- डॉ. सदानंद मोरे
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे पहिले नेते होत. टिळकांमुळे ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात असंतोषाचा उद्रेक पेटला आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याची ऊर्मीही उमटली. टिळकांचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वातंत्र्याची चळवळ आटोक्यात आणता येणार नाही, अशी ब्रिटिश सत्ताधार्यांची खात्री पटली; पण ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. एकतर कायद्याने चालणारे सभ्य लोकांचे सरकार अशी ब्रिटिश सरकारची ख्याती होती आणि दुसरे असे, की स्वत: टिळक कायद्याच्या र्मयादांचे उल्लंघन न करता केसरी, मराठा या वृत्तपत्रांमधून लेखन करीत असत; पण तरीही सरकार संधीची प्रतीक्षा करीत जणू टपूनच बसले होते.
तशी संधी सरकारला लवकरच मिळाली. बंगालची फाळणी झाल्यानंतर, देशभर तिच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. फाळणीला विरोध करण्याची साधने म्हणून काँग्रेस पक्षाने स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन प्रभावी हत्यारे उपसली होती; पण बंगालमधील जहाल देशभक्त तरुणांचे तेवढय़ाने समाधान होईना. त्यांनी शस्त्राचाराचा मार्ग पत्करला. खुदीराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी या तरुणांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड यांची हत्या घडविण्यासाठी बॉम्बस्फोट घडविले. त्यात न्यायाधीश वाचले; पण निरपराध ब्रिटिश महिलांचा बळी गेला. ब्रिटिश सत्ताधारी चवताळून उठले व त्यांनी दमनतंत्र सुरू केले.
या वातावरणात ‘केसरी’मधून अग्रलेख छापून आले. खरे तर हे अग्रलेख स्वत: टिळकांच्या लेखणीतून उतरले नव्हतेच; पण संपादक या नात्याने त्यांची जबाबदारी टिळकांवर येत होती. सरकारने संधी साधून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. अर्थात, खुद्द सरकारमध्येही याबाबत मतभेद होते; पण शेवटी व्हायचे ते झालेच.
मुंबईच्या कोर्टात न्या. दिनशा दावर यांच्यापुढे हा खटला चालला, टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली. विशेष म्हणजे, टिळकांनी स्वत:चा बचाव स्वत:च केला. कारण असे, की एकदा तुम्ही बचावासाठी वकील दिला की; मग तुम्हाला त्याच्या तंत्राने चालावे लागते. व्यावसायिक नीतीने बांधला गेलेला वकील अशिलाची सुटका हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून खटला चालवितो. टिळकांना स्वत:चे निर्दोषित्व सिद्ध करण्यापेक्षा या निमित्ताने भारतीय नागरिकांच्या हक्कांचे सर्मथन करून ते जगापुढे मांडण्यात अधिक स्वारस्य होते. आपल्या बचावाच्या भाषणात त्यांनी हे बरोबर साधले. परिणाम ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी.
टिळकांनी तुरुंगातील दिवस कसे काढले, हा एक वेगळाच विषय आहे. एकच गोष्ट सांगायची म्हणजे या काळात त्यांनी ‘गीतारहस्य’ या महाग्रंथाची निर्मिती केली.
टिळकांचा भारतातील अभावही परिणामकारक ठरला. स्वातंत्र्यलढय़ाची चळवळ पूर्णपणे ठप्प झाली. विशेषत: पुण्यातील टिळकांचे अनुयायी तर अक्षरश: दिवस मोजीत होते. विठोबाशिवाय पंढरपूर जसे असेल, तसे टिळकांशिवाय पुणे, अशी कल्पना एका कवीने केली ती यथार्थच होती.
शेवटी तो म्हणजे सुटकेचा दिवस उजाडला. सोमवार, दि. ८ जून १९१४ रोजी दुपारी टिळक मंडालेच्या त्या तुरुंगातून बाहेर पडले. मोटारीने रंगून गाठल्यानंतर रंगूनहून बोटीने त्यांना मद्रासला रवाना करण्यात आले. तिथून पुण्यापर्यंतचा प्रवास रेल्वेने. अर्थात, ही सर्व कारवाई अत्यंत गुप्तपणे करण्यात आली. त्यासाठी पुण्याहून काही पोलीस अधिकारी ब्रह्मदेशात रवाना करण्यात आले होते.
१५ जून रोजी मध्यरात्रीनंतर टिळकांची गाडी पुण्याजवळ आली; पण ती पुणे स्टेशनवर पोहोचायच्या आतच तिला अलीकडे हडपसर स्टेशनवर थांबविण्यात आले. टिळकांना तेथे उतरवून घेऊन पोलिसांच्या गाडीतून राहत्या घरी म्हणजे गायकवाड वाड्याच्या दारात सोडण्यात आले. हा सर्व प्रकार इतका अनपेक्षित होता, की वाड्याचा रखवालदारही बुचकळ्यात पडला. आत जाऊन त्याने टिळकांचे भाचे धोंडोपंत विद्वांस यांना बाहेर घेऊन आले आणि मग टिळकांचा आपल्या हक्काच्या घरात प्रवेश झाला.
टिळक सुटण्याची बातमी दुसर्या दिवशी पुण्यात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वार्यासारखी पसरली. त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रीघ लागली. पहिले काही दिवस हा दर्शन देण्याचा कार्यक्रम टिळकांना पुरला. श्री. म. माटे यांनी ‘चित्रपट’ या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे, ‘‘गायकवाड वाड्यातील मैदानात टिळक एका मंचावर उघडेच बसले होते, सहस्त्रावधी लोक येऊन नमस्कार करून जात होते.’’ रविवार, दि. २१ जून रोजी पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने गायकवाड वाड्याच्या पटांगणातच अण्णासाहेब पटवर्धनांच्या अध्यक्षतेखाली पुणेकरांनी टिळकांना पान-सुपारी केली. पाचएक हजारांचा समुदाय उपस्थित होता. खाडिलकर केळकरांशिवाय दादासाहेब खापर्डे, दादासाहेब करंदीकर, भारताचार्य वैद्य, वि. गो. विजापूरकर असे मातब्बरही मुद्दाम आले होते. ‘टिळकमहाराज की जय’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. सरकारला उत्तर देताना टिळकांनी ‘‘सहा वर्षांपूर्वी मी आपल्याशी ज्या तर्हेने वागलो, त्याच तर्हेने व त्याच नात्याने व त्याच पेशाने मी यापुढे वागेन.’’ असे जाहीर वचन दिले. टिळक आपल्या या वचनाला कसे आणि किती जागले, याला इतिहासच साक्षी आहे.
टिळक तुरुंगवासात असताना सहा वर्षांच्या दीर्घ कालखंडात टिळकांचे अनुयायीही शांत आणि स्वस्थ होते. टिळकांच्या आगमनाने त्यांनाही हुरूप आला. राजकारणाचे चक्र पुन्हा फिरले. पुढची सहा म्हणजे, १९१४ ते १९२0 ही वर्षे स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासातील विशुद्ध टिळकपर्वच होय. हा सारा इतिहास ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला त्या श्री. म. माट्यांनी टिळकांच्या परतण्याचे वर्णन त्याच्या परिणामांसह साक्षेपी साराशांने केले आहे.
‘‘महाराष्ट्राचे भाग्य परत आले. पराक्रम पुन्हा जागा झाला. तेजाने नवी दीप्ती प्राप्त झाली. बुद्धीला नवे स्फूरण मिळाले आणि अखिल भारतीय राष्ट्रीय चळवळीचे पुरस्कर्ते लोकमान्यांकडे नव्या आशेने पाहू लागले.’’
त्यांची ही आशा टिळकांनी अजिबात विफल होऊ दिली नाही. आपल्या मृत्यूपर्यंतच्या पुढील सहा वर्षांत त्यांनी स्वातंत्र्याचा लढा अशा एका टप्प्यावर नेऊन ठेवला, की आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य देणे, ब्रिटिशांना अपरिहार्य ठरावे.’’
(लेखक संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व विचारवंत आहेत.)