शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

उतरली तारकादळे..

By admin | Published: June 10, 2016 5:34 PM

चहुबाजूला मैलोन्मैल पसरलेलं मिट्ट काळोखाचं साम्राज्य आणि ‘अग्निशिखांचा लयबद्ध चमचमाट. रात्रीच्या गर्भात फुललेली लोभसवाणी प्रकाशफुलं !

भाऊसाहेब चासकर
(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि निसर्ग अभ्यासक आहेत.)
 
चहुबाजूला मैलोन्मैल पसरलेलं मिट्ट काळोखाचं साम्राज्य आणि ‘अग्निशिखांचा लयबद्ध चमचमाट.
रात्रीच्या गर्भात फुललेली लोभसवाणी प्रकाशफुलं !
नभोमंडळातील तारकादळेच जणू धरणीवर उतरलेली!
आदिवासी खेडय़ांच्या शिवारातली  सहस्नवधी झाडे अक्षरश: कोटय़वधी काजव्यांनी 
लगडून गेलेली.
वैशाख सरताना भंडारद-याची नुसती हवाच बदलत नाही, निसर्गही कात टाकतो.
या बदलत्या निसर्गाचा स्वर्गीय आनंद घ्यायलाच हवा.
 
वैशाख सरता सरता पश्चिमेकडून मस्त वारे वाहू लागतात. तापलेली उन्हं उतरतात, तशी भंडारद-याची हवा बदलते. वातावरणातल्या थंडाव्यामुळे जिवाला आल्हाद वाटू लागतो. आमच्यासारख्या रानवेडय़ांना तर या दिवसांचे वेधच लागलेले असतात. आता सह्यगिरीच्या इथल्या गिरिकंदरात लखलखत्या काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरणार असते! ‘काजवे आलेत..’ निरोप येतो. सोबत्यांची फोनाफोनी होते. आमची पावलं आपसूकच भंडारद-याच्या दिशेनं पडू लागतात.
अकोले ते घाटघर असा अंदाजे साठ किलोमीटरचा हा प्रवास कधीच कंटाळवाणा वाटत नाही. हिरवाईच्या कुशीतून पुढं जाताना निसर्गाचे ऋतुविभ्रम सदासर्वदा सुखावत असतात. मला तर ती वृक्षराजी सग्यासोय-यांसारखीच वाटते. इथला तजेलदार निसर्ग थकवा, कंटाळा, ताणतणाव घालवून आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न करतो. घाटघरच्या कोकणकडय़ावरून दिसणारं सूर्यास्ताचं विलोभनीय दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायचं. करवंदाच्या जाळीतून करवंदं तोडायची. ती खाताना सायंकाळची शोभा बघत, संधिप्रकाशात काही काळ तसंच रेंगाळायचं. तोवर अंधारून येतं. भंडारद-याच्या दिशेनं निघायचं. वाटेत उडदावणो, पांजरे अशी आदिवासी खेडी लागली की, गाडीचा वेग कमी ठेवायचा. काचा उघडय़ा ठेवायच्या. मोटारसायकल असल्यास आणखी उत्तम. गाडीचा पुढचा मोठा लाईट अधूनमधून बंद करत, डोळे उघडे ठेवून, बघत चालायचं. कुठं कुठं काही झाडं चमचमताना दिसू लागतात. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवायची. हातातल्या विजेरीनं रस्त्यावर कुठे सरपटणारे प्राणी नाहीत ना, याची खात्री झाली की, चमचमत्या झाडांच्या दिशेनं पुढं सरकायचं. एक झाड, मग दुसरे झाड, तिसरे, चौथे.. पुढं पुढं जात, भान हरपून आपण ते दृश्य एकटक बघतच राहतो.
लक्ष लक्ष काजवे.. नभोमंडळातील तारकादळेच जणू धरणीवर उतरली आहेत! चहुबाजूला मैलोन्मैल पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात अग्निशिखा हे विशेषण सार्थपणानं मिरविणा-या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सुरूये.. कुतूहलमिश्रित नजरेनं आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं हे अनुपम वैभव आपण बघतच राहतो. रात्रीच्या गर्भात उमललेली ही लोभसवाणी प्रकाशफुलं न्याहाळताना भोवतीच्या विराट पसा-यात आपण स्वत:लाच हरवून बसलो आहोत.. कुठं कुठं पाहू, किती किती पाहू अशी मनाची अधीर स्थिती होते आहे.. ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे..’ या ओळींची तंतोतंत प्रचिती येतेय! हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्याच झाडांवर काजव्यांचा काही दिवसांचाच ‘बसेरा’ असतो. आदिवासी खेडय़ांच्या शिवारातली सहस्नवधी झाडे अक्षरश: कोटय़वधी काजव्यांनी लगडून गेली आहेत. ज्या विशिष्ट झाडांवर काजवे ‘वस्तीला आलेले आहेत, ती झाडे ख्रिसमस ट्रीसारखी दिसताहेत! झाडांच्या खोडांवर, फांद्यांवर, पानांवर अगणित काजव्यांची आरास केलीये! त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरूये. एका लयीत, तालात अन् सुरातही! 
आपण बघितलेलं दृश्य आणखीन कोणाला दाखवण्याच्या हेतूने हातातले मोबाइल किंवा डिजिटल कॅमेरे फोटोसाठी पुढं सरसावतात. पण काजवे काही कॅमे:यांना बधत नाहीत, ते काही केल्या जेरबंद होत नाहीत! आम्हाला बघायचंय तर तुमचे डोळे हेच जगातले उत्तम कॅमेरे आहेत, असेच जणू काजवे आपल्याला सांगतात. लखलख तेजाची ती चंदेरी दुनिया बघताना आपण धरणीवरचा स्वर्ग पाहत असल्याची भावना मात्र आपल्या मनाला आतआतपर्यंत सुखावत राहते..
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातला रात्रीचा सारा माहोलदेखील रानभैरी आहे. सारा आसमंत गाढ निद्रेच्या अधीन.. सरता वसंतवायू जणू झाडांच्या पानांना गुदगुल्या करतोय.. रातकिडय़ांची किरकिर काजव्यांच्या नृत्याला संगीतसाज चढवते आहे.. आपल्या तनामनात ङिारपणारी ती काळोखी, तरुण रात्र आता अधिकच गुढरम्य भासते आहे.. रानसम्राज्ञीनं आपला हात जणू तिच्या हाती घेतलाय.. आपण आपल्याही नकळत स्वत:ला तिच्या हवाली केलेय..
काजवे बघणं हा निसर्गप्रेमींच्या दृष्टीनं अविस्मरणीय अनुभव असतो. हे बघताना मग काळोखाची, हिंस्र श्वापदांची, सरपटणा:या प्राण्यांची एरवी मनाला वाटणारी भीती कुठल्या कुठं पळून गेलेली असते. यातली मस्त मौज केवळ अनुभवायची आणि श्वासात सामावून घ्यायची असते हेच खरं! उत्तरेकडं कळसूबाईसह अलंग, मदन आणि कुलंग या कुर्रेबाज त्रिकुटाची पसरलेली थोरली पर्वतरांग. तिच्या कुशीत शांत पहुडलेलं भंडारदरा धरणाचं रात्रमग्न तळं. तपाला बसलेल्या एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखा दुर्गराज रतनगड समोर दिसतो आहे. त्याचा पूर्वेचा शेजारी आणि आडवाटेचा पहारेकरी पाबरगड हात पालवतोय. दरम्यान विस्तीर्ण पसरलेली खोल खोल रानं, त्यातून वळणं घेत पुढं जाणारी ती डांबरी सडक. हे झाड, मग ते झाड अशी काजव्यांची झाडंच झाडं पाहत मस्त रमतगमत फिरण्यातली मौज आपण अनुभवतो आहोत. ती नवलाई आणि काजव्यांची ही मायावी दुनिया पाहत पुढं पुढं जात आहोत.
आता रात्र सरते आहे. आपलं मन काही तृप्त होत नाही. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखावतेच आहे. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्र जणू कणाकणांनी-अंगाअंगानी फुलारलीय, मोहरलीय! ऐन अमावास्येच्या दिवशी रानभर सांडलेलं हे हसरं चांदणं बघणं हा केवळ अवर्णनीय आणि अलौकिक अनुभव आपण घेतो आहोत. काजव्यांचे विलोभनीय प्रकाशपर्व पाहताना त्याची अपूर्वाई मनाला मोहित करते. स्वर्गीय सुख यापेक्षा वेगळं नसल्याची साक्ष मनोमन पटत राहते! ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाशफुले उधळतेय!
रानावर सांडलेलं रात्रीचं चांदणं अंगावर लेवून तसंच घरी जावं.. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी रम्य रात्र.. जिवाला आल्हाद देणारे ते ताज्या हवेचे श्वास मिटता मिटत नाहीयेत. मग हा अनुभव केवळ अनुभव राहत नाही, ती जणू मर्मबंधातली ठेवच बनून जाते. ऋतुचक्र पुढे सरकत राहते. पुढच्या वर्षी मे-जून येतो. मित्र-मैत्रिणींच्या कानगोष्टी होतात. नक्षत्रंची, दिव्यांची झाडा-झाडांवर केलेली आरास पुन्हा खुणावू लागते. रसिकांची पाऊलं अलगद त्या दिशेने पडू लागतात. आषाढी-कार्तिकीला जाणा:या वारक:यांसारखी..
काजवे.. एक पाऊस संकेत!
 
काजव्यांची वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वरूपाची वर्दी देतात, असं इथले स्थानिक आदिवासी सांगतात. मोसमी पाऊस दाखल झाला की पुढे तो चांगलाच ताल धरतो. पुढं त्याचं रौद्रभीषण तांडव सुरू होतं. या धुवाधार पर्जन्यवृष्टीमुळे इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राची अखेर होते. तशी ही ‘मयसभा’देखील संपून जाते!
 
केवळ तुझ्याचसाठी.
 
काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटकच! सहा पाय आणि पंखाच्या दोन जोडय़ा असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. लहान झुरळाइतक्या आकाराच्या या किटकाचे शरीर तीन भागात विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणा:या, बागडणा:या या किटकाला दोन मोठे डोळे असतात. 
दरवर्षीच्या मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरू होते. सुरुवातीला त्यांची संख्या अगदीच नगण्य असते. वातावरणातला दमटपणा आणि आद्र्रता यांचे प्रमाण जसजसे वाढत जाते, तशी काजव्यांची संख्याही भरपूर वाढते. जून महिन्याच्या मध्यार्पयत त्यांच्या संख्येत भूमिती पद्धतीने वाढ होते. मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते, तेव्हा या भागातल्या अनोख्या काजवा महोत्सवाचा ख:या अर्थाने ‘क्लायमॅक्स’ झालेला असतो!
मे-जून महिन्यांचे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजनन काळ असतो. आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी हा नर जातीचा कीटक चमचम करतो. काजव्यांचे प्रकाशमान होणो हेदेखील त्या-त्या विशिष्ट प्रजातीवर अवलंबून असते. त्यावरूनच मादीला आपल्या प्रजातीचा जोडीदार शोधणो शक्य होते. अंडी, अळी, कोश असा जीवनप्रवास करणा:या काजव्याच्या अळीचे दोन आठवडय़ांत प्रौढावस्थेत रूपांतर होते. काजवा निशाचर आहे, तसाच तो रजनीसखाही आहे.
जगभरात काजव्यांच्या जवळपास दोन हजार प्रजाती आहेत. ‘कोलिओऑप्टेरो’ नावाच्या भुंग्याच्या कुळात काजव्यांचा समावेश होतो. अळीतून प्रौढावस्थेत जातो तेव्हा काजवा स्वयंप्रकाशी बनतो. त्याची लांबी दोन ते अडीच सेंटीमीटर असते. मंद काळसर किंवा पिवळा तांबूस रंगाच्या या कीटकाच्या मादीपेक्षा नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात. तुलनेने माद्या काहीशा सुस्त असतात. मऊ, मृदुकाय खाद्य काजव्यांना आवडते, तर बेडूक, कोळी यांसह काही पक्ष्यांचे काजवे हे खाद्य आहे. नर आणि मादीच्या मीलनानंतर नराचे जीवनचक्र थांबते.
काजवा का चमकतो?
 
जगभर निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराचे, रंगांचे काजवे दिसून येतात. पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, तांबडा, पांढरा असे रंग काजवे उधळतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग 510 ते 670 नॅनोमीटर असतो.
काजव्यांच्या शेपटीत एक विशिष्ट अवयव असतो. त्यात ल्युसिफेरीन नावाचं एक रसायन असतं. या रसायनाची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की त्यातून प्रकाश बाहेर पडतो. ही विक्रिया होण्यासाठी ऑक्सिजनबरोबरच कॅल्शिअम, ऊर्जा देणारा एटीपी (अॅडेनोसाईन ट्रायफॉस्फेट) हा रेणू आणि ल्युसीफरेज नावाचं एनझाइम तिथं हजर असणंही गरजेचं असतं. कारण त्या अवयवातला ऑक्सिजनचा रेणू बंदिस्त असतो. त्याला मोकळं करण्याची कामगिरी ल्युसीफरेजची असते. ते झालं की पुढची सारी प्रक्रिया पार पडून काजव्याचं अंग उजळून निघतं. हा प्रकाश विजेच्या दिव्यातून मिळणा:या प्रकाशासारखा असला तरी एक महत्त्वाचा फरकही त्यात असतो.
विजेचा दिवा उजळून निघताना मोठय़ा प्रमाणात उष्णताही निर्माण होते. त्यामुळे तो गरम प्रकाश असतो. पण ल्युसिफेरीनपासून बायोल्युमिनिसन्सच्या प्रक्रियेतून मिळणा:या प्रकाशातून उष्णता निर्माण होत नाही. त्यामुळे तो प्रकाश थंड असतो. हे तसं गरजेचंही आहे. कारण प्रकाश निर्माण करण्याच्या प्रत्येक प्रक्रियेबरोबर विजेच्या दिव्याइतकीच उष्णता निर्माण झाली तर तो काजवा भाजून निघून त्याचाच कोळसा व्हायचा! याशिवाय नायट्रिक ऑक्साइडचा रेणूही या सा:या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पडत असतो. बंदिस्त ऑक्सिजनला सुटं करण्याची जबाबदारी त्याचीच तर असते. या नायट्रिक ऑक्साइडच्या उपलब्धतेवर काजव्याचं नियंत्रण असते. तो उपलब्ध असेल तर ऑक्सिजन सुटा होतो. पण नसेल तर ऑक्सिजन परत आपल्या कोशात जातो आणि प्रकाश नाहीसा होतो. याचाच उपयोग करत तो काजवा मग बटण दाबल्यासारखा प्रकाश निर्माण करतो किंवा त्याची निर्मिती बंद करून टाकतो. ही प्रक्रिया झटपट होत असल्यामुळं दिव्याची उघडझाप झाल्यासारखा काजवा चमकू लागतो. रात्रीच्या वेळी हे दृश्य पाहणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद आहे. 
 
काजवे बघताना.
 
काजवे पाहताना भान हरपून जाते. म्हणूनच काही खबरदारी घेण्याची आवश्यकता असते. रात्रीच्या काळोखात काजवे पाहताना शक्यतो रस्त्यावर उभे राहूनच हे दृश्य पाहावे. रस्त्यावरून पायी फिरत या दुनियेची सैर करण्यातून निराळा आनंद मिळतो. जंगलात आत आत घुसू नये. कोणतीही आगळीक करू नये. पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्यानं एखादा पाऊस झाला की, बिळात पाणी घुसल्याने विषारी साप बाहेर येतात. जागा निसरडी झालेली असते. उंचसखल भूभागाची जाणीव ठेवावी. शक्यतो पायात बूट घालावेत. काजवे पाहताना साधारण पाचेक मिनिटं एकाच झाडाकडे एकटक पाहात राहावे. काळोखी रात्र असल्यास काजवे पाहायला मजा येते.
रात्रीच्या मातीत पेरलेल्या सोनबिया.
 
जगभरातल्या जीवशास्नच्या अभ्यासकांपेक्षाही या काजव्यांनी निसर्गप्रेमी, लेखक, कवी यांनाच जास्त भुरळ घातल्याचे दिसते. जेम्स रिल या सुप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकाने ‘रात्रीच्या मातीत पेरलेल्या सोनबिया’ असे काजव्यांचे मोठे चपखल शब्दांत वर्णन केलेय. मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार कवी ग. दि. माडगूळकर यांनी काजव्याचा मंद प्रकाशदेखील सतावतोय. अशी लाडीक तक्रार आपल्या एका कवितेत केलीय. ‘अंधारच मज हवा, काजवा उगा दाखवतो दिवा’ असे ते लिहून ठेवतात! कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या उत्तुंग प्रतिभेला काजव्यांनी भुरळ घातलेली दिसते. ‘नवलाख तळपती दिवे, उतरली तारकादळे..’ असे काव्य मग त्यांच्या पोटी जन्म घेते. प्रसिद्ध गीतकार नौशाद काजव्यांच्या दिवसांत कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी येथील विश्रमगृहात राहायला येत. हिंदी सिनेमातील अनेक गाणी त्यांनी इथेच लिहिली आहेत.