कलापिनी कोमकली..
पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि त्यांचा वारसा पुढे नेणार्या त्याच्या शिष्याही. स्वतंत्र प्रतिभेच्या गायिका म्हणून तरुण पिढीतील कलाकारांमध्ये वेगळे स्थान निर्माण करणार्या कलापिनी ‘कालजयी कुमार गंधर्व’ या पुस्तकाच्या निमित्ताने पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद. कुमारजींसारख्या प्रतिभावंत गायकाची मुलगी असणे हे किती अवघड आहे?- अत्यंत अवघड आहे. आपल्यासमोर किती कठीण वाट आहे, याची जाणीव मला पदोपदी होते. माझ्यासमोरचे आईवडिलांचे उदाहरण एव्हरेस्ट डोळ्यांसमोर असावा तसे आहे. त्यांचा दर्जा इतका उच्च आहे, की या दोघांनीच मला शिकवले असले तरी ते प्रत्यक्षात आणणे किती अवघड आहे याची कल्पना सांगून यायची नाही. प्रतिभावंताच्या पुढील पिढीकडून लोकांच्या मोठय़ाच अपेक्षा असणार, हे साहजिक आहे. याचे दडपण असणे चांगलंच आहे. त्यामुळे मी जागरूक राहते, असं मला वाटतं. कुमार गंधर्वांची गायकी इतक्या वर्षांनंतरही अजून लोकांच्या मनात आहे. तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर, जगभर जात असाल, तेव्हा ही आत्मीयता तुम्हाला नक्कीच जाणवत असेल..- पदोपदी जाणवते. आणि त्याबद्दल मला कुतूहल आणि थोडासा हेवाही वाटतो. बाबांना जाऊन २२ वर्षे झाली. तरी त्यांच्याबद्दल लोकांत असलेले प्रेम, कुतूहल, आपुलकी थोडीही कमी झालेली नाही. ही काही साधारण गोष्ट नव्हे. आपल्याला १५ दिवसांपूर्वी पाहिलेला चित्रपट आठवत नाही, अशा परिस्थितीत हे गाणे टिकून राहणं हे किती अद्भुत आहे! दर्दी लोकांच्या वतरुळापुरती ही गोष्ट होणे मी समजू शकते; पण जनमानसात टिकून राहणे ही गोष्ट वेगळीच आहे. खरे तर या सगळ्यामुळेच या पुस्तकाची कल्पना माझ्या डोक्यात आली.तुम्ही कुमारजींच्या कन्या आणि शिष्याही. त्यांनी कधी घराणेशाही मानली नाही आणि त्यांचे गाणे चौकटीच्या बाहेरचे होते, असे म्हटले जाते. तुम्हाला यासंदर्भात काय वाटते?- त्यांनी घराण्याच्या चौकटीला बांधून घेतले नाही हे खरे आहे. त्यांनी एकदा लिहिले होते, तुम्ही कृष्णभक्त असाल आणि तर तुम्हाला कृष्णाच्या मूर्तीतले सौंदर्य कळायला हवे. पण मूर्तिकला कळायची तर त्याचबरोबर तुम्हाला शंकराच्या मूर्तीतलेही सौंदर्य कळायला हवे. संगीताचे तसेच आहे. हा कॅनव्हास खूप मोठा आहे.त्यामुळे तुम्ही स्वत:ला चाकोरीत का बसवायचे? त्यांनी अनेक घराण्यांचा अभ्यास केला; कारण ते त्यांना गरजेचे वाटत होते. मला वाटते आम्हा त्यांच्या शिष्यांनाही काय करावेसे वाटते आणि आम्ही त्याला कसे सामोरे जातोय हे महत्त्वाचे. तुमच्या पहिल्या मैफलीच्या काय आठवणी आहेत?