- भीष्मराज बाम
एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न आहे. ‘‘आस्तिक दु:खात देवाकडून प्रेरणा घेतो, तशी नास्तिकाने कोणाकडून प्रेरणा घ्यायची?’’
- सर्वसाधारणपणे माणसाचा कल इतर चारचौघे वागतात तसेच आपण वागावे असा असतो. आपल्याकडे आस्तिक हे संख्येने खूपच जास्त आहेत. त्यामुळे आपण नास्तिक असलो, तर इतरांपेक्षा वेगळे आहोत, असे वाटत राहते. नास्तिकपणा हा केवळ एक गंमत किंवा काहीतरी चूष म्हणून स्वीकारायचा नसतो. ती विचारधारा आपल्याला संपूर्ण पटत असली तरच स्वीकारायची असते. आस्तिक विचार म्हणजे हे विश्व चालवणारी जी शक्ती आहे तिचे माझ्यावर प्रेम आहे आणि मी माझ्या वागण्याने तिला आपल्याला अनुकूल करून घेऊ शकतो. ही श्रद्धाच भक्तीत परावर्तित होत असते. ती माणसाला प्रचंड सार्मथ्य देऊ शकते तसेच अगदी दुर्बलही बनवू शकते. मन जर दुर्बल होणार असेल तर नास्तिक असणे किंवा आस्तिक असणे यात फारसा फरक राहतच नाही. आपल्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते. दु:ख सोसण्याची शक्ती आपल्या विचारातूनच येते. ईश्वर आस्तिकांसाठी या शक्तीचे निमित्त बनत असतो. नास्तिकांना तसे निमित्त शोधण्याचे कारण पडू नये. ती शक्ती आपल्या विचारातून उभी करण्याचा प्रयत्न करायला हवा.
मी भोपाळला होतो, तेव्हा एका मुस्लीम गृहस्थांशी माझा चांगला परिचय झाला. त्यांचे वाचन दांडगे होते आणि ग्रंथसंग्रहही खूपच मोठा आणि चांगला होता. सवड सापडेल तेव्हा मी त्यांच्याकडे जात असे. रमजान ईदच्या दिवशी मी आवर्जून त्यांना भेटायला गेलो. ते आणि त्यांचे कुटुंबीय घरीच होते. मी विचारले, ‘‘तुम्ही नमाज पढण्यासाठी मशिदीत जाऊन आलात का?’’ त्यावर ते हसले आणि म्हणाले, ‘‘मी पक्का नास्तिक आहे; म्हणून मी मशिदीत कधीच जात नाही.’’ मला नवल वाटले; कारण मुस्लिम समाजातल्या नास्तिक व्यक्तीला मी पहिल्यांदाच भेटत होतो. मी विचारले, ‘‘तुमच्या नातेवाइकांचा तुमच्यावर रोष झाला नाही का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘सुरुवातीला मला बराच त्रास झाला. पण आता ते माझे वागणे सहन करतात. सुदैवाने माझी पत्नी माझ्याच विचाराची आहे आणि मुलेही त्याच संस्कारात वाढलेली आहेत. ईश्वरावर नसली, तरी माणसाच्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे आणि चांगले जीवन जगायला तेवढे पुरेसे आहे, असे मला वाटते. ईदची मिठाई खाण्यासाठी मला कोणतीच अडचण येत नाही. माझ्या हिंदू मित्रांकडे मी दिवाळीच्या फराळासाठी जातो आणि ख्रिस्ती मित्रांबरोबर नाताळसुद्धा साजरा करतो.’’
माझ्या भोपाळच्या वास्तव्यातच त्या कुटुंबावर फार मोठे संकट आले. पण ज्या धीरोदात्तपणे ते त्या संकटाला सामोरे गेले, तो अनुभवून माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. त्यांच्यामुळेच आणखी एका मुस्लीम परिवाराची ओळख झाली. ते गृहस्थ प्राध्यापक होते आणि पक्के कम्युनिस्ट होते. त्यांची पत्नी हिंदू होती आणि तिला समाजसेवेची खूप आवड होती. ही सारी मंडळी नास्तिक असूनही आपल्या विचारांवर खंबीर होती. असा मनाचा कणखरपणा वाढवता येणे व्यावहारिक जीवनात खूप उपयोगी पडते.
आपण निवडलेलं क्षेत्र आणि ध्येय, ते गाठण्यासाठी आपण स्वीकारलेला मार्ग या सार्यावर आपली गाढ श्रद्धा असायला हवी आणि त्या ध्येयाचा ध्यास लावून घेता यायला हवा. आपल्यापूर्वी ज्यांनी तो मार्ग चोखाळलेला असेल, त्यांची उदाहरणे आणि चरित्रे आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवायची असतात. मग दु:खात आणि संकटात जी प्रेरणा आणि जो आधार आपल्याला गरजेचा वाटतो, तो आपल्याला आतूनच मिळतो. त्यासाठी बाहेर कोठे शोधायची आवश्यकता भासत नाही.
कर्मयोगी बाबा आमटे, सुप्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदकर आणि महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीताताई हे सर्व रूढार्थाने नास्तिकच होते. पण त्यांची मानवतेवर आणि विकासाच्या प्रक्रियेवर गाढ श्रद्धा होती. त्यामुळे त्यांची व्यक्तिमत्त्वे लोभस झाली आणि त्यांना अफाट लोकप्रियतासुद्धा मिळाली. मी यवतमाळला असताना तिथल्या साहित्यप्रेमी मंडळींनी नरहर कुरुंदकरांचे एक व्याख्यान आयोजित केले, ते तिथल्या एका देवळात. रोज पुराणाला येणार्या वृद्धांपासून तो आमच्यासारख्या आता हे काय बोलतात ते पाहू असे म्हणून येणार्या लोकांचा श्रोत्यांत भरणा होता. विषयही धार्मिक होता. त्या दिवशी आपल्या अमोघ वक्तृत्वाने कुरुंदकरांनी आम्हाला चकित करून सोडले. प्रार्थना या संकल्पनेवर त्यांनी इतके सुंदर विवेचन केले, की नेहमी प्रवचन करणार्या विद्वानालासुद्धा नवल वाटावे.
आता या नास्तिक मंडळींवर त्यांच्या आयुष्यात काय कमी संकटे आली? अडचणींचे पहाड सतत पार करावे लागत असतानाही त्यांनी मांगल्यावरची आपली श्रद्धा कधी सोडली नाही आणि उभ्या राहणार्या समस्यांना विटून जाऊन हाती घेतलेले कार्यही सोडले नाही. दु:खे आणि संकटे तर येणारच आहेत; पण हाती असलेल्या कार्याचा आणि ध्येयाचा ध्यास सतत वाढता ठेवण्याची काळजी घ्यायला हवी. आस्तिक माणसालासुद्धा देव त्याची सर्व कामे स्वत: करून टाकून आळशी बनायला परवानगी देतच नाही. तो फक्त संकटे आणि दु:खे सहन करून सर्मथपणे उभे राहण्याची आणि आपले कर्तव्य अथकपणे पार पडण्याची शक्ती देतो. जर तुमची नास्तिक विचारांवर श्रद्धा असली, तर ही शक्ती तुम्हाला आपल्या विचारातून आणि ध्येयाच्या ध्यासातूनच निर्माण करायला हवी. तुम्ही आस्तिक असा अगर नास्तिक असा, विपरीत परिस्थितीला न घाबरणारे मन तयार करण्याची साधना तुम्हालाच करायची आहे. तुमची सहनशक्तीच वाढवायला हवी; दुसरा पर्याय नाही.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)