटिश लोक शिकारीसाठी येत व ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे बॉबरी हंट’ या शिकार खेळाची सुरुवात येथून होत असल्याचे इतिहासात नमूद आहे. माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१८१९-१८२७) मुंबई राज्याचे गव्हर्नर झाले असताना त्यांनी या ठिकाणी ‘मरीन व्हिला’ नावाची एक छोटी बंगली बांधली व ते या ठिकाणी अधूनमधून येत असत, असे इतिहासाचे अभ्यासक व राजभवनाचे इतिहासकार दिवंगत सदाशिव गोरक्षकर यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
१८८५ साली लॉर्ड रे (रे रोड ज्यांच्या नावाने आहे ते) मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले आणि ‘गव्हर्न्मेंट हाऊस’ पूर्वीच्या परळ येथून मलबार हिल येथे स्थलांतरित झाले. या काळात मुंबई राज्याचे क्षेत्र इतके मोठे होते की गुजरातचा मोठा भाग, कर्नाटकचा काही भाग, आज पाकिस्तानात असलेले कराची व आज येमेनची राजधानी असलेले एडन शहर देखील तेव्हाच्या मुंबई राज्याचा भाग होते. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या सागर किनारी सुरक्षेच्या दृष्टीने तोफखाने उभारले होते. मलबार हिल येथे गव्हर्नर राहत असल्याने येथील हिरवळीवर, आज त्या ठिकाणी हेलिपॅड आहे तिथे तोफखाना होता. अलीकडेच म्हणजे २०१६ ला प्रकाशात आलेले भूमिगत भुयार (बंकर) देखील याच तोफखान्याचा भाग होता असे दिसून येते.
राजभवनातील भूमिगत बंकरच्या सुरुवातीला एक लांब उतार (रॅम्प) आहे. हा रॅम्प दारूगोळ्याची ने-आण करण्यासाठी निर्माण केला असावा हे जाणवते. अर्थात या बंकरचा किंवा येथे आढळून आलेल्या तोफांचा कधी काळी उपयोग झाला की केवळ तो सुरक्षेच्या दृष्टीने बांधून ठेवला, हे कळायला मार्ग नाही.
सध्या राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेले राजभवन आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षा कारणांमुळे राजभवनाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करूनच या बंकरला भेट देता येते तसेच येथील तोफादेखील पाहता येतात. या बंकरमध्ये एक छोटेखानी संग्रहालय असून, इतिहासप्रेमींनी ते अवश्य पाहिले पाहिजे.
साधारण १५००० चौरस फूट आकारमानाच्या या बंकरमध्ये असलेल्या १३ कक्षांना आढळून आलेली नावे तसेच तेथून वरच्या हिरवळीवर दारूगोळा पाठविण्याच्या चोरवाटा या ठिकाणी तोफखाना होता ही गोष्ट अधोरेखित करतात. बंकरच्या सुरुवातीच्या भागाचे बांधकाम दगडी असून, उर्वरित भागाचे बांधकाम पारंपरिक साहित्य वापरून केल्याचे दिसते. राजभवनातील या बंकरच्या बांधकामाचे वर्ष निश्चितपणे निर्धारित करण्यात आले नसले, तरी ते निश्चितपणे पहिल्या महायुद्धापूर्वीचे असावे, याला पुष्टी मिळते.