- मी स्वतंत्रपणे पहिल्यांदा गायले ते कुमारजी गेल्यानंतर. बर्याचदा ते आणि ताई (माझी आई वसुंधरा कोमकली) बरोबर गायचे. मी त्यांना मैफिलीत तंबोर्यावर साथ करायचे. त्यांच्याबरोबर ‘गीतवर्ष’ कार्यक्रम केला तेव्हा त्यांना खूप दिलासा वाटला होता, खूष झाले होते. या कार्यक्रमानंतर ‘तू समजुतीने साथ केलीस’ असे ते म्हणाले तेव्हा मला खूप आनंद झाला होता. ‘आता तू गायला लागली आहेत, तराण्याची मैफल करू’ असेही ते म्हणाले होते. ते शक्य झाले नाही. ते गेल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मी पहिल्यांदा स्वतंत्रपणे गायले. तुमचे गाणे विचार आणि सृजनशीलता यांचा मिलाफ आहे, तुम्हाला नावीन्याचा ध्यासही आहे असे म्हटले जाते. तुम्हाला तुमच्या गाण्याबद्दल काय वाटते?- मला आपले गाणे इमानदारीने सादर करावे इतकेच वाटते. कार्यक्रम काय आहे, कुठे आहे याचा विचार करून मी सादरीकरण करते. कुणी काही विशिष्ट फर्माइश केली तर तीही पूर्ण करायचा प्रयत्न करते. जे काही गाणे मी समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे, ते उत्तमपणे सादर करणे एवढेच माझ्या मनात असते. त्या दिवशीचा माहोल, सापडलेली लय यातून त्या त्या कार्यक्रमाला त्याचा आकार येतो. गाण्यात नवीन काही तरी करायचे म्हणून मी ठरवून काही करत नाही. कुमारजी तुमचे गुरू, तशाच तुमच्या आई वसुंधरा कोमक लीही तुमच्या गुरूच. या दोघांच्या गायकीतल्या कुठल्या गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव आहे, असे म्हणता येईल?- खरेतर मला असे सांगता येणार नाही. कारण जे काही घेतलेय ते आपसूकच माझ्यात आलेय. माझ्यासाठी ते दोघे एकच आहेत. ताई देवधरांच्या शिष्या. ते कुमारजींचेही गुरू होते. ताईंच्या गाण्यात देवधरजींच्या शिकवणीचा भाग खूप आहे. व्हाया वसुंधराताई कुमार असाच माझा प्रवास होता. या दोघांच्या गाण्यातून रागाची ठेवण, बंदिशीची कहत घ्यायचा मी प्रयत्न केला, असे मला वाटते. आज गुरू-शिष्य परंपरा फारशी अस्तित्वात नाही; पण गाणे शिकायची हीच योग्य पद्धत आहे, असे तुम्हाला वाटते का?- हो. मला खरोखरच असे वाटते. आज काळ बदलला आहे आणि त्यामुळे काही गोष्टी बदलणारच हे गृहीत आहे. तरीही काही गोष्टींना पर्याय नाही. लहानपणी बाथरूम सिंगर्सपासून सगळ्यांनाच वाटते, की आपण अगदी लता मंगेशकरसारखे गातो. पण हे खरे नाही हे सांगायला कुणी तरी लागते ना! मला आता बडे गुलाम अली खॉँ साहेब, सिद्धेश्वरी यांना ऐकायचे असेल तर त्यांचा जतन केलेला आवाजच ऐकायला हवा. दुसरा काही पर्याय नाही. पण एरवी संगीत ही कॅसेटवरून, यू-ट्यूबवरून शिकायची गोष्टच नाही. त्याने फारतर तुमची समजूत प्रगल्भ होईल; पण अमुक राग कसा मांडायचा, त्यातले खाचखळगे काय, हे गुरूकडूनच समजून घ्यायला हवे.तुम्ही ‘पहेली’, ‘देवी अहिल्या’ या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेले आहे. यापुढेही पार्श्वगायन करायला आवडेल का?- हो, का नाही? मला चित्रपटसंगीत कमालीचे आवडते. आजच्या चित्रपटसंगीताबद्दल मात्र मी साशंक आहे. खरेतर आज काही अफलातून चित्रपट तयार झालेत, जे आपल्याकडे तयार होतील, अशी कल्पनाही काही दिवसांपूर्वी नव्हती. संगीताबद्दल मात्र असे म्हणता येत नाही. आजचे संगीत स्वरांच्या नाही तर तालाच्या दिशेने जाणारे आहे. तरीही जुन्या संगीताच्या पठडीतले काही मिळाले तर मला नक्की चित्रपटांसाठी गायला आवडेल. हिंदी किंवा अगदी मराठीही. देवासमधे तुम्ही ‘कुमार गंधर्व संगीत अँकॅॅडमी’तर्फे काय उपक्रम करता?- इथे अँकॅडमी पद्धतीने संगीताचे शिक्षण दिले जाते. आमच्याकडे कुमारजींचे सुमारे हजारेक तासांचे रेकॉर्डिंग आहे. त्याचे संग्रहालयाच्या पद्धतीने जतन केले आहे. अभ्यासकाना त्याचा उपयोग होऊ शकतो. लिंडा हेस नावाच्या बाई भजनपरंपरेवर अभ्यास करतात. त्या गेली ४ वर्षे स्टॅनफोर्डहून इथे येतात. आम्ही त्यांना मदत करतो. कुमारजींच्या जन्मदिवशी, पुण्यतिथीला संगीताचे कार्यक्रम केले जातात. याशिवाय स्पीकमॅकेच्या माध्यमातून मी व्याख्यानांद्वारे मुलांमधे संगीताची आवड निर्माण करायचाही प्रयत्न करते. कुमारजींवर येणार्या पुस्तकाचे तुम्ही आणि रेखा इनामदार-साने संपादन करताहात. हा अनुभव कसा आहे?- खरंतर खूप दडपण आलंय. कुमारजींच्या ९0व्या वाढदिवसानिमित्ताने असे पुस्तक यावे ही कल्पना माझीच होती. यात कुमारजींवरच्या उत्तम, दर्जेदार लेखांचा समावेश आहे. त्यांचे सांगीतिकदृष्ट्या जे योगदान आहे, त्याचा चांगला पॅनोरमिक व्ह्यू द्यायचा हा प्रयत्न आहे. कधीच प्रसिद्ध न झालेल्या मुलाखती, लेख, पत्रे यात आहेत. असे पुस्तक होतेय याचा आनंद आहेच; पण जबाबदारीच्या जाणिवेने झोपही उडालीय. कुमारजींनी देवासमधे राहणेच पसंत केले. त्यासाठीची त्यांची वेगळी कारणे असतील. तुम्ही नंतरच्या पिढीतल्या असूनही मोठय़ा शहरात यायचा विचार न करता तिथेच राहणे कसे पसंत केलेत?-खरे सांगायचे तर कधीकधी मोठय़ा शहरात स्थायिक व्हावे असे वाटूनही गेले. तसे केले असते तर मला कदाचित अधिक कार्यक्रम मिळालेही असते. ते कुणाला नको असतात? पण या सगळ्याची किंमत जास्त होती. आपला हेतू फक्त लोकांच्या समोर राहणे, जास्त कार्यक्रम मिळवणे हा आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही होते. आपण देवाससारख्या ठिकाणी मनाप्रमाणे राहू शकतो. आणि आता संवादाची माध्यमे इतकी प्रगत झाली आहेत, की मोठय़ा शहरांचा ध्यास घ्यायची काही गरज नाही. मला वाटते, की हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. आणि जे देवासमधे आहे ते कुठेच नाही, हेही आता मनापासून पटले आहे. (लेखिका लोकमत पुणे आवृत्तीमध्ये बातमीदार आहेत.)