लॉकडाऊनच्या गाळात रुतलेली गावं जागी झालीत, जत्रा-यात्रा-उरुसांनी मोहरू लागलीत! मनाचं पाखरू झालेले चाकरमानी गावाकडं निघालेत...
कोरोनाच्या कचाट्यातून सुटून दोन वर्षांनंतर यंदा गावोगावच्या यात्रा-जत्रा-उरूसांना दणक्यात सुरुवात झालीय. लॉकडाऊनच्या गाळात रुतलेला गावगाडा भिरीरी पळायला लागलाय. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तोंडावर तजेला आलाय...
सुगी संपली की, लगेच सुरू होतो यात्रा-जत्रा-उरूसांचा हंगाम. यात्रा-जत्रा म्हणजे लोकजीवनाचं सांस्कृतिक वैशिष्ट्य. हा जसा देव-देवतांचा, सत्पुरुषांचा, नद्या-डोंगरांचा उत्सव, तसा कृषी संस्कृतीचा लोकोत्सव, आनंदसोहळा, एकोप्याचा धडा गिरवून घेणारा. पंचेंद्रियांची दिवाळीच! सगळे नाद, स्वाद, रंग, गंध इथं सामावलेले. दिवसभर राबणं खेड्यातल्या प्रत्येकाच्या पाचवीला पूजलेलं. बारोमास कष्ट. या सगळ्या बाया-बापड्यांना राबण्यातून सुटका मिळते, ती जत्रा-यात्रांच्या निमित्तानं. ग्रामीण संस्कृती आणि परंपरांची जपणूक होते, ती इथंच. काहीबाही विकणाऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळते आणि गावकुसातल्या कलावंतांना लोकाश्रय मिळतो, तोही इथंच.
खरं तर गावोगावच्या जत्रांचे वेध सुगी संपण्याआधीच लागतात. शेत-शिवारात पिकांच्या काढणीला जोर आलेला असतो. त्यात शेतकरी, शेतमजुरांची नुसती लगबग. त्याच उत्साही वातावरणात यात्रांची तयारी सुरू होते. तारीख ठरते शेतीच्या वेळापत्रकावर. घाटावरच्या यात्रा-जत्रा ठराविक तिथीलाच येतात, तर कोकणात तारखेसाठी कौल लावतात. काही यात्रा-जत्रा खरीप हंगामानंतर, तर बहुसंख्य सोहळे त्या-त्या भागातली वर्षाची सुगी संपल्यानंतर. उरूस मुस्लिम कॅलेंडरवर ठरतात.
गावची जत्रा म्हटलं की, माहेरवाशिणी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या गावकऱ्यांचं मन पाखरू होतं. ते जत्रेसाठी गावाकडं पळतं. खेड्यांतली सुख-दु:खं जत्रांना लगडलेली. सगळे समाज, सगळं गाव यांना सोबतीला घेऊनच यात्रा-जत्रा फुलतात, बहरतात. पूर्वजांनी पाहुणे-रावळे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना एकत्र करून मनं मोकळी करण्याच्या, सुख-दु:खं वाटून घेण्याच्या, गोडाधोडाचं खाऊपिऊ घालण्याच्या या लोकसोहळ्याला, बाजारपेठेच्या हंगामाला धार्मिक जोड दिलेली. त्यानिमित्तानं ग्रामदैवताबद्दलची अपार कृतज्ञता व्यक्त करता येते... त्यातला नवस फेडण्याचा, तोरण वाहण्याचा, गुलाल-भंडारा-खोबरं उधळण्याचा, पालखी-मिरवणुका, दंडवतांचा उपचार म्हणजे तर आपल्यावर देव नावाच्या राखणदाराचा वरदहस्त आहे, याचा दिलासाच!
जत्रेतली बाजारपेठ अख्ख्या पंचक्रोशीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देते. खेडोपाडी तयार होणाऱ्या वस्तूंना गिऱ्हाईक देते. हळद-कुंकू, गुलाल-बुक्का, देव-देवतांच्या तसबिरीपासून मोबाईलपर्यंत आणि बायकांच्या कंगव्या-टिकल्यांपासून दागदागिन्यांपर्यंत सगळं काही मिळण्याचं ठिकाण म्हणजे गावची जत्रा. लहान-थोरांना मोठमोठाले आकाशपाळणे, फिरती चक्रं, नानाविध वस्तू, खेळण्यांची दुकानं, भेंडबत्ताशापासून जिलबीपर्यंत, भज्यापासून शेव-चिवड्यापर्यंत सगळ्याचंच अप्रूप!
जत्रा म्हटलं की तंबूतला आणि पारावरचा तमाशा, कलापथकं, दशावतारी खेळ, टुरिंग टॉकिजमधले चित्रपट, कुस्त्यांचे फड, बैलगाड्यांच्या शर्यती, भजन-प्रवचनं हे आपसूकच आलं. गावा-गावातल्या पैलवान, लोककलावंत, छोट्या व्यावसायिकांना यातूनच बळ मिळतं. अवघ्या आनंदाचं साधंसुधं आभाळ जत्रेवर सावली धरून असतं.
कोल्हापूरजवळचा जोतिबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोकणातल्या आंगणेवाडीची भराडीदेवी, नांदेडच्या माळेगावचा खंडोबा, ठाण्याचा हाजीमलंग, नाशिकची सप्तशृंगी, सौंदत्तीची यल्लम्मा, माहुरगडची रेणुका, औंढ्याचा नागनाथ, परळीचा वैजनाथ, शिखर शिंगणापूरचा शंभुमहादेव, मांढरदेवची काळुबाई, पालीचा खंडोबा, पाटणजवळचा नाईकबा, सोलापूरचा सिद्धरामेश्वर, आरेवाडीचा बिरोबा, यासोबतच अहमदनगरचे कानिफनाथ, पुसेगावचे सेवागिरी यांच्या लोकोत्सवाला गर्दी उसळते. कुणाची यात्रा एक-दोन दिवसांची, तर कुणाची दहा-दहा दिवस चालणारी. कोणाचे नैवेद्य गोडे, तर कोणाचे खारे. कोणाच्या सासनकाठ्या, तर कोणाच्या पालख्या आणि रथोत्सव!
बदलत्या काळात जत्रांचं स्वरूप बदललं, पण रूढी-परंपरांची जपणूक आणि नवतेचा ध्यास कायम. जत्रेला जाणाऱ्या घुंगरांच्या बैलगाड्यांसोबत जीपगाड्या-आरामबसही आल्या. मेवामिठाईच्या दुकानात शेव-चिवड्यासोबत चायनिज पदार्थांचीही रेलचेल झाली. हातानं फिरवल्या जाणाऱ्या चक्रीपाळण्यांसोबत डोकं गरगरवणारी आधुनिक चक्रं आली. पण चार-आठ दिवस एकत्र येऊन लोकसोहळा साजरा करण्याची विशुद्ध भावना तीच राहिली. हे भारलेपण टिकून असल्यानंच गाववाला गावची जत्रा कधी चुकवत नाही. जत्रेचं रंगीबेरंगी आयुष्य जमेल तसं पदरात बांधतो आणि पुढच्या वर्षीच्या तारखेची हुरहूर मनात ठेवत कामाला लागतो...- श्रीनिवास नागे, वृत्तसंपादक, लोकमत, सांगली