- मंथन’ प्रतिनिधी
एमबीबीएस डॉक्टर आणि वाघाचा संबंध काय, असा प्रश्न पडू शकतो; पण नागपूरस्थित जेमतेम पंचविशीच्या या डॉक्टरला मात्र वाघाच्या जिवाच्या काळजीनं अस्वस्थ केलं आहे. डॉ. जेरील बनाईत वन्यजीवप्रेमी आणि निसर्गसंवर्धक आहेतच; पण सध्या ते वाघांचा ‘आवाज’ बनून थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाघाची बाजू मांडत आहेत. कायद्यावर बोट ठेवून वाघाला कायद्यानं मदत होईल का म्हणून प्रयत्नशील आहेत.
पांढरकवडा परिसरात ‘टी-वन’ वाघिणीचा प्रश्न सध्या पेटलेला असताना त्यासंदर्भात डॉ. जेरील यांचा दृष्टिकोनही समजून घेण्यासारखा आहे. कारण वाघ आणि माणूस यांच्या नात्याची एक वेगळीच वीण ते उलगडून दाखवतात. जेरील यांचे आईवडीलही डॉक्टर, मुलं लहान असताना ती दोघं जंगलाच्या आसपास मेडिकल कॅम्प लावत. आजोबा शेतकरी. त्यामुळे या मुलांना जंगलाचा लळा लागला. बदलती जंगलं, जंगल परिसरात नागरिकरणानं पोहचणारे आजार, प्रदूषण याविषयी घरात चर्चा व्हायची. त्यामुळे आरोग्य आणि परिसंस्था या सा-याची ओढ डॉ. जेरील यांना आपोआप लागली. वयाच्या 15व्या वर्षी ते नवेगावला एकदा ट्रेकला गेले होते. तिथं त्यांच्या लक्षात आलं की जंगलातल्या पाणवठय़ाच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे अनेक प्राणी पाण्याअभावी तडफडून मरतात. त्यामुळे तिथून निघताना त्या परिसरात काम करणा-या संस्थेला आपले पॉकेटमनीचे साचलेले; दहा हजार रुपये त्यांनी देऊन टाकले. हे पैसे जंगलात तळे, कॅचमेण्ट एरिया तयार करण्यासाठी वापरले गेले. तिथून प्रवास सुरू झाला आणि अनेक प्राणी त्यांनी वाचवले, त्यांना सांभाळलं. त्यातूनच त्यांच्या लक्षात आलं की, आपली परिसंस्था टिकवायची, तिचा समतोल राखायचा तर वाघांचं वाचणं फार महत्त्वाचं आहे.
डॉ. जेरील सांगतात, ‘माणसांचा वावर वाढला तर प्राणी आपल्या पाणवठय़ाच्या जागा सोडून देतात, शिकारही लोक पाणवठय़ाजवळच करतात. त्यामुळे जिवाला धोका नको म्हणून या पाणथळ जागा प्राणी सोडून देतात; पण मग पाण्याच्या शोधात अनेकदा ते मानवी वस्तीपर्यंत येऊन पोहचतात. वाघासारखा प्राणी हा रंगांध असतो, त्यामुळे अनेकदा वाघ माकड समजून माणसावर हल्ला करतो. सगळेच वाघ सरसकट नरभक्षक नसतात. अनेकदा स्वत:च्या किंवा आपल्या पिलांच्या जिवाच्या भीतीनं, सुरक्षिततेसाठी म्हणून ते माणसांवर हल्ला करतात. त्याला म्हणतात ‘चान्स एन्काउण्टर’. अपघाती हल्ला. असा अपघाती हल्ला झाला म्हणून लगेच वाघ नरभक्षक ठरत नाही. कोणत्या वाघानं फक्त अपघाती हल्ला केला, कोण खरंच नरभक्षक झालाय हे शोधायची एक पद्धत असते. ती पद्धत व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानंच ठरवलेली असताना खातरजमा न करता दिसताक्षणी वाघाला गोळीच घालण्याचे आदेश देणं चूक आहे. ‘किस्मत’ या वाघिणीच्या वेळेसही असंच झालं होतं. ती नरभक्षक आहे म्हणत तिला मारण्याचे आदेश देण्यात आले. त्या निर्णयाविरोधात मी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. याचिका दाखल केल्या. दिल्लीत गेलो. मात्र दुर्दैवानं निर्णय माझ्या बाजूनं लागला नाही.’ डॉ. जेरील यांचं म्हणणं आहे, माणूस जंगलात शिरला, माणसानं आपला अधिवास थेट जंगलापर्यंत नेला. हायवे आले, बांधकाम झालं. जंगलात आणि वाघाच्या परिसरात माणूस घुसखोरी करू लागला आणि वाघानं चुकून हल्ला केला तर दोषही वाघालाच देऊ लागला. अशारीतीनं प्रत्येक वाघाला नरभक्षक लेबल लावून मारलं तर, वाघ उरतील कसे? ‘राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं वाघांसंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वं आणि नियमावली दिलेल्या आहेत. अपघाती हल्ला आणि नरभक्षक वाघ यांच्यात फरक कसा करायचा हे त्यांनीच सांगितलं आहे. मात्र जेव्हा केव्हा असा ‘टी-वन’ वाघिणीसारखा पेच उभा राहतो तेव्हा या सा-याकडे दुर्लक्ष करत थेट वाघाला गोळीच घातली जाते, है दुर्दैवी आहे. यासा-यात नरभक्षक नसलेला वाघ किंवा वाघीण मारली गेली तर ते अधिक वाईट ठरेल, त्यामुळे नियमाप्रमाणे प्रक्रिया व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. आताही या वाघिणीला बेशुद्ध करून, तिचा अधिवास बदलता येऊ शकतो. तिचं वय पाहता अजून नऊ-दहा पिलं ती देऊ शकते, असं असताना तिला मारणं म्हणजे एका गोळीनं दहा वाघ मारण्यासारखं आहे.’
माणसांचा जीव मोलाचा आहेच, तसाच वाघांचाही मोलाचा आहे, हे आपण समजून घ्यावं एवढंच त्यांचं म्हणणं आहे. ‘टी-वन’ वाघिणीच्या संदर्भातही बनाइत यांनी मुंबई उच्च न्यायालयात वन खात्याच्या विरोधात याचिका केली होती. ती न्यायालयानं फेटाळली, सर्वोच्च न्यायालयानंही हस्तक्षेपास नकार दिला, मात्र तरीही वाघाच्या बाजूनं त्याच्या जिवाचा विचार करणं आणि त्याला कायद्याची मदत करण्याचं काम डॉ. जेरील यांनी सुरू ठेवलं आहे